: गायत्री हसबनीस

कपडय़ांचा विचार करताना आपल्याकडे बऱ्याचदा उत्सवाच्या अनुषंगानेच त्याचा विचार केला जातो. यंदा ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये कलेक्शन सादर करताना डिझायनर्सनी बनवलेल्या कपडय़ांमध्येही हाच उत्सवी विचार प्रामुख्याने जाणवला. विशेषत: लग्नसोहळे, गणेशोत्सवापासून दसरा-दिवाळीसारख्या मोठय़ा उत्सवांच्या निमित्ताने परिधान करता येतील, अशाच कपडय़ांचे डिझायनर्सचा आपला वेगळा टच असलेले सदाबहार कलेक्शन यावेळी पाहायला मिळाले आहे.

श्रावणातले उत्सव जोरदार साजरे झाले. प्रत्येक सणासमारंभाला आरामदायी, पारंपरिक आणि तरीही वेगळा लूक देणाऱ्या उत्सवी कपडय़ांचे पर्याय आपल्याला उपलब्ध होते. आताही याच पारंपरिक पण वैविध्यपूर्ण कपडय़ांच्या खरेदीचा योग दसरा-दिवाळीत जुळून येणार हे नक्की. याचे कारण फॅशन विश्वात सध्या अशाच कपडय़ांची रेलचेल आहे. पाश्चिमात्य प्रकारांपेक्षा आपल्याकडचेच पारंपरिक फॅ ब्रिक्स आणि डिझाइन्स यांचा वापर करून नव्या पद्धतीने मेन्स आणि वुमन्सवेअर करण्यावर डिझाइनर्सचा भर आहे.‘लॅक्मे फॅशन वीक २०१९’ याच प्रयत्नांची झलक पाहायला मिळाली. त्यामुळे फेस्टिव्ह आणि ब्राईडल कलेक्शनवरच यावेळी ‘लॅक्मे फॅशन वीक’ने जास्त लक्ष दिले असल्याचे सहज दिसून येते.

