|| तेजश्री गायकवाड

मनोरंजनाचं माध्यम म्हणून लोकप्रिय झालेल्या यूटय़ूबचा योग्य वापर करून घेत जगभरातील तरुणाईने आपले एक वेगळे विश्व उभे केले आहे. यूटय़ूबवर गाण्यापासून खाण्यापर्यंत नानाविध गोष्टींचा आविष्कार करत लोकप्रिय झालेल्या यूटय़ूबर्सनी आता याच आधारे मर्चडाइझिंगही सुरू केलं आहे..

साधारण २००५ साली यूटय़ूब नावाची व्हिडीओ शेअर करणारी साइट अस्तित्वात आली आणि २००८ साली भारतात यूटय़ूब सुरू झालं. बघता बघता यूटय़ूब भारतीय कल्चर आणि लाइफस्टाइलचा अविभाज्य भाग बनलं. सुरुवातीच्या काळात मोठमोठय़ा कंपन्या माहितीपर गोष्टी शेअर करण्यासाठी याचा वापर करत होते. त्याला प्रतिसाद मिळत गेला तसं त्याचं स्वरूप बदलत गेलं. मनोरंजनाचं माध्यम म्हणून लोकप्रिय झालेल्या यूटय़ूबचा योग्य वापर करून घेत जगभरातील तरुणाईने आपले एक वेगळे विश्व उभे केले आहे. यूटय़ूबवर गाण्यापासून खाण्यापर्यंत नानाविध गोष्टींचा आविष्कार करत लोकप्रिय झालेल्या यूटय़ूबर्सनी आता याच आधारे र्मचडाइझिंगही सुरू केलं आहे..

सुरुवातीला माहिती किंवा प्रबोधन ते मनोरंजन असा हळू हळू प्रवास केलेले यूटय़ूबचे माध्यम आजघडीला सिनेमाची गाणी, सिनेमाचे प्रोमो, बातम्या यांसह जगभरातील पाककृती, पर्यटन, फिल्ममेकिंग, हस्तकला, चित्रकला.. असा सगळाच माहिती-मनोरंजनाचा एकत्रित खजिना ठरले आहे. या यूटय़ूबवर व्हिडीओ टाकायला तुम्हाला पैसे लागत नाहीत म्हटल्यावर अनेकांनी स्वत: कशा कशाचे व्हिडीओ बनवून टाकायला सुरुवात केली. आणि त्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी कायमचं, सहज पद्धतीने उपलब्ध होईल असं व्यासपीठ मिळालं. आणि यातूनच यूटय़ूबर ही संकल्पना अस्तित्वात आली. यूटय़ूबवरती पर्सनलाइज्ड व्हिडीओ टाकणाऱ्यांची यूटय़ूबर, कॉन्टेन्ट क्रिएटर, यूटय़ूब सेलिब्रिटी, यूटय़ूब पर्सनॅलिटी अशी ओळख झाली आहे. अशा यूटय़ूबरचे व्हिडीओ बनवणाऱ्यांची आणि पाहणाऱ्यांची संख्याही वर्षांनुवर्षे वाढू लागली. आपण टाकलेल्या फुकट व्हिडीओला यूटय़ूबकडून जास्त व्ह्य़ूज आणि सबस्क्रायबर्स मिळत आहेत हे लक्षात आल्यावर लोक जास्तीतजास्त उत्तम व्हिडीओ बनवू लागले. गेल्या साधारण ३ वर्षांपासून या व्हिडीओ बनवणाऱ्यांमध्ये अर्थात यूटय़ूबर्समध्येही नवनवीन विभाग पडू लागले. यात व्लॉगर, कॉमेडी व्हिडीओ टाकणारे, शॉर्ट फिल्म टाकणारे, गाणी टाकणारे, माहिती देणारे, डान्स शिकवणारे, मेकअप शिकवणारे, डीआयवाय (डू इट युवरसेल्फ) शिकवणारे, कुकिंग शिकवणारे असे अनेक विभाग सध्या अस्तित्वात आहेत. या यूटय़ूबर्समध्ये तरुणाईचे प्रमाण अंमळ जास्तच आहे. या सगळ्याच यूटय़ूबर्सना स्वत:ची अशी ओळख मिळाल्यानंतर त्यांनी या ओळखीचा आणि लोकप्रियतेचा फायदा करून घेत स्वत:चे र्मचडाइझिंग थोडक्यात वेगवेगळ्या पद्धतीने व्यापार करायला सुरुवात केली आहे.

