News Flash

प्रकाशबीजे रुजवीत चाललो..

‘सपोर्ट फॉर कोव्हिड पेशंट्स’ ही अशीच एक मोहीम सध्या राज्यासह बेळगावातल्या लोकांनाही मोठा आधार देत आहे

नीलेश अडसूळ viva@expressindia.com

या करोना कहरात तरुण मंडळी कंबर कसून कामाला लागली आहेत. समाजमाध्यमांचा वापर आणि एकमेकांच्या ओळखीने मदतीचा हात पुढे करत ही तरुणाई आरोग्य व्यवस्थेपासून ते राजकीय प्रतिनिधींनाही हलवून सोडत आहेत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, प्लाझ्मा, बेड, रेमडेसिविर ते रुग्णापर्यंत लागेल ती मदत पोहोचविण्यासाठी यांनी केलेले प्रयत्न हे जीवाची बाजी लावल्यासारखेच आहेत.

जवळपास गेले चौदा महिने आपण नैराश्याने, विषण्णतेने भरलेले जग अनुभवतो आहोत. संकट काही जगाला नवीन नाही, पण संकटाचा असा घरोबा केवळ आर्थिकच नाही तर मानसिक अवस्थाही खिळखिळी करणारा आहे. वाढती रुग्णसंख्या, सुविधांचा अभाव, कानावर येणाऱ्या नकोशा वार्ता, रुग्णवाहिकांचे आवाज, रोज कुणाच्या तरी निधनाची बातमी अशा गढूळ वातावरणाने प्रत्येक जण ढवळून निघाला आहे. त्यात आपलं कुणीही नसलं तरी प्रत्येकाला जगाचं दुखणं आपलं वाटू लागलं आहे.

‘सपोर्ट फॉर कोव्हिड पेशंट्स’ ही अशीच एक मोहीम सध्या राज्यासह बेळगावातल्या लोकांनाही मोठा आधार देत आहे. समाजमाध्यम केवळ मौजेसाठी नाही तर विचारांचे, मदतीचे आणि देशसेवेचे उत्तम व्यासपीठ म्हणून वापरले जाऊ शकते याची या तरुणांनी जाणीव करून दिली आहे. समाजमाध्यमाद्वारे एकाला एक जोडत ऐंशी तरुणांनी जोडलेली ही भक्कम साखळी आज रुग्णांच्या उपचारामध्ये खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलते आहे. एखादी केस यांच्याकडे आली की संपूर्ण टीम कामाला लागते. त्या त्या विभागात असणारे प्रत्येकाचे संपर्क  पडताळून बघितले जातात. रुग्णाची गरज काय, ती कशी पूर्ण केली जाईल या दिशेने सगळे प्रयत्न सुरू होतात. रुग्णांना बेड्स मिळवून देणे, ज्या भागात इंजेक्शन मिळत नाही त्या भागातील प्रशासनाशी संपर्क साधून इंजेक्शन, औषधे मिळवून देणे, प्लाझ्मा दाता मिळवून देणे ते अगदी प्राणवायू, व्हेंटिलेटर अशा महत्त्वाच्या गरजांसाठीही रुग्णांना मदतीचा हात हे तरुण देत आहेत. त्याचसोबत लोकांमध्ये जनजागृती करणे आणि गेल्या दोन ते चार महिन्यांत करोनातून बरे झालेल्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांना प्लाझ्मादानासाठी आवाहन करणे यावरही भर दिला जातो आहे. एप्रिलच्या सुरुवातीला सुरू झालेल्या या मोहिमेने आत्तापर्यंत ६००हून अधिक रुग्णांना मदत केली आहे.

या समूहात कवी, लेखक, कलाकार, डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ अशा समाजातील महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. त्यामुळे काही रुग्णांना डॉक्टरांचे मार्गदर्शन, मनोबल वाढवण्यासाठी एखादी थेरपी असेही सकारात्मक प्रयोग ते करत आहेत. कल्याणी संध्या अंकुश या तरुणीने या मोहिमेची सुरुवात केली असून पूजा भडांगे, सर्वेश जोशी, प्रज्वली, किरण तांबे, योगेश जगताप, वृषभ अहिरे, ऋषी साबळे यांसह अनेक तरुण या मोहिमेत साथ करत आहेत. तर सायली कुलकर्णी, चेतन शिवाजीराव पवार आणि मीनाक्षी तोरणे इत्यादी डॉक्टरही यात सहभागी आहेत. याच समूहात काम करणारी पूजा भडांगे कवयित्रीदेखील आहे.

