स्वप्निल घंगाळे, भक्ती परब

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतासारख्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांनी आवाज उठवल्यास, आजही अनेकांच्या भुवया उंचावतात. आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत बोलणाऱ्या त्या मुलीचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, तिच्यावर आरोप – प्रत्यारोपांची फै री झडते. परंतु या ‘मी टू’ मोहिमेमुळे काही जणी हक्काने त्यांच्याबरोबर घडलेल्या गैरवर्तनाबाबत उशिरा का होईना बोलण्याचे धैर्य एकवटू लागल्या आहेत. या हॅशटॅगबरोबर त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या तणावाचा थोडा का होईना भार हलका होण्यास मदत होते आहे. ‘मी टू’ ही स्त्रीवादी विचारधारेतीलच एक लाट आहे, असे तिला संबोधले जात असले तरी यापलीकडे जाऊन व्यक्तीवर होणाऱ्या अन्यायाबाबत बोलणं, व्यक्त होणं गरजेचं आहे. तरुणाईसुद्धा या विषयाकडे प्रगल्भपणे पाहू लागलीय, ही महत्त्वाची बाब आहे.

मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी आलेल्या नवोदित नायिकांना कुठल्या दिव्यातून जावं लागतं, याची एक काळी बाजू स्पष्ट होऊ लागलीय, यासाठी मनोरंजन क्षेत्रातील काही जबाबदार व्यक्तींनीही यावर मत व्यक्त करणे आवश्यक बनले आहे. पण बेधडक बिनधास्तपणे कुठल्याही समस्यांना भिडणारी तरुणाई याही विषयावर उत्स्फूर्तपणे आणि तितक्याच गांभीर्याने व्यक्त होते आहे. इंटरनेट म्हणजे ट्रोलिंग, टाइमपास, व्हिडीओ पाहणं आणि सोशल नेटवर्किंग वगैरे असा सामान्यपणे समज आहे. भारतात मात्र काही दिवसांपासून इंटरनेट विश्व या एका गंभीर विषयाने ढवळून निघाले आहे. हा विषय आहे जगभरात मागील वर्षभरापासून चर्चेत असणारी ‘मी टू’ म्हणजे #टीळ मोहीम. अर्थात हा हॅशटॅग भारतीयांसाठी काही नवीन नाही. मात्र मागील आठवडय़ाभरापासून भारतामधील महिलांनी इंटरनेटवर हा हॅशटॅग वापरून आपल्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबद्दल खुलेपणे बोलायला सुरुवात केली आणि त्याचे वेगाने पडसाद उमटले. काय होते आहे हे कळायच्या आत अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांमागे दडलेल्या लैंगिक शोषणाच्या कथा बाहेर पडू लागल्या आणि उशिराने का होईना मनोरंजन क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रांतही स्त्रियांना सुरक्षितपणे त्यांच्या कार्यालयात काम करता यावे, यासाठी आवश्यक ते नियम, व्यवस्था करण्यासाठी पाठपुरावा सुरू झाला आहे.

भारतात नेहमी एखादी चळवळ उभी राहण्यासाठी प्रभावशाली व्यक्तींना त्याबद्दल बोलणे गरजेचे असते. तसंच काहीसं या मोहिमेबद्दलही झालंय. सध्या व्हॉट्सअपमधील स्टेटसपासून ते फेसबुक टाइमलाइन्सवर हा हॅशटॅग दिसतोय. त्यामागील कारण म्हणजे मागील काही दिवसांमध्ये भारतातील मनोरंजन क्षेत्रात आणि प्रसारमाध्यमांमध्ये घडलेल्या काही घटना. म्हणजे अगदी ‘फॅण्टम’ ही कंपनी बंद करण्यापासून ते ‘एआयबी’च्या तन्मय भट्टची स्वत:च्या कंपनीमधून झालेली हकालपट्टी असो किंवा संस्कारी बाबूजींवर लावण्यात आलेले आरोप या सर्वामुळे पुन्हा एकदा # मी टू चर्चेत आला. त्याला सर्वात मोठे समर्थन मिळाले ते भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या आणि इंटरनेटवर तितक्याच अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या महिला पत्रकारांकडून. एकंदरीतच सिनेमा, प्रसारमाध्यमे, स्टार्टअप्स, इंटरनेटवर गाजलेल्या एआयबीसारख्या कंपन्या या सर्वाकडून # मी टूला केवळ शाब्दिक चर्चाऐवजी कारवाईच्या माध्यमातून बळ मिळाले आहे. म्हणूनच आता लोकप्रिय चेहऱ्यांबरोबरच अनेक सामान्य नेटकऱ्यांनीही समाजमाध्यमांच्या मदतीने त्यातही खास करून ट्विटरवरून आपल्याबरोबर झालेल्या शारीरिक, मानसिक लैंगिक छळाला # मी टू वापरून वाचा फोडली आहे. या सगळ्यात तरुणाईने या मोहिमेला दिलेला पाठिंबाही तितकाच महत्त्वाचा ठरतो.

एकीकडे शाळा, कॉलेजेस, ऑफिसेससारखी सर्व ठिकाणे जेंडर सेन्सिटिव्ह म्हणजे लैंगिक समानता असणारी व्हावीत यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. अनेक जणांनी हा केवळ मुलींसाठीचा हॅशटॅग नसून पुरुषांनाही अशा प्रकारच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याची विनंती समाजमाध्यमांवरून केली आहे. तर दुसरीकडे तरुणाईमध्येही या विषयाची चर्चा घडताना दिसून येते आहे. अनेकांच्या टाइमलाइनवर # मी टू बरोबरच त्या संदर्भातील बातम्या आणि लिंक्स शेअर होतायेत. त्याबद्दल व्हॉट्सअपवर साधकबाधक चर्चाही घडताना दिसतायेत.

आज मुंबई-ठाण्यासारख्या बडय़ा शहरांमधील अनेक कॉलेजेसमध्ये वुमन्स सेल्स आहेत. तेथे मुलींना आपल्या समस्या मांडण्याची, तक्रार करण्याची, आपल्या अडचणींबद्दल मोकळेपणे बोलण्याची मुभा आहे. त्यामुळे आता केवळ आपल्या ग्रुपमध्ये चर्चा न करता या मोहिमेनंतर अशा प्रकारे लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुली या वुमन्स सेल्सच्या माध्यमातून किंवा सोशल नेटवर्किंगवरून आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडतील का.. हे येणारा काळच सांगेल. तरुणाईने नेहमी जागरूक असावं या दृष्टिकोनातून आपल्या आसपास घडणाऱ्या अशा घटनांबाबत सजग राहून कुणाला मदत लागल्यास ती जरूर करावी. सोशल मीडियाचा आधार व्यक्त होण्यासाठी जरूर घ्यावा, पण सोशल मीडियावर चर्चा करण्यापलीकडेही त्यांनी जायला हवं. आपापल्या ग्रुपमध्ये मात्र खरोखरच अशा प्रकारचे अनुभव आले असल्यास त्याबद्दल वाच्यता करून भावी पिढीला या धोक्यासंदर्भात सतर्क करण्याची जबाबदारीही तरुणाईवर आहे याचे भान यानिमित्ताने आले तरी बदलाच्या दिशेने ते एक मोठे पाऊल असेल!

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about me too movement
First published on: 12-10-2018 at 00:08 IST