स्वप्नील घंगाळे

व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच एक नवीन फीचर लॉन्च केले. या नवीन फीचरमुळे आता व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस थेट फेसबुकवर शेअर करता येणार आहे. यामुळे दोन वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर वेगवेगळे स्टेटस अपलोड करण्याचे काम नक्कीच कमी होणार आहे. मात्र एकीकडे असे असतानाच दुसरीकडे सर्वच सोशल नेटवर्किंग साइट्स आणि अ‍ॅप्लिकेशन थोडय़ाफार फरकाने सारखीच फीचर देत असल्याबद्दल युजर्सकडून नाराजीही व्यक्त केली जात आहे. वेगळे असूनही सारखेच दिसण्यातून निर्माण झालेल्या या गोंधळावर टाकलेली नजर..

आजच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपल्यापैकी अनेक जण एकाच वेळी वेगवेगळी सोशल नेटवर्किंग साइट्स आणि संवादाची अ‍ॅप्लिकेशन्स वापरत असतो. सुरुवातीला ही अ‍ॅप्लिकेशन्स युजर्सच्या भेटीस येतात तेव्हा त्यांचे वेगळेपण नक्कीच आकर्षित करणारे असते. मात्र कालांतराने या अ‍ॅप्लिकेशनचे अनेक फीचर्स हे इतर अ‍ॅप्लिकेशन्सप्रमाणेच होतात आणि मग एकाच कामासाठी कोणते माध्यम वापरायचे, याबद्दल उगाच गोंधळ निर्माण होतो. एकीकडे सर्वकाही एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होते, मात्र त्याच वेळेस त्या प्लॅटफॉर्मचे वेगळेपण हरवून बसते. उदाहरणच घ्यायचे झाले तर स्नॅपचॅटच्या स्टोरीचा पर्याय इन्स्टाग्राम आणि फेसबुकने उपलब्ध करून दिला. त्यानंतर फेसबुकने ट्विटरप्रमाणे हॅशटॅगचे फीचर उपलब्ध करून दिले. तर दुसरीकडे ट्विटरने आपली शब्दमर्यादा वाढवली. त्यामुळे ट्विटरवरची टिवटिव ज्यासाठी प्रसिद्ध आहे तीही उगाच लांबण लावणारी वाटू लागली. ट्विटरने हा निर्णय घेतला तेव्हा खूप जणांनी नाराजी व्यक्त करत १४० अक्षरांमध्ये लिहिणे ही कला होती ती आता मारली जाणार, अशी भावना व्यक्त केली होती. त्यानंतर स्टोरीची संकल्पना व्हॉट्सअ‍ॅपवर आली तिथून हीच कल्पना आता थेट यूटय़ुबने उचलली आहे. असेच आणखीन एक उदाहरण सांगायचे म्हणजे लाइव्ह स्ट्रीमिंग. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामपाठोपाठ यूटय़ुबवरूनही लाइव्ह स्ट्रीमिंग करता येऊ  लागले आहे. असाच बदल फोन कॉलच्या स्वरूपातही झाला आहे. आज फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि गूगल चॅटवरूनही व्हॉइस तसेच व्हिडीओ कॉल करता येणे शक्य झाले आहे. अनेक अ‍ॅप्लिकेशन्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे कुठे तरी एकरूप होत चालले असल्याचे चित्र दिसते आहे. म्हणजे जे फेसबुकवर आहे तेच इन्स्टाग्रामवर आहे. तेच ट्विटवर आणि तेच व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांचे वैशिष्टय़ लोप पावताना दिसत असून सर्व माध्यमे सारखीच असल्यासारखी भावना मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे, अशी भावना टेकसॅव्ही तरुणाईकडून व्यक्त होऊ लागली आहे.

‘वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशन्सचे फीचर्स सारखेच झाल्याने त्यांचा वेगळेपणा नष्ट होतोय. तसेच सगळीकडे सगळे फीचर्स असले तरी मला योग्य वाटणारे अ‍ॅप्लिकेशनच मी संवादासाठी वापरते. ब्लॅकबेरी मेसेंजर सर्वाना उपलब्ध करून देण्यात आले, पण ते फारसे यशस्वी ठरले नाही. कारण त्याबद्दल वेड असण्याचा तो काळ नव्हता, असे कधीकाळी ब्लॅकबेरी मेसेंजरवरच भर देणारी दीपश्री आपटे सांगते. तर सगळीकडे सारखीच फीचर्स असल्याने सर्व अ‍ॅप्लिकेशन्स कं टाळवाणी वाटू लागली आहेत. आज व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक सारखेच वाटू लागले आहे. जे एका प्लॅटफॉर्मवर येते तेच दुसऱ्यावर काही महिन्यांनी उपलब्ध होते. त्यामुळे अरे हे इथे का? एकच अ‍ॅप्लिकेशन पुरेसे होते असे वाटते, असे नेहा कदम सांगते. तर प्रत्येक अ‍ॅप्लिकेशनचा आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा एक फॉर्मेट असतो. त्याला स्वत:चे महत्त्व असते ते या समान फीचर्समुळे कुठे तरी हरवले आहे, पण लोक सगळेच प्लॅटफॉर्म वापरतात, त्यामुळे अजून पर्याय येताना दिसत असल्याचे आदित्य बिवलकर सांगतो.