‘फेस्टिव्ह’ मूड

फॅब्रिकमधील निवड एकसमान असली तरी त्यामागे प्रत्येक डिझायनर्सचा विचार वेगवेगळा असतो. त्यामुळे सणासमारंभाला शोभतील अशा कपडय़ांच्या नाना स्टाइल्स सध्या पाहायला मिळत आहेत. कपडे जितके साधे आणि त्यावरची नक्षी आधुनिक असेल तर त्या कपडय़ांवर अधिक चांगल्या प्रकारे प्रयोग करता येतात, हे लक्षात घेऊन रिक्सी भाटिया आणि टीनका भाटिया यांनी तसेच फेस्टिव्ह कलेक्शन त्यांच्या ‘हाफ फुल कर्व’या लेबलखाली सादर केले. त्यांनी मीडियम साइजपासून प्लस साइजमध्ये हे कपडे आणले आहेत. त्यांनी पिचवाई एम्ब्रॉयडरीवर जास्त भर दिला आहे आणि एकाच रंगाच्या शेड्स घेऊन त्यात वेगळेपणा आणला आहे. किमोनो, कोट्स, टय़ुनिक्स, कुर्ता यांचा यात समावेश आहे. हाच फंडा काहीसा विनीत-राहुल या डिझायनर्सनीसुद्धा वापरला. थोडक्यात, विविध शेड्सचा पर्याय ठेवून, कलरफुल एम्ब्रॉयडरी चितारत पॅण्ट्स,  जॅकेट्स आणि शर्ट्सचा आधुनिक पेहराव डिझायनर्सनी आणला आहे. सिल्कचा आऊटफिट आणि त्यावर प्रिंट्सचा वेगळा लूक यंदा डिझायनर्सनी साधला आहे. ईशानी मुखर्जी आणि अनिरुद्ध चावला यांच्या ‘पूचकी’ या लेबलखाली त्यांनी हॅण्ड ब्लॉक प्रिंट्स आणले, तर सान्या सुरी आणि रेशम करमचंदानी यांनी ‘द पॉट प्लाट’ या लेबलतर्फे बांधणी आणि शिबोरी प्रिंट्स आणले आहेत आणि यात त्यांनी सिल्क आणि ऑरंगेजा फॅब्रिक वापरले आहे. खरंतर, सिल्क आणि ऑरंगेजा हे फॅब्रिक आणि बांधणी, शिबोरी किंवा ब्लॉक प्रिंट्सही नवीन नाहीत. परंतु, या फॅ ब्रिकसह असे प्रिंट हे वेस्टर्न आऊ टफिट्सवर ट्राय केल्याने नक्कीच एक आरामदायी लूक मिळतो. ‘आवरण’ या लेबल अंतर्गत डिझायनर अल्का शर्मा यांनी अस्सल राजस्थानी लूक आणला आहे. ज्यात बंद गळा, कुर्ता, बुंडी, जोधपुरी पॅण्ट्स यांना प्राधान्य दिले आहे. ‘आम्ही हे आऊटफिट्स अशा प्रकारे डिझाइन केले आहेत, जेणे करून घागऱ्यावरील चोळी किंला ब्लाऊज हा ट्रॅडिशनल पॅण्ट्सवरही जाऊ  शकतो. त्यामुळे आधुनिक लूक तर मिळतोच, पण सध्या लोकांच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्यानुसार त्यांना सजताही येतं. आम्ही पांढऱ्या रंगाच्या पॅटर्नवर लाइट एम्ब्रॉयडरी ठेवल्याने अप्पर किंवा लोअर गार्मेट कुठल्याही स्टाइल आणि रंगाच्या लूकवर सहज वापरता येतं’, असं डिझायनर अल्का शर्मा यांनी नमूद केलं. सिल्कवर प्रयोग करत सोहम दवे या डिझायनरने ‘जरी’ हे कलेक्शन सादर केलं. जरी आणि सिल्कचा क्रीएटिव्ह वापर करत एम्ब्रॉयडरीला बराच वाव असताना त्याने केवळ सिल्क आणि झारी या दोन फॅ ब्रिकवर फक्त गोल्डन स्ट्राइप ठेवले. त्याच्या या युक्तीचा उपयोग करून त्याने साडीसोबत ब्लाऊ ज, मॅक्सी, चोळी, दुपट्टा, लेहेंगा असे विविध प्रकार डिझाइन केले. त्यामुळे संपूर्ण कलेक्शन जरी काळ्या रंगाचे असले तरी त्याला गोल्डन स्ट्राइप्समुळे उठाव आला. एक वेगळा अनुभव हवा असेल तर रितू कुमारने पिकॉक डिझायनर लॉन्ग स्कर्टवर कॉलर्ड व्हाईट शर्ट आणि बेल्ट असा लूक दिला आहे, याशिवाय पांढऱ्या शर्टवर ब्लॅक एम्बलिशमेंटच्या वेलवेट पिनाफोर आणि लेदर शूज अतिशय आधुनिक पण फेस्टिवल सीझनलाही शोभून दिसतील, अशा पद्धतीने पेअर केल्या आहेत.

