सध्या तरुणाईमध्ये मालिका किंवा पुस्तकं यामध्ये एक प्रकार कॉमन दिसतो. तो म्हणजे पौराणिक किंवा ऐतिहासिक संदर्भ असलेल्या कथा. सुपरहिरो बनलेले देव किंवा इतिहासातले नायक तरुणाईला भुरळ घालताहेत. काय आहेत त्यामागची कारणं?

पूर्ण दिवसभरात होणाऱ्या धावपळीमध्ये थोडासा विरंगुळा म्हणून आपण पर्याय शोधत असतो. कधीतरी गाणी, सिनेमा, नाटक, कुठेतरी भटकणं असे ऑप्शन तर असतातच. पण आपल्या लाडक्या इडीयट बॉक्सवरचे डेली सोप किंवा मालिका हा पर्यायही आपला आवडता आहे. बऱ्याचदा संध्याकाळी टीव्हीचा रिमोट आईच्या किंवा आजीच्या ताब्यात असतो. त्यावर कुठल्यातरी साँस- बहू टाइप्स हिंदी मराठी मालिका सुरू असतात. हल्ली त्यामध्ये काही पौराणिक, ऐतिहासिक मालिका आपलं थोडं लक्ष वेधून घेताहेत. १७- १८ वर्षांपूर्वी रामायण आणि महाभारत यासारख्या पौराणिक मालिका आल्या होत्या. त्यावेळी रस्ते कसे ओस पडायचे वगैरे आपल्याला आधीच्या पिढीकडून कळतं. पण सध्याच्या पौराणिक मालिका त्यापेक्षा वेगळ्या आहेत. त्या प्रमाणात लोकप्रियता त्यास नसेल. कारण आज इतरही अनेक चॅनेलचे पर्याय आहेत. पण तरीही तरुण पिढीला या मालिकांमधली पौराणिक कॅरॅक्टर्स, ऐतिहासिक कथेतले हिरो क्लिक होताहेत. आजही अनेक वर्षांनंतरदेखील या मालिकांचा ट्रेंड कायम आहे. पण कारणं बदलली आहेत. असं यासंबंधी तरुणाईशी बोलताना स्पष्ट झालं. 

सध्या सुपरहिरो प्रकारची कॅरॅक्टर्स तरुणाईला आवडतात, असं लक्षात येतं. बहुतेक पौराणिक मालिकांमधले सुपरहिरो म्हणूनच त्यांच्यामध्ये पॉप्युलर आहेत. हे पौराणिक, ऐतिहासिक मालिकांमधले नायक अगदी फिट आणि फाइन दाखवले जातात. त्यांची वेल बिल्ट बॉडी तरुणाईला आकर्षति करणारी असते. ‘देवों के देव महादेव’चे लुक्स काय भारी आहेत असंही आपल्याला बऱ्याचदा ऐकायला मिळत असतं. हे हिरो तरुणाईमध्ये लोकप्रिय आहेत. शंकर म्हटला की, मोहित रैना किंवा महाराणा प्रताप म्हटला की छोटा फैझलच डोळ्यांसमोर येतो, हे या मालिकांचं वैशिष्टय़ आहे. शिवाय हे देव-देवता तुमच्या-आमच्यातल्या चांगल्या माणसांचे प्रतिनिधित्व करतात. ज्याप्रमाणे ‘जय मल्हार’मधला मल्हार हा वाईट प्रवृतींचा नाश करतो तसेच आदर्श राजाप्रमाणे प्रजेचे रक्षणही करतो, अशी उदाहरणं आत्ताच्या मालिकांमधून दिसतात. पौराणिक आणि ऐतिहासिक मालिकांना त्या काळाचा फील देण्यासाठी राजेशाही कपडय़ांच्या, जुन्या काळातल्या दागिन्यांचा उपयोग केला जातो. या दागिन्यांचीही क्रेझ दिसते. ‘जय मल्हार’मधील ‘लक्ष्मी’चे सुंदर हार असोत किंवा ‘म्हाळसा’चे मेगा-स्लीव्ज ब्लाऊझ असोत, या फॅशनकडे नक्कीच प्रेक्षकांचं लक्ष असतं. तांत्रिकदृष्टय़ाही या मालिका जास्त प्रगत आणि आकर्षक वाटतात.

पुस्तकातले देव
ऐतिहासिक आणि पौराणिक कथांभोवती बांधलेली पुस्तकंही तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. म्हणूच मराठीतली ‘ययाती’, ‘मृत्युंजय’, ‘स्वामी’ आजही तरुणाईच्या ‘बेस्ट फाइव्ह’ बुक्समध्ये येतात. इंग्रजीतली बेस्टसेलरही हीच पुस्तकं आहेत. ‘द शिवा ट्रायॉलॉजी’, ‘दा व्हिन्सी कोड’ वगैरे पुस्तकांची तरुणाईमध्ये विशेष आवड आहे. तरुणाईच्या मते, अमिश त्रिपाठीमुळे शिवा हा सुपर हिरो तर झालाच आहे, पण तरुणाईही त्याच्याशी जास्त रिलेट करू शकते. त्याचप्रमाणे दुर्योधन आणि रावणाचाही पॉइंट ऑफ व्ह्य़ू यातून कळू लागला आहे. रावणाची व्हिलनची इमेज या पुस्तकाने बदलू लागली आहे. अमिश त्रिपाठीच्या लेखणीने देवाकडे देव म्हणून पाहण्यापेक्षा ‘सुपर-हिरो’ म्हणून बघायला शिकवले. शबरी मराठे म्हणते, ‘‘जुन्या मलिकांमधल्या शंकराप्रमाणे हा पुस्तकातील शिवा सर्व-शक्तिमान किंवा सर्वज्ञ नाही. पण त्याने त्याची बुद्धी वापरून सगळी हिस्ट्रीच बदलून टाकली. त्यामुळे तो सुपर-हिरो झाला. हा असा पुस्तकातला सुपर हिरो मोठय़ा पडद्यावरही दिसावा, अशी तरुणाईची खूप इच्छा आहे.’’
ऐश्वर्या पटवर्धन म्हणते की, ‘‘अमिष त्रिपाठीच्या पुस्तकांमुळे युवावर्ग पौराणिक विषयांकडे आकर्षित होऊ लागला आहे. माणसापासून ते देवापर्यंतचा प्रवास उत्तम रेखाटला आहे. या पुस्तकांमुळे अशा कथांकडे बघण्याची एक नवीन दृष्टी मिळाली आहे.’’ द्रौपदीच्या नजरेतून सांगितलेलं महाभारत म्हणूनच आजच्या तरुणाईला भावतं. एकूणच पुराणातली वांगीही अजून ताजी टवटवीत आहेत हे खरं.
viva.loksatta@gmail.com