‘ती येते आणिक..’ लेख वाचला (व्हिवा दिनांक २५ सप्टेंबर). पाळीबद्दलच्या गैरसमजुती आणि त्यातून आलेल्या रुढी अजूनही आपला पिच्छा सोडत नाहीत. ही देवानीच दिली आहेना? बायकांनी मागून थोडीच घेतली आहे. मग देवा जवळ त्यांनी का जायचं नाही? मूल जन्माला घालण्याचे कार्य स्त्री कडे सुपूर्त केलंय त्या देवाजवळ स्त्रीने जायचं नाही हा कसला अजब न्याय ? पाळीत स्त्रीला शारीरिक, मानसिक त्रास होतो त्यासाठी तिला विश्रांतीची गरज असते आणि त्यासाठी तिने आराम करावा हे प्रॅक्टिकल आहे. पण त्यापलिकडच्या रुढींना कुरवाळत बसण्यात अर्थ नाही. आजची पिढी अनावश्यक रुढी आणि अंधविश्वासाच्या बाहेर पडू बघतेय हे पाहून फार आनंद वाटला.
अर्चना कुलकर्णी, बदलापूर

नव्या पिढीनं बिनबुडाच्या प्रथा नाकारायला हव्यात
मासिक पाळीविषयीच्या समज- गैरसमजांविषयी अतिशय स्पष्ट शब्दात माहिती आणि भावना पोचवल्याबद्दल लोकसत्ता व्हिवाचे अभिनंदन. मी २९ वर्षांची विवाहिता असून लहानपणी देखील पाळीच्या वेळी वेगळी वागणूक मला सहन करावी लागली नव्हती. माझा या कुठल्याही रुढीवर विश्वास नसल्याने मी आताही त्या दिवसात सगळ्या धार्मिक कार्यात भाग घेते. पाळीच्या वेळी अंगावर का जातं, याचं शास्त्रीय कारण आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आता या प्रथा पाळण्यात काहीही अर्थ नाही. माझ्यामते, आमच्या नव्या पिढीनं केवळ पूर्वजांपासून चालत आल्या म्हणून अशा रुढी- प्रथा अकारण पाळणं योग्य नाही.
दीप्ती मोहरील

चर्चा आवश्यक
मासिक पाळीसारख्या विषयावर अजूनही आपण खुलेपणानं बोलू शकत नाही. अशा विषयांवर चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. आजही हे टाळायचे विषय असतात. व्हिवामधून या विषयावर योग्य प्रकाश टाकत नव्या पिढीच्या भावना योग्य शब्दात मांडल्याबद्दल धन्यवाद.
मोनाली देशमुख

त्वमेव केवलं कर्ताऽसि
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विधायक उपक्रम करणाऱ्या तरुणाईची माहिती त्वमेव केवलं कर्ताऽसि (व्हिवा, दि. १८ सप्टेंबर) या लेखात देण्यात आली होती. ही माहिती खरंच उपयुक्त होती आणि प्रेरणादायी होती. या उपक्रमांना आणि या तरुणांना मदत म्हणून निधी देण्याची इच्छा आहे. अशाच उपक्रमांची माहिती मिळत राहो. गणपती बाप्पा मोरया!
पल्लवी अत्रे

हॉस्टेलमधील बाप्पा
हॉस्टेलमधील बाप्पा (व्हिवा दि. १८ सप्टेंबर) या लेखाने अनेक आठवणींना उजाळा दिला. पुण्यात हॉस्टेलमध्ये राहताना केलेली धमाल, तिथे साजरे केलेले सण- उत्सव, मेसचं जेवण, पॅरासाइट म्हणून राहणं या सगळ्याच्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद!
आरती के.

‘ते’ गाणे आशाचे नव्हे..
प्ले लिस्ट या सदरातून जसराज जोशी नव्या पिढीपर्यंत जुन्या हिंदी-मराठी चित्र-भाव संगीताची मौलिक माहिती देत असतात. मी हे सदर आवडीने वाचतो. ११ सप्टेंबरच्या व्हिवा प्ले लिस्टमध्ये जसराज जोशींनी आशा भोसले यांच्या बारा रंगातल्या गाण्यांची ओळख करून दिली आहे. यात राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या काही गाण्यांचा समावेश आहे. यामध्ये ‘दो नयना एक कहानी’ या गाण्याचा उल्लेख आहे. हे गाणे आशा भोसले यांनी म्हटलेले नसून आरती मुखर्जी यांनी गायलेले आहे. गुलजार यांनी लिहिलेल्या ‘मासूम’ चित्रपटातल्या या गाण्यासाठी मुखर्जी यांना त्या वर्षांचा उत्कृष्ट पाश्र्वगायिकेचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता.  नव्या पिढीच्या वाचकांपर्यंत चुकीची माहिती जाऊ  नये, म्हणून हा पत्रप्रपंच! बाकी आशा बाईंच्या सदाबहार गायकीचा छान असा धावता नव्या पिढीचे गायक जसराज जोशींनी घेतला आहे तो खासच.

तुमचे सदर मला फार आवडते. आरडी यांच्या समकालीन असलेला, पण फारशी चर्चा न झालेला संगीतकार राजेश रोशन..यांच्याबद्दल लिहिता आले तर बघावे.
प्रा. प्रवीण घोडेस्वार, नाशिक
viva.loksatta@gmail.com