मेन्सवेअरमध्ये खादीपेक्षा हॅण्डवूलन आणि कॉटनवर भर देण्यात आला आहे. ‘अंतर-अग्नी’ या लेबलची खासियत डिझायनर उज्ज्वल दुबे याने फेस्टिवल सीझनसाठी कॉटन सिल्क आणि कॉटन झारी या फॅ ब्रिकचा वापर करत वाढवली. खादीचा तोचतोचपणा टाळून सदाबहार आऊ टफिट्स त्याने आणले. त्यात करडा, निळा, हिरवा असे रंग आणि लेअर्ड, एसिमेट्रिक कुर्ता / टय़ुनिक, कोट्स, जॅकेट्स त्याने मेन्सवेअरमध्ये आणले आहेत. तरीही खादीचा मोह आवरला नाही तर अनुज भुटानी याने आणलेल्या कुर्ता, शॉर्ट्स, शर्ट्स, वेस्टकोट्स, क्रॉप जॅकेट्स यांकडे नक्कीच लक्ष वेधले जाईल. सोनम आणि पारस मोदी यांनी शाही लूक आणला आहे, ज्यात परत प्रिंट्स आणि डार्क रंग पाहायला मिळतात. यांचे कलेक्शन हे फार एकसुरी वाटते, कारण त्यांनीदेखील काळ्या रंगाचा वापर केला असला तरी डिझायनिंगमध्ये वैविध्य आणलेले नाही. डिझायनर पायल सिगलने फंकी रंगातील मेन्सवेअर आणि वूमन्सवेअर डिझाइन केले आहेत. त्यातही तिने लेहेंगा, सलवार, चुणीदार, पॅण्ट साडी, जॅकेट-चोळी, ब्लेझर असे नानाविध प्रकार आणले आहेत.

सदाबहार ब्रायडल कलेक्शन – ब्रायडल वेअरचा तामझाम यावर्षी थोडासा फिका पडला आहे, परंतु त्यात विलक्षण बदल म्हणजे त्यातही एकाचवेळी साधेपणा आणत डिझाइन्सची सरमिसळ थोडय़ा वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. रंगाच्या बाबतीत मात्र अजून वेगळेपणा साधता आला असता. पल्लवी मोहन या डिझायनरने ‘नॉट सो सीरियस’ या लेबलखाली मॅक्सी, मिडी, गाऊन असे प्रकार आणले आहेत. रंगांच्या छटांमध्ये न पडता तिने वेलवेट, ग्लिटर, शिमर, ह्यू कलर्स, प्लिटेड डिझाइन आणले, त्यामुळे ओकेजनला साजेसे म्हणजेच पार्टी कम वेडिंग लूक तिने कपडय़ांमधून दिला आहे. सुनैना खेरा या डिझायनरने लेहेंगा-चोळीला एक वेगळा लूक दिला, ज्यात नेहमीसारखे चोळीचे छोटे हात तिने लॉन्ग स्लिव्जमध्ये आणले आहेत. लहान हातांपेक्षा मोठे हात हा फंडा बऱ्याच कालावधीनंतर पाहायला मिळाला. लेहेंगा-चोळीबरोबरच तिने सॅटिन साडी आणि वेस्टर्न आऊ टफिट्सही आणले आहेत. ज्यात शॉल कॉलर जॅकेटचा समावेश आहे. वेडिंग रिसेप्शनच्या वैशिष्टय़ामधलं एक वेगळेपण म्हणजे नाइट कलर जास्त हायलाइट करता येतात. ज्यात गडद रंगांचा समावेश करण्यात येतो आणि चमकदार नक्षीकामाला भरपूर वाव असतो. असाच विचार रिद्धी मेहरा आणि जयंती रेड्डी यांनी केला. एका फिकट रंगाच्या छटा रिद्धी मेहरा या डिझायनरने आणल्या, ज्यात हेवी क्रिस्टल एम्ब्रॉयडरी तिने केली आहे. लेहेंगा-चोळी आणि नेट ओढणीचा एक परफेक्ट लूक असला तरी फिकट रंगाच्या लेहेंगा-चोळीचा उपयोग वधू ओपन ग्राऊंड असलेल्या वेडिंग लोकेशनवर करू शकते. त्याहूनही विधी किंवा रसमच्या वेळेस हा लूक योग्य ठरेल. जयंती रेड्डीचे एकूणच आऊ टफिट्स हे नाइट लूकसाठी अगदी योग्य आहेत. कोणत्याही ओढणीशिवाय एकेरी रंगाच्या आणि ओव्हर डिझायनर ब्लाऊ ज व त्याखाली सिमेट्रिकल डिझाइनचा लेहेंगा असा लूक अगदी सहज आणि सुंदर वाटेल जो अप्रीता मेहता या डिझायनरने आणला आहे. यंदा क्रिस्टल, डायमंड आणि ग्लिटर एम्बलिशमेंटचा ट्रेण्ड असल्याने थोडय़ाशा फंकी रंगांच्या फ्लोरल एम्ब्रॉयडरीसह एक संपूर्ण लूकही तिने आणला.

