चॉकलेट्सच्या दुनियेची सफर करताना चॉकलेट्सबरोबर नाव घेतलं जातं त्या कँडीज, च्युईजबद्दल बोलायलाच हवं. च्युईज म्हणजे तोंडात घोळवत, निगुतीनं चघळत, सावकाश चावून खायचा प्रकार. यातल्या वैविध्याबद्दल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरळसोट रस्त्याने गाडी चाललेय. काही हालचाल नाही. फक्त स्टेअरिंगवर हात. रस्त्याच्या आजूबाजूला तीच झाडे, तेच डोंगर आणि तीच घरे..बराच वेळ..तेच आणि तेच..मग एक अचानक तीव्र वळण येतं आणि सारं एका क्षणात पालटून जातं. जणू त्या वळणापासून नवा प्रवास सुरू होतो. हो, तसंच काहीसं, आज हा लेख लिहिताना मला वाटत आहे! आजवर तुम्ही सर्वानी ‘चॉकलेट अध्याय’ मनापासून वाचत आला. वाचता वाचता त्यातील काही तुमच्या पोटातही गेली असतील आणि त्यातील काहींची चव अजूनही तुमच्या जिभेवर रेंगाळत असेल. माझा अंदाज चुकणार, ठाऊक आहे मला!
तर आजचं वळण आहे ‘च्युईज’चं. याला मराठीत शब्द ‘गोळी’ असा असू शकतो; गोळ्या बिस्किटांतली गोळी. पण च्युइज म्हणजे फक्त गोळी नव्हे. कारण ‘कन्फेक्शनरी’ क्षेत्रात चॉकलेटवर जितके विविध प्रयोग केले जातात, त्याही पलीकडे जाऊन ‘च्युईज’वर केले जातात. इतके की त्याला काही मर्यादा नाहीत. च्युइजची लोकप्रियताही मोठी. कारण च्युइजची रसाळ चव जिभेवर दीर्घकाळ रेंगाळणारी असते. ते हळूहळू चावता चावता, त्या चवीचा आस्वाद घ्यायचा असतो. चॉकलेटचं आणि पाण्याचं वाकडं आहे, तसं ‘च्युईज’चं नाही. अगदी कलिंगड आणि द्राक्षाचा रस ओतूनही ते तयार करता येतात आणि चॉकलेट फ्लेवर्समध्येही. च्युइझ कितीही दिवस टिकतात आणि फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. आता च्युइज कुणाला म्हणायचं? मुंबईच्या बाहेर लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर आदी ठिकाणी कधी सुटीसाठी गेलात तर घोडेस्वारी वा अन्य कुठेतरी रपेट करताना पहिल्यांदा तुमच्या डोक्यात येईल ती लोणावळ्याची चिक्की; परंतु चिक्कीचा बांधा चिवट. म्हणजे दात- हिरडय़ांना भरपूर व्यायाम देऊन तिचा पुरेपूर आस्वाद घेत पोटपूजा करणं त्यात आलं. ‘च्युईज’ही दातांना व्यायाम देणारे पण चिक्कीपेक्षा कोमल. विविधरंगी आणि विविध रसांनी पुरेपूर. महाबळेश्वर, लोणावण्याची जेली स्वीट्स हा ‘च्युइज’मध्ये मोडणारा प्रकार. ‘च्युईज’ची विविध रूपं आहेत. कॅरेमल, ग्रॅनोला, नट्स, आणि फळांमध्येही च्युईज साकारले जातात.
तुम्हाला काय खायला आवडतं, त्यानुसार च्युइजची चव, टेक्सचर, आकार आणि पॅकिंगही बदलणार. पाहिजे तितकी विविधता आहे इथे. आता भारतात उपलब्ध च्युइजमध्ये लोकप्रिय आहेत ‘परफेटी फ्रुटेला’चे बारच्या आकारातील आणि स्ट्रॉबेरी, लिंबू, ऑरेंज आणि काळ्या द्राक्षांच्या ‘फ्लेवर’मधील ‘च्युईज’. चिमुकल्यांमध्ये या ‘च्युईज’ कमालीच्या लोकप्रिय आहेतच, याशिवाय मोठय़ांनाही या ‘च्युईज’ आपल्या लहानपणाकडे घेऊन जातात. ‘परफेटी फ्रुटेला’ अनेक फ्लेवर्सच्या गोळ्या आणि चकत्याही तयार करते. यात ‘मेन्थॉस च्युईज ड्रगीज’ याचा समावेश आहे. पुन्हा कोला, कलिंगड आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये ही सारी जादूई चव सामावलेली आहे. चवीत कधीच मागे न राहणाऱ्या सदाबहार ‘नेस्ले एक्लेअर्स’ आणि ‘कॅडबरी चॉक्लेअर्स’चेही नाव यात आवर्जुन नमूद करावे लागेल. चॉकलेट कॅरेमलच्या आवरणात चॉकलेट-साखरेची चव लपलेली असते.
आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचा उल्लेख करायचा झाल्यास ‘च्युई लेमोनेड’ आणि ‘फ्रेंड्स कॅण्डी’ यांचा यात अग्रक्रम लागतो. लिंबू, सफरचंद, द्राक्षे, ऑरेंज, चेरी असा एकत्रित चवीचा ठेवा यात आहे. ‘क्वेकर च्युईज चॉकलेट चिप्स’, ‘पीनट बटर च्युईज’, ग्रॅनोला बार आणखी बरंच काही.. याशिवाय ‘वॉरहेड’मध्ये हिरवे सफरचंद आणि इतर फळांचा संगम झालेला आहे. असे कितीतरी ब्रॅण्ड्स सांगता येतील.
चिक्की, गोळी अशा देसी च्युईजमध्ये एक स्थानिक नाव घ्यायलाच हवं. मुंबईत मिळणारा ‘लाहोरी हलवा’. रंगीबेरंगी, लुसलुशीत, च्युई.. याची गोडीही अनेकांच्या जिभेवर रेंगाळत असेल. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या का? आपल्याकडेच या च्युइजचं केवढं वैविध्य आहे राव! विदेशी ब्रॅण्ड्स हवेत कशाला? लहानपणापासून अशाच ‘च्युईज’नी आपल्या जिभांना चवीचा गुलाम बनवलं आहे!

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about different chocolates
First published on: 15-04-2016 at 01:13 IST