30 September 2020

News Flash

टेकजागर : तंत्रजागराला या!

सोशल मीडियावर झळकणारा प्रत्येक मजकूर सत्यवचन असल्यासारखं आपण फॉरवर्ड करत राहतो.

(संग्रहित छायाचित्र)

आसिफ बागवान viva@expressindia.com

खरं तर टेक्नोलॉजी या विषयावर वृत्तपत्रात लिहावे, हा विरोधाभासच. कारण ज्याला तंत्रज्ञान कळतं आणि जो ते अवगत करतो, त्याला स्मार्टफोन, लॅपटॉप आणि सोशल मीडियातून टेक्नोलॉजीबाबत समजत असतंच. आणि ज्याला ते कळत नाही (अशी मंडळी आता खूपच कमी उरली आहेत!) त्याच्यासाठी या विषयावर वृत्तपत्रात छापून आलेलं वाचणं म्हणजे निव्वळ ज्ञानात भर असते. पण तंत्रज्ञान कळतं आणि कळत नाही अशा दोन वर्गाच्यामध्ये एक मोठा वर्ग आहे तो म्हणजे तंत्रज्ञान न कळताच वापरणाऱ्यांचा. असा वर्ग ज्याच्या हाती अपटुडेट स्मार्टफोन असतो, मनगटावर फिटनेस बँड असतो, सोशल मीडियावर आल्या-गेल्या प्रत्येक मेसेजला पोचपावती देऊन तो पुढे पोच करण्यात जे तत्पर असतात. या वर्गात तंत्रज्ञानाच्या भल्याबुऱ्याची समज काहीशी कमी असते आणि तिचे दुष्परिणाम वेळोवेळी समोर येत असतात. हे सदर खासकरून या वर्गासाठी आहे.

तंत्रज्ञानाची समज कमी असणे हा काही कमीपणा नाही. कोणी आपली या वर्गात गणती केली म्हणून रागावण्याचेही कारण नाही. त्यांना टोमणे लगावणे किंवा झोडपणे हा काही या सदराचा हेतू नाही. उलट या सदराच्या माध्यमातून तंत्रज्ञानाशी अधिक जवळीक साधताना त्याचा वापर अधिक विचारपूर्वक करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. ती काळाची गरजही आहे. आज तंत्रज्ञानाने आपल्या रोजच्या जगण्याला व्यापून टाकले आहे. सकाळच्या अलार्मपासून ट्रेनच्या मोबाइल तिकिटापर्यंत आणि अ‍ॅपवरून लंच ऑर्डर करण्यापासून रात्रीच्या वेबसीरिज मनोरंजनापर्यंत आपण तंत्रज्ञानाच्या कह्य़ात गेलो आहोत. दिवसाच्या २४ तासांपैकी १६ तास सोशल मीडियाशी कनेक्ट असणं, हाही त्यातलाच एक भाग. याच दरम्यान, आपण मोबाइलवरून बिलं भरतो, ऑनलाइन शॉपिंग करतो, डेटिंग करतो आणि क्वचित आयुष्याचा जोडीदारही निवडतो. एकूणच ही सर्व गॅझेट्स आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली आहेत.

