21 November 2019

News Flash

मोबाइलचा स्फोट का होतो?

जानेवारी महिन्यात राजस्थानमधील चित्तोडगड येथील एका वृद्धाचा मोबाइल स्फोटात मृत्यू झाला.

मोबाइलचा स्फोट

|| आसिफ बागवान

कोणताही आजार उद्भवण्याआधी त्याची लक्षणे दिसून येतात. पण त्याही आधी आपल्या आहार, विहार, निद्रा आणि जीवनशैलीचे स्वरूप यातून संभाव्य आजारांचा इशारा मिळत असतो. मोबाइल फोनचंही तसंच आहे. मोबाइलमध्ये निर्माण झालेला दोष वेळीच ओळखला नाही तर, त्याचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. मोबाइलचा स्फोट होणं, हा त्यातलाच एक.

गेल्याच आठवडय़ातली घटना. कोल्हापूरची. कागल तालुक्यातल्या एका गावातला अमोल पाटील हा मुलगा घरात मोबाइलवर गेम खेळत असताना अचानक मोबाइल गरम झाला आणि काही कळायच्या आत त्याचा स्फोट झाला. या दुर्घटनेत अमोलचा एक डोळा निकामी झाला..

जानेवारी महिन्यात राजस्थानमधील चित्तोडगड येथील एका वृद्धाचा मोबाइल स्फोटात मृत्यू झाला. रात्री झोपताना शर्टच्या खिशातला मोबाइल काढून ठेवण्याचे या व्यक्तीला लक्षात राहिले नाही आणि पहाटेच्या सुमारास एका स्फोटासह मोबाइलने पेट घेतला. काही क्षणातच त्या व्यक्तीला आगीच्या ज्वालांनी भक्ष्य बनवले.

जिवाचा थरकाप उडवणाऱ्या या घटना अनेकांनी वृत्तपत्रातून वाचल्या असतील, टीव्हीवरून पाहिल्याही असतील. प्रत्येक वेळी अशा प्रकारची घटना पाहण्यात येते, तेव्हा आपल्यातला प्रत्येक जण मनातून हादरून जातो. अनेकदा तर ते पाहताना आपला हात नकळत आपल्या मोबाइल ठेवलेल्या खिशाकडे जातो. मोबाइलचा स्फोट होणं, ही काही सर्वसामान्य घटना नाही. त्यामुळे तशा शक्यतेचा विचार आपल्यातल्या अनेकांच्या मनालाही शिवत नाही. पण जेव्हा अशा प्रकारची घटना समोर येते, तेव्हा आपल्या मनातही चिंता घर करते.. ‘माझ्या मोबाइलचा स्फोट होणार नाही ना?’

वर म्हटल्याप्रमाणे मोबाइलचा स्फोट होणं ही अपवादात्मक घटना आहे. जगाची लोकसंख्या साडेसात अब्जांच्या आसपास आहे आणि २०१५मध्ये जगभरातील एकूण मोबाइलची संख्या साधारण सात अब्जांच्या आसपास आहे. भारतात दर १०० माणसांमागे ९० इतके मोबाइलचे प्रमाण आहे. याचा अर्थ भारतात ९० टक्के जनतेकडे मोबाइल आहे, असा नाही. अनेकांकडे एकापेक्षा अधिक मोबाइल फोनही असू शकतात. पण मुद्दा हा आहे की, इतक्या मोठय़ा संख्येने जगभरात मोबाइलचा वापर होत असताना मोबाइलचा स्फोट होणं किंवा त्याने पेट घेणं यासारख्या घटनांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातही अशा घटनांत कोणाला इजा होणं किंवा एखाद्याचा मृत्यू होणं, यांचं प्रमाण तर नगण्य. त्यामुळे याबाबत फार चिंता करायची गरज नाही. अर्थात मोबाइलचा स्फोट का आणि कसा होतो, हे जाणून घेणं कधीही चांगलं.

