22छोटेसे, चष्मा घातलेले, वेगळ्याच ग्रहाचे वासी वाटणारे क्रिचर सध्या फॅशन अ‍ॅक्सेसरीज, किचेन, बॅग, केक या सगळ्यांवर दिसायला लागले आहेत. ज्यांचा कॉम्प्युटर गेम्स किंवा अ‍ॅनिमेटेड फिल्म्सशी काही संबंध नाही, त्यांना हे कोण बरं? असा प्रश्न पडू शकतो. निरागस आणि ‘क्यूट’ कॅटॅगरीतलं हे कॅरॅक्टर आहे-मिनियन्स फॅमिलीतलं. अ‍ॅनिमेटेड चित्रपटातलं असलं तरी हे कार्टून नाही. त्यामुळे लहान-थोर सगळ्यांनाच या मिनिअन्सनी लळा लावलाय. त्यामुळेच चपलेपासून केसाच्या पिनेपर्यंत सगळीकडे मिनियन्सच मिनियन्स दिसू लागले आहेत. मिनियन्सचं ते गोड हसू, निष्पाप डोळे, त्यावरचा अतरंगी चष्मा, हॅट, लहान मुलासारखे चेहऱ्यावरचे प्रांजळ भाव या सगळ्याला तरुणाई नाही भुलली तरच नवल!
२०१०मध्ये आलेल्या ‘डेस्पिकेबल मी’ या अ‍ॅनिमेटेड इंग्रजी चित्रपटात मिनियन्स पहिल्यांदा अवतरले. त्यांचं दिसणं जितकं गोड आहे तितकाच त्यांचा आवाजही परफेक्ट मॅच झालेला आहे. त्यामुळे मिनियन्सनी पहिल्या फटक्यातच लोकांना आपलंसं केलं. त्यानंतर २०१३ मधल्या ‘डेस्पिकेबल मी २’ आणि २०१५ मधल्या ‘मिनियन्स’ या अ‍ॅनिमेटेड चित्रपटानंतर हे ‘मिनियन्स’ सगळ्यांच्या गळ्यातले ताईत बनले. चित्रपटात ते बोलतात न कळणारी भाषा पण ती क्यूट वाटते ऐकायला. त्यांचे सहजसुलभ हावभाव यामुळे ते नकळत मनाशी जोडले गेले. ते इतके प्रिय झाले की कपडय़ांपासून नेलपेंटपर्यंत आणि वॉलपेपरपासून प्रोफाईल पिकपर्यंत सगळ्यावर त्यांनी कब्जा केला. मिनियन्स हे एक स्टाइल स्टेटमेंट बनलं आणि त्याचा ट्रेण्डच पसरला.
तरुणाईचं हे मिनियन्स प्रेम ओळखून की काय ‘मॅकडोनाल्ड्स’ने त्यांच्या ‘हॅप्पी मील’सोबत मिनियन्स भेट द्यायला सुरुवात केली आणि घराघरात लहान मुलांना पण मिनियन्सचं वेड लागलं. मिनियन्सची खेळणी, दप्तरं, स्टिकर यांनी मुलांच्या मनात घर केलं. गंमत अशी की, या कॅरॅक्टरला मिनियन्स म्हणतात किंवा हे सिनेमातलं कॅरॅक्टर आहे, हे माहिती नसलेली मंडळीसुद्धा हा ट्रेण्ड पसरवण्यात आघाडीवर राहिली.
चित्रपटाचे फॅन्स आहेत त्यांना मिनियन्स चित्रपटातली त्यांच्यातली मैत्री, एकजूट, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती भावते. मोठय़ामोठय़ा अडचणींवर आत्मविश्वसाने आणि सकारात्मकतेने मात करता येते हे त्यांच्या चित्रपटांतून ते सगळ्यांनाच सांगत असतात. मिनियन्स हे सगळ्या ‘बिझी’ तरुणाईसाठी स्ट्रेस बस्टर्स ठरलेत. मिनियनकडे बघूनच फ्रेश वाटतं, त्यांच्यातली पॉझिटिव्हिटी पटकन फील होते असं सगळ्या तरुणाईचं म्हणणं आहे. त्यांच्यासारखं साधासोपा विचार करता आला तर आयुष्य खूप सोपं होईल असं तरुणाईचं मत आहे.
मिनियन्सचे कितीही चित्रपट कितीही वेळा बघितले तरी समाधान होत नाही. म्हणूनच की काय पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात ‘डेस्पिकेबल मी ३’ येऊ घातलाय. सगळ्यांना हसवण्यासाठी, नवीन एनर्जी देण्यासाठी मिनियन्स पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. यावेळी मिनियन्स जंगल, वाळवंट, समुद्र, बर्फ अशा निसर्गाच्या सान्निध्यात धमाल करणार आहेत म्हणे. सो, गेट रेडी फॉर न्यू.!