vn12नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
कर्नाटकी आणि हिंदुस्तानी शास्त्रीय गायकीचा सुंदर मिलाफ; त्याचबरोबर पाश्चिमात्य संगीताचीही उत्तम जाण; वर-खाली लीलया फिरणारा आवाज; कमालीची फिरत; आणि सर्वात मुख्य म्हणजे या सर्व गोष्टींचा सुंदर आणि नावीन्यपूर्ण वापर.. मी कुणाबद्दल बोलतोय लक्षात आलंच असेल. ज्या कलाकारामुळे मला माझ्या गायकीची दिशा ठरवता आली; ज्याला मी मनापासून गुरू मानतो, त्या शंकर महादेवन यांच्याबद्दल. या आठवडय़ात (३ मार्चला) त्यांचा वाढदिवस झाला. ‘आयुष्यात शंकर महादेवनसारखे होणे’ हेच माझे साधारण कॉलेजपासूनचे ध्येय आहे!  शंकरजींना ऐकून कोणी फॅन झाला नाही तरच नवल! सादर आहे शंकर महादेवन आणि शंकर-एहसान-लॉय प्ले लिस्ट-
प्ले लिस्टची सुरुवात ‘उर्वशी उर्वशी’ या ‘हमसे है मुकाबला’ मधल्या गाण्याने. एक तर ते गाणेच भन्नाट, त्यातून रेहमान सरांच्या जोडीला येणारा शंकरजींचा आवाज म्हणजे अजूनच मजा! मग अर्थातच ु१ीं३ँ’ी२२. हे गाणे तांत्रिकदृष्टय़ा एका श्वासात गायलेले नसले, तरी जसे गायले आहे तसे गाणे कोणालाच शक्य नाही. संगीत संयोजनानेही हे गाणे आपली उत्कंठा अशी वाढवते आपण आपला श्वास धरून ठेवतो, आपल्यालाच दम लागतो!
‘ब्रीदलेस’नंतर काही काळातच शंकर-एहसान-लॉय हे एकत्र आले. त्यांचा पहिला सिनेमा होता- मुकुल आनंद यांचा- ‘दस’. मुकुल आनंद यांच्या निधनामुळे हा चित्रपट प्रदíशत झाला नाही, पण यातली गाणी मात्र प्रसिद्ध झाली. ‘सुनो गौर से दुनिया वालो’ , ‘माहिया’ ही गाणी तुम्ही ऐकली असतीलच, पण या चित्रपटात आणखी एक गाणे होते, जे मला फारच आवडते, ते शंकरजींनीच गायलेले- ‘चांदनी रूप की, या किरण धूप की..’  फारच सुंदर. हे गाणे तसे फार ऐकले न गेल्यामुळे त्यांनी त्यांच्या पुढच्या एका चित्रपटात अशाच धाटणीचे गाणे बनवले, ते म्हणजे ‘दिल चाहता है’ मधले- ‘कैसी है ये रुत..’ हे गाणेसुद्धा तितकेच मस्त. बाकी ‘दिल चाहता है’ विषयी मी काय बोलू! या चित्रपटाप्रमाणेच याच्या अल्बमनेसुद्धा बॉलीवूडला एक तजेलदारपणा आणून दिला. संगीताचा एक नवीन अध्यायच सुरू केला.. सगळीच गाणी भारी! माझे सर्वात आवडते- दिल चाहता है- शीर्षकगीत.
शंकरजींचे ‘अल्बम-९’ मधील ‘साहेबा’ हे गाणे जर निसटून गेले असेल तर नक्की ऐका. (‘मितवा’ गाण्याचे मूळ गाणे असे या गाण्याला म्हणता येईल. दोन्ही गाणी त्यांचीच आणि दोन्ही सुरेख)
‘रॉकफर्ड’ या चित्रपटासाठी त्यांनी दिलेले ‘मैं हवा के परों से कहा..’ हे  थोडे कमी ऐकले गेलेले पण अफाट सुंदर गाणे माझ्या अगदी जवळच्या गाण्यांपकी एक आहे. ‘दिल चाहता है’च्या बाबतीत आहे, तेच ‘तारे जमीं पर’च्या बाबतीत आहे. सगळीच गाणी भारी. मला सर्वात आवडणारी दोन म्हणजे टायटल सॉँग आणि ‘खोलो खोलो दरवाजे..’
