16 July 2020

News Flash

खाबूगिरी: थंडावा देणारं ‘फायर पान’

सध्या दिवस उकाडय़ाचे आणि रात्र घामाची आहे.

इतर कोणत्याही देशातील खाद्यसंस्कृतीमध्ये न सापडणारा आणि फक्त भारतीय खाद्यसंस्कृतीत असलेला पदार्थ म्हणजे पान. अगदी औरसचौरस जेवणानंतर या पानाची साथ मिळाली की, जेवणाची मजा दुपटीने वाढते. पण हे पान जमवतानाही काही गमतीजमती करता आल्या तर? खाबू मोशायने गिरगावात ‘फायर पान’ खाल्लं आणि त्याची तबियत खूश झाली.
सध्या दिवस उकाडय़ाचे आणि रात्र घामाची आहे. त्यामुळे खाबू मोशाय अत्यंत अस्वस्थ असून इतर वेळी जिभेला आव्हान देणाऱ्या पदार्थाकडे बघणंही त्याला जड जातंय. परिणामी गिरगावात धूप ताक पिण्यासाठी त्याच्या चकरा वाढल्या आहेत. आता गिरगावात जाण्यासाठी केवळ धूप ताक हेच एकमेव कारण नाही, हे खाबूला खुल्या दिलानं कबूल करायला हवं. गिरगाव रस्त्यावर कोणत्याही वेळी फुललेला रंगीबेरंगी फुलांचा चालताबोलता ताटवाही खूप मोहक आणि आकर्षक असतो, हे खाबूला सांगण्यासाठी नाथा कामताने पुस्तकातून बाहेर येण्याची गरज नाही. खाबूदेखील अधेमधे रुईया ते विल्सन चकरा मारून शिझन कसा आहे, ते बघून येत असतो.
तर, असाच एक दिवस धूप ताक प्यायला खाबू गिरगावात गेला असताना त्याच्या मोबाइलवर फ्राइड मन्याचा फोन आला. बाबू खवय्यासारखा हादेखील खाबूच्या ‘पोट’जातीतला भाऊबंद! फ्राइड मन्या हा सात वारांमधल्या शुक्रवारासारखा आहे. सदैव जिंदादिल. कधी कुठे गाण्याबजावण्याच्या मैफिलीला जाऊन रात्र जागवेल, उन्हं पायाशी येऊन सलाम आलेकुम करेपर्यंत बिछान्यात लोळत पडेल, डोक्यावर जुने नवाबअली घालतात तशा टोप्या घालून काय हिंडेल, फ्राइड मन्याचं काही सांगता येत नाही. खाणं, गाणं आणि लावण्य हे खाबू आणि फ्राइड मन्याला घट्टं जोडून ठेवणारे तीन धागे. फ्राइड मन्या गिरगावच्या नाक्यावर उभा राहून खाबूची पूछताछ करत होता. मग खाबू आणि फ्राइड मन्या भेटणं ओघानंच आलं. त्यात बोलता बोलता मन्यानं त्याला एक बढिया चीज दाखवतो, असं सांगितल्याने खाबूची पावलं गिरगाव नाक्याकडे वळली.
डॉ. भालेराव लेनमधून खाबू गिरगाव रस्त्याला येत नाही, तोच गायवाडी स्टॉपपाशी फ्राइड मन्या उभा असलेला दिसला. ओठात सिगारेट, ओठांच्या कडा पान खाल्ल्याने लाल झालेल्या आणि लाल पॅण्टवर पिवळा शर्ट घालून त्यावर हिरवा रुमाल गळ्यात अडकवून एवढी रंगसंगती कमी की काय म्हणून खिशातून निळा कंगवा काढून केस विंचरत उभा! खाबूला फ्राइड मन्याचं हेच आवडत नाही. ओठांना एक्स्टेंशन असल्यासारखी सदैव भगभगती सिगारेट हे मन्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. मन्या एकटाच उभा बघून त्याने आपला मामा केला, असा विचार चमकून गेला. खाबूने ‘असली चीज’ कुठे, असा प्रश्न केल्यावर ‘चलो तो सहीं’ असं म्हणत मन्याने त्याचा दंड धरून रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला नेलं आणि समोरच असलेल्या बोरभाट लेनमध्ये घुसवलं आणि नरेंद्र पानवाला नावाच्या दुकानाशी येऊन उभं केलं.
