|| राधिका कुंटे

सारस पक्षी, फुलपाखरं आणि इतर वन्यजीवांविषयीच्या नोंदी ती नोंदवते. केवळ निसर्गातील जीवांची छायाचित्रं काढून न थांबता त्यांचा अभ्यास करणं, त्यातले बदल टिपणं आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या अपूर्वा पाटीलच्या संशोधनाविषयी जाणून घेऊ या.

तिला लहानपणापासून निसर्गाविषयीची माहिती जाणून घेण्यात रस होता. चारचौघांप्रमाणे तीही डिस्कव्हरी, नॅटजिओ, अ‍ॅनिमल प्लॅनेट वगैरे वाहिन्यांवरील कार्यक्रम बघायची. मात्र या क्षेत्रात करिअर करता येऊ शकतं, याची तिला फारशी कल्पना नव्हती. पुढे ‘डी. जी. रुपारेल महाविद्यालया’मध्ये एफवायबीएस्सीमध्ये शिकताना ‘इको फोक्स’ या संस्थेच्या कार्यशाळेत वन्यजीवन आणि त्या आनुषंगिक करिअरची माहिती मिळाली. तसंच आपल्या परिसरातील जैवविविधता कशी ओळखायची, तिचा अभ्यास कसा करायचा आणि वन्यजीवांचं छायाचित्रण कसं करायचं याविषयीही शिकायला मिळालं. त्यानंतर महाविद्यालयाच्या अनेक फिल्ड ट्रिप्स आणि बीएस्सीच्या अभ्यासक्रमातून वनस्पतीशास्त्र आणि जीवशास्त्राबद्दल अधिकाधिक प्रॅक्टिकल आणि थिअरॉटिकल माहिती मिळत गेली. पुढे एमएस्सीसाठी तिने ठाण्यातील बी. एन. बांदोडकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेव्हा मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणारा ‘एमएस्सी इन बायोडायव्हर्सिटी वाइल्डलाइफ कॉन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’ हा वन्यजीवनाशी निगडित असणारा तिथला अभ्यासक्रम तुलनेने नवीन होता. त्यांची दुसरीच बॅच होती. या अभ्यासक्रमामुळे वन्यजीवांसह नैसर्गिक परिसराचं संरक्षण आणि व्यवस्थापन कसं करता येईल, त्यासाठी कोणती पद्धत काळजीपूर्वक अवलंबायची, कशा प्रकारे प्राणी, पक्षी, झाडं, कीटक, पाणथळ परिसरातील जैवविविधता, सूक्ष्मजीव यांचा शास्त्रशुद्ध वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करायचा, पर्यावरणविषयक पत्रकारिता आणि लोकसहभागातून दुर्मीळ प्रजातींचं संवर्धन यासारखे बरेच विषय शिकायला मिळाले. तसंच ठाण्यातील ‘फर्न’ संस्थेमार्फत ट्री-वॉक्सच्या निमित्ताने केलेल्या फिरस्तीत तिच्या वनस्पतीशास्त्राच्या माहितीचा खुंटा अधिकच बळकट झाला. कारण ‘फर्न’च्या सीमा हर्डीकर यांनी तिच्याकडून वनस्पतीशास्त्राचे चांगले धडे गिरवून घेतले. एमएस्सीमध्ये पहिल्या तीन सेमिस्टर पेपरच्या आधी अणि शेवटच्या एका सेमिस्टरमध्ये संशोधन करायचं होतं. त्यात विद्यार्थ्यांनी कोणत्याही विषयावर चार महिने संशोधन करून एसएसचा थिसिस – प्रबंध सादर करायचा असतो. ‘मी ठाणे खाडीतील फ्लेमिंगो पक्षी अभयारण्याला आणि उरणमधील पाणथळ जागा यांना भेट देणाऱ्या हिवाळी प्रवासी पक्ष्यांचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यात ‘स्पेसीज डायव्हर्सिटी अ‍ॅण्ड फोरजिंग बिहेविअर ऑफ वेडर्स’ यावर काम केलं. यासाठी मला मार्गदर्शक म्हणून डॉ. गोल्डिन क्वाड्रोस अणि डॉ. पूनम कूर्वे यांचं मार्गदर्शन लाभलं. अपूर्वा सांगते की, ‘एमएