News Flash

वापरलेलं…

पाचवी ते दहावीपर्यंत मी आमच्या कॉलनीतल्या एक वर्ष पुढे असलेल्या- अनिरुद्ध परांजपेची पुस्तकं वापरली. या कारणासाठी तरी मला त्याच्यासारखे पैकीच्या पैकी मार्क मिळावेत असं मला

| April 26, 2013 12:10 pm

पाचवी ते दहावीपर्यंत मी आमच्या कॉलनीतल्या एक वर्ष पुढे असलेल्या- अनिरुद्ध परांजपेची पुस्तकं वापरली. या कारणासाठी तरी मला त्याच्यासारखे पैकीच्या पैकी मार्क मिळावेत असं मला वाटायचं.

मधे एकदा माझी एक छोटी मैत्रीण पावसात भिजली. माझं घर जवळच होतं म्हणून माझ्याकडे आली. ‘‘ओले कपडे बदल आधी’’- असं म्हटल्यावर माझ्या कपडय़ाच्या कपाटात खुडबुड करत बराच वेळ रमली. मग एक टॉप कप्प्यातून ओढत आरशात स्वत:ला हसून वगैरे न्याहाळत म्हणाली, ‘‘हा घालून जाऊ?’’ मी म्हटलं, ‘‘हो हो अवश्य. आणि परत आणून देण्याच्या फंदात पडू नकोस. मला जरा लहान होतो तो आता.’’ त्याच भरात मी कपाटातून अजून चार-पाच गोष्टी काढल्या आणि जाताना तिच्याकडे सुपूर्द करत म्हणाले, ‘‘बघ ही जीन्स आणि बाकीचे टॉप पण येतील तुला कदाचित.’’ माझी कॉलेज गोइंग मैत्रीण खूशच झाली. दुसऱ्या दिवशी तिच्या आईचा फोन आला. ‘‘अगं काय मस्त कपडे आहेत सगळे. छोटीचे किती लाड करतेस!’’ माझ्या पण तोंडावर मोठ्ठं हसू पसरलं.
किती साधी गोष्ट आहे ही. कुणीच गैरसमज करून घेतला नव्हता. क्वचित कधी छोटीला ते कपडे घालताना माझी आठवण आली असेल बास. ह्य़ाच्या विरुद्ध मधे जे ऐकायला मिळालं ते इतकं विचित्र होतं. आमच्या एका फॅमिली फ्रेंड कुटुंबाकडे गेले होते. काकूंना माझं बाळ बघायचं होतं. बरं नसल्यामुळे त्यांना हिंडता फिरता येत नाही आता. त्यांच्या सुनेनी पाठवलेला एक सुंदर अंगरखा कावेरीला घालून घेऊन गेले होते. काकूंना म्हटलं, ‘‘हे बघा.. आठवतंय का तुम्हाला? तुमच्या नातीचा फ्रॉक आहे हा.’’ ते लक्षात आल्यावर काकूंच्या डोळ्यातून घळाघळा पाणीच यायला लागलं. उदास उदास होत त्या म्हणाल्या, ‘‘सूनबाईंना सांगू नकोस हं. तिच्या नकळत दिल्या होत्या या सगळ्या गोष्टी मी तुला. तिनी फेकून देण्यासाठी काढल्या होत्या बाजूला. किती विचित्र झालीए तुमची पिढी. प्रत्येक गोष्टीत तुमचे आक्षेप, शंका, प्रश्नांची सरबत्ती. आम्ही कितीतरी गोष्टी ऐकलेल्या, पाहिलेल्या, चालत आलेल्या- म्हणून करत आलो. त्यामागच्या भावनांची गोडी जगताना कळत गेली. पण तुम्हाला आधी सगळ्याची कारणमीमांसा करायची असते आणि आमचं म्हणणं उडवून लावायचं असतं.’’
गप्पांच्या ओघात कळत गेलं. त्यांच्या कुणा नातेवाईकांकडून आलेलं बाळलेणं पाहिल्यावर काकूंच्या सुनेचा पारा चढला होता. ती काकूंना घालून पाडून बोलली. ‘‘कुणाची तरी वापरलेली झबली आणि दुपटी. मी नाही माझ्या बाळाच्या अंगाला लागू देणार. इट्स सो अनहायजिनिक. आम्हाला नाही भिकेचे डोहाळे लागले. आम्ही स्वत: खूप कष्ट करून भरपूर पैसे कमावतो. जगातली कुठलीही महागातली महाग गोष्ट आम्ही आमच्या बाळाला घेऊ शकतो. हे सेकण्ड हॅण्ड गिफ्ट तुम्ही त्या नातेवाईकांना परत करा.’’ हे ऐकल्यावर काकू अवाक झाल्या होत्या म्हणे. मुद्दा तुमच्याकडे किती पैसे आहेत हा नाहीच्चे मुळी. एका बाळानी वापरलेल्या गोष्टी दुसऱ्या बाळाकडे मऊ होऊन जातात. बाळाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा घेऊन जातात. अगदी इम्युनिटीसुद्धा वाढवतात. शेअिरग, देवाणघेवाण, एका आईनी दुसरीला दिलेला धीर, उमेद, नव्या आईच्या कष्टांसाठी, नवलाईसाठी वाटणारी सहानुभूती – अशा शब्दात न मांडलेल्या कितीतरी गोष्टी- प्रेम आणि दिलासा व्यक्त करतात.
