जाहिरातींच्या माऱ्यामधून नेमकं कुठलं क्रीम वापरावं समजत नाही, त्वचेच्या कोणत्या समस्येवर नक्की काय इलाज करावा, याबद्दल संभ्रम निर्माण होतो. आंधळेपणानं कुठलीही उत्पादनं वापरल्यानं अपाय होऊ शकतो. या संदर्भात दोन तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन..

चेहऱ्याच्या समस्येचं मूळ पोटात
– डॉ. चित्रा नायक
स्किन केअर ट्रीटमेंटमध्ये सर्वात प्रथम हे पहिलं जातं की, तुमचं डाएट काय आहे. बाहेरचं जंक फूड आणि कोल्डिड्रक्स हे कोणत्याही स्किनविषयक समस्येचं मूळ कारण असतं. मुळात पिंपल्स, डोळ्यांखालील काळी वर्तुळं, काळपटपणा या समस्या चेहऱ्यावर दिसत असल्या तरी त्या समस्यांचं खरं कारण तुमच्या शरीराच्या आत असतं. पुष्कळ वेळा या समस्यांच्या निराकरणासाठी मुली ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महागडय़ा ट्रीटमेंट्समध्ये पसे खर्च करता; परंतु ब्युटीशियन फक्त वरवरचे उपाय करतात. चेहऱ्यावर दिसणाऱ्या पिंपल्ससारख्या समस्यांचं मूळ कारण लठ्ठपणा आहे, की शरीरात होणारे हार्मोनल बदल, हे फक्त एक डरमॅटॉलॉजिस्ट तुम्हाला सांगू शकेल.                  
दुसरं महत्त्वाचं- त्वचा कायम टवटवीत ठेवण्यासाठी त्याला मॉइश्चराईज ठेवणं गरजेचं असतं. हल्ली प्रत्येक जण वातानुकूलित ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर बसून काम करीत असतो. तसंच बहुतेक घरांमध्ये एसी असतोच. दिवसाचे चोवीस तास एसीसमोर बसून त्वचा कोरडी पडते. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. योग्य मॉइश्चरायजर वापरणं गरजेचं असतं. मॉइश्चरायजर आंघोळीनंतर ३ मिनिटांमध्ये लावणं गरजेचं असतं. प्रत्येकीच्या शरीराला असलेली मॉइश्चरची गरज वेगवेगळी असते. त्यानुसार प्रत्येकीने दिवसातून दोन किंवा तीनदा मॉइश्चरायजर लावणं गरजेचं असतं. पण प्रत्येक वेळी मॉइश्चरायजर लावण्यापूर्वी चेहरा पाण्याने धुवून घ्यावा.

फेअरनेस क्रीमपासून सावधान
– डॉ. अंजू मेथील
गोरेपणा हा सगळ्यांना हवाहवासा असतो. आज कित्येक मुली आपली स्किन गोरी करण्यासाठी धडपडत असतात. बाजारातही अनेक फेअरनेस क्रिम्स उपलब्ध आहेत. परंतु मुळात फेअरनेस क्रिम्समागील तत्त्व समजून घेतलं पाहिजे. आपल्या शरीरातील मेलानिन संप्रेरक आपल्या त्वचेचा, डोळ्यांचा रंग ठरवतात. फेअरनेस क्रिम्समधले रासायनिक घटक तुमच्या शरीरातील मेलानिनचं प्रमाण कमी करून तुमच्या चेहऱ्याला उजळ करतात. जाहिरातीत दाखवली जाणारी फेअरनेस क्रिम्स ही तुमची स्किन पाच ते सहा टोनपर्यंत उजळ करण्याचं आश्वासन देतात; परंतु खरे पाहता फेअरनेस क्रिम्सचं मूळ काम असतं ते उन्हामुळे किंवा प्रदूषणामुळे चेहऱ्याला आलेला काळपटपणा कमी करून स्किनचा नसíगक टोन पुन्हा आणणं. त्यामुळेच कोणतीही फेअरनेस क्रीम ही तुम्हाला एक किंवा दोन टोनपेक्षा जास्त उजळपणा देऊ शकत नाहीत. तसंच फेअरनेस क्रीम्सचा वापर हा मर्यादित काळासाठी करायचा असतो. तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळाल्यानंतर त्यांचा वापर थांबवावा. अन्यथा फेअरनेस क्रीम्सच्या अतिवापराने तुमची स्किन पूर्वीपेक्षा अधिक काळपट होण्याचा संभाव असतो.

सुंदर दिसणं हा प्रत्येक स्त्रीचा जन्मसिद्ध हक्क असतो; पण सुंदर दिसण्याच्या या धडपडीत कधी कधी आपण कोणत्या गोष्टी कशासाठी वापरतोय, याचा सारासार विचार करणं फार महत्त्वाचं असतं. आज बाजारात एक चक्कर टाकल्यास कित्येक उत्पादनं, मग ती फेअरनेस क्रीम्स असोत, मॉइश्चरायजर्स असोत किंवा सन्सक्रीम्स, प्रत्येक जण सुंदर आणि नितळ चेहऱ्याची खात्री देताना दिसतात. पण मुळात आपल्या त्वचेची समस्या काय आहे आणि तिला कसली गरज आहे, हे जाणून त्यानुसार कोणतेही उत्पादन वापरणं योग्य. पण नेमक्या कोणत्या समस्येवर कोणता उपाय केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन करणार कोण, हा प्रश्न भेडसावतो. त्याचा परिणाम म्हणून बहुतेक वेळा आपण चुकीची क्रीम्स वापरून आपल्या त्वचेला हानी पोहोचवून घेतो किंवा त्वचेवरील काल्पनिक बदलांवर विश्वास ठेवून आंधळेपणाने ती उत्पादने कायम वापरत राहतो. तुमच्या त्वचेला कोणत्या वेळी कसली गरज आहे, याविषयी काही तज्ज्ञांना आम्ही बोलतं केलं.