लग्नाच्या मुहूर्तासाठी योग्य तो लूक विचारात घेतला तो गौरांग शहा या अवलिया आणि हुशार डिझायनरने. त्याचे कलेक्शन हे ब्रायडल वेअरमधील सर्वात परफेक्ट म्हणायला हवे. कारण यंदा त्याने डिझाइन केलेले कलेक्शन देशभरातील कोणत्याही प्रांतातील वधू सहज परिधान करू शकते. गौरांगने ‘पेशवाई’ कलेक्शन सादर केले, ज्यात पारंपरिक पैठणीचा साज चढवत त्याला गुजराती बांधणी, जामदानी, कोटा दोरिया यांचा समावेश करून घेतला आहे. त्यामुळे पैठणी साडीच्या लूकमध्ये लेहेंगा आणि त्यावरील लटकन संमिश्र झाले आहे. गडद लाल, केशरी, गुलाबी, हिरवा, पांढरा, निळा, जांभळा अशा विविध रंगांचा वापर करत त्याने ब्राइट लूक साधला आहे. त्यावर मराठमोळ्या दागिन्यांचा त्याने वापर केला. ज्यात नथ, हिरवा चुडा यांचा समावेश आहे. काही लूकमध्ये बांधणीच्या साडीला त्याने पैठणीच्या रंगीबेरंगी मोरांचा लूक देऊन लाखात एक असा ब्रायडल लूक साधला आहे. ‘खरंतर पेशवाई हे कलेक्शन सादर करताना पैठणीच मला हवी होती. मला एक आऊटफिट तयार करण्यासाठी साधारणपणे वर्षभराचा कालावधी लागतो. त्यामुळे तसे कारागीर मी नेमले होते. माझ्या कपडय़ांची खरेदी परदेशातही सुरू आहे आणि दोन लाख ते आठ लाख या रेंजमध्ये माझ्या या पेशवाई कलेक्शनची किंमत आहे’, अशी माहिती गौरांगने दिली.

सध्या कपडय़ांवर प्रयोग करण्याची चांगली मुभा असताना चौकटीतच राहून रंगसंगतीशी खेळत डिझाइन पॅटर्नवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे अगदी काहीतरी नवीनच पाहायला मिळत नाही. मात्र, कलेक्शन सादर करताना ते व्यवहार्य किती असेल, याचाही विचार डिझायनर्सने केलेला दिसतो. म्हणूनच नवरात्री, दिवाळी यांचा विचार करत हे कलेक्शन सादर झाले आहे. यंदाच्या वर्षी रंगांच्या छटा, सरमिसळ, पॅटर्न्‍स, प्रिंट्स आणि एम्ब्रॉयडरी यांचा सदाबहार लूक नक्कीच आजमावून पाहायला हवा.-viva@expressindia.com

खरं तर कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण कलेक्शन हे फेस्टिव्ह किंवा वेडिंग सीझनला फिट बसेल, असा प्रयत्न डिझायनर्सनी करून घेतला असता. परंतु, त्याऐवजी फेस्टिव्ह आणि पार्टी लुकचा योग्य तो मेळ साधण्याची संधी यंदा डिझायनर्सनी घेतली आहे. अनुश्री रेड्डी, नचिकेत बर्वे, गौरी आणि नैनिका, दिशा पाटील, दिव्या राजवीर, बंदाना नेरुला, पुनीत बालाना आणि कुनाल रावल यांनी शेड्स, पॅटर्न्‍स, प्रिंट्स असे वापरले की ते फेस्टिव्ह आणि पार्टीच्या मूडमध्येच सूट होतील. त्यामुळे ओकेजननुसार दोन्ही प्रकारे एकच लुक विचारात घेऊ न डिझायनर्सनी सिंपल पण एलिगंट लुक साधला आहे.