तेजश्री गायकवाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या तरुणाईला इंडोवेस्टर्न, वेस्टर्न, फ्यूजन अशा सगळ्या प्रकारची फॅशन आवडते, परंतु तरीही अनेक तरुणांचा कल हा ट्रॅडिशनल कपडय़ांकडेही असतो. अनेकदा आपल्यालाही मूळ ट्रॅडिशनल कपडे, दागिने घालायचा मोह होतो खरा.. मात्र त्याविषयी नेमकी माहिती नसते. म्हणूनच ‘व्हिवा’ने दरवर्षी ट्रॅडिशनल लुकलाच पसंती देणाऱ्यांशी संवाद साधला.

दोन दिवसापूर्वीच नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी खास असतात. तरुण वर्ग वाट पाहात असतो तो नवरात्रीचे नऊ  दिवस खेळायला मिळणाऱ्या गरबाची. नऊ दिवस विविध रंगांची उधळण असते. याच रंगाची उधळण यंदा इंडोवेस्टर्न फॅशनेबल कपडय़ातून होताना आपल्याला दिसते आहे. तरुणाईचा कल नेहमीच काहीतरी नवीन आणि हटके करण्याकडे असतो. यासाठी तरुणाई नवनवीन ट्रेंड्स, फॅशनवरती लक्ष ठेवून असतात. हल्ली तरुणाईला काही ठरावीक कार्यक्रम सोडता नंतर न वापरता येणारे हेवी कपडे फारसे आवडत नाहीत. त्याऐवजी हलके, कम्फर्ट देणारे, नंतर कधीही वापरता येईल आणि परवडतील अशा किमतीचे कपडे त्यांना जास्त आवडतात. म्हणून आजच्या तरुणाईला इंडोवेस्टर्न, वेस्टर्न, फ्यूजन अशा सगळ्या प्रकारची फॅशन आवडते, परंतु तरीही अनेक तरुणांचा कल हा ट्रॅडिशनल कपडय़ांकडेही असतो. अनेकदा आपल्यालाही मूळ ट्रॅडिशनल कपडे, दागिने घालायचा मोह होतो खरा.. मात्र त्याविषयी नेमकी माहिती नसते. म्हणूनच ‘व्हिवा’ने दरवर्षी पारंपरिक लुकलाच पसंती देणाऱ्यांशी संवाद साधला.

स्वत: फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेणारी झरना गाला नवरात्रीमध्ये कितीही नवनवीन गोष्टींचा ट्रेण्ड आला तरी ट्रॅडिशनल कपडे आणि ज्वेलरीलाच पसंती देते. ती सांगते, मी स्वत: डिझायनिंगचं शिक्षण घेतेय. त्यामुळे आम्ही जे ट्रेण्डमध्ये आहे किंवा नवीन काही तरी ट्रेण्ड सेट करू शकेल, ते वापरण्यावर जास्त भर देतो. मी रोजच्या वापरात किंवा बाकीच्या फेस्टिव्हलमध्येही जी ट्रेण्डिग फॅशन आहे ती फॉलो करते. पण नवरात्रात गेल्या अनेक वर्षांपासून मी फक्त पारंपरिक कपडे आणि ज्वेलरीच घालते. प्रत्येक जण आपल्या सणांना त्यांच्या ट्रॅडिशनप्रमाणेच तयार होतो असं मला वाटतं. गरबासाठी घातलेल्या आऊटफिटला घागरा चोळीचंच ट्रॅडिशनल स्वरूप दिलेलं असतं. मूळ गुजराती कपडय़ांवर केली जाणारी आबला, मिरर वर्क ही एम्ब्रॉयडरी घागरा चोळीवर केली जाते. मूळ ड्रेसवरती हातानेच सगळं काम केलं जातं. या एम्ब्रॉयडीला कवडय़ांपासून केलेल्या वर्कमुळे चारचाँद लागतात, असं ती सांगते. कवडीचं वर्क केलेली चोळी सध्या जास्त फेमस आहे. घागरा चोळीमध्ये लाल आणि काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. टिपिकल गुजराती लोकांपासून ते इतर लोकांनाही हेच कॉम्बिनेशन जास्त भावतं. गेल्या वर्षांपासून ट्रेण्डमध्ये असणारी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीसुद्धा ट्रॅडिशनली घातली जाते. त्याबदल झरना सांगते, सध्या तरुणांना खूप आवडणारी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी हीसुद्धा ट्रॅडिशनल ज्वेलरी आहे. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीच्या पेंडनला वुलनच्या दोऱ्यामध्येही ओवून ती वापरली जाते. ऑक्सिडाइज्ड सोबतच सिल्व्हर ज्वेलरीलाही या वेळी पसंती मिळते. ही ज्वेलरी एको पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. याशिवाय, कवडय़ांची ज्वेलरी, हातात किंवा दंडात घातल्या जाणाऱ्या बांगडय़ा या ट्रॅडिशनली हत्तीच्या दातापासून बनवलेल्या असतात. आता हस्तदंतावरती बंदी असल्यामुळे अशा बांगडय़ा बाजारात उपलब्ध नाहीत.पण वर्षांनुवर्षे पिढीजात जपल्या गेलेल्या दागिन्यांमध्ये या बांगडय़ा अजूनही पाहायला मिळतात, अशी माहिती तिने दिली.