‘गेल्या टाळेबंदीत पुण्यात अभ्यासासाठी, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या मुलांना घरी जाण्यासंदर्भात, जेवणाच्या बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशा वेळी त्यांना जेवण मिळवून देण्यापासून काहींना घरी पोहोचवण्यापर्यंत मदत केली. यासाठी आम्हाला अधिकारी वर्गानेही साथ दिली. पुढे ही मदत विस्तारत गेली आणि अडलेल्या रुग्णांना रुग्णवाहिकांची तर गरोदर महिलांसाठी वाहन व्यवस्था करण्यापर्यंत काम सुरू झाले. येत्या टाळेबंदीत लोकांच्या गरजा बदलल्या. परिस्थिती गंभीर झाल्याने रेमडेसिविर, प्लाझ्मा, प्राणवायू, व्हेंटिलेटर ही महत्त्वाची गरज बनली. आठवडय़ाभरापूर्वी जवळपास ४० ते ५० लोकांना वैद्यकीय मदत केली जात होती. आजही ते सत्र सुरूच आहे,’ असे पूजा सांगते.

आपल्या अनुभवांविषयी ती म्हणाली, ‘रुग्णांना मदत करताना एक वेगळं जग पाहता आलं. माणूस वाचवण्यापेक्षा पैसे उकळताना, डोळ्यांसमोर औषधांचा काळाबाजार करताना पाहिले, व्हेंटिलेटरसाठी स्वत: डॉक्टर पैसे मागतात इतकं भीषण वास्तव पाहिलं. वेळोवेळी तक्रारी केल्या, न्याय मिळवून दिला. रुग्णाला मदत करताना आम्हीही त्याचे नातेवाईक होऊन जातो.  कोणताही रुग्ण दगावल्याने आम्हला त्रास होतोच कारण त्याने जगावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. गेल्या महिनाभरात अनेक तरुण दगावले याचे शल्य अधिक आहे, कारण अनेक स्वप्न उराशी बाळगलेल्या तरुणांचे असे जाणे हे धक्कादायक आहे. म्हणून तरुणांचेही लसीकरण शक्य तितक्या लवकर व्हावे असे वाटते. करोनाकाळात माणसाने स्वत:चे आत्मबल सुदृढ ठेवायला हवे. शक्य तितकं स्वत:ला आनंदी ठेवायला हवं. अगदी करोना झाल्यानंतरही आपण बरे होणारच ही सकारात्मकता बाळगली तर उपचार यशस्वी व्हायला अधिक गती येते,’ असे आवाहनही तिने केले आहे.

नाशिक येथील प्रमोद गायकवाड ‘सोशल नेट्वर्किंग फोरम’ या संस्थेच्या माध्यमातून नाशिक येथील ग्रामीण भागात, विशेषकरून आदिवासी पाडय़ांवर काम करत आहेत. समाजमाध्यमांचा सक्रिय वापर करून तरुणांना एकत्र करण्याचे काम गायकवाड करतायेत. तरुणांनी एकत्र येऊन समाजाच्या प्रत्येक संकटात सहभागी झाले पाहिजे, असे त्यांना वाटते. तरुणांची मोट बांधून गेल्या टाळेबंदीत या संस्थेने नाशिक जिल्ह्यतील ३५ हजार आदिवासी कुटुंबीयांना शिधा पुरवला. हे कार्य केवळ शिध्यापुरतेच मर्यादित राहिले नाही तर लोकांच्या आरोग्य सेवेसही हातभार लावत होते. यंदाच्या करोनाकाळात तिथली आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे काम हे तरुण करत आहेत.

