vv17नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
साधारण १९९० च्या दशकात भारतीय संगीतात रेहमानी क्रांती घडली. आपल्याला अशा प्रकारचे संगीत ऐकू येऊ  लागले, ज्याचा आपण कधी विचारच केला नव्हता. शब्द, चाल, गायकी याबरोबरच ‘प्रोग्रॅमिंग’ हा गाण्याचा महत्त्वाचा घटक असू शकतो, हे आपल्याला समजले. आधी कधी न ऐकलेले आवाज आपल्याला गाण्यात ऐकू येऊ  लागले. आज भारतीय चित्रपट संगीतात प्रोग्रॅमिंग हा भाग अग्रगण्य आहे, सर्वात महत्त्वाचे आहे, ते या १९९० मधल्या क्रांतीमुळेच.
जे आपल्याकडे १९९० च्या दशकात घडले तेच अमेरिका मधे १९८०च्या दशकात घडले. ही क्रांती आणणारा कलाकार म्हणजे माइकल जॅकसन (२९ ऑगस्ट १९५८ – २५ जून २००९)! आज आपण शास्त्रीय सोडून जे काही भारतीय संगीत ऐकतो, त्या सगळ्या संगीतावर ए आर रेहमानचा प्रभाव आहे आणि ए आर रेहमानवर बव्हंशी मायकल जॅकसनचा! रेहमानसरच काय, जगातल्या सर्व संगीतकारांवर टखचा प्रभाव आहे. थोडक्यात काय, तर तुम्ही जेव्हा टख ऐकत नसता, तेव्हाही टखच ऐकत असता!
केवळ संगीत नाही, तर ‘एमजे’च्या परफॉर्मन्स, नृत्य, कपडे घालण्याची पद्धत, हेअरस्टाइल, सगळ्याचे आजही अनुकरण केले जाते. एवढेच नव्हे, तर आपली गाणी स्टेजवर सादर करण्याची त्याची पद्धतही आज सर्व जण अभ्यासतात. त्याचे सादरीकरण पाहणे हे डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. हा शो म्हणजे अनेक महिन्यांच्या तालमींचे फलित असते.
प्रोग्रॅमिंग ही संकल्पनाच ‘एमजे’ने अस्तित्वात आणली. त्याच्या गाण्यात वापरण्यात आलेले विविध वाद्यांचे टोन्स आजही नवीन भासतात. ड्रम, गिटार आणि विशेष करून बास गिटारचा त्याने जो वापर केला तो आजही अभ्यासाला जातो, त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचे साधारण १९९६ वगैरेमधले म्युझिक व्हिडीओज असे आहेत की, भारतात अजूनही असा विचार, अशी टेक्नॉलॉजी कोणाला वापरता आली नाही.
तालसंयोजन (ऱ्हिदम प्रोग्रॅमिंग) ही संकल्पनासुद्धा ‘एम्जे’नीच वापरात आणली. याची उत्तम उदाहरणे म्हणजे (खरे तर सगळीच गाणी)  बिली जीन, बॅड, बीट इट, स्मूद क्रिमिनल, द वे यू मेक मी फील इत्यादी. या गाण्यांमध्ये डिजिटल ऱ्हिदम आणि बेस गिटारचा जो मेळ साधण्यात आला आहे, तो अफलातून आहे. विशेष म्हणजे ताल-संयोजनाची त्याची १९८२ मध्ये चालू झालेली पद्धत अगदी आजपर्यंत, ब्लड ऑन द डॅन्स फ्लोर, स्क्रीमसारख्या गाण्यापर्यंत त्याने बदलली नाही, तरीही ती तितकीच प्रभावी आहे.
जेवढी त्याची तालप्रधान गाणी प्रभावी आहेत, तेवढीच हळुवार, मृदू स्वभावाची गाणीसुद्धा. ‘एमजे’चा आवाज तसे पाहायला गेले, तर अगदी विचित्र असा, बारीक, पातळ, काहीसा बायकी. पण याच आवाजाचा साहेबांनी जो वापर केलाय, तो अवघ्या पृथ्वीतलावरील समस्त स्त्रीवर्गाला वेड लावतो.  ‘यू आर नॉट अलोन’, ‘स्ट्रेंजर इन मॉस्को’,‘जस्ट कॅण्ट स्टॉप लविंग यू’, ‘ह्य़ूमन नेचर’, ही सॉफ्ट, पण आर्त गाणी ऐकताना सर्व स्त्रियांच्या हृदयाची धडधड वाढते. जवळजवळ सगळ्याच गाण्यांमध्ये येणारे त्याचे एक ‘आउ’ ऐकून हृदयाचा ठोका चुकतो! सगळ्यांच्याच. माझ्याही.
