|| प्रियांका वाघुले

झी मराठी वाहिनीवरच्या ‘बाजी’ मालिकेतून तो लोकांसमोर आला तेव्हाच त्याच्या पीळदार शरीरयष्टीचं कोण कौतुक झालं होतं. आता झी युवा वाहिनीवरील ‘साजणा’ मालिकेतून अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आला आहे. मी फिट राहतो हे अभिजीतला सांगण्याची गरज नाही ते त्याच्या एकूणच व्यक्तिमत्त्वातून दिसून येतं. मात्र पीळदार शरीर कमावण्यासाठी जिममध्ये तासन्तास घालवून फिटनेस राखला जातो हे त्याला मान्य नाही. आपण आनंदी असलं पाहिजे मग आपोआप आपला फिटनेस राखला जातो, असं तो म्हणतो.

माणूस आनंदी राहिला की तो आपल्या मनाला हवं तसं वागतो, हवं ते करतो. आणि आपल्या मनासारखं वागता आलं मग माणसाचं मन आनंदी होतं. त्यामुळे आपलं मन आनंदी राहणं फिटनेसच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं असल्याचं तो सांगतो.

बऱ्याचदा व्यायाम करणं म्हणजेच एखादी मोठी जबाबदारी आहे असे वाटू लागते. आणि या भावनेतूनच मनावर ताण येतो. व्यायाम करण्याआधीच मन नकारात्मक विचाराने प्रभावित होतं. आणि ही नकारात्मकताच मग मनाच्या आणि पर्यायाने शरीराच्या फिटनेसची दुश्मन ठरते, असं तो म्हणतो. शारीरिक फिटनेसची किमान गरज म्हणून व्यायाम करत असल्याचं तो सांगतो. मात्र केवळ आवश्यक आहे म्हणून नुसता व्यायाम करणे त्याला रुचत नाही. तो म्हणतो, व्यायाम करताना प्रत्येक व्यायाम प्रकार कशासाठी आहे? तो करण्यामागचा हेतू काय?, या गोष्टी जेव्हा आपण समजून घेतो. तेव्हाच त्या व्यायामाचे महत्त्व आपल्या लक्षात येते. त्याची आपल्या शरीरासाठी किती आणि कशा प्रकारे गरज आहे हे लक्षात आलं की मग आपलं मन उत्साही होतं. आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या मेहनतीवर नक्कीच होत असल्याचं तो सांगतो.

जिममध्ये ठरलेला नियमित व्यायाम प्रकार करत असताना, जिमचे रूटीन सुरू असताना अभिजीत सायकल चालवण्यावर जास्त भर देत असल्याचं सांगतो. सायकल चालवायला अगदी शाळेपासून आवडत असल्याने सायकल चालवण्याची मेहनत घ्यायला कधीच नको वाटत नाही, असं तो सांगतो. सायकलिंग हा फिटनेससाठी अतिशय साधा आणि छान मार्ग असल्याचं सांगतानाच सायकलिंग करताना वेगवेगळी ठिकाणे पाहण्याची संधी आयती चालून येते, याकडेही त्याने लक्ष वेधले. नवनवीन जागांना भेट देऊन फिरणे आणि फिटनेस राखणे अशा दोन्ही गोष्टींचा फायदा या एका सायकलिंगमुळे होतो. ‘एक चीजमें डबल फायदा’ मिळवून देणारी सायकलिंग मनासाठीही आनंददायी असते, असे सांगणारा अभिजीत त्याच्या फिटनेससाठी व्यायामापेक्षा सायकलिंग जास्त महत्त्वाचं मानतो.

viva@expressindia.com