खरंच अलीकडे पैसे जास्त लोकांकडे की वेळ कमी झालाय कळत नाही. पण हो, सुबत्ता खूप आलीए आणि पेशन्स कमी झालाय एवढं मात्र नक्की. दुसऱ्याचं काऽऽही नको असतं लोकांना. पूर्वी लहान होतोय म्हणून कुणी ड्रेस वगैरे दिला तर किती अप्रूप वाटायचं. आत्याकडे राहायला गेल्यावर गंमत म्हणून तिच्या जुन्या चपला घालून बसण्याचा आनंद वेगळाच असायचा. कित्ती वेळा मोठय़ा बहिणी / वहिन्यांच्या कपडय़ांना धावदोऱ्यांनी टीप घालून लहान करून घालायचो आम्ही. माझ्या अरंगेत्रमला वृषाली वहिनीची लग्नातली चिंतामणी रंगाची साडी नेसले होते मी. हाफसारी करून. माझ्या दूरदर्शनवरच्या आणि एकूण आयुष्यातल्याही पहिल्या शूटिंगला प्रिया वहिनीची हिरवी साडी आणि टीप घातलेलं ब्लाऊज! अजूनही कधी तो सतारवादनाचा कार्यक्रम लागला आणि
माझं निवेदन सुरू झालं की, प्रिया वहिनीची आठवण येते. आईच्या कितीतरी ब्लाऊजना तर टिपा घालून काढून भोकं पाडली होती मी चक्क. नाटक, एकांकिका, कविता वाचन- प्रत्येक कार्यक्रमाला हक्काची वॉर्डरोब कर्टसी म्हणजे आईच! बाकी फोटोशूट इ. कार्यक्रमांना मोठय़ा बहिणींचे कपडे चाचरत मागण्यात आणि मिळाल्यावर हरखून जाण्यात काय मजा होती. माझी आई आणि सिंधूमावशी वर्षांतून एकदा भेटल्या की, एखाद् वेळी साडय़ा एक्स्चेंज करायच्या. वापरण्यात ताजेपणा यायचा. आणि आठवणीनी मूड आनंदी व्हायचा. माझ्या आईच्या वडिलांनी- आईच्या पहिल्या बाळंतपणात- संदीपसाठी म्हणून करून घेतलेल्या पाळण्यात पुढे शंभर-सव्वाशे तरी बाळं झोपली, त्यांच्या आयांनी हलका झोका घालत अंगाई म्हटली. त्यांना पाळणा पोचवण्यासाठी, त्यासोबत काहीतरी खाऊ देण्यासाठी आईनी केलेली लगबग किंवा बाबांनी पाळणा स्कूटरला सुतळीनी बांधून बाळाच्या घरी तो नीट पोचवण्यासाठी केलेली धडपड आठवली तरी मला हेलावून जायला होतं. किती गोड संदर्भ जुडत जातात एखाद्या वस्तूला.
हल्ली सगळेजण अळूच्या पानांसारखे निर्लेप व्हायचा प्रयत्न करतायत. निरुपद्रवी असण्यासाठी स्वत:ला मिटून घेतायत. नकोच ती कटकट कुणाकडून काही घेण्याची- आणि मग आठवणीनं परत करण्याची- या नादात पिढय़ान्पिढय़ा चालत आलेल्या- ‘आनंदाचं, चांगलं ते’ वृद्धिंगत करण्याच्या साखळीला खंड पडत चाललाय. प्रत्येकानं बाजारात मिळत असलेल्या सगळ्या गोष्टी घ्यायचं ठरवलं- तर मग काय. चंगळवाद पोसणारे मार्केटिंगवाले अजून अजून यशस्वी होत राहतील. आपल्यालाही मग घरातल्या भारंभार वस्तूंप्रमाणे प्रदर्शनात मांडल्यासारखं जगायची सवय होईल. छे! झटकून टाकू या हा अवघडलेपणा. एखादी गोष्ट स्वीकारण्याची ग्रेस शिकू या. एखाद्याचा आनंद द्विगुणीत करणं फुकट साध्य होतं. त्याला पैसे नाही लागत. ते करू या- आणि मग कुणाकडे किती पैसे आहेत, त्या पैशात आपण काय काय खरेदी करू शकतो याच्या बाता मारू या!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 12:10 pm

Web Title: sucess from useing the used things
टॅग : So Cool,Sonali Kulkarni
Next Stories
1 भैरवी मारणार ‘बाजी’..
2 क्लिक
3 मी आले, निघाले..
Just Now!
X