‘गेल्या टाळेबंदीत आदिवासी लोकांपुढे उपजीविकेचा प्रश्न होता. करोना तिथे फारसा पसरला नाही, पण यंदा मात्र चित्र विदारक आहे. मोठय़ा प्रमाणात आदिवासींना करोनाची बाधा होते आहे. विशेष बाब म्हणजे पुरेशा आरोग्य सेवा नसल्याने बाधितांचे प्रमाण अधिकच वाढते आहे. ते नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पेठ, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक ग्रामीण या चार आदिवासी तालुक्यांमध्ये जवळपास १० हजार अरोग्यसेवक काम करत आहेत. परंतु काम करताना त्यांना प्रतिबंधात्मक सुविधा मिळत नाहीत. म्हणजे कुठे पीपीई कीट नाही, कुठे मुखपट्टी नाही, कुठे र्निजतुकीकरण द्रव्य नाही, तर कुठे साध्या साध्या वस्तूंचा अभाव आहे. या गरजा लक्षात घेऊन त्याची पूर्तता करण्याचे आमचे लक्ष्य आहे. करोनाकाळात आशा वर्करवरही मोठी जबबदारी देण्यात आली आहे, परंतु प्रतिबंधात्मक उपायांची वानवा असल्याने त्याही मोठय़ा संख्येने बाधित होत आहेत. म्हणून अशांची यादी करून प्रत्येकापर्यंत ‘सुरक्षा कीट’ पोहोचवले जात आहेत. त्यासाठी आम्ही १५० लोक कार्यरत असून महिनाभरात ५ हजार कर्मचाऱ्यांना ते देण्यात आले आहेत, तर उर्वरित ५ हजार कर्मचाऱ्यांना येत्या १५ दिवसांत मिळतील,’ असे गायकवाड यांनी सांगितले.

मुंबईच्या मीरा-भाईंदर येथील दीप काकडे आणि कुणाल काटकर यांनी थेट सरकारच्या परिपत्रकाचा आधार घेऊन रुग्णालयात आकारले जाणारे अवाच्या सवा देयक कमी करण्याचा वसा घेतला आहे. केवळ मीरा-भाईंदर परिसरातच नव्हे तर राज्यभरात पोहोचून ते काम करत आहेत. त्यासाठी त्यांना मित्र-मैत्रिणींचा, राजकीय पक्षाचा मोठा आधार  मिळाला आहे. आजवर त्यांनी ७९ मोठाली देयके कमी केली असून रुग्णांच्या नातेवाईकांचे जवळपास ६० लाख रुपये वाचवले आहेत. ‘यंदा रुग्णसंख्या अधिक असल्याने लोक नाइलाजाने खासगी रुग्णालयांचा आधार घेत आहेत. याच मजबुरीचा पुरेपूर फायदा रुग्णालयांनी उठवला आहे. खासगी रुग्णालयांनी कोणत्या सुविधेवर किती रक्कम आकारावी याची मर्यादा आखून दिली आहे. त्या पलीकडे जाऊन काही रुग्णालये देयकांचा फुगवटा करत आहेत. तर काही रुग्णालये शासकीय नियम पाळावे लागत असल्याने इतर संसाधनांचे भाव मनाला येईल तसे लावून रुग्णांकडून पैसे उकळत आहेत. एका रुग्णालयाने देयकात १५ दिवसांच्या प्राणवायूचे दर १ लाख ८४ हजार आकारले होते. वास्तवात त्याची किंमत केवळ १५ हजार रुपये होती. आम्ही थेट सरकारी निर्देशांवर बोट ठेवून कायद्याची कास धरतो. आपली बाजू न्यायाची असल्याने रुग्णालयांना फुगवलेली देयके मागे घ्यावीच लागतात,’ असे दीप सांगतो.

केवळ याच संस्था नव्हे तर अशा कैक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संस्थांचा आधार घेऊन तरुण मोठय़ा संस्थेने या करोनायुद्धात उरतले आहेत. मुंबईतीलच नव्हे राज्यभरातील गणेशोत्सव मंडळे, उत्सव समित्या तरुण कार्यकर्त्यांंना घेऊन रक्तदानाचा यज्ञ उभारत आहेत. काही तरुण विभागातील करोनातून बरे झालेल्यांची यादी करून त्यांना प्लाझ्मासाठी प्रेरित करत आहेत. तर कित्येक तरुण पदरमोड करत रस्त्यारस्त्यांवर अन्नदान करत आहेत. केवळ मानवांनाच नव्हे तर प्राणीमात्रांनाही खाद्य पुरवण्यात ते मागे  राहिलेले नाही. विशेष म्हणजे हे करताना त्यांनी आपल्या नोकऱ्या बाजूला सारल्या नाहीत किंवा कौटुंबिक जबाबदारी झटकली नाही. उलट वेळेचे व्यवस्थापन करून जास्तीत जास्त वेळ समाजासाठी कसा देता येईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत. म्हणूनच सध्याच्या तिमिरमय काळात या तरुणाईने रुजवलेली प्रकाशबीजे उद्याचा उष:काल दाखवणारी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 2:23 am

Web Title: youth in forefront of fight against covid support for covid patients campaign on social media zws 70
Next Stories
1 संशोधनमात्रे : या किरणांनो!
2 बीइंग पॉझिटिव्ह
3 वस्त्रान्वेषी ; धोतराची कूळकथा
Just Now!
X