एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..
काही काही शब्द आपला पिच्छा पुरवतात. म्हणजे कधीच्या काळात तो शब्द ऐकलेला असतो. त्याचा अर्थ डोक्यावरून बंपर गेलेला असतो. तरी त्या शब्दाला समान जाणारं काही ऐकलं की पुन्हा त्या शब्दाची पिन टोचते. काही वर्षांपूर्वी कुठल्या तरी चॅनलवर एक कार्यक्रम होता, रांदेव्हू विथ सिमी गरेवाल. आठवतंय? तर हाच तो रांदेव्हू शब्द. काय अर्थ असेल नेमका? गप्पाटप्पा? मुलाखत? की आणखी काही? बरं शब्दाचा उच्चारसुद्धा पक्का खात्रीचा नाही. मुळात जिथे अर्थच डोक्यावरून जाणारा तर, उच्चार फार नंतरची गोष्ट. कारण अर्थ माहीत नसताना शब्दाचा उच्चार कसा करावा? (इथे एक गोष्ट खास नमूद करावीशी वाटते की, शब्दाचा अर्थ माहीत नसताना तो रट्टावून बोलणारी मंडळीही आपल्या आसपास असतात तो भाग सोडा!) तर काय आहे हे रांदेव्हू प्रकरण? भात रांधणं, रांधा वाढा..असे शब्द कानावरून गेले की तो रांदेव्हू मनात चमकून जायचा. पण फार खोलात शिरून अर्थबिर्थ जाणून घेऊया, अशी इमर्जन्सी कधी आली नाही. काहीच दिवसांपूर्वी आपले वाचक सदानंद माळी यांनी या शब्दाचा शोध घ्यायची जबाबदारी दिली आणि पुन्हा हा शब्द आठवला. म्हटलं चला! आता तर पुरती छाननीच करायची. एकदा होऊन जाऊ दे!
मूळात या शब्दाचा उच्चार आणि स्पेलिंग यांचा टोटल काडीमोड आहे. RENDEZVOUS  असं स्पेलिंग असणारा शब्द रांदेव्हू कसा? पण नाकासमोर चालायला हा काही मराठी शब्द नाही. तर याचं मूळ आहे फ्रेंच भाषेतलं. म्हणजे गुगलीला एकदम टोटल वाव आहे. पु. ल. देशपांडेंनी या फ्रेंच भाषेबद्दल जे काही लिहून ठेवलंय त्याचा चपखल प्रत्यय ‘रांदेव्हू’ च्या बाबतीत येतो. पु. ल. म्हणतात, ‘रोमन लिपी तीच पण उच्चार भलतीकडेच. मराठीत आपण गोडबोले असं लिहून उच्चार अलबुकर्क असा करायचा ठरवला तर जो घोटाळा होईल तीच गत ! ‘मॉन्ट पार्नासे’ अशा रीतीने लिहिलेल्या शब्दाचा उच्चार ‘मोपार्नास’ होतो हे आम्हाला कसे कळावे?’ पुलंचं फ्रेंच भाषेबद्दलचं हे विवेचन वाचलं की रेन्डेझ्वोसऐवजी रांदेव्हू का म्हणावं? याचं नेमकं कारण कळतं. स्पेलिंग पूर्वेला उच्चार पश्चिमेला अशी गंमत आहे सगळी. पण ठीक आहे. ज्याला उच्चार पक्का करायचाय तो पृथ्वीही पालथी घालणार!
हे सगळं झालं उच्चाराच्या बाबतीत! तुम्ही म्हणाल, इतक्या रामायणानंतर आता हा शब्द वापरायचा कुठे? कशासाठी? तर दोस्तहो, एखाद्या व्यक्तीला विशिष्ट जागी, विशिष्ट वेळी भेटण्यासाठी निश्चित केलेली, अ‍ॅरेंज केलेली जागा म्हणजे रांदेव्हू. हा कॅफे रांदेव्हूसाठी पॉप्युलर जागा आहे दोस्ता !  किंवा Today I have planned rendezvous  (रांदेव्हू) with my school friends असं ही म्हणता येईल. काही जणं रांदेव्हूज असाही उच्चार करतात. या शब्दाचा अर्थ शोधताना एक उल्लेख आढळला की, गुप्त मीटिंगसाठी, खास मीटिंगसाठी विशेष करून रांदेव्हू शब्द वापरला जातो.
या शब्दाचा नेमका उच्चार व अर्थ कळल्यावर अडकलेली टोचणारी पिन निघाल्याचा फील येतोय.
असो.. आपलं रांदेव्हू याच ठिकाणी होत राहील. या लेखातून भेटण्याची जागा आणि दिवस ठरलेलाच आहे.
रश्मी वारंग -viva.loksatta@gmail.com     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about proper pronunciation
First published on: 03-04-2015 at 01:13 IST