शिवाय, ‘कभी अलविदा ना कहेना’ मधले ‘तुम ही देखो ना’, ‘रॉकऑन’मधले- ‘ये तुम्हारी मेरी बातें..’, ‘टू स्टेट्स’मधले ‘चांदनीया’, ‘सलाम-ए-इश्क’ मधील ‘या रब्बा’ हे कैलाश खेरने गायलेले गाणे, ‘क्यू? हो गया ना?’ मधले ‘आओ ना..’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ (यांच्या जवळजवळ सगळ्याच चित्रपटांची नावे मोठमोठाली आहेत.. लिहिताना कंटाळा येतो..ऐकताना मात्र नाही!) मधील ‘उडे..खुल्के जहाँ मे ख्वाबों के परिन्दे..’, ‘चांदनी चौक टू चायना’ (पुन्हा तेच..)मधील ‘तेरे नना’, ‘बंटी और बबली’मधील चुपचुपके..’ सारखी अवीट गोडीच्या चाली असलेली गाणी हवीतच या प्ले लिस्टमध्ये.
‘माय नेम इज खान’मधील ‘नूर-ए-खुदा’, ‘लक बाय चान्स’मधले ‘सपनों से भरे नना’ ही सूफी धाटणीची गाणी, ‘जॉनी गद्दार’ चित्रपटाचे शीर्षकगीत, ‘झूम बराबर झूम’ मधले ‘किस ऑफ लव’, ‘तारे..’मधले ‘खोलो खोलो दरवाजे’, भाग मिल्खा भाग मधले ‘जिंदा..’ ही रॉक प्रकारातील गाणी सारखी ऐकावी अशी.
चित्रपटांप्रमाणेच शंकरजींनी जाहिरातींमधेही (जिंगल्स) आपल्या गायकीची चाप पाडली आहे. त्यांची ती ‘वर्लपूल रेफ्रिजरेटर’च्या जाहिरातीतील सनसनाटी तान तर तुम्हाला आठवत असेलच, शिवाय पर्क, कॅडबरीच्या जुन्या जाहिराती मी ‘यूटय़ूब’वर शोधून शोधून ऐकत असतो. अजून एक.. मी सतत यूटय़ूबवर पाहतो म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये सलमान खान पहिल्यांदा विक्रम गोखलेंना गाणे गाऊन दाखवतो तो सीन.. सलमान इटलीवरून आला असतो हे दाखवण्यासाठी शंकरजींनी ज्या गायकीचा (जॅझ स्टाइल) अवलंब तिथे केला आहे, तो ऐकून मी त्यांच्या प्रेमात पडलो.. ऐकल्यावर तुम्हीही नक्कीच पडाल.
                                       
हे  ऐकाच..
रिमेम्बर शक्ती
‘शक्ती’ या फ्युजन बॅण्डची निर्मिती जॉन मॅकलॉइन या गिटारिस्टने साधारण १९७५ मध्ये केली. यात झाकीर हुसेन, आर राघवन, विक्कू विनायकराम, एल शंकर हे कलाकारही होते. कालांतराने जॉन आणि झाकीर यांनीच काही नवीन कलाकारांसह ‘रिमेंबर शक्ती’ हा बॅण्ड सुरू केला. यात मेंडॉलिनवर होते नुकतेच जग सोडून गेलेले यू श्रीनिवास हे दिग्गज कलाकार आणि गायनाची जबाबदारी सांभाळली शंकर महादेवन यांनी. या बॅण्डचे काही अल्बम बाजारात आहेतच, पण यूटय़ूबवर यांचे सादरीकरणाचे अनेक व्हिडीओ आहेत. रिमेंबर शक्तीचे मला सर्वात आवडणारे गाणे म्हणजे ‘सखी’.. कमाल! फ्युजन म्हणजे काय, हे शक्ती/ रिमेंबर शक्तीकडून शिकावे! पाश्चात्त्य-भारतीय याबरोबरच िहदुस्तानी-कर्नाटकी असाही मेळ या बॅण्डमध्ये सुंदररीत्या साधला आहे. ही शक्ती तर युक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे!!!
जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com