भारतीय खाद्य संस्कृती इतर खाद्यसंस्कृतींपेक्षा वेगळी आहे, यात वादच नाही. पण तरीही आपला भात असेल, तर चिनी किंवा थाई फूडमध्ये आपल्याएवढेच भाताचे विविध प्रकार आहेत. आपलं मटण असेल, तर अरब देशांमध्ये उंटाच्या मटणापासून बोकडाच्या मटणापर्यंत विविध जिन्नस चाखायला मिळतात. आपली भाकरी असेल, तर युरोपचा ब्रेड आहे. आपले गुलाबजाम, जिलबी आदी गोड पदार्थ असतील, तर तिथे केक, पेस्ट्रीज् आहेत. पण एक गोष्ट फक्त आणि फक्त आपल्या खाद्यसंस्कृतीतच सापडते. ती म्हणजे हे पान! खाबू मोशाय एकलव्यासारखाच पुलंचा शिष्य. त्यामुळे ‘पानवाला’ कोळून प्यायलेला किंवा वाचलेला म्हणू.
17
याच ‘पानवाल्या’च्या पंथातील एक पानवाला खाबूला या बोरभाट लेनमध्ये सापडला. नरेंद्र नागरे असं त्याचं नाव आणि त्याच्या पानाच्या गादीला नरेंद्र पानवाला हे नाव रूढ आहे. या नरेंद्र पानवाल्याकडे गुंडी पान, लहान मुले आणि बायका यांसाठीचं मसाला पान, मसाला मावा यांच्याबरोबरच फायर पान नावाचा भन्नाट प्रकार मिळतो, असं फ्राइड मन्यानं खाबूला सांगितलं. आपण म्हणत होतो ती ‘असली चीज’ हीच, हे मन्यानं सांगितल्यावर खाबूने कपाळावर हात मांडला. इथे उन्हाळ्याने खाबूच्या अंगाअंगात लावलेली आग घामावाटे बाहेर पडत असताना फायर पान वगैरे खाण्याची हिंमत कशी करायची, हे खाबूला कळे ना. पण फ्राइड मन्या कसला खाबूला सोडतोय!
पान जमवणे ही एक अदाकारी आहे. आधी नुसतं पान घ्यावं लागतं. एखाद्या लहान बाळाला आंघोळीनंतर पुसावं, तसं ते पुसावं लागतं. मग त्याचं देठ हलकेच खुडावं लागतं. कुशल मेकअप आर्टिस्ट जेवढय़ा हलकेपणे एखाद्या नाजूक चेहऱ्यावर रंग लावतो, तेवढय़ाच नाजूकपणे कात-चुना पानावर पसरवावा लागतो. मग समोरच्या माणसाकडे पाहून त्याच्या मिजाजला साजेसं पान न सांगता लावतो, तो खरा पानवाला. या गादीवरच्या नरेंद्र पानवाल्याने खाबूकडे पाहूनच तांबुलादी गोष्टी बाजूला ठेवल्या तिथेच खाबूला त्याच्याबद्दल प्रचंड खात्री वाटली. खाबू त्या बाबतीत अथुंक संप्रदायातला आणि स्वच्छतेचा भोक्ता. आपली घाण आपण साफ करावी, हे मानणारा. तेवढय़ात फ्राइड मन्याने आगाऊपणा करून त्याला फायर पान नावाची चीज बनवण्याचं फर्मान बजावलं. मगाशी लिहिलेली