वेदवती चिपळूणकर परांजपे

आपल्याकडे येणारं पाणी पिण्यायोग्य नाही. ते दूषित आहे याची जाणीव झाल्यानंतर दूषित पाणी कसं ओळखायचं आणि त्यातल्या दूषित घटकांचं प्रमाण किती हे मोजण्यासाठी आधुनिक विज्ञानतंत्रज्ञानाची मदत घेत यंत्रनिर्मिती करणाऱ्या गीतांजली रावची ओळख आजच्या फेनम स्टोरीमध्ये…

तुम्ही एक पंधरा वर्षांची मुलगी आहात. तुमच्या अत्यंत आवडीचं असं तुम्ही काही तरी काम आणि संशोधन करता आहात आणि एक दिवस तुम्हाला ‘टाइम’ मॅगझिनकडून ‘किड ऑफ द इयर’ म्हणून नावाजलं जातं. नुसतं नावाजलं जात नाही तर तुम्हाला मॅगझिनचं कव्हर फेस बनवलं जातं. तुमची मुलाखत घेतली जाणार हे तर उघड आहे, मात्र ती मुलाखत घेतली जाते ती थेट हॉलीवूडची सौंदर्यवती अँजेलिना जोली हिच्याकडून ! हे सगळं स्वप्नवत वाटावं असंच… पण ते प्रत्यक्षात घडलं आहे. कॉलोरॅडोमध्ये विद्यार्थिनी असलेल्या गीतांजली राव हिच्या बाबतीत घडलेली गोष्ट नवल वाटायला लावणारी अशीच आहे. २०२० या वर्षीसाठी ‘टाइम किड ऑफ द इयर’ म्हणून गौरवली गेलेली गीतांजली आज केवळ एकोणीस वर्षांची आहे. तिला आवडणारी गोष्ट म्हणजे विज्ञान आणि त्यात तिने केलेल्या एका यशस्वी प्रयोगामुळे तिला हा सन्मान दिला गेला आहे.

हेही वाचा >>> लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

कॉलोरॅडोच्या शाळेत शिकणारी एक सामान्य मुलगी गीतांजली. विज्ञानच आपलं पॅशन आहे वगैरे काहीही तिला त्या वेळी जाणवलेलं नव्हतं. तिला केवळ इतरांसाठी काही चांगलं करण्याची इच्छा होती. आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य येईल असं काही तरी करावं असं तिला सतत वाटायचं. सर्वांच्या आनंदासाठी, सर्वांचं भलं व्हावं यासाठी काही तरी करायची तिची सतत इच्छा असायची. त्यातूनच तिला असं वाटलं की पाण्यातलं प्रदूषण टेस्ट करणं ही गरज आहे. ही गरज जाणवल्याने तिच्या संशोधनाला काहीएक दिशा मिळाली. थोडा अभ्यास केल्यावर प्रदूषण म्हणजे नेमकं काय शोधायला हवं हे तिच्यापुढे स्पष्ट झालं. पाण्यातल्या लीडचं प्रमाण निश्चित करण्यासाठी काही तरी डिव्हाईस बनवायचं तिने पक्कं केलं. ‘कार्बन नॅनोट्यूब सेन्सर टेक्नॉलॉजी’ या माध्यमातून हे करायचं असं तिने ठरवलं. या शब्दांचे अर्थसुद्धा तिच्या वयाच्या मुलांना समजत नव्हते. गीतांजली म्हणते, ‘‘मला अशा पद्धतीने संशोधन करायचं आहे असं सांगितल्यावर माझ्या आईचीच पहिली प्रतिक्रिया ‘म्हणजे काय?’ अशा अर्थाची होती.’’