प्रसिद्ध यूटय़ूबर्सच्या व्हिडीओला जेवढी पसंती लोक देतात तेवढीच पसंती त्यांनी बाजारात आणलेल्या टी-शर्ट्स, पॅन्ट्स, हुडीज, कस्टमाइज्ड कप, बॅचेस या सगळ्यांना पसंती देतात. व्यवसायाने यूटय़ूबर्स असलेले स्वत:चे यूटय़ूब चॅनेल सांभाळत हा साइड बिझनेस कसा चालवतात याविषयी थेट मोस्ट पॉप्युलर यूटय़ूबर्सकडूनच उत्तरे मिळवायचा प्रयत्न केला. भारतातील डिजिटल मीडियाचा स्टार आणि सर्वाधिक फॉलोअर्स असलेला यूटय़ूबर भुवन बाम आणि त्याच्या बरोबरीने त्याच्या र्मचडाइझिंगचे काम बघणारा त्याचा मित्र रोहित राज म्हणतो, ‘जेव्हा आम्ही आमचे यूटय़ूब  चॅनेल ‘बीबी की वाइन्स’ सुरू केले, तेव्हा आम्हाला अजिबातच वाटलं नव्हतं की आम्ही इतक्या लोकांपर्यंत पोहोचू. २०१७  मध्ये आमचे २ मिलियन्सपेक्षा जास्त सबस्क्रोयबर्स झाल्यावर आम्ही काही तरी नवीन करायचं ठरवलं. आणि आम्ही आमचं पहिलं  र्मचडाइझ -युथियापा लॉन्च करायचं ठरवलं’. टीशर्टवर किंवा त्यांच्या कोणत्याही प्रॉडक्ट्सवर लिहून येणारे संवाद, शब्द याचे नेहमीच लोकांना आकर्षण असतं. याबद्दल बोलताना, आम्ही सर्वप्रथम आमचे खूप लोकप्रिय असलेले संवाद किंवा चिन्हं निवडतो. हे संवाद वाचताक्षणी ऑडियन्सला क्लिक व्हायला हवेत, हाही या निवडीमागे विचार असतो. मग आम्ही आमच्या टार्गेट ऑडियन्सचा नीट अभ्यास करतो आणि मग पुढे जातो, असं त्यांनी सांगितलं. भुवन रंगांचा चाहता आहे त्यामुळे प्रत्येक र्मचडाइझिंगसाठी तोच सगळे रंग निवडतो. ‘सही खेल गया बंचो’ हा ‘बीबी की वाइन्स’चा सर्वात लोकप्रिय संवाद आहे आणि आमच्या पोर्टलवर सर्वात जास्त टीशर्ट्सची विक्री होते. आम्ही आमची स्वत:ची वेबसाइट्ही तयार केली होती जिथून लोक आमचे प्रॉडक्ट्स खरेदी करू शकतात. याशिवाय, एक ई-कॉमर्स पोर्टलही आहे ज्यावर या उत्पादनांची यादी असून त्यावर भुवनकडूनच आवाहन करून लोकांना खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जाते, असे रोहितने सांगितले.

यूटय़ूब चॅनेलबरोबरच हेही कमाईचं आणखी एक साधन झालं आहे का?, असं विचारल्यावर भुवन म्हणतो, हे यूटय़ूबर्सच यूटय़ूब आणि ब्रॅण्ड्स सोडून कमाईचं तिसरं साधन आहे. याशिवाय, हे आमच्यासाठी आमच्या चाहत्यांना भेटण्याचं, त्यांना कनेक्ट राहण्याचं एक साधनसुद्धा आहे.  आम्ही  आता  या गोष्टींचे लायसेन्सिंग करायच्या प्रक्रियेत आहोत. जेणेकरून आम्ही पुढे जाऊन अनेक मोठय़ा ब्रँड्ससोबत कार्ड्स, कॅप्स, चष्मा, बूट व स्पीकरवर आमचे संवाद किंवा लोकप्रिय लाइन्स प्रिंट करू न देण्याच्या प्रयत्नात आहोत.