शब्दामधले शेवटचे अक्षर जोर देऊन गाणे (‘चेंज’च्या जागी ‘चेन्न्ज्जा’, ‘वॉण्ट’च्या जागी ‘वॉट्टा’ इत्यादी) आणि दोन शब्दांमध्ये श्वासांचा, उच्छ्वासांचा मस्त वापर करणे ही ‘एमजे’ची गायकीमधली लकब (यू रॉक माय वर्ल्ड- उत्तम उदाहरण) मला फार आवडते. म्युझिक व्हिडीओतूनसुद्धा साहेबांची अतरंगी प्रतिभा आपल्याला दिसते. व्हिडीयोजना एक विशिष्ट कथा असते आणि ते कथानक सविस्तरपणे मांडण्यासाठी व्हिडीओची सुरुवातीची चक्कदोन दोन मिनिटे केवळ कथा दाखवली जाते. उदाहरणार्थ ‘स्पीड डीमन’ हा कमालीचा भन्नाट व्हिडीओ. रिमेंबर द टाइम ज्यात पिरॅमिडचा सेट उभारला आहे; आणि ‘वी आर हियर टू चेंज द वर्ल्ड’ आणि ‘अनदर पार्ट ऑफ मी’ या दोन गाण्यांचा एकत्रित केलेला व्हिडीओ. यात खरे म्हणजे व्हिडीओसाठी ही दोन गाणी केली आहेत असेच वाटते. ‘थ्रिलर’च्या व्हिडीओमध्ये तर गाणे साडेचार मिनिटांनी चालू होते! एवढय़ा मोठय़ा आणि असे कथानक असलेल्या व्हिडीओची पद्धतसुद्धा ‘एमजे’पासूनच सुरू झाली असावी.
साहेबांनी फक्त खटय़ाळ आणि रोमँटिक गाणी केली असेही नाही. त्यांना सामाजिक भानही तेवढेच होते. ‘दे डोण्ट केअर अबाउट अस’, हे अमेरिकेतल्या वर्णद्वेषावर भाष्य करणारे गाणे, ‘मॅन इन द मिरर’ हे गाणे ही त्याची उदाहरणे. ‘मॅन इन द मिरर’मधून आपल्याला बदल पाहिजे असल्यास सुरुवात स्वतपासूनच करायला हवी, हे थेट गांधीजींचे विचार आपल्यासमोर येतात. ‘अर्थ साँग’मध्ये पर्यावरण आणि एकूणच मानवाची आत्मघातकी वृत्ती यावर भाष्य केले आहे.
कलाकार जेवढा मोठा, जेवढा प्रसिद्ध, तेवढे त्याच्याभोवती घोंगावणारे वादही. एमजेसरही अनेक वादांच्या, आरोपांच्या भोवऱ्यात अडकले. ते वाद खरे असो वा खोटे, आपल्याला फरक पडत नाही. आपण एमजेच्या संगीताचे दीवाने आहोत आणि राहणार. ‘कुछ तो लोग कहेंगे..लोगों का काम है कहेना..’ काही लोक तर असेही म्हणतात, की एमजेसरांनी स्वत:हूनच स्वत:च्या गूढ मृत्यूचे नाटक रचले आणि सर आजही जिवंत आहेत. खरंच..असेल का हो एमजे जिवंत?
हे  ऐकाच.. : धिस इज इट
मायकल जॅकसन हा इसम एवढा प्रसिद्ध का होता? त्याच्या कार्यक्रमांना एवढी गर्दी का होत असे? हमखास काही चाहते त्याच्या कार्यक्रमाच्या वेळी वेड लागून बेशुद्ध वगैरे कसे काय पडत असत, असे प्रश्न जर चुकून पडलेच तर उत्तरांसाठी ”this is it” ही फिल्म पाहायलाच हवी. ‘एमजे’च्या this is it या नावाने होणाऱ्या वर्ल्ड टूरच्या तयारीचे छायाचित्रण यात संकलित करण्यात आले आहे. ही टूर दुर्दैवाने एमजेच्या अकाली मृत्यूमुळे होऊ  शकली नाही; पण एखादा कार्यक्रम बांधताना काय पातळीपासून तयारी केली जाते, किती वेळ, पैसा आणि घाम खर्चून असा नेत्रदीपक शो तयार करण्यात येतो,  स्टेजवरील एमजेच्या आजूबाजूला असणाऱ्या सहकलाकारांची नर्तक, गायक, वादक कशा पद्धतीने जागतिक पातळीवर निवड चाचणी घेऊन एक एक हिरा निवडण्यात येतो, हे सर्व पाहून थक्क व्हायचे असेल, तर जगातील या सर्वात सर्जनशील व्यक्तीची ‘this is it’ पाहायला हवीच हवी.
जसराज जोशी – viva.loksatta@gmail.com