फॅशनमध्ये आधुनिकताही टिकून रहावी आणि बाजारातील ठोकळेबाज कपडय़ांऐवजी काहीतरी वेगळं मिळावं यासाठी भारतीय पारंपरिक कशिदाकामाचा वापर करायला हरकत नाही. जागतिक फॅशनमध्ये सध्या याचीच चलती आहे.

मागच्या वर्षी ‘डोल्चे अ‍ॅण्ड गबाना’ ब्रँडने आखाती देशांतील स्त्रियांना डोळ्यांसमोर ठेवून बाजारात आणलेलं खास हिजाबचं कलेक्शन जगभरात चच्रेचा विषय ठरलं. लाँग मॅक्सी ड्रेस, अंगरखा आणि डोक्यावर स्कार्फ असं या कलेक्शनच स्वरूप होतं. गेल्या काही वर्षांत आखाती देशातील स्त्रिया हा एक बडा ग्राहकवर्ग भारतासोबतच जगभरातील मोठय़ा फॅशन ब्रँड्सना मिळाला आहे. या ग्राहकवर्गाला आपल्या ब्रँडकडे वळविण्याचे प्रयत्न जगभरात होत आहेत. ‘डोल्चे अ‍ॅण्ड गबाना’लासुद्धा त्यांच्या ब्रँडची शाखा या देशांमध्ये सुरू करायची होती. पायघोळ, संपूर्ण शरीर झाकणारा हा बुरखा किंवा हिजाब हा आखाती देशातील स्त्रियांच्या पेहरावातील महत्त्वाचा घटक आहे. मुळात आखाती देशांच्या स्त्रिया त्यांच्या लुक्सबद्दल चोखंदळ असतात आणि कपडे, बॅग्स, शूज, ज्वेलरीवर त्या पाण्यासारखा पसा खर्च करायला तयार असतात. अर्थात आखाती स्त्रियांना नजरेसमोर ठेवून हे कलेक्शन तयार केलेलं असलं तरी यातील स्कार्फचा भाग वगळल्यास मॅक्सी ड्रेस किंवा इव्हिनग गाऊनच्या स्वरूपात हे कपडे जगभरातील कोणतीही स्त्री सहज वापरू शकणार होती. हे कलेक्शन इतकं प्रसिद्ध झालं, की त्यानंतर हिजाब कलेक्शन्सची लाट आली.

जगभरातील नावाजलेले ब्रँड्स आपल्या शाखा विस्तारण्याचे प्रयत्न सतत करत असतात. त्यामुळे प्रत्येक देशातील नागरिक, त्यांची संस्कृती, राहणीमान यांचा अंदाज घेत प्रसिद्धीचे विविध मार्ग स्वीकारतात किंवा त्यांच्या उत्पादनांमध्ये आवश्यक बदल करतात. अगदी भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नुकत्याच प्रदíशत झालेल्या ‘ब्युटी अ‍ॅण्ड बीस्ट’ सिनेमातील बेलाच्या कपडय़ांवर गुजरातमधील कारागिरांचं आरीवर्क, कॉटन, जकाड अशा भारतीय कापडांचा वापर केला होता. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी या बाबींचा उपयोग भारतीय प्रेक्षकांचं सिनेमाकडे लक्ष वेधण्यासाठी कुशलतेने करण्यात आला. चार्ल्स लुटविज डॉजसन या ब्रिटिश लेखकाच्या ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’मधील अ‍ॅलिसपासून प्रेरणा घेत ब्रिटिश डिझायनर अलेक्झांडर मक्वीनने २००८ मध्ये एक कलेक्शन तयार केलं. पण त्यासाठी त्याने कल्पना घेतली भारतीय पेहरावांपासूनची. ब्रिटिशांच्या वसाहतवादाच्या काळातील गाऊन्सच्या स्टाइलला भारतीय टेक्सटाइलमधील मोटीफ, दागिने, रंग याची जोड देत अ‍ॅलिसचा एक नवा अवतार त्याने सादर केला. मागच्या वर्षी जगभरातील फॅशन ब्रँड्सना ‘इक्कत’ टेक्सटाइलमधील बुट्ट्यांनी भुरळ घातली होती. कित्येक जगप्रसिद्ध ब्रँड्सनी त्यांच्या कलेक्शन्ससाठी भारताकडून प्रेरणा घेतली आहे. मागील वर्षीपासून भारतीय डिझायनर्सनीसुद्धा कलेक्शन्ससाठी पारंपरिक कला, एम्ब्रॉयडरी, कापडांची मदत घेण्यास सुरुवात केली.