असे का होते आहे?

सर्व प्लॅटफॉर्मवर सारखेच फीचर देण्याचे प्रमाण का वाढले आहे, याबद्दल तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारे आणि पेशाने युजर एक्स्पीरियन्स एक्स्पर्ट (उपयोजक- अनुभवतज्ज्ञ) असणारे सौरभ करंदीकर यामागे आर्थिक गणितेच कारणीभूत असल्याचे सांगतात. ‘आजकाल सर्वच अ‍ॅप एकमेकांची कामे करू पाहताहेत. प्रत्येक अ‍ॅपकर्त्यांला आपल्या युजरने दुसरे कुठलेही अ‍ॅप वापरू नये असे वाटते, हे त्याचे महत्त्वाचे कारण. आपले युजर आपल्या अ‍ॅपवर किती वेळ घालवतात, हे महत्त्वाचे असते. कारण त्याच्या अ‍ॅपवर दीर्घकाळ असल्याने युजरबद्दल, त्याच्या आवडीनिवडीबद्दल जितकी माहिती गोळा होते त्यावरून त्या अ‍ॅपमधील गुंतवणूकदार त्याची किंमत ठरवतात. नवीन गुंतवणूक येते, तेव्हा अ‍ॅपकर्त्यांची भरभराट होते. अ‍ॅप अर्थव्यवस्थेचे ‘युजरचा वेळ’ हे खरे चलनी नाणे आहे,’ असे करंदीकर सांगतात. वापरकर्त्यांने अ‍ॅप्लिकेशनवर घालवलेला वेळ हेच चलन असणाऱ्या या उद्योगामध्ये वापरकर्ता जास्तीत जास्त वेळ आपल्या प्लॅटफॉर्मवर राहावा, असा प्रयत्न कंपन्या करतात.

‘युजर्सला खिळवून ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो. त्यामुळेच विमानाची तिकिटे देणारी अ‍ॅप्स हॉटेल आणि टॅक्सी बुक करू का, म्हणून वापरकर्त्यांला विचारतात. ‘पेटीएम’ सिनेमाची तिकिटे आणि रेल्वेची तिकिटे काढून देते. ‘झोमॅटो’ रेस्टॉरंटची माहिती देणारे अ‍ॅप म्हणून उदयास आले खरे, पण आज ते फूड डिलिव्हरी आणि खाद्यप्रेमींचे सोशल नेटवर्क बनू पाहत आहे. एखाद्या अ‍ॅपमधले एखादे फीचर किती वापरले जाते त्याची आकडेवारी प्रत्येक अ‍ॅपकडे असते. ‘अमुक अ‍ॅप हे करते म्हणून आपणही करू या’, असा गुंतवणूकदारांचा अ‍ॅपकर्त्यांवरचाही दबाव वाढत जातो आणि अनेकदा आपले मुख्य उद्दिष्ट काय, याकडे डोळेझाक करून अ‍ॅपमध्ये बदल के ले जातात,’ असे करंदीकर स्पष्ट करतात. या स्पर्धेमधून सोशल मीडिया अ‍ॅप्सही सुटलेली नाहीत. बाजारात टिकून राहण्यासाठी, स्पर्धकांसमोर सरस राहण्याच्या उद्देशाने एकमेकांची फीचर्स थोडय़ाफार फरकाने नक्कल करून युजर्सला दिली जातात. ‘आज अगदी फेसबुक मेसेंजरवर फोन कॉल करता येतो. प्रत्येक युजर एखादे अ‍ॅप काही विशिष्ट कारणासाठी डाऊनलोड करतो. ते वैशिष्टय़ हरवले तर तो त्या अ‍ॅपचा तोटाच असतो,’ असे या एकरूपीकरणाबद्दल बोलताना करंदीकर सांगतात. हा ट्रेण्ड खरेच फायद्याचा आहे का, याबद्दल बोलताना करंदीकर म्हणतात, ‘नो वन कॅ न प्लीज एव्हरीवन ऑल द टाइम’, असे म्हटले जाते, पण सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता स्विस नाईफसारखे हरहुन्नरी भासू लागले आहेत. हा वेडेपणा काही काळ चालेल कदाचित, पण प्रत्येक युजर एक गोष्ट करण्यासाठी एक विशिष्ट अ‍ॅपच वापरेल आणि त्यातल्या इतर फीचर्सकडे दुर्लक्ष करू लागेल असे वाटते.’

अर्थात, बाजारीकरणाच्या गणितांवर अवलंबून असलेला हा खेळ आणखी किती दिवस एकरूपतेचा हा नाद करणार, याची कल्पना नाही. मात्र या नादात त्या त्या अ‍ॅपचे मूळ स्वरूप युजर्सने मेमरीत ‘आठवण’ म्हणून सेव्ह केले तर अवघा रंग..ची ही युजर्सची अनुभूती अ‍ॅपकर्त्यांना फारशी सुखावह ठरणार नाही हे निश्चित!