तेजश्री गायकवाड

लग्नात नाचगाणं म्हटलं की सहजच वरातीतला वेडावाकडा डान्स आठवतो. वरातीत डान्स हा फक्त वरपक्षाच्या लोकांना करायला मिळतो म्हणूनच की काय गेल्या काही वर्षांपासून लग्नात ‘संगीत’ हा इव्हेंट खास महत्त्वाचा ठरतो आहे. संगीत इव्हेंटमध्ये खऱ्या अर्थाने दोन कुटुंबं एकत्र येऊन दिलखुलास आपली नृत्यकला दाखवत मस्ती-धम्माल करतात. अर्थात, यातही तरुणाईचा सहभाग मोलाचा असल्याने खास या संगीत डान्स इव्हेंटसाठी डान्स प्रशिक्षकही सज्ज झालेले दिसतात..

गेली काही वर्ष स्वत:ची नोकरी सांभाळत लग्नसराईमध्ये डान्स शिकवणारी तेजश्री सावंत सांगते, ‘काही लोकांमध्येच परंपरेनुसार संगीत हा प्रकार साजरा केला जात होता, आता सगळ्याच लग्नात संगीत आयोजन केलं जातं. हा ट्रेण्ड चांगलाच रुजला आहे. सगळ्यांना अगदीच संगीत हा इव्हेंट करता नाही आला तरी दुसऱ्या कोणत्या तरी इव्हेंटमध्ये डान्स केला जातो. मुळात संगीत आयोजन करायचं असेल तर त्यात किती डान्स सादर होणार आहेत यावर त्याचं बजेट ठरतं.’ वधू-वरांच्या मुख्य नृत्याबरोबरच त्यांच्या नात्यातील विविध वयोगटातील सदस्यांनुसार वेगवेगळे डान्स डिझाईन केले जातात. मग कधी आजी तिच्या नातीसाठी डान्स करते तर कधी भाऊ  त्याच्या भावासाठी ठेका धरतो. वधू-वराचा खास डान्स ठरलेला असतो, असं ती सांगते. ‘संगीत’साठी डान्स कोरिओग्राफ करताना अनेकदा कल्पनाही वधू-वरांकडूनच येतात, अशी माहितीही तिने दिली.

‘अनेकदा त्यांच्या डोक्यात काही कल्पना असतात, कधी कधी त्यांचा प्रवास, त्यांची प्रेमकथा त्यांना डान्स स्वरूपात सगळ्यांसमोर मांडायची असते. कधी कधी नवरदेव खास नवरीसाठी डान्स करतो तर नवरी नवरदेवासाठी सोलो डान्स करते. संगीत करणं शक्य नसेल तर हळदी किंवा मेंदीच्या वेळी डान्स केले जातात. ‘एन्ट्री डान्स’चा प्रकार हा सगळ्यात जास्त ट्रेण्डमध्ये आहे. लग्नाच्या दिवशी वधू आणि वर दोघेही लग्नसोहळा आयोजित केलेल्या हॉलच्या गेटपासून ते स्टेजपर्यंत खास डान्स करत करत येतात. तर कधी फक्त नवरदेव ‘तेनु लेके  मैं जावांगा’ किंवा ‘मेहेंदी लगाके  रखना’ अशा खास बॉलीवुडी गाण्यांवर डान्स करत स्टेजवर एन्ट्री घेतो’, असं तेजश्री सांगते. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि खास क्षण अविस्मरणीय करण्याच्या प्रयत्नात ‘संगीत’चं महत्त्व वाढलं असल्याचं डान्स प्रशिक्षक सांगतात. याबद्दल ‘ईशान डान्स अ‍ॅकॅडमी’चा ईशान ठाकर सांगतो, लग्नामध्ये डान्स, संगीत हे प्रचंड मोठे ट्रेण्ड आहेत. आपापल्या बजेटनुसार कमी-जास्त का होईना लोक आवर्जून हा इव्हेंट करतात. यासाठी आम्ही पॅकेजेस बनवतो. ज्यामध्ये फॅमिली डान्स, कझिन डान्स आणि नवरा-नवरीसाठी खास डान्स असे प्रकार असतात. लोक सोयीनुसार डान्स प्रॅक्टिसची सुरुवात करतात. मी शक्यतो ते माझ्या स्टुडिओमध्ये येऊन डान्स रिहर्सल करतील याची दक्षता घेतो. याचं कारण इथे योग्य जागा असते, आरसे असतात. लग्नघरी आधीच प्रचंड काम आणि सामान असतं म्हणून मी माझ्याच स्टुडिओत डान्स रिहर्सल घेतो, असं तो सांगतो. मात्र अनेकदा लोकांना दिवसभरात वेळ काढणं शक्य होत नाही, तेव्हा त्यांच्या वेळेनुसार काम करावं लागतं. अगदी रात्री उशिराही डान्स पॅ्रक्टिस घेण्यासाठी आम्ही तयार असतो. लोक अगदी एक महिना आधीपासून ते अवघ्या १५ दिवसांतही डान्स शिकतात. डेस्टिनेशन वेडिंगसाठी जाणारी कु टुंबं कित्येक दिवस आधीपासूनच तयारी करतात, असं ईशान सांगतो. फक्त तरुण मुलांनीच डान्स करायचा हेही समीकरण आता मोडीत निघालं असल्याकडेही ईशानने लक्ष वेधलं.

