25 September 2020

News Flash

‘मी’लेनिअल उवाच : मन, दु:ख आणि समाज

‘मिलेनिअल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युवामनांच्या ‘मी’चा हाच बिनधास्त-बेधडक आवाज या सदरातून उमटणार आहे..

(संग्रहित छायाचित्र)

जीजिविषा

मनात दडलेल्या, ठसठसणाऱ्या-सुखावणाऱ्या अशा कित्येक गोष्टी ज्या खरं म्हणजे मोकळेपणाने कुणाशी तरी बोलणं, कुणाला तरी सांगणं ही युवामनांची गरज असते. मात्र अनेकदा अशा गोष्टी डायरीच्या पानांत नाही तर मित्रमैत्रिणींच्या कानात गोळा होतात. ‘मिलेनिअल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युवामनांच्या ‘मी’चा हाच बिनधास्त-बेधडक आवाज या सदरातून उमटणार आहे..

प्रिय वाचकमित्र,

कसे आहात? बरे असाल अशी अपेक्षा करते कारण उत्तर मला मिळणार कसे? हा दोन शब्दांचा प्रश्न आपण लहानपणापासून  ऐकत-विचारत आलो आहोत. आणि आपोआपच मजेत, बरी आहे किंवा असं तत्सम काहीतरी तोंडून बाहेर पडतं.

परवा एका मैत्रिणीला फोन केला. अनेक दिवस सतत एकमेकांचे कॉल्स मिस होत होते, पण नेमका त्या दिवशी मुहूर्त लागला. तिला काहीतरी बोलायचं होतं, पण कुणाशी बोलावं कळत नव्हतं. काहीही बोलायच्या आधी मी तिला विचारलं, ‘कशी आहेस ते आधी सांग’. उत्तर नेहमीचेच अपेक्षित होते, पण अचानक त्या बाजूने काही आवाज येईना. हल्ली नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी आपलं ‘हॅलो हॅलो’ करू लागले. तर अचानक तिकडून मुसमुसण्याचा आवाज आला.  मला अचानक काय झालं कळेना. थोडा वेळ थांबून शेवटी मी परत विचारलं, ‘श्वेता? ऑल ओके?’ त्यावर तिचं उत्तर होतं, ‘माहिती नाही. म्हणजे नाही, पण का नाही ते कळतच  नाहीये. भेटतेस का?’ तिच्या या प्रश्नाला नाही हे उत्तर देण्याचा पर्यायच नव्हता. पुढच्या अर्ध्या तासात मी तिच्या घरी पोहोचले. तिने हसत हसत दार उघडलं. नाक लाल झालेलं, पण चेहरा एकदम खूश. आत गेले तर काकू भेटल्या. नेहमीच्या चार गप्पा मारून आम्ही खोलीत गेलो. खोलीचे दार लावून वळते ना वळते तोच श्वेताच्या रडण्याचा आवाज तिच्या बाथरूममधून येऊ  लागला.  काय चाललंय मला काहीच कळेना. बाथरूममध्ये गेले तर तिने मिठी मारली आणि हमसाहमशी रडायला लागली. ‘मला काय होतंय तेच मला कळत नाही आहे जीजि. सारखं  रडायला येतं हल्ली. कामात मन नाही लागत. असं वाटतं नुसतं झोपून राहावं. परवा आईनी नुसतं  विचारलं की  काय चालू आहे आजकाल? काम कसं चालू आहे? तर मी इतकी चिडले. काहीच कारण नव्हतं, पण काय माहिती मला काय झालं. कुठे जायलाही नको वाटतं. काल रात्री बेडवर पडले होते. मला तहान लागली. पाणी अगदी समोरच्या टेबलवर होतं गं.. पण उठवेच ना मला. रात्रभर झोपलेही नाही आणि बेडमधून उठलेही नाही. नॉर्मल आहे का हे? का मी उगीच जास्त विचार करते आहे?’. तिचं अखंड बोलणं सुरूच होतं. मी तेवढय़ात तिला पाणी आणून दिलं. ती पाणी प्यायली आणि अचानक पुन्हा शून्यात बघत बसली. मग परत तिला काहीतरी सुचलं आणि म्हणू लागली, ‘सॉरी, मी तुला खूप टेन्शन दिलं ना? सॉरी सॉरी. मूर्ख आहे मी. कामाचा स्ट्रेस आहे, आई म्हणते तसं. तुला इतक्या दिवसांनी सुट्टी होती आणि मी हे असं केलं’. खरंतर, मला काहीच त्रास नाही हे मी तिला सांगायच्या आधी ती परत म्हणाली, ‘तू चहा घेणार का? घेच. मी आणते बनवून’, असं  म्हणत तोंड धुऊन, डोळे पुसून ही मुलगी किचनमध्ये गेली. मला बेडरूममध्ये तिचा आईशी बोलण्याचा आवाज येत होता. कोणी ऐकलं तर म्हणणार नाही की ही आत्ता रडत होती. का कोण जाणे पण मलाच भरून आलं..

अनेक विचार डोक्यात चालू झाले. मनात असाही विचार आला की मी  तिला कशी आहेस हे विचारलंच नसतं तर बरं  झालं असतं का? त्यामुळे तिला त्रास झाला का? का तिला बरं  वाटलं? का लपवत असेल ती हे सगळं आईपासून? काका-काकू कायमच तिला सपोर्ट करत आले आहेत. मग का बरं असं? मी काही डॉक्टर नाही, पण मानसिक आरोग्याबद्दल कायमच मी स्वत:ला जागृत ठेवलं आहे. तिचं बोलणं ऐकून नक्कीच एवढं लक्षात आलं की जे होतंय ते काही बरोबर नाही. तिला त्रास होतोय, पण जे मला इतक्या सहजपणे कळतंय ते तिला कळत नसेल? का नसेल मदत घेत ती एखाद्या मानसशास्त्रतज्ज्ञाची.. पण माझ्या प्रश्नांची उत्तरं मला माहिती  होती. माझ्या मैत्रिणीच्या मनात चाललेला गोंधळ, तिला पडलेले प्रश्न आणि माझ्याकडे असलेली त्याची उत्तरं हे सगळं आपण पुढच्या पत्रात समजून घेऊयात..

ता. क. – तुम्हीही विचार करा की काय होत असेल नेमकं?

कळावे,

जीजि

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2020 12:21 am

Web Title: millennial voice of the youth in this article abn 97
Next Stories
1 माध्यमी : बीइंग अँकर
2 बुकटेल : एक टप्पा आऊट
3 डाएट डायरी : तरुणाई आणि फास्ट फूड
Just Now!
X