मोबाइलमध्ये सध्या लिथियम-आयन बॅटऱ्या बसवलेल्या असतात. या बॅटऱ्या थेट मोबाइलशी जोडलेल्या असतात. म्हणजेच, त्या मोबाइलपासून वेगळय़ा करता येत नाहीत. या बॅटऱ्यांमध्ये लिथियम हे रसायन इंधनाचे काम करते. या बॅटऱ्यांमध्ये दोन इलेक्ट्रॉड असतात. इलेक्ट्रॉड म्हणजे, ज्या भागातून ऊर्जेचे वहन होते, तो भाग. त्यापैकी ‘अ‍ॅनॉड’ हा इलेक्ट्रॉड  ऋणभारित आयनने भारलेला असतो. तर ‘कॅथॉड’ हा दुसरा इलेक्ट्रॉड धनभारित आयन आणि लिथियमने युक्त असतो. जेव्हा बॅटरीचा वापर होतो, तेव्हा कॅथॉडवरील लिथियम अ‍ॅनॉडकडे सरकते आणि जेव्हा बॅटरी चार्ज होते तेव्हा लिथियम पुन्हा आपल्या जागेवर परतते. ही झाली या प्रक्रियेची सोप्या भाषेतली माहिती. कॅथॉड आणि अ‍ॅनॉडचा एकमेकांशी संपर्क होऊ नये, यासाठी त्यात एक विभाजक बसवण्यात आलेला असतो. कारण कॅथॉड आणि अ‍ॅनॉडचा थेट संपर्क येतो तेव्हा बॅटरीचा स्फोट होतो.

बॅटरीच्या आतल्या भागातल्या क्रियेची ही वैज्ञानिक माहिती. पण प्रत्यक्षात बॅटरीचा स्फोट होण्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे ‘ओव्हरहिटिंग’. जेव्हा बॅटरी अधिक तापते तेव्हा ती फुगते आणि आतमध्ये साठवलेली ऊर्जा आपल्या संपूर्ण शक्तिनिशी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. याची दोन संभाव्य कारणे असतात. त्यातील एक कारण म्हणजे, गरजेपेक्षा अधिक काळ बॅटरीचे चार्जिग आणि दुसरे म्हणजे, बॅटरीचा दर्जा. स्फोट होणारे बहुतांश मोबाइल हे कमी किमतीतील असतात. अशा फोनमधील प्रत्येक भागाच्या दर्जाची तपासणी व्यवस्थित होतेच, असे नाही. अनेकदा बॅटरी निर्माण करताना एखादा अतिसूक्ष्म धातूकण त्यात चुकून राहिला आणि तो रसायनांच्या संपर्कात आला तर तो स्फोट घडवतो. साहजिकच स्वस्तातले मोबाइल खरेदी करताना या गोष्टीची खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

गरजेपेक्षा अधिक काळ मोबाइल चार्ज करणं ही जणू सवयच झाली आहे. दिवसभर कामाच्या धावपळीत मोबाइल चार्ज करता येत नाही. अशावेळी आपण रात्री झोपण्यापूर्वी मोबाइल चार्जिगला लावतो आणि निद्रेच्या अधिन होतो. परंतु, हा आठ-दहा तासांचा काळ मोबाइलच्या चार्जिगसाठी अति आहे. पूर्वीच्या काळी मोबाइलमध्ये लिथियम पॉलिमर बॅटरी बसवली जात असे. ही बॅटरी चार्ज होण्यास जास्त वेळ लागत असे. परंतु, अलिकडे सर्वत्र लि-आयन बॅटरीचाच वापर होतो. या बॅटऱ्यांमध्ये जास्त ऊर्जा साठवता येते त्याचप्रमाणे त्या कमी वेळात चार्ज होत असतात. जेव्हा क्षमतेपेक्षा अधिक विद्युत ऊर्जा या बॅटरीत साठवली जाते तेव्हा ती गरम होणे आणि पर्यायाने तिचा स्फोट होणे सहाजिक आहे.

बॅटरीचा स्फोट होण्याचं दुसरं महत्त्वाचं कारणही आपल्या सवयीशी निगडीत आहे. मोबाइल फोन हातातून पडल्यामुळे किंवा त्यावर मोठा आघात झाल्यामुळे बॅटरीमध्ये अतिसुक्ष्मशी फट निर्माण झाली तरी, ती शॉर्टसर्किट घडवून आणते. यातूनही मोबाइलचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे मोबाइल जपून हाताळणेही तितकंच महत्त्वाचं आहे. वरील सर्व गोष्टी पाहिल्या तर, मोबाइलचा स्फोट होण्यामागे त्यातील तंत्रज्ञानापेक्षा आपल्या सवयीच अधिक जबाबदार असल्याचं दिसून येतं. रात्रभर मोबाइल चार्ज करणं, अयोग्य किंवा बनावट चार्जरचा वापर करणं, रात्री मोबाइल उशाशी घेऊन झोपणं अशा सवयींचा त्याग केला तर आपला मोबाइल आणि आपण दोघेही सुरक्षित राहू!

viva@expressindia.com

First Published on June 7, 2019 12:07 am

Web Title: why do smartphones blast
Just Now!
X