तेजश्री गायकवाड

भारतीय संस्कृतीबद्दल आणि भारतीय फॅशन इंडस्ट्रीबद्दल असलेली पॅशन दोन तरुण डिझायनर्सना एकत्र घेऊन येते आणि त्यांचा प्रवास सुरु होतो. भारतीय आर्किटेक्चर, संगीत, क्रिएटिव्हिटी, फाइन आर्ट्स अशा अनेक गोष्टींवर काम करत, अभ्यास करत या जोडगोळीने २००८ साली स्वत:चा बॅ्रण्ड सुरू केला. आणि आजही मोनिका शाह- करिश्मा स्वाली या दोघीही एकत्रितपणे, त्याच उत्साहाने, जोशाने हा ब्रॅण्ड पुढे नेत आहेत. एके काळच्या या मैत्रिणी आता एकमेकींबरोबर जाऊबाईचे नाते निभावत आहेत आणि तरीही त्यांच्यातली मैत्री तसूभरही कमी झालेली नाही. त्यामुळेच त्यांचा ‘जडे’ हा ब्रॅण्ड फॅशन इंडस्ट्रीत आपली मुळं घट्ट रोवून उभा आहे..

सेम पॅशन असलेल्या या डिझायनर जोडीने २० वर्षांपूर्वी एकत्र काम करायला सुरुवात केली होती. मोनिका आणि करिश्माने आपल्या घरच्या व्यवसायातच काम करायला सुरुवात केली. दोघीही एकाच घरात लग्न करून आल्यानंतर त्यांनी घरच्याच ‘चाणक्य’ या एक्सपोर्ट हाऊससाठी काम करायला सुरुवात केली. ‘चाणक्य’ हाही आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड आहे. आमचे आता इटलीतही कार्यालय आहे. या ब्रॅण्डअंतर्गत आम्ही गुच्ची, अरमानी सारख्या अनेक नामांकित फॅशन ब्रॅण्डबरोबर काम के ले, असे या दोघी सांगतात.या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसाठी संशोधन सल्लागार म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्या वेळी जेव्हा आम्ही नव्याने डिझायनर म्हणून काम सुरू केले तेव्हा आम्हाला भारतातील नववधूच्या कपडय़ांमध्ये फरक दिसू लागला. जेव्हा आम्ही लग्न के ले होते तेव्हा, लग्नाचा पोशाख एक तर खूपच भडक असायचा. त्या वेळी आम्हाला वाटले की, नववधूंना यापलीकडे काही तरी अद्वितीय, मोहक पण आधुनिक असे काही तरी द्यायला हवं. असं काही तरी ज्याने पारंपरिकताही जपली जाईल आणि आताच्या काळातील आधुनिक विचारांनुसार ते भडकही असणार नाहीत. परिपूर्ण समतोल साधणारे कलेक्शन काढण्याच्या विचारातूनच आम्ही ‘जडे’ (JADE) बाय मोनिका शाह आणि करिश्मा स्वाली या बॅ्रण्डची सुरुवात केली, असे त्या सांगतात.

मोनिका आणि करिश्मा यांच्या प्रत्येक कलेक्शनमध्ये तुम्हाला भारतीय संस्कृती, भारतीय कलाकुसर प्राधान्याने दिसून येते. भारतीय संस्कृतीच्या पायावरच आधुनिक नक्षीकाम, रंग यांचा मेळ साधत त्या आपले क लेक्शन डिझाइन करताना दिसतात. फॅ शन डिझायनर म्हणून सगळ्यात जास्त आम्हाला नववधूचे ‘ब्राईड टू बी’ हे सुंदर स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया जास्त आव्हानात्मक पण तरीही अत्यंत समाधानकारक वाटते, असे त्या दोघी आवर्जून सांगतात. मोनिका शाह आणि करिश्मा स्वाली एक अशी डिझायनर जोडगोळी आहे ज्यांचे वेडिंग कलेक्शन सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. त्यांनी नुकत्याच झालेल्या ‘व्होग वेडिंग शो २०१९’मध्ये ‘ला मियुझ मस्टीक’ – ब्राइडल कुटूर २०१९/२० हे वेडिंग कलेक्शन सादर केले. ‘आमच्या या कलेक्शनमध्ये मस्टीक मियुझची कथा सांगण्यात आली आहे. या कलेक्शनमागचे हे इन्स्पिरेशन मोहक परंतु रहस्यमय गोष्टींनी परिपूर्ण आहे. लग्नाच्या वेळी वधू ही प्रत्येक सेलिब्रेशनमधली स्टार असते, प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये तिचीच चर्चा असते. यालाच शोभेल असे आमचे हे कलेक्शन आहे. यात सुंदर स्कर्ट आणि ब्लाऊज, मोठे लेहेंगा, शार्प आणि अत्याधुनिक जॅकेट्स आले आहेत. रंगांच्या पॅलेटमध्येही खूप विविधता आहे. अगदी फिकट तपकिरी रंगापासून ते हॉट गुलाबी, निळा, सोनेरी, चंदेरी असे सगळेच रिच रंग या कलेक्शनमध्ये आहेत. रेशम, ऑर्गनझा, टय़ूलसारख्या फॅब्रिकवर सुंदर भरतकाम केलेले आहे. सिल्हाऊट्स अगदी आरामदायी आहेत. जटिल लेस आणि चमकदार भरतकाम केलेले आधुनिक डिझाइनचे काठ जोडत एकाच वेळी भरजरी आणि नाजूकतेची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही या कलेक्शनच्या माध्यमातून केला आहे, असे त्या सांगतात. लग्नाच्या प्रत्येक प्रसंगात घालण्यासाठी काही तरी नवीन, वेगळा पोशाख तुम्हाला आमच्या या कलेक्शनमध्ये मिळेल, असे त्या विश्वासाने सांगतात.