या सगळ्या प्रक्रियेत या पारंपरिक कला, पेहराव यांना नवा लुक मिळतो. कारण प्रत्येक डिझायनरची नजर वेगळी असते. त्याची गरज, कल्पनाशक्ती, ग्राहक या सगळ्यांना नजरेसमोर ठेवत तो त्या कलेतून नेमका त्याला अपेक्षित धागा उचलतो आणि कलेक्शन तयार करतो. त्यातूनच डिस्को लुकमध्ये मिरर वर्कला जागा मिळते किंवा मीनाकारी पेंटिंग रेड काप्रेट गाऊनवर अवतरतात. यामध्ये ग्राहकाची आवड हा भाग महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ, ‘शनेल’ ब्रँड साडय़ांवरून प्रेरणा घेऊन साडय़ाच डिझाइन करू शकत नाही. कारण प्रत्येक ब्रँडची विशिष्ट स्टाइल असते. हा ब्रँड त्यांच्या मस्क्युलीन लुक, स्ट्रेट फिट कपडय़ांसाठी प्रसिद्ध आहे. भारतीय ग्राहक त्यांच्याकडे साडय़ा खरेदी करण्यास जाणार नाही. त्यासाठी भारतीय डिझायनर्स, ब्रँड्स आहेतच. दुसऱ्या बाजूला प्रत्येक ब्रँड त्यांचं कलेक्शन जगभरातील ग्राहकाला डोळ्यासमोर ठेवून बनवत असतो. युरोपातील स्त्री कितीही आकर्षक असली, तरी साडी खरेदी करायला जाणार नाही. मग अशा वेळी या साडीच्या ड्रेप ड्रेसच्या स्वरूपात ग्राहकांच्या समोर आणतात. ‘एली सा’ या रेड काप्रेट गाऊनसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या ब्रँडने साडीकडून प्रेरणा घेत, सुंदर गाऊन गेल्या काही वर्षांत बनविले आहेत. ‘हम्स’ ब्रँडने जोधपुरी पँट्स, नेहरू जॅकेट, साडी, दुपट्टा ड्रेप यांचा वापर करून इव्हिनग वेअर कलेक्शन केलं. डिझायनर इसाबेल मॅरंटने राजस्थानी एम्ब्रोयडरी, टेक्सटाइलला अमेरिकन स्ट्रीटवेअरची जोड देत कलेक्शन केलं. वेरा वँगच्या एका कलेक्शनमध्ये पार्टी वेअर ड्रेसेससाठी तिने ब्रोकेड, जकाड कापड, भारतीय एम्ब्रॉयडरी, ब्राइट रंग यांचा वापर केलाय. हिमालयीन प्रदेशातील उबदार पेहराव, रंग, मोठाले मोटीफ्सचा वापर करत डिझायनर स्टेला जेन्सने िवटर कलेक्शन सादर केलंय. भारतीय टिकलीच्या आकाराला भारतीय एम्ब्रॉयडरीची जोड देत डिझायनर नईम खानने इव्हिनग ड्रेसेस्चं कलेक्शन तयार केलंय. ‘लुई विटॉन’ ब्रँडने मेन्सवेअर कलेक्शनसाठी भारतीय ब्राइट रंग आणि मिरर वर्कसारख्या एम्ब्रॉयडरीची मदत घेतली होती.

थोडक्यात सागायचं झाल्यास, पारंपरिक कलांचं जागतिकीकरण करण्याची ही एक प्रक्रिया. बदलत्या काळानुसार या कला टिकवून ठेवायच्या असल्यास या प्रक्रियेतून त्यांनी जाणं हे महत्त्वाच असतं. नाहीतर या कला काळानुसार अदृश्य होऊन केवळ संग्रहालयाच्या काचेच्या खिडकीपलीकडून पाहून उसासे द्यायची पाळी येते. हॉटेलमध्ये पास्ता, नुडल्स अशा आंतरराष्ट्रीय पदार्थामध्ये स्थानिकांच्या चवीनुसार बदल केले जातात, तसेच प्रयोग आज टेक्सटाइल, एम्ब्रॉयडरीच्या बाबतीत करणं गरजेचं आहे. प्रत्येक पेहरावाचा एक काळ असतो. त्यावेळीच्या भौगोलिक, सामाजिक पाश्र्वभूमीवर तो आधारलेला असतो. अगदी साडी नेसायची पद्धतसुद्धा काळानुसार बदलत गेली. त्या साडीचा आज गाऊन होणं हाही याच बदलाचा एक भाग आहे. गेल्या वर्षभरात पारंपरिक कापड, एम्ब्रॉयडरी पुन्हा नव्या स्वरूपात रॅम्पवर येऊ लागली आहे. अगदी दैनंदिन आयुष्यातसुद्धा कॉलेजवयीन मुलं लांब कुर्ती आणि हॉट पँट, स्कर्ट किंवा धोती पँटचा वन पीस ड्रेस, िपट्रेड कुर्तीवर रंगीबेरंगी स्कार्फ असे काही भन्नाट लुक करतात. यूटय़ूब, फॅशन ब्लॉग्सच्या माध्यमातून अशा भन्नाट स्टायिलगचे बरेच व्हिडीयो, टिप्स पाहायला मिळतात. अशा प्रयोगांमुळे लुकमधला आधुनिकपणाही टिकून राहतो आणि बाजारातील ठोकळेबाज कपडय़ांऐवजी काहीतरी वेगळं घातल्याचं मिरवतासुद्धा येतं.

परंपरेचा आधुनिक बाज कसा टिकवायचा?

* भरजरी एम्ब्रॉयडरीचा कुर्ता रोज फारसा वापरता येणार नाही, पण त्याचंच जॅकेट असेल, तर सिंपल टी-शर्ट आणि जीन्सवरसुद्धा ते उठून दिसेल.

* फुलकारी केलेला लांब दुपट्टा एखाद्या हिप्पी स्कर्ट आणि गंजीवर कफ्तान स्कार्फ म्हणून वापरता येईल.

* साडीपासून तयार केलेला घेरदार गुडघ्याच्या उंचीचा स्कर्ट आणि सफेद शर्ट कोणत्याही पार्टीला हटके लुक ठरू शकतो.

* शर्ट किंवा ब्लेझरला शोल्डर पॅड स्वरूपात जरदोसी एम्ब्रॉयडरीचा पॅच करता येऊ शकतो. पार्टी किंवा डिस्कोमध्येही हा शर्ट तुम्ही मिरवू शकता.

मृणाल भगत viva@expressindia.com