शब्द वाचून आश्चर्य नक्कीच वाटलं असेल. गोल म्हणजे नक्की कोणता गोल? काय गोल? मराठीतला गोल की इंग्लिशमधला? दोन्हीपैकी कोणताही असेल तरी हा सगळ्यांनाच माहिती आहे. हे बरोबर की शब्द सगळ्यांनाच माहिती आहे. हा इंग्लिशमधला गोल आहे ज्याचा अर्थ ध्येय किंवा साध्य वगैरे वगैरे! मात्र हा नव्याने सांगायचं कारण म्हणजे त्याचा अर्थ शब्दश: ध्येय किंवा साध्य असा असला तरी त्याची सध्याची खोली किंवा गांभीर्य किंवा ‘गहराई’ वेगळी आहे. ही बदललेली खोली अधिक खोल नसून काहीशी कमीच खोल आहे, हे नक्की! काय आहे या तरुणाईची नवीन खोली किंवा नवीन अर्थ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हो या शब्दाची बदललेली खोली हा बहुतांशी सोशल मीडियाचा परिणाम म्हणता येईल. इतरांच्या कृतींचा होणारा प्रभाव आणि त्यामधून निर्माण होणारी ‘मीही असंच करणार’ ही भावना सध्याच्या ‘गोल्स’मागचं कारण ठरते. कोणीतरी दोन मैत्रिणी मस्त ट्रेकला जाऊ न आल्याचे फोटो पोस्ट करतात, कोणीतरी एक ग्रूप रात्रभर कॉफी पित गप्पा मारतानाचे फोटो अपलोड करतो, कोणीतरी भावंडांची जोडी एकमेकांचं कौतुक करतानाचे फोटो टाकतात, कोणीतरी कपल एकमेकांसाठी केलेल्या गोष्टींचे फोटो आणि स्टेटस टाकतात, इत्यादी इत्यादी आणि या सगळ्या पोस्ट्स पाहणाऱ्यांना ‘#गोल्स’ देत असतात. कपल गोल्स, सिबलिंग गोल्स, फ्रेंडशिप गोल्स, फॅमिली गोल्स वगैरे वगैरे हॅशटॅग वापरून या पोस्ट्स व्हायरल होतात आणि सगळ्यांना ‘अगदी तश्शाच’ गोष्टी करायची स्वप्नं पडायला लागतात.

आयुष्याला काहीतरी ध्येय नक्की असावं. तरुणाईच्या डोळ्यांत तर सगळ्यात जास्त स्वप्नं असावीत, हे अगदी खरं! मात्र इतर लोक जे करतात तेवढंच करणं म्हणजेच केवळ ‘गोल्स’ असू शकतात का? याचं उत्तर कोणतीही तिऱ्हाईत व्यक्ती देऊ  शकत नाही. केवळ फोटोपुरते किंवा पोस्टपुरते ‘गोल्स’ मनाशी बाळगून त्यांच्यासाठी प्रयत्न करण्यात, त्यांचा विचार करण्यात आपल्याही नकळत आपण किती विचारशक्ती वाया घालवतो! त्यातही कोणीतरी मित्र-मैत्रिणीने केलं म्हणून, एखाद्या सेलेब्रिटीने केलं म्हणून किंवा ऑनलाइन व्हायरल झालं म्हणून आपणही ‘डिट्टो’ तसंच करून त्यांची कॉपी करायची आहे का?, याचा विचारही आपणच करायला हवा! उगीच ट्रेण्ड फॉलो करत कोणत्या तरी ‘गोल्स’च्या मागे धावण्यापेक्षा स्वत:चे गोल्स स्वत:च तयार केलेले जास्त चांगलं नाही का?

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about goals meaning for youngsters
First published on: 07-09-2018 at 03:30 IST