गायत्री हसबनीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षभरात व्यक्तिस्वातंत्र्यावर आलेली गदा, समाजात जाणवत असलेली दडपशाही आणि राजकीय वर्चस्व या मुद्दय़ांवरून भवतालातील वातावरण कलूषित झाले आहे. समाजात अस्वस्थता जाणवत असली तरी आजचा तरुण यातूनही काही बरे घडेल अशी आशा ठेवून आहे.

केंद्र आणि राज्यात असलेल्या सत्ता, त्यांचे चूक-अचूक निर्णय, विविध मागण्यांसाठी  सामान्यांची होणारी फरफट, सत्तेमधील अनागोंदी कारभार अशी बरीच गुंतागुंत स्पष्ट दिसत असली तरी आपण सकारात्मक राहिलो तर परिस्थिती नक्कीच नवे वळण घेईल, यातूनही मार्ग निघतील असा प्रखर आशावाद आजच्या तरुणांमध्ये आहे. या संपूर्ण वर्षभरात राजकीय पटलावर अनेक गोष्टी घडल्या. अगदी शेतकरी आंदोलन, जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईचे सत्र, इंधनांची दरवाढ, केंद्र राज्य संघर्ष, चौकशा, भ्रष्टाचार, नुकताच कंगनाने लावलेला स्वातंत्र्याचा शोध किंवा सध्या पेटलेला एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अशा नानाविविध समस्यांवरून देशात आणि राज्यातही प्रचंड गदारोळ सुरू आहे. या सगळय़ा घटनांना जवळून पाहणारी नवी पिढी लवकरच ‘मतदार’ होणार आहे. त्यामुळे समाजाचे एकदंरीत वास्तव  पाहता या पिढीला नक्की काय वाटतं, या बदलत्या राजकारण आणि समाजकारणाबद्दल त्यांची  मते काय याचा हा थोडक्यात धांडोळा.

‘नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून उपस्थित झालेला गदारोळ, सरकारने पाळलेले मौन सर्वच भीषण होते. हे प्रकरण कुठे थंड होत नाही तोवर शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलन हे एक महत्त्वाचे शस्त्र आहे. त्या आंदोलनात जर खरेपणा आणि ताकद असेल तर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते सरकारला भाग पाडू शकतात,’ असे तरुण पिढीचे नेतृत्व करणारी सौम्या कोरडे सांगते. कंगनाने केलेल्या विधानावरही तिने आपले मत व्यक्त केले आहे. ‘स्वातंत्र्य म्हणजे काय हे सर्वप्रथम समजून घ्यायला हवे. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेसची सत्ता होती. तिच्या बोलण्यात तथ्य असले तरी २०१४ नंतर स्वातंत्र्य मिळाले हे विधान भीषण आहे. आम्ही काँग्रेसवर टीकाही करतो, पण त्याचबरोबर आम्ही हेही म्हणतो की तो पक्ष नसता तर देशही नसता,’ असे विचार तिने व्यक्त केले.  ‘सत्ताबदल व्हावा म्हणून जनतेने भाजपला निवडले, पण आता सात वर्षांच्या कालावधीनंतर या निर्णयाची खंत वाटू लागली आहे. आंदोलने, त्यावरून झालेली हिंसा, महागाई इत्यादी गोष्टी अनुभवल्यामुळे लोकांचेही मतपर्वितन झाले आहे. त्यामुळे या सत्तेला नवीन पर्याय शोधण्यासाठी आता नागरिक पुढे सरसावतील,’ असेही ती म्हणाली.

‘कृषी कायदे मागे घेतले तेव्हा शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने विजय झाला. हा लोकशाहीचा विजय आहे. सध्या पाहिले तर धार्मिक ध्रुवीकरण होते आहे. त्यातून जर कट्टरतावाद वाढला तर ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. जाती-धर्माच्या नावाखाली राजकारण करणे हा फंडा अनेक राजकारण्यांना जमला आहे. सतत आपण धर्माच्या वर्तुळातच फिरतो आहोत. आपण शिक्षण आणि रोजगाराबद्दल फार कमी बोलतो, अशा काही प्रमुख गोष्टी रोहित ढाले या तरुणाने अधोरेखित केल्या. ‘सध्या शिक्षणावर पूर्णपणे भर द्यायला हवा, परंतु दुर्दैवाने त्यावर व्यवस्था फार काम करत नसल्याने शिक्षण क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. ही सर्व व्यवस्था थोडक्यात असफल झाली आहे.

शिक्षण, रोजगार, आरोग्य एकूणच असमाधानकारक अशी स्थिती आहे. कृषी कायद्याचे प्रकरण पाहिले तर ते अधिक संवेदनशीलतेने हाताळले जायला हवे होते, परंतु कुठलीही चर्चा इतके लोक मृत्यूमुखी पडूनही होत नव्हती. जो एक राजकीय स्वार्थ असतो तो पूर्ण करण्यापायी हे सर्व घडले असेच यावरून स्पष्ट होते. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा ही इच्छा होती, परंतु त्याऐवजी नवे कृषी कायदे आणले.. ते कशासाठी? म्हणजे लोकांना जे हवं आहे तेच मिळत नाही आहे,’’ असे रोहित सांगतो.

या सगळय़ाकडे एका वेगळय़ा दृष्टिकोनातून उमा दीक्षित ही तरुणी पाहते. ‘कृषी कायदे रद्द झाले ही बाब तशी थोडीबहुत प्रमाणात चुकली, कारण त्यातून एक वेगळा बदल येथे घडला असता. पण अजूनही अशी आशा आहे की पुढे हे कायदे अधिक सुधारित आवृत्तीने येतील. या सरकारचे कौतुक वाटते की त्यांनी निर्णयाबाबत चिकाटीही दाखवली आणि त्याच प्रामाणिकपणे त्यांनी ते मागेही घेतले,’ असे ती म्हणते. ‘आपला देश म्हणजे जगातील मोठी लोकशाही आहे. आता जेव्हा देश २०१४ साली स्वतंत्र झाला असे कोणी म्हटले तर माझे निरीक्षण असे आहे की जेव्हा एखादा राजा राज्यासाठी निवडला जातो तेव्हा त्याच्या अधिकाराचा वापर तो कसा करतो ते पाहणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य  मिळते तेव्हा तुम्ही त्याचा उपयोग किती योग्य पद्धतीने करता याला फार महत्त्व आहे,’ असे म्हणत तिने कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन केले. ‘ती खूप धाडसाने हे म्हणाली म्हणून ते लोकांना खटकले. मोदी सरकारवर प्रचंड टीका झाली पण संकटसमयी आंतरराष्ट्रीय मदत मिळावी म्हणून मोदींनी सर्व देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले ज्याचा पुरावाही आपण करोनाकाळात पाहिला,’ असे मत तिने मांडले.

एकंदरीतच देशातील वातावरण विविध समस्यांनी ढवळून निघते आहे. त्याचे पडसाद तरुण मनांवरही उमटत आहेत. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा धांडोळा घेत, त्यावर विचार करून आपापली मतं तरुणाईकडून मांडली जात आहेत. परिस्थिती कशीही असली तरी ती तशीच कायम राहणार नाही, यात बदल होणार हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आजची नवी पिढी सजगतेने वावरताना दिसते आहे. viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adolescence independace people society ysh
First published on: 03-12-2021 at 00:07 IST