गीतांजली या तंत्रज्ञानाच्या बाबतीतसुद्धा विस्ताराने सांगते. हे तंत्रज्ञान मुळात तिने शोधलेलं नाही. तिने त्याबद्दल वाचलं होतं आणि त्यातून ते तंत्रज्ञान नक्की काय आहे ते समजून घेतलं होतं. कार्बनचे काही सिलिंडर आकाराचे मॉलिक्यूल्स असतात. ते इतर कोणत्याही केमिकलला सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे पाण्यात असलेला कोणताही रासायनिक घटक ते सहज ओळखू शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्यातल्या हानिकारक घटकांचं अस्तित्व तपासायचं आणि ते घटक अस्तित्वात असले तर त्यांचं प्रमाण शोधून काढायचं असं गीतांजलीने ठरवलं. डेन्वर वॉटर क्वालिटी लॅबमध्ये तिने तिचे प्रयोग केले आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिने ते साध्यही केलं. पाण्याची शुद्धता आणि क्वॉलिटी तपासणे जेणेकरून ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी मदत होईल आणि त्यातल्या प्रदूषणकारक घटकांचा कोणालाही त्रास होणार नाही, असं तिचं ध्येय होतं. ‘‘आता आमच्या पिढीकडे पर्यावरणाची जबाबदारी आहे. त्यामुळे जे करणं गरजेचं आहे पण इतर कोणी करत नाही आहे, ते मी करणार असा माझा विचार आहे. केवळ पर्यावरणच नव्हे तर कोणत्याही पद्धतीची सामाजिक, पर्यावरणीय, लोकहिताची कामं हा आता तरुण पिढीने करायचा विचार आहे, त्यामुळे त्यातलं मला जे जे शक्य आहे ते मी करणार,’’ असं गीतांजली ठामपणे सांगते.

हेही वाचा >>> भ्रष्टाचारमुक्त

केवळ पर्यावरणाचा विचार करून किंवा प्रदूषणाशी संबंधित बाबतीत संशोधन करून गीतांजली थांबली नाही, तर तिने वेगवेगळ्या क्षेत्राचादेखील विचार केला. सायबर बुलिंग थांबवण्यासाठी तिने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारावर एक अॅप आणि क्रोम एक्सटेन्शन बनवलं. हे ‘kindly’ नावाचं अॅप किंवा एक्सटेन्शन शांतपणे सोशल अॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवतं आणि सायबर बुलिंगच्या सुरुवातीलाच काही त्रासदायक शब्द ओळखून युजरला त्याबद्दल अलर्ट करतं. हे अॅप किंवा एक्सटेन्शन गीतांजलीच्या वयाच्या टीनएजर्सना पसंत पडेल की नाही याबद्दल तिला थोडी शंका होती. मात्र आपल्यावर कोणी वॉच ठेवत नाहीये, उलट आपल्याला मदत करतं आहे या भावनेतून टीनएजर्सनी याला चांगला प्रतिसाद दिला. गीतांजली म्हणते, ‘‘आमच्या वयाच्या मुलांना कोणी त्यांच्यावर लक्ष ठेवलेलं आवडत नाही. आमच्या आमच्या लाइफस्टाइलमध्ये असताना आम्हाला हे प्रॉब्लेम्स सहज येतात. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी आमच्या पातळीवर काही तरी पर्याय शोधणं गरजेचं होतं.’’

सर्वच मुलांमध्ये संशोधनाची वृत्ती असते, तो स्पार्क असतो, मात्र त्यांना दिशा मिळत नसते, असं गीतांजलीचं म्हणणं आहे. त्यामुळे तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या शाळा, संस्था यांच्याशी जोडून घेऊन यंग इनोव्हेटर्सना ग्रूम करण्यासाठी वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली आहे. तिने आतापर्यंत तिच्याच वयाच्या तीस हजारहून अधिक मुलांना मार्गदर्शन केलं आहे. जगभरातल्या सगळ्या इनोव्हेटर्सनी एक नेटवर्क बनवावं अशी तिची इच्छा आहे. अत्यंत लहान वयात सामाजिक आणि पर्यावरणीय भान बाळगून त्यादृष्टीने प्रत्यक्ष अभ्यास आणि प्रयत्न करणारी गीतांजलीसारखी मुलं अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात. केवळ मोठमोठी भाषणं न देता स्वत:च्या कामातून इतरांना उपयोगी पडणारी गीतांजली आणि तिने केलेलं कार्य म्हणूनच दखल घ्यायला लावतं. आपण लहान आहोत, आपण काय करणार? असा विचार न करता आपल्याला समाजोपयोगी संशोधन आणि कार्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी गीतांजलीसारख्या कर्तबगार युवांची गोष्ट प्रेरणादायी ठरते.

viva@expressindia.com