इतकी वर्षे या दोघी एकत्रितपणे हसतखेळत काम करत आहेत. दोन मुली आणि त्यातही जर त्या सासरच्या नात्यात एकत्र असतील तर एकमेकांशी जुळवून काम करणे हे अवघडच गणित असते. मात्र आपल्यासाठी हे शक्य झाले याला एक तर लग्नाआधीपासून आम्ही मैत्रिणी होतो, असे त्या म्हणतात. पण आमच्यात वाद होतच नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे सांगतानाच या ब्रॅण्डचे व्यवस्थापन सांभाळताना कामाच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कलेक्शन आणि त्या संदर्भातील संशोधनाची जबाबदारी करिश्मावर आहे, तर ब्रॅण्डची डिझाइन्स आणि मार्केटिंगचे काम मोनिका सांभाळते. त्यातही आम्ही प्रत्येक पातळीवर आपापल्या विभागात जे जे काम होते आहे ते एकमेकांना अपडेट करत राहतो. नवनवीन डिझाइन्स, कलेक्शन्सच्या निमित्ताने चर्चा होतातच आणि त्यात मतभेद जरी झाले तरी अंतिमत: त्यातून ब्रॅण्डसाठी फायदेशीर, महत्त्वाची असलेलीच गोष्ट बाहेर पडते. त्यामुळे थोडेसे वादविवादही ब्रॅण्डचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयोगीच असल्याचे त्या सांगतात. डिझायनर म्हणून या वीस वर्षांच्या प्रवासात मोनिका आणि करिश्मा यांनी अनेक उतार-चढाव पाहिले आहेत, असे त्या दोघी सांगतात. यशापयशाच्या मालिकेतील एका प्रसंगाची आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. ‘या प्रवासातील सर्वात खास क्षण म्हणजे जेव्हा आम्ही ‘चाणक्य स्कूल ऑफ एम्ब्रॉयडरी’ची स्थापना केली तो आहे. त्याचे उद्घाटन मारिया ग्राझिया चुरी यांनी केले. आपल्या शिक्षण आणि कौशल्यांचा उपयोग करून घेत या क्षेत्रातील हुशार आणि उज्ज्वल भविष्य असलेल्या मुलींसाठी आम्ही काही तरी करतो आहोत, ही भावनाच आमच्यासाठी खूप खास आहे, असे त्या म्हणतात. ज्या मुलींना या क्षेत्रात येऊन नवीन काही शिकायचे आहे, स्वत:ची स्वप्ने पूर्ण करायची आहेत आणि ज्यांच्याकडे त्यासाठी काही सोर्सच नाही अशा मुलींना आम्ही या स्कूलच्या माध्यमातून मदत करतो आहोत. डिझायनर म्हणून केवळ नवनवीन कलेक्शनच्या निर्मितीपुरते मर्यादित न राहता डिझाइनच्या क्षेत्रातील तरुण मुलामुलींना आम्ही आज मदत करू शकतो हा टप्पाच आमचा प्रवास पूर्ण करणारा आहे, असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

एवढय़ा ग्लॅमरस आणि सतत काही तरी नवीन हवे असलेल्या क्षेत्रात काम करायची इच्छा असलेल्यांना त्या आपला आवाज आणि ओळख व्यक्त करण्यास घाबरू नका, असे ठामपणे सांगतात. काळानुसार दुसऱ्याचे अनुकरण करणे ही गोष्ट खूप मोहात पाडणारी आहे. विशेषत:

फॅ शनच्या क्षेत्रात हा मोह होतो आणि तसे करणे सोपेही आहे. पण हा मार्ग यशाकडे नेणारा नाही, हे त्या अनुभवातून सांगतात. आपल्याला या क्षेत्रामध्ये दीर्घकाळ टिकायचे असेल तर आणखी एक महत्त्वाची आणि आताच्या काळातील एकमेव गोष्ट म्हणजे आपली स्वत:ची वेगळी भाषा असणे आणि त्या भाषेतून आपण जगभरातील माणसे जोडायला हवीत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदाच होतो. तो करून घ्यायला हवा, असेही या दोघी आग्रहाने सांगतात.

viva@expressindia.com