|| आसिफ बागवान

मोबाइलचा कॅमेरा जितका जास्त मेगापिक्सेलचा तितका तो अधिक दर्जेदार, असा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मोबाइल कॅमेऱ्यांच्या मेगापिक्सेलचे आकडे आठ, दहावरून थेट २१, २५ मेगापिक्सेल इतके पोहोचले आहेत. ग्राहकही दरवेळी जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला मोबाइल दिसला की, त्याकडे आकृष्ट होतात. पण खरंच फक्त मेगापिक्सेलवरच कॅमेऱ्याचा दर्जा ठरतो का?

९० च्या दशकानंतर जन्मलेल्यांनी कदाचित हा अनुभव घेतला नसेल. पण एक काळ होता जेव्हा फोटो काढणं हा एक सोहळा असायचा. किंबहुना कुठल्या तरी सोहळय़ातच फोटो किंवा व्हिडीओ शूटिंग यासारखं काहीतरी घडायचं. त्यासाठी करावी लागणारी तयारी म्हणजे आणखी वेगळा सोहळा.  घरातच कॅमेरा असला तरी, कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी आधीच त्यात नवीन बॅटरी सेल टाकायचे. मग बाजारातल्या फोटो स्टुडिओत जाऊन रोल घेऊन यायचा. तो कॅमेऱ्यात अलगद भरायचा. बरं कॅमेऱ्यात रोल भरणं हे साधं काम नसायचं. अनेकदा चुकीच्या पद्धतीने रोल बसवला आणि ते वेळीच लक्षात आलं नाही तर, सगळा बट्टय़ाबोळ व्हायचा.

अख्ख्या कार्यक्रमभर कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा लखलखाट करूनदेखील प्रत्यक्षात फोटो यायचेच नाहीत. मग ते काम करणारा शिव्यांचा धनी व्हायचा. बरं रोल नीट बसवल्यानंतरही फोटो चांगले येतील याची खात्री नाही. अपुरा प्रकाश किंवा झगमगाटी उजेड या दोन्ही परिस्थितीत फोटो काढताना घोळ व्हायचेच. लेन्सवर बोटाचा काही भाग आल्याने किंवा नीट फोकस न केल्याने किंवा योग्य फ्रेम न घेतल्याने खराब होणाऱ्या फोटोंची गणती वेगळीच. बरं हे सगळं उघड व्हायचं कधी तर, कॅमेऱ्यातल्या ३६ फोटोंच्या फिल्मचा रोल संपल्यानंतर फोटो स्टुडिओत धुवायला टाकल्यानंतर दोन दिवसांनी जेव्हा हातात ‘डेव्हलप्ड’ फोटो यायचे तेव्हा.

डिजिटल कॅमेरा आल्यानंतर हे ‘कॅमेरायण’ निव्वळ फोटोपुरतंच उरलं. मेमरी कार्डवर जागा आहे तोवर हवे तेवढे फोटो काढा आणि हवे तेव्हा कॉम्प्युटरशी जोडून त्यांची प्रिंट काढली की झालं. फोटो काढताना त्याची नेमकी फ्रेम, प्रकाश या गोष्टीही डिजिटल कॅमेऱ्यावरील डिस्प्लेमध्ये दिसायच्या. त्यामुळे तो तापही कमी झाला. पण डिजिटल कॅमेरा सगळय़ांनाच परवडणारा नव्हता. तो सांभाळून हाताळणंही एक जोखीमच. कॅमेरा मोबाइलमध्ये आला आणि या सगळय़ाच अडचणी दूर झाल्या. मोबाइलमध्ये कॅमेराही बसवता येऊ शकतो, या संकल्पनेचा पहिला वापर २००० मध्ये सॅमसंगने कोरियामध्ये आणि शार्पने जपानमध्ये केला. पण हे फोटो काढण्यासाठी मोबाइल कॉम्प्युटरशी जोडावा लागत होता. कॅमेऱ्यांचा दर्जाही सर्वसाधारण होता. पण ती सुरुवात होती. कॅमेरा आणि मोबाइल हे समीकरण खऱ्या अर्थाने रूढ झाले ते टचस्क्रीन आधारित फोनची निर्मिती सुरू झाली तेव्हा. तोपर्यंत कॅमेऱ्यांच्या मेगापिक्सेलने ०.३ वरून पाच मेगापिक्सेलपर्यंत झेप घेतली होती. पण टचस्क्रीन स्मार्टफोन आल्यानंतर मोबाइल कॅमेऱ्यांत जबरदस्त प्रगती पाहायला मिळाली. कॅमेऱ्यांचे मेगापिक्सेल वाढलेच; पण त्याजोडीने फ्रंट कॅमेरा आला, व्हिडीओ रेकॉर्डिग आलं, एलईडी फ्लॅश आला. मोबाइलचा कॅमेरा परिपूर्ण होऊ लागला.