सगळी अदाकारी पानावर करत या पानवाल्याने एकेक जिन्नस त्या पानावर ठेवायला सुरुवात केली. खिमाम, ठंडाई, इलायची, कत्री सुपारी, सुकं खोबरं आदी जिन्नस पानावर विराजमान झाल्यावर त्याने डब्यातून एक पांढरी काडी काढून त्यावर ठेवली. जवळच पडलेला लायटर उचलून त्याने त्या पांढऱ्या काडीला लावला आणि तो प्रकार प्रज्वलित झाला. झटक्यात ते पान गुंडाळून त्याने खाबूच्या अगदी तोंडासमोर नेलं. खाबूने खरं तर अचंबित होऊन आऽऽ वासला होता. पण ती संधी साधून त्याने ते पान तोंडात कोंबलं.
लहानपणी बर्फात खेळल्यानंतर गोठलेल्या खाबूच्या घशात डॉक्टर्स ब्रॅण्डी ओतली होती. त्या वेळी खाबूला घशापासून पोटापर्यंत एक गरम द्रव्य गेल्याचा भास झाला होता. हे पान खाल्ल्यावर घशापासून पोटापर्यंत काही तरी थंडगार जातंय, असं त्याला जाणवलं. मस्तानी म्हणे पान खायची तेव्हा तिच्या घशातून खाली जाणारा रस दिसायचा. खाबू तेवढा सुंदर असता, तर कदाचित एक थंडगार झोत खाबूच्या घशापासून पोटापर्यंत जाताना फ्राइड मन्यालाही दिसला असता. दुर्दैवं मन्याचं! हे पान खाल्ल्यानंतर अंतर्बाहय़ थंड वाटतं. कान, नाक आणि तोंड ही पाच छिद्रं उघडी झाली असून त्यातून गार हवा आत जात असल्यासारखं वाटतं. सर्दी वगैरे असलीच, तर छुमंतर होते. बरं, हे पान फक्त २० रुपयांचं असल्याने हा गारवा केवळ शरीरालाच नाही, तर खिशालाही जाणवतो.
या फायर पानखेरीज नरेंद्र पानवाल्याकडे गुंडी पान, गोड मावा आणि इतर कलकत्ता, बनारसी वगैरे पानंही मिळतात. ही सगळीच पानं १० ते २५ रुपयांच्या आसपास आहेत. पण फायर पान ही फ्राइड मन्याच्याच शब्दात सांगायचं, तर ‘एकदम बढिया चीज’ आहे. हे पान खाल्ल्याची धुंदी अशी होती की, खाबू मोशायने त्या दिवशी पहिल्यांदाच गिरगाव रस्ता एकाही फुलाकडे न बघता तुडवला.

कुठे : नरेंद्र पानवाला, गिरगाव
कसे जाल : फायर पानपर्यंत पोहोचण्याचा उत्तम मार्ग म्हणजे रेल्वे. पश्चिम रेल्वेवर चर्नी रोड स्थानकात उतरल्यावर साहित्य संघाच्या गल्लीतून बाहेर पडा. गिरगाव रस्ता लागला की, तो ओलांडून समोरच असलेल्या बोरभाट लेनमध्ये नरेंद्र पानवाला आहे. मध्य रेल्वेवरून येणार असाल, तर सीएसटीला उतरल्यावर गिरगावात येणारी बस पकडा. गायवाडी या स्टॉपला उतरून रस्ता ओलांडल्यावर समोरच बोरभाट लेन दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2016 1:05 am

Web Title: popular and famous food places in mumbai
टॅग Marathi,Viva
Next Stories
1 खाऊच्या शोधकथा: पावभाजी
2 फ्रीडम अ‍ॅट इट्स बेस्ट..
3 फाइन डाइन: जेवणाची सुरुवात : अमेरिकन स्टाइल
Just Now!
X