News Flash

लर्न अ‍ॅण्ड अर्न : ‘प्राची’ज् क्रिएशन…

इतर भाषिक माणसांशी संवाद साधताना त्यांची संस्कृती आपल्याला माहीत असणं गरजेचं ठरतं. भाषाकौशल्याला कलेची जोड मिळाली, की आपण संवादी होतो नि आपलं व्यक्तिमत्त्व अधिकच फुलतं.

| September 20, 2013 01:09 am

इतर भाषिक माणसांशी संवाद साधताना त्यांची संस्कृती आपल्याला माहीत असणं गरजेचं ठरतं. भाषाकौशल्याला कलेची जोड मिळाली, की आपण संवादी होतो नि आपलं व्यक्तिमत्त्व अधिकच फुलतं. असं प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे प्राची छत्रे!
भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास हा ‘तिचा’ अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, तर हटके कलाविष्कार करणं ही ‘तिच्या’ हातांची जादू. भाषेतल्या प्रावीण्यामुळं करिअरला मिळालेली गती नि वेगळ्या बाजाच्या कला शिकून घेत त्यात साधलेल्या प्रगतीमुळं प्राची छत्रे अधिकच समृद्ध होतेय. दहावीच्या सुट्टीत काही तरी प्रॉडक्टिव्ह करायच्या उद्देशानं ती एका जपानी शिकवणाऱ्या क्लासला गेली, पण तिथं शिक्षण समाधानकारक नसल्यानं तिनं बोरिवलीचं ‘प्रोफेशनल फॉरेन लँग्वेज सेंटर’ जॉइन केलं. तिथं ती जपान सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या जापनीज भाषेच्या (जेएलपीटी) परीक्षेसाठीच्या टय़ूशनला जाते. ‘डी. जी. रुपारेल कॉलेज’मध्ये तिनं इंग्रजी साहित्यात पदवी मिळवल्येय. पुढं िलग्विस्टिक मध्ये एम.ए. करायचं ठरवलं होतं, पण एमए सुरू झालेलं वर्ष घरगुती अडचणींमुळं सोडावं लागलं. या दरम्यान ती जपानी भाषा शिकत फ्रीलािन्सगही करत होती. जापनीज भाषेतील अभ्यासक्रमानुसार तिच्या ५, ४, ३ लेव्हल्स झाल्या असून आता ती दुसऱ्या लेव्हलची परीक्षा देणारेय. या परीक्षा साहित्य आणि संस्कृतीचा आनुषंगिक अभ्यास करणाऱ्या असतात. एका प्रोजेक्टमध्ये तिनं जपानी-भारतीय संस्कृतीतील साम्य-वेगळेपणावर संशोधन करून निबंध सादर केला होता. भारतीयांना जपानी संस्कृतीविषयी असणाऱ्या कुतूहलामुळं विचारांना अधिक चालना मिळाल्यानं त्या अनुषंगानं तिला १०-१५ वर्षांनी एक पुस्तक प्रकाशित करायचंय.
जपानी शिकतानाच तिला अ‍ॅनिमेशनचं काम मिळालं. जपानीच्या क्लासमधील शिक्षकांच्या ओळखीच्यांना भाषांतराच्या आठवडाभराच्या कामासाठी काही फ्रेशर्स हवे होते, त्यात प्राचीची निवड झाली. ते काम आवडल्यानं पुढं अ‍ॅनिमेशनचं भाषांतर करण्याचं काम तिला सोपविण्यात आलं. ‘निकेलोडियन’ वाहिनीवरील ‘बिरिकेन’ या अ‍ॅनिमेटेड मालिकेचं भाषांतर तिनं केलंय. तिनं भाषांतर केलेली आणखी एक अ‍ॅनिमेटेड मालिकाही येऊ घातल्येय. ती सांगते की, ‘आपल्यासारखाच जपानी लेखी-बोली भाषेत फरक आहे. जपानी बोली भाषेची सवय नसल्यास ती कठीण वाटते. मात्र अ‍ॅनिमेशन करताना अर्थवाही शब्द वापरण्याची मुभा घेता येते. अ‍ॅनिमेशन लहान मुलांशी निगडित असल्यानं त्यातल्या शब्दांची निवड जपून करावी लागते. केवळ डिक्शनरीनुसारचे शब्द वापरता येत नाहीत. टाग्रेट ऑडियन्स लक्षात घ्यायला हवा. जपानीतून इंग्लिशमध्ये केलेलं भाषांतर पुढं इतर भाषांमध्ये होणार असल्यानं ते इंग्लिशही कठीण स्तरावरचं नसावं. त्यातला जपानीचा मुख्य इसेन्स अबाधित राहिला पाहिजे.’