झरनाप्रमाणेच हिमांशीलाही नवरात्रात कितीही नवनवीन ट्रेण्डी कपडे, ज्वेलरी मार्केटमध्ये आली तरी तिला ट्रॅडिशनली तयार व्हायला आवडतं. नवरात्रात मुली जे कपडे घालतात त्यांना घागरा चोळी किंवा चनिया चोळीच म्हटलं जातं. तर मुलांचे जे ट्रॅडिशनल कपडे आहेत त्यांना केडीयो – वाजणो म्हणतात. या कपडय़ांच्या रंगांमध्ये लाल, हिरवा हे दोन रंग जास्त प्रसिद्ध आहेत. सतरंगी चनिया चोळी म्हणजे सात रंग असलेली चनिया चोळीसुद्धा अनेकांची आवडती असते, असं हिमांशी सांगते. या घागरा-चोळीवर हाताने आरी वर्क, नाकरो भरत, कच्छी भरत, रबारी भरत पद्धतीची एम्ब्रॉयडरी केली जाते. मुलं डोक्यावरती फेटा घालतात तर मुली ओढणी घेतात. त्या ओढणीलाही गोंडय़ांनी सजवलं जातं. ज्वेलरीमध्ये मांग टीका घातला जातो. हा टीका दोन पदरी किंवा त्यापेक्षा जास्त पदरांचाही असतो. हातामध्ये चुडी घातली जाते, घातलेल्या कपडय़ांप्रमाणे या ज्वेलरीचा रंग ठरतो किंवा मग सप्तरंगांच्या बांगडय़ा घातल्या जातात. झंझरा म्हणजे पायल हाही ज्वेलरीमधला महत्त्वाचा भाग आहे. हे  सिल्व्हरपासून बनवलेलं असतं. बुट्टी म्हणजे कानातले हे ट्रॅडिशनली झुमक्याप्रमाणेच असतात. दंडात जर बांगडय़ा घातल्या नाहीत तरी तिथे बाजूबंद घातला जातो, अशी माहिती हिमांशीने दिली.

आपण कितीही मॉडर्न झालो, नवीन पद्धतीची लाइफस्टाइल जगायला लागतो तरी आपल्या ट्रॅडिशनलगोष्टींना आपण कधीच मागे टाकत नाही. आजची तरुणाई वेस्टर्नाइज झाली आहे असं म्हटलं जातं, पण सणासुदीच्यावेळी मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये आपली मूळ संस्कृती, ट्रॅडिशन जपण्याचीच त्यांची धडपड असते.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about traditional clothes in navratri festival
First published on: 12-10-2018 at 00:20 IST