|| गायत्री हसबनीस

सस्टेनेबिलिटी फॅशन क्षेत्रात खूप महत्त्वाची ठरते आहे, मात्र त्या प्रमाणात ती अजून साध्य करता आलेली नाही. सस्टेनेबल फॅ शनचा विचार रुजावा यासाठी सध्या वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या पद्धतीने खूप धडपड, धावपळ, प्रयोग, विचार, प्रयत्न सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठय़ा प्रमाणात वर्षभर ज्यांनी सस्टेनेबिलिटी हा एकच ध्यास घेतला आहे त्यांनी मांडलेल्या ‘ग्लोबल फॅशनअजेंडा’ विषयी..

घराचा, संस्थेचा, कंपनीचा किंवा देशाचा कारभार सांभाळायला ज्या प्रकारे एका सक्षम नेतृत्वाची गरज असते त्याचप्रमाणे फॅ शनसारख्या सतत बदलत राहणाऱ्या क्षेत्राचा कारभार, त्यापुढील त्याचा विकास, होणाऱ्या बदलांचे फायदे – तोटे, बाजार, विक्रेत्यांचे आणि ग्राहकांचे समीकरण हे सांभाळायलादेखील तितक्याच ताकदीच्या नेतृत्वाची गरज भासते. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून जागतिक पातळीवर नानाविध फोरम्स, मूव्हमेंट्स, बिझनेस नेटवर्क्‍स आणि संस्था कार्यरत आहेत. आज जगात प्रत्येक कानाकोपऱ्यातून फॅशनच्या बाबतीत विचार करताना इतर प्रयोगांबरोबरच सस्टेनेबिलिटीला जास्त प्रमाणात महत्त्व दिले जाते आणि त्यातून जगभरात सस्टेनेबल फॅ शनचा विचार पुढे नेण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांतून पुढाकार घेतला जातो.

सस्टेनेबिलिटी ही सध्याची गरज आहे हे जगजाहीर आहे, परंतु त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी इतक्या मोठय़ा प्रमाणावर नामांकित मंडळींचं एकत्र येऊन त्यासाठी प्रयत्न करणं हेही नवलाईचंच आहे. सध्या अनेक संस्था, फोरम, चळवळी त्या दृष्टीने जे उपक्रम राबवताहेत, त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे सस्टेनेबल फॅशनचा विचार मांडून थांबणं पुरेसं नाही. तर ग्राहकांची सस्टेनेबल फॅ शनची मागणी आणि त्यांना त्याचा पुरवठा कसा होईल, याचाही विचार व्हायला हवा आहे. आणि हेच सध्या फॅ शन इंडस्ट्रीला व्यवसायाच्या दृष्टीने मोठे आव्हान आहे हे लक्षात येईल. सतत नवनवीन क्लोदिंग ब्रॅण्ड्सचं झपाटय़ाने वर येणं. तरुण पिढीची बदलती जीवनशैली आणि अभिरुची; हेही फॅ शन इंडस्ट्रीसमोरचं एक मोठं आव्हान आहे. याचं कारणही असं की सध्या तरुण पिढी ही डिजिटल माध्यमांतून फॅ शनचा सर्वात जास्त फॉलोअप ठेवते. त्यांना प्रत्येक फॅब्रिक आणि स्टाइल्सची इत्थंभूत माहिती असते आणि ती त्यांना सतत हवी असते. त्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी दर्जेदार कपडय़ांची मागणी असलेल्या फॅ शन कंपन्यांना डिजिटलायझेशनची अत्यंत गरज आहे, परंतु यावर फॅ शन इंडस्ट्री कितपत जोर देऊ  शकते? हीही एक शंका आहे. सगळंच ऑनलाइन झालं तर फॅशन स्टोअर आणि अ‍ॅपरल स्टोअरचं अस्तित्वच किती उरेल?, हाही एक कळीचा मुद्दा आहे. हे सगळे मुद्दे आणि त्यातही प्राधान्याने चर्चिला जाणारा सस्टेनेबल फॅ शनचा मुद्दा इथे सविस्तर मांडण्याचे कारण म्हणजे गेल्या वर्षां-दोन वर्षांत जगभरात झालेले मोठे फॅ शनसंबंधित इव्हेंट्स आणि उपक्रमांतून यावर जोर देण्यात आला आहे. सस्टेनेबल फॅ शनचा आणखी एका वेगळ्या अंगाने विचार होतो आहे तो म्हणजे फॅ शन इंडस्ट्रीसमोरची पर्यावरणाची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने काही ठोस उपाय मिळाले तर त्यातूनच पर्यावरणस्नेही उत्पादनांच्या नव्या उद्योगाला चालना मिळणार आहे. ‘लंडन कॉलेज ऑफ फॅ शन’ येथे गेल्या वर्षी पार पडलेल्या ‘ग्लोबल फॅ शनकॉन्फरन्स’मध्ये सस्टेनेबिलिटी हा ट्रेण्ड न होता त्याचा अधिकाधिक फायदा इंडस्ट्री आणि ग्राहक दोघांनाही व्हायला हवा या दृष्टीने सस्टेनेबल फॅ शनचा विकास झाला पाहिजे, असा आग्रह धरण्यात आला होता. हे आव्हान पेलण्यासाठी सध्या जागतिक स्तरावरील फॅ शन इंडस्ट्रीतील प्रतिभावंत डिझाइनर, फॅशनचे पुरस्कर्ते मैदानात उतरले आहेत.

