वैष्णवी वैद्य

काही वर्षांपूर्वी एखाद्या वाढदिवसाचे बोलवणे आले की एकच अप्रूप असायचं ते म्हणजे केकचं. त्या वेळी व्हॅनिला आणि चॉकलेटचे कॉंम्बिनेशन असलेला, रेड चेरीने सजविलेला केक हेच आकर्षण होते. तसा केक घरात आला म्हणजे काहीतरी खास आहे असे वाटायचे. ब्लॅक फोरेस्ट, पाइनॅपल, डार्क चॉकलेट या फ्लेवर्सच्या बरोबरीने फोटो केकचा ट्रेण्डसुद्धा अगदी आता आतापर्यंत लोकप्रिय होता, पण सध्याचा ट्रेण्ड हा थीम आणि कस्टमाइझ्ड केक्सचा आहे.

मुळात काही ना काही निमित्ताने उत्सव, समारंभ करण्याचा सध्याचा काळ असल्यामुळे ते साजरा करण्याच्या पद्धतीही आधुनिक आणि फॅन्सी झाल्या आहेत. केक हे या सगळ्या साजरीकरणातलं वैशिष्टय़ ठरू पाहतं आहे. आबालवृद्धांना पाहताक्षणी आवडेल अशा विविध कल्पनांमधून केक साकारण्याची अहमहमिका सुरू आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बेकिं गच्या विश्वात आवडीने उतरणाऱ्या तरुणी आणि त्यांच्या कल्पनांमधून उतरणारे हे केक आधी नजरेला भावतात आणि मग जिभेवर रेंगाळतात. हे केक सजवण्याची प्रक्रिया क्लिष्ट असली तरी अत्यंत संयमाने कोणत्याही कल्पना केकवर उतरवण्याचे आवाहन स्वीकारले जाते आहे. निधी सागवेकर ही तरुणी गेली दोन वर्षेविविध थीम केक ऑर्डरप्रमाणे बनवते. ‘थीम केकच्या सजावटीसाठी मुख्यत: फॉण्डंट म्हणजे सारखेपासून विशिष्ट पद्धतीने बनविलेल्या आयसिंगचा वापर केला जातो. हे आयसिंग पूर्णपणे सुकण्यासाठी कमीतकमी ४८ ते ७२ तास लागतात. म्हणूनच सजावटीचे साहित्य दोन दिवस आधीच बनवावे लागते. त्यांनतर मुख्य बेस केक बनवायला साधारण तासभर लागतोच’, असे निधी सांगते.

थीम केक्स बनविणे कुठल्याही संशोधनापेक्षा कमी नाही. ग्राहकाला काय अपेक्षित आहे हे नीट समजून घ्यावे लागते. केकची सजावट हीसुद्धा दोन पद्धतीची असते. खाण्यायोग्य नसलेली केवळ दिखाव्यापुरती असलेली सजावट आणि दुसरी फॉण्डंट वापरून केलेली खाण्यायोग्य सजावट असते, अशा सजावटीसाठी वेळ आणि मेहनत जास्त लागतो त्यामुळे त्याची किंमतही जास्त असते, असे काही बेकर्सने सांगितले. थीम केक्सचा हा ट्रेण्ड अचानक वाढण्याचे कारण सोशल मीडिया आणि वाढती समारंभ संस्कृती आहे, असंही बेकर्स सांगतात. फातेमा तांबावाला गेली तीन वर्षे‘ऑर्डर ५३’ नावाचा होम बेकिं ग ब्रॅण्ड चालवते. ‘अनेकदा ऑर्डर करताना लोक गूगलवरून किंवा कोणाच्या तरी फोटोमधले केक पाठवून त्यांना असाच केक हवा आहे, असा आग्रह धरतात. अमुक एकाने अशी पार्टी केली, मग आपणही हटके  पार्टी करावी या आग्रहातून थीम केकची मागणी केली जाते. पार्टीचं जे निमित्त आहे त्याच थीमवर बऱ्याचदा केक बनवला जातो’, असं फातेमा सांगते.