गेल्या चार-पाच वर्षांत तर याबाबतीत क्रांतीच झाली आहे. पूर्वी स्मार्टफोनसोबत कॅमेरा हे एक अतिरिक्त वैशिष्टय़ समजले जायचे. पण आता स्मार्टफोनचा कॅमेरा  हा फोनइतकाच महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. आज बाजारात येणाऱ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या जाहिरातीतील मोठा भाग हा त्या फोनचा कॅमेरा किती वेगळा आणि दर्जेदार आहे, हे सांगण्यात खर्ची होत असतो. ते स्वाभाविकही आहे. कारण स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर होत असलेल्या गोष्टींमध्ये कॅमेरा हा घटक आघाडीवर आहे. केवळ तरुणाईच नव्हे तर, सर्वच वयोगटातील वापरकर्ते मोबाइल कॅमेऱ्याचा पुरेपूर वापर करत असतात. आपल्याकडे दर्जेदार कॅमेरा असलेला स्मार्टफोन असावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

कॅमेऱ्यातलं तंत्रज्ञान गेल्या दोन-तीन वर्षांत इतकं प्रगत झालं आहे की, आता त्याची तुलना डीएसएलआर कॅमेऱ्यांशी होऊ लागली आहे. मोबाइल बनवणाऱ्या कंपन्याही तशाच जाहिराती घेऊन जनतेसमोर येतात. अशा वेळी ‘दर्जेदार’ कॅमेरा कसा ओळखावा, याबद्दल ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. अनेकदा स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचे वाढणारे मेगापिक्सेलच ग्राहकांना आकर्षित करत असतात. पण ‘मेगापिक्सेल’ हाच केवळ कॅमेऱ्यांचा दर्जा ठरवण्यासाठीचा मुद्दा असू शकत नाही. त्यामागे मोबाइलमधील हार्डवेअर, प्रोसेसर, झूमची क्षमता, ऑटोफोकसचा दर्जा अशा अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. भरपूर उजेड असलेल्या ठिकाणी ९९ टक्के मोबाइल कॅमेऱ्यांतील फोटो उत्तम येतात. पण अंधारलेल्या किंवा कमी उजेड असलेल्या ठिकाणी फोटो कसा येतो, यावरून कॅमेरा किती गुणी आहे, हे ओळखता येते. ‘पोर्ट्रेट मोड’ हा कॅमेऱ्यातील अलीकडचा महत्त्वाचा घटक आहे. ‘पोर्ट्रेट मोड’मध्ये छायाचित्रातील ‘सब्जेक्ट’ अर्थात ज्याचा फोटो काढायचा आहे, ती वस्तू किंवा व्यक्ती यांच्यावरच फोकस होऊन फ्रेममधील पाश्र्वभूमी धूसर होते. त्यामुळे छायाचित्रातील सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट अधिक उठावदार दिसते. सध्या सर्वच मोबाइल कॅमेऱ्यांमध्ये ‘पोटर्र्ट मोड’ असतो. पण तो कितपत प्रभावी आहे, हे चाचपल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे कॅमेऱ्याकडे पाहून स्मार्टफोन खरेदी करताना हा विचार करणेही गरजेचे आहे. सध्या ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ तंत्रज्ञानामुळे कॅमेऱ्याला प्रत्यक्ष न हाताळतानाही दर्जेदार फोटो काढता येतात. अशी सुविधा असलेला कॅमेरा चांगलाच. पण ती सुविधाही योग्यपणे काम करते का, हा निकषही पडताळून पाहणे गरजेचे आहे.

सेल्फी असो की एखाद्या निसर्गदृश्याचे छायाचित्र. आपल्या कॅमेऱ्याने सगळे कसे ‘आहे तसे’ टिपले पाहिजे किंबहुना त्यापेक्षाही ‘देखणे’ टिपले पाहिजे, अशी आपल्या सर्वाचीच अपेक्षा असते. ती पूर्ण व्हावी, असे वाटत असेल तर वर सांगितलेल्या गोष्टींचा विचार करायलाच हवा.

viva@expressindia.com