‘बीबी के वाइन्स’प्रमाणे प्रसाद वेदपाठक याचं ‘युवर इंडियन कन्झ्युमर’ हे यूटय़ूब चॅनेल आणि त्यांचे र्मचडाइझिंगही लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. स्वत:ची र्मचडाइझिंग सुरू करण्यामागचा विचार मांडताना प्रसाद सांगतो, ‘आमच्या व्हिडीओद्वारे आम्ही बरेच सुविचार आणि प्रेरणादायी विचार नेहमीच मांडत असतो. या विचारांना एक आकार देण्याकरता आम्ही टीशर्ट प्रिंटिंग सुरू केले. आम्ही नियमित आमच्या प्रेक्षकांना व्हिडीओजवर कमेन्ट करण्यास सांगतो आणि त्यातून आम्हाला २०१७ मध्ये ‘फ्रेंड्स कॅ फे’ या आमच्या यू.आय.सी. व्लॉग्ज या दुसऱ्या चॅनलवरच्या व्हिडीओला एक आगळीवेगळी कमेन्ट आली. ‘उम्मीद नही जिद होनी चाहिए’ ही की कमेन्ट होती. झारखंडवरून दिव्या प्रकाश मिश्रा नावाच्या मुलीने ही कमेन्ट टाकली होती. त्या व्हिडीओत म्हटल्याप्रमाणे आम्ही तिला क्रेडिट देत ती कमेन्ट उचलली आणि त्याचं टीशर्ट प्रिंट केलं. हळू हळू आमचे टीशर्ट फार फेमस होऊ  लागले. व्हिडीओव्यतिरिक्त या दुसऱ्या व्यवसायाला आम्ही ‘जिद्’ असं नाव दिलं आणि त्याचा लोगो गेल्या वर्षी आमच्या चॅनेलवर लाँच केला’. या सगळ्या गोष्टी सुरू करताना आणि योग्य रीतीने चालवताना कशा प्रकारे काम केलं जातं याबद्दल बोलताना तो म्हणतो, ‘प्रिंटिंगसाठी आमचे दोन मुख्य पार्टनर्स आहेत जे आम्हाला प्रिंटिंग, शिपिंग, ऑनलाइन लिस्टिंग आणि स्टॉक मॅनेजमेंटमध्ये मदत करतात. आमच्याकडे बरेच ग्राफिक डिझाइनर्स आहेत. आमचे काही डिझाइनर्स इंडोनेशियातील तर काही युरोपमधील स्थानिक आहेत. रोहित चौधरी हा आमचा सर्वात सर्जनशील असा कोल्हापूरमधील मुलगा आमचा मुख्य ग्राफिक डिझाइनर आहे. यूटय़ूब हे एक मार्केटिंग आणि लोकांशी जोडले जाण्याचं माध्यम म्हणून खूप उत्तम असा प्लॅटफॉर्म आहे. नियमित उत्पन्न मिळत राहावे, यासाठी प्रत्येक आर्टिस्टला काहीतरी माध्यम शोधावंच लागतं, असं प्रसाद ठामपणे सांगतो. यू.आय.सी.च्या दोन्ही चॅनेलवरून नेहमीच खास विचार-संदेश दिला जातो. खास विचार व सामाजिक संदेश नसला तर ते आम्ही लाँच करतच नाही, असं प्रसाद म्हणतो. ‘जिद्’, ‘ओन्ली ओरिजन नो कॉपी #औकात’, ‘उम्मीद नही जिद् होनी चाहिए’, ‘सर्फ बिफोर यू स्वाइप’, ‘आम हिंदुस्थानी ग्राहक की आवाज’, ‘कहके नही करके दिखाओ’ असे अनेक संवाद असणारे यू.आय.सी.चे टीशर्ट्स प्रसिद्ध आहेत.

यूटय़ूब चॅनेलवर ज्या पद्धतीचे व्हिडीओ टाकले जातात त्याच्याशी निगडित स्वत:ची र्मचडाइझिंग काढायचा हा ट्रेण्ड निश्चितच खूप लोकप्रिय आहे. आणि फॅशन इंडस्ट्रीमधील हा वाढता बिझनेसही असल्याने तो तरुणाईने जास्त आपलासा केला आहे हे सहज दिसून येते!