भाषा शिकताना आपली संस्कृती अधिक आकळते. एरवी आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो, कारण ते आपल्या संस्कृतीतल्या लोकांसोबतचं वागणं असतं, ते चालून जातं; पण आपण दुसऱ्या संस्कृतीतल्या व्यक्तींशी संवाद साधतो तेव्हा खूप बारकाईनं गोष्टी माहीत असण्याची गरज असते. उदाहरणार्थ, आपल्यासारखंच जपान्यांमध्ये पहिल्यांदा भेटताना काही तरी छोटीशी वस्तू भेट देतात. प्राची सांगते की, ‘आमच्या क्लासमध्ये अनेकदा जपानी लोक येतात. त्यापकी एकदा एका बाईंच्या डायरीची मी पटकन स्तुती केली. त्या डायरीत त्यांच्या कित्येक महत्त्वाच्या नोंदी असूनही त्यांनी ती डायरी मला देऊ केली. त्यानंतर मला शिक्षकांकडून कळलं की, जपानी लोक आपली वस्तू कुणी आवडल्येय, म्हटल्यावर त्याला लगेचच ती देतात. त्यांना त्या व्यक्तीकडून निगेटिव्ह वेव्हज नको असतात. म्हणूनच इतर भाषिक माणसांशी संवाद साधताना त्यांची संस्कृती, त्यातल्या छोटय़ाशा गोष्टीही आपल्याला माहीत असणं गरजेचं ठरतं. नुसती भाषा शिकून भागत नाही.’
जपानमधील राहणीमान अत्यंत खर्चीक आहे. त्यामुळं जपानमध्ये जपानी वकिलातीत काम किंवा इंटरप्रिटर असा जॉब मिळवायचाय. तिथं जाण्यासाठी जपान सरकारची स्कॉलरशिपही मिळू शकते किंवा व्यावसायिक भाषांतरकार म्हणून जाता येईल का, त्याची चाचपणी करायच्येय. भारत-जपानमधील वाढते संबंध लक्षात घेता, जपानी लोक त्यांची संस्कृती इथं आणताहेत. आपणही आपली संस्कृती तिथं जाऊन किंवा पुस्तकांमधून पोहोचवू शकतो. मराठी कविता जपानी भाषेच्या ढंगानं भाषांतरित करण्याचा तिचा मानस आहे. सध्या ज्येष्ठ साहित्यिक अनंत भावे यांच्या बडबडगीतांसारख्या कवितांच्या संग्रहाचं भाषांतर ती जपानीत करत असून ते प्रकाशितही करायचंय. त्यामागचा उद्देश असा की, इथं जपानी शिकणाऱ्यांना फारशी जपानी पुस्तकं उपलब्ध नाहीत. त्यांना ही पुस्तकं उपयोगी ठरू शकतील. जपानी वाचण्याच्या निमित्तानं मराठी वाङ्मयही अनेकांपर्यंत पोहोचू शकेल. कदाचित कुणाला मूळ मराठी पुस्तकही वाचावंसं वाटेल. जपानी लोकांना मराठी साहित्यही जपानीत भाषांतरित केलंय, हे कळेल.  
प्राची म्हणते की, ‘आपल्या सणांची संस्कृती निबंधात्मक स्वरूपात मी जापनीजमध्ये लिहायचा विचार करत्येय. त्याचं निमित्त ठरलं माझं काम. िहदी, इंग्रजी नि जपानीवरचं प्रभुत्व तिचा प्लस पॉइंट ठरला. ‘नोमुरा’ या जापनीज कंपनीत कॉर्पोरेट ट्रेिनगअंतर्गत मी जपानी अधिकारी बाईंना िहदी भाषा शिकवायला जात्येय. त्यांना आपल्या सणावारांविषयी माहिती नव्हती. त्यामुळं या पुस्तकाच्या माध्यमातून आपलं फेस्टिव्ह कल्चर जपानमध्ये प्रमोट करता येईल, असं तिला वाटतं. या कोर्समध्ये तिला जपानी येत असल्यानं काही गोष्टी चटकन समजावता येतात. आपली बाराखडी नि तिथली पंचखडी असल्यानं काही वेळा पंचाईत होते. ऱ्हस्व-दीर्घ, उच्चारांतला फरक समजावावा लागतो. दीड-दोन तास चालणाऱ्या या सेशनमध्ये शिकवण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागलेय. सुरुवातीला तिच्या कलानं घेऊन, ते सोप्पं करून सांगावं लागलं. उदा. ‘आंगन’ ही संकल्पनाच आपल्याकडची असल्यानं ती नीट समजवावी लागते.’
आठवडय़ातून तीन दिवस तिचा जपानीचा क्लास असतो. भाषेचा अभ्यास ग्रुपनं क्लासच्या वेळेआधी तासभर होतो. पेपर संभाषण ऐकून लिहायचा असल्यानं प्रवासाच्या वेळात ‘चोकाई’ ऐकावी लागते. त्यामुळं जपानी भाषा सतत कानावर पडून तिचा अ‍ॅक्सेंट कळतो. परीक्षेच्या वेळी अधिक वेळ अभ्यासासाठी देऊन उरलेला वेळ फ्रीलान्स कामांसाठी देते. तिच्या ‘प्राची आर्टस् अँण्ड क्रिएशन्स’च्या अनोख्या प्रॉडक्ट्समध्ये पेपर ज्वेलरीपासून ते शंखाच्या पेपरवेटपर्यंत नाना प्रकारची कलाकुसर आहे. ‘यू ट्यूब’च्या ‘हाऊ पिक्चर्स’ या चॅनलवर तिच्या उत्पादनांचे व्हिडीयोज उपलब्ध आहेत. काही प्रदर्शनांतही ती सहभागी झाली असून आर्ट अँण्ड क्राफ्टचे क्लासेसही घेते.
‘इकेबाना’ या जपानी फ्लॉवर अरेंजमेंटचं ट्रेिनग घेतलं असून त्याचे क्लासेसही ती घेते. मुळात तिला कलाकुसरीत रस आहे. दहावीच्या सुट्टीत ती पुस्तकांत बघून वारली पेंटिंग नि पेपर क्वििलग ट्रायल अँण्ड एरर करत शिकल्येय. रेडीमेड गिफ्ट्स देण्यापेक्षा आपला एक्सक्युझिव्हनेस राहण्यासाठी ही तिची धडपड होती. सुरेख मेहंदी काढण्याची मुळात आवड असल्यानं एका पार्लरमधून तिला मेहंदीच्या कामासाठी विचारणा झाली. मग बारावीपर्यंत कॉलेज, जपानीचा क्लास नि संध्याकाळी पार्लरमध्ये मेहंदी काढणं असं तिचं शेडय़ूल होतं. आंतरमहाविद्यालयीन मेहंदी स्पर्धामध्ये तिला बक्षिसं मिळाल्येत. दादरच्या ‘समर्थ व्यायाम मंदिरा’त येणाऱ्या जर्मन मल्लखांब टीम्सच्या चार बॅचेसना तिनं वारली पेंटिंग शिकवलंय. तिनं शिकवलेल्या कलेच्या अनुभव नि अनुभूतीतून त्यांनी जर्मनमध्ये जाऊन एक पुस्तक काढलं असून ते आता जर्मनीत वारली पेंटिंग शिकवताहेत. एस.वाय.बी.ए.च्या वर्षांतल्या या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी करताना तिची खूप धावपळ व्हायची. आपलं जिम्नॅस्टिक मात्र नववीनंतर सुटलं, याची खंत तिला वाटते.
कलेसाठी आवश्यक ठरणारी सर्जनशीलता तिच्यात आईकडून आल्येय. तिनं सतत प्राचीला काही ना काही शिकून घेण्याची प्रेरणा दिली. वडिलांनीही कायमच सक्रिय पािठबा देत व्यावहारिक बाजू सांभाळल्येय. ती म्हणते की, ‘ज्या गोष्टी मी सुरू केल्यात, त्या बंद करायच्या नाहीत. उलट त्यात दहा गोष्टी वाढल्या तरी चालतील. जपानला गेले तरी ही आर्ट घेऊनच जाणार आहे. तिथल्या लोकांना कलेची खूपच जाण असल्यानं माझ्या कलागुणांना तिथं वावच मिळेल. तिची प्रॉडक्ट्स आतापर्यंत हस्तेपरहस्ते यूएसए, जर्मन नि जपानपर्यंत पोहोचल्येत. आर्टशी निगडित काहीही हवं असेल ते एकाच छताखाली मिळेल, असा एक ब्रँड तिला तयार करायचाय. या ब्रँड किंवा शॉपमध्ये कलाशिक्षणापासून ते प्रॉडक्ट्सपर्यंत सगळं मिळेल. ते कला किंवा भाषेशी निगडित असेल.’ तिच्या ध्येयपूर्तीसाठी तिला ऑल द बेस्ट.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 1:09 am

Web Title: learn and earn prachis creation
टॅग : Language
Next Stories
1 ब्रँडेड जादू
2 लक बाय चान्स
3 तुम्ही कुठल्या ‘पक्षात’?
Just Now!
X