याच दृष्टीने आणखी एक फोरम महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे ‘ग्लोबल फॅ शनअजेंडा’. डेन्मार्कमधील कोपनहेगन या शहरात ‘ग्लोबल फॅशनअजेंडा’चे बस्तान आहे. दरवर्षी ‘कोपनहेगन फॅ शन समीट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपक्रमातून  सस्टेनेबिलिटीसारख्या विषयांवर नामांकित व्यक्तींची वैचारिक बैठक ‘ग्लोबल फॅ शनअजेंडा’च्या वतीने भरवली जाते. यंदाचे हे त्यांचे दहावे वर्ष होते. मे महिन्यात या ‘कोपनहेगन फॅ शन समीट’ला सुरुवात होते. इवा क्र्यूझ या ‘ग्लोबल फॅ शनअजेंडा’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्या एका मोठय़ा फॅशन मॅगझिनच्या एडिटर -इन चीफ राहिल्या आहेत. या मंचावरून ‘एम्मी’ पुरस्कार विजेती अभिनेत्री ज्युलिया ऑरमान्ड, ‘मार्क अ‍ॅण्ड स्पेन्सर’ या रिटेलरचे संचालक माईक बेरी, डेन्मार्कची राजकन्या मॅरी, ‘एच् अ‍ॅण्ड एम्’च्या सस्टेनेबिलिटी विभागाच्या प्रमुख अ‍ॅना गेडा अशा काही महत्त्वाच्या व्यक्तींनी या बैठकीत आपले विचार मांडले होते. २०२५ पर्यंत फॅ शन विश्वात सस्टेनेबिलिटीसाठी नक्की काय काय करता येऊ  शकते, याबाबत तज्ज्ञांनी आखणी करायला सुरुवात केली आहे, ही बाब या वर्षीच्या ‘कोपनहेगन फॅ शन समीट’मध्ये अधोरेखित झाली होती. याच बैठकीत २१३ ब्रॅण्ड्सना रिसायकलिंग आणि रिसेलसाठी प्रोत्साहित करावे, या उद्देशाने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २१३ ब्रॅण्ड्सचं टार्गेट खरंतर दोन वर्षांपूर्वीच ठरवण्यात आले होते, त्यापैकी २१ टक्के म्हणजे ९० ब्रॅण्ड्सनी रिसायकलिंग आणि सस्टेनेबल कपडय़ांची निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. जास्तीत जास्त कपडे हे रिसायकल फॅ ब्रिकपासून बनवावेत, असाही निर्धार करण्यात आला असून रिसायकल फॅब्रिक्सची निर्मिती नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यावर कोपनहेगन फॅ शन समीटचा भर राहणार आहे. डिझाइनर्स आणि बायर्सशी यांची गाठ घालून देणं हाही यातला महत्त्वाचा भाग होता. भारतात फॅ शन डिझाइनरअनिता डोंगरेंपासून कीर्ती तूला, टेन्सेलसारखे ब्रॅण्ड जे स्वत: सस्टेनेबिलिटीवर भर देतात ते हा ‘ग्लोबल फॅ शनअजेंडा’ नियमितपणे फॉलो करताना दिसतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित ब्रॅण्ड्समध्ये होणाऱ्या बदलांवरही या ग्लोबल फॅ शन अजेंडाचा प्रभाव आहे. याच फॅ शन समीटमध्ये‘एच् अ‍ॅण्ड एम्’ या ब्रॅण्डने आपण सस्टेनेबल फॅ शनसाठी आग्रही असल्याचे आश्वासन दिले होते. सस्टेनेबल उत्पादन निर्मिती करत असतानाच त्यासाठी आर्टिफिशियल इन्टिलिजन्सचा वापर करण्याचाही प्रयत्न असल्याचे ‘एच् अ‍ॅण्ड एम्’ने स्पष्ट केले आहे. ‘एच् अ‍ॅण्ड एम्’ आपल्या सप्लाय चेन आणि ऑपरेशन विभागातही फेरबदल करणार आहे. ‘ग्लोबल फॅ शनअजेंडा’च्या वतीने तरुणांना मोठय़ा प्रमाणात सस्टेनेबल फॅशन आणि तत्सम उपक्रमात सहभागी करून घेण्यात येते आणि येथे रोजगाराच्या संधीही आहेत. तर दुसरीकडे ग्लोबल फॅ शन अजेंडाच्या कृपेने सस्टेनेबल होण्याचा विचार करणाऱ्या ‘एच् अ‍ॅण्ड एम्’च्या उद्योगात सस्टेनेबिलिटीमुळे वाढ होईल की आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या मदतीने.. यावरही त्यांचे लक्ष आहे. ग्राहक सस्टेनेबल फॅशनच्या बाबतीत जागरूक आहेत.

‘ग्लोबल फॅशनअजेंडा’च्या माध्यमातून रियूज कपडय़ांची आणि फुटवेअरची संख्या वाढवून त्याच वेळी रिसायकल केलेल्या पोस्ट कन्झ्युमर वेस्ट फॅब्रिक्सचाही खप वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. हा सगळा विकास किती वेगाने होतो आहे, याचीही ‘पल्स स्कोअर ऑफ द इंडस्ट्री’च्या मदतीने नोंद ठेवली जाणार आहे. या नोंदीतून जे निष्कर्ष समोर येतील त्यानुसार फॅ शन इंडस्ट्रीची पुढील धोरणे ठरवण्यात येणार आहेत. जुलैपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार या उपक्रमाचा वेग मंदावला असल्याने सस्टेनेबल फॅ शनचे ध्येय गाठण्यासाठी २०२० पर्यंत एक मोठे बिझनेस मॉडेल निर्माण करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. ‘ग्लोबल फॅ शन अजेंडा’ची ध्येयधोरणे आणि प्रत्यक्ष उपक्रम लक्षात घेता २०२० हे वर्ष फॅशन इंडस्ट्रीसाठी आमूलाग्र बदल करणारे ठरेल, असे दिसते.

viva@expressindia.com