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आपल्या सर्वाचा वेळ आणि पैसा दोन्हींमध्ये बचत झाली आहे. त्यामुळे त्याबद्दल ओढ असणं स्वाभाविक आहे. पण तंत्रज्ञानाचा वाढता वापर आपल्याला परावलंबी तर बनवत नाही ना, याचा विचार करण्याची वेळही आता आली आहे. गॅझेटनी आपल्या दिनक्रमातील अनेक कामे सोपी केली आहेत. पण त्यामुळे आपण दिवसेंदिवस अधिकाधिक आळशी होत आहोत. इतकं की, आपल्या झोपेचे तास मोजायलाही आपल्याला एखाद्या फिटनेस ट्रॅकरची मदत घ्यावी लागते आहे. घरापासून बाजारापर्यंत जाण्याचे कष्ट न घेता अ‍ॅपवर क्लिक करून किराणा घरपोच मागवणारे आपण दररोज किती पावले चाललो याच्या गणितातून स्वत:च्या तंदुरुस्तीची समीकरणे मांडू लागलो आहोत. एखाद्या अनोळखी ठिकाणी गेल्यावर पत्ता शोधण्यासाठी आपल्याला कोणालाही विचारायची गरज लागत नाही. गुगल मॅपवरून आपल्याला पटकन ते ठिकाण सापडतं. ही झाली तंत्रज्ञानाची कार्यक्षमता. पण प्रत्येकवेळी गुगल करण्याआधी एखाद्या स्थानिकाला विचारण्याची तसदी आपल्याला घ्यावीशी वाटत नाही, हा आपला आळशीपणा. एकेकाळी संवादाचं जलद माध्यम उपलब्ध करून देणाऱ्या तंत्रज्ञानाने आज माणसामाणसांतील संवादच इमोजींपुरता मर्यादित केला आहे. नववर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला फोन किंवा संदेश नव्हे तर व्हॉट्सअ‍ॅप स्टिकरही पुरेसे वाटतात, इतका कोरडेपणा नाती आणि मैत्रीमध्ये निर्माण झाला आहे.

तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे आलेला आळशीपणाही एकवेळ सुसह्य़, पण आपले वैचारिक परावलंबित्व फारच गंभीर आहे. सोशल मीडियावर झळकणारा प्रत्येक मजकूर सत्यवचन असल्यासारखं आपण फॉरवर्ड करत राहतो. फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या पोस्ट आपली वैयक्तिक आणि सार्वजनिक मते बनवतात. अफवा किंवा गैरसमज पसरवण्यासाठी तयार केलेले व्हिडीओ आणि फोटो आपल्या विचारविश्वाची जागा व्यापतात. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली खोटी बातमी फॉरवर्ड करताना तिची खातरजमा करण्याची मेहनतही आपण बुद्धीला घेऊ देत नाही. हे फारच धोकादायक आहे. निवडणुकीच्या निकालांपासून कुटुंबातील कुरबुरीपर्यंत अनेक गोष्टींवर या वैचारिक आंधळेपणाने मोठा परिणाम केला आहे. आहारापासून आरोग्यापर्यंतचे सल्ले इंटरनेटवरून घेतले जात आहेत. दिवसातून दोनदा जेवायचं की दोन दोन तासांनी खायचं, याचा निर्णय इतरांच्या सांगण्यावरून होऊ लागला आहे, इतपत आपल्या शरीरावर तंत्रज्ञानाची हुकमत निर्माण झाली आहे.

तंत्रज्ञान वाईट आहे, असा या साऱ्याचा अर्थ बिलकुल नाही. त्याचा वापर कसा आणि किती करायचा, याचं भान आपल्याला नाही, हे यामागचं सांगणं आहे. ते भान आणण्यासाठी प्रयत्न करणं, हाच या सदराचा हेतू आहे. तंत्रज्ञानाचा वापर कमी करण्यासाठी उपदेशाचे डोस पाजण्याचा प्रकार इथे होणार नाही. पण तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला उपयुक्त कसा ठरेल, याच्या क्लृप्त्या म्हणजेच टिप्स देण्यासाठी ही जागा निवडली आहे. तंत्रजगतातील एखादी घडामोड आपल्या जीवनावर कसा प्रभाव पाडेल, हे सांगण्यासाठीचा हा लेखप्रपंच असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2019 4:26 am

Web Title: technology the importance of digital technology in life
Next Stories
1 फिट-नट : चिन्मय उद्गीरकर
2 जगाच्या पाटीवर : कालसुसंगत अर्थशास्त्र
3 नया है यह : कूल जॅकेट्स!
Just Now!
X