‘आता घरातली अगदी आजी-आजोबा ही मंडळीही आनंदाने या डान्स प्रकारात सहभागी होतातच. संगीतमुळे दोन कुटुंबांतील नातं आणखीन घट्ट होतं असं माझं मत आहे. आमच्याकडे येताना आम्हाला अमुक अमुक गाण्यावर अमुक अमुक डान्सचा प्रकारच करायचा आहे, असंही काही जण ठरवून आलेले असतात. अशा वेळी ते योग्य नसेल तर आम्ही त्यांचा डान्स करताना पूर्ण व्हिडीओ काढून त्यांना दाखवतो. मग त्यातील योग्य-अयोग्य समजावून देत त्यानुसार मार्गदर्शन करतो’, अशी माहिती ईशानने दिली. वधू-वराचा डान्स हा इव्हेंटची शान असतो. त्यामुळे तो कुठेही फसू नये, चुकू नये याची काळजी आधीच घेतली जाते.

यासाठी आम्ही दोन दिवस आधी रंगीत तालीम घेतो. ज्यात ते ‘संगीत’च्या दिवशी जे कपडे घालणार आहेत ते किंवा त्यांच्याशी मिळतेजुळते कपडे घालून रिहर्सल घेतली जाते. त्यात काही चुकीचं वाटत असेल तर लगेच स्टेप बदलल्या जातात. डान्स करताना वधू अनेकदा गाऊन प्रकारातील कपडे घालते. त्यामुळे मुलींना आम्ही अप्पर बॉडीच्या जास्त डान्स स्टेप देतो. अनेक प्रॉप्सही डान्स करताना वापरले जातात’, असंही ईशानने सांगितलं.

अर्थात, नाटकांच्या रंगीत तालमींप्रमाणे लग्नातील संगीत इव्हेंटचीही तालीम जोरदार रंगते. दीप्ती वोरा हीसुद्धा अशाच प्रकारे डान्स शिकवते. ‘प्री वेडिंग फोटोशूटपेक्षाही ‘संगीत’ची क्रेझ जास्त आहे. समोरच्यांना सोपं व्हावं म्हणून मी पॅकेजनुसारच काम करते. कपल डान्स सध्या ट्रेण्डमध्ये आहे. काका-काकी, मामा-मामी अशी जोडपी मिळून दिलखुलास कपल डान्स करतात. मोठय़ा लोकांनी न लाजता असा डान्स करणं आणि तरुणाईच्या हातात हात घालून आनंदाचा क्षण साजरा करणं हा मोठा बदल आहे’, असं दीप्ती म्हणते. भावंडांच्या ग्रुप डान्ससाठी मी नेहमीच ड्रामा अ‍ॅक्ट निवडते. त्यामुळे समोरच्या लोकांना मजा येते, असं सांगतानाच वधू-वराच्या डान्समध्ये अनेक प्रॉप वापरून ते रंगतदार होतील यावर भर दिला जातो. त्यांच्या घरातील तरुण मुला-मुलींना त्यांच्याबरोबर एकत्र आणून सुंदर अ‍ॅक्ट डिझाईन केला जातो, असं दीप्ती सांगते. त्यामुळे एखाद्या चित्रपटात किंवा पुरस्कार सोहळ्यात जसे हिरो-हिरोईन डान्स करतात तसा फील त्यांना येतो, असं सांगतानाच संगीत सोहळ्यात बऱ्याचदा ठरावीक गाणी वाजवली जातात, असं ती म्हणते. ‘संगीत’मध्ये डान्ससाठी निवडल्या जाणाऱ्या गाण्यांमध्ये एव्हरग्रीन ‘नवराई माझी लाडाची गं’पासून ते ‘कच्ची दोरियो’ अशी आजची हिट गाणी असतात. यामुळे संगीतसाठी उपस्थित असलेले लोक कधीही कंटाळत नाहीत. फ्लॅश एन्ट्री मॉब हा प्रकारही सध्या ट्रेण्डमध्ये आहे. नवरदेवाच्या एन्ट्रीपासून स्टेजपर्यंत अनेक जण वेगवेगळ्या गाण्यांवर नाचतात. ‘विरे डी वेडिंग है’पासून लहान मुलं, वहिनी ‘लो चली मैं देवर की बारात लेके’ अशा वेगवेगळ्या गाण्यांवर धम्माल डान्स करत ही मंडळी स्टेजपर्यंत पोहोचतात, अशी माहिती दीप्तीने दिली.

एकूणच लग्नसोहळा हा त्या खास दोन प्रेमी जीवांच्या मीलनापुरता मर्यादित राहिला नसून त्यानिमित्ताने दोन्हीकडची कुटुंबं, त्यातले अबालवृद्ध सदस्य एकत्र येतात, एकमेकांबरोबर काही क्षण एक त्रित व्यतीत करतात. ‘संगीत’सारख्या इव्हेंट्सच्या माध्यमातून ही मंडळी एकमेकांची फारशी ओळख नसतानाही काही एकत्रित आठवणी निर्माण करतात आणि मग त्या आठवणींचा गोडवा नवोदित दाम्पत्याबरोबरच त्यांच्या घरच्यांच्याही मनात रुंजी घालतो. म्हणूनच की काय, हा ‘संगीत’चा ताल प्रत्येक लग्नागणिक झंकारतो आहे..