साखरपुडा आणि लग्नातही आजकाल मोठय़ा प्रमाणात केक कटिंग होताना दिसते. तसेच बेबी शॉवरचा स्ट्रॉबेरी—ब्लूबेरी मिक्स फ्लेवर केक, लग्नाचे सहा महिने झाल्यावर हाफ सर्कल केक, पैठणी साडीच्या डिझाइनचा केक असे अंसख्य केकप्रयोग आजकाल सहज पाहायला मिळतात. एखादी इमारत उभी करताना गृहशिल्पी जसा प्रथम ती कागदावर उतरवतो त्याप्रमाणे बेकरही त्यांच्या केकची प्रतिमा आधी डोक्यात, मग कागदावर आणि प्रत्यक्षात साकारतात. ‘सोलशुगर बेकरी’ या बेकिंग ब्रॅण्डची हेमांगी सहारे सांगते,‘ग्राहकांकडून ऑर्डर घेताना त्यांच्याशी तपशीलवार बोलून त्यांच्या अपेक्षा समजून घ्याव्या लागतात. इथेही अनेकदा केकशी भावनिक नाते जोडण्याचा प्रयत्न असतो. विविध आकार, थरांचे केक याप्रमाणे त्याचे रफ स्केच तयार करून बघितले जातात किंवा ग्राहकांनी सुचवलेल्या आकृतीवरही काम केले जाते’. गेल्या काही वर्षांत केकच्या लोकप्रियतेमध्ये झालेली वाढ ही अर्थातच तरुणाईच्या पार्टी-सेलिब्रेशनने भरलेल्या फास्ट लाइफस्टाइलमुळे आहे असे शेफ अमेय सावंत सांगतो. ‘बेकरी प्रॉडक्ट्सचे तरुणाईला विशेष आकर्षण असते. शिवाय, केक कटिंगच नाही तर केकनिर्मितीतही तरुण पिढी रस घेत असून बऱ्याचजणांनी लॉकडाऊनच्या काळात घरातूनच बेकिं गचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर सुरू केला आहे’, असे निरीक्षण अमेयने नोंदवले.

थीम केक्स कमीतकमी एक किलो प्रमाणाचे बनवावे लागतात. घरातल्या घरात अगदी एखाददोन जणांमध्ये सेलिब्रेशन असेल तर असा केक घेणं लोकांना शक्य नसतं. अशा वेळी इंडियन फ्यूजन डेझर्ट्स काजूकतली कपकेक्स, विविध फ्लेवरचे डोनट्स, मिनी ब्राउनी यांची मागणी वाढते. अ‍ॅव्हेंसर्ज थीम कपकेक, हॅरी पॉटर कपकेक्स, फ्रेण्ड्स सिरीज कपकेक्स, गुलाबजाम फ्लेवर मुस असे अनेकविध फ्यूजन डेझर्ट्स तरुणाईच्या जिभेचे चोचले पुरवतात. सण-समारंभांमध्येही सध्याच्या दिवसांत मिठाईपेक्षा या फ्यूजन डेझर्ट्सची मागणी वाढली आहे असे एकंदर चित्र दिसते.  यातही रेग्युलर पॅकिंगपेक्षा नावीन्य आणण्याचा तरुण होम बेकर्सचा प्रयत्न असतो. डेकोरेटिव जारमधले  ‘जार केक्स’, आइस्क्रीम कॅ न्डी आकारातले ‘केकसिकल्स’, ‘केकबॉम्स’ दिसायला आणि सरप्राइज गिफ्ट द्यायलाही सुंदर वाटतात, असं बेकर्स सांगतात.

एखाद्याच्या हृदयात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो, असं म्हणतात. हा मार्ग तरुणाईने अचूक ओळखला आहे, पण पोटात शिरण्याआधी तो नजरेलाही तितकाच सुंदर दिसायला हवा, याचीही काळजी तरुण बेकर्स घेत आहेत. करोनाच्या या परिस्थितीत दूर राहून नाती जपताना आनंदाचा गोडवा वाढवण्याचे काम हे थीम केक आणि त्यांचे तरुण निर्माते करत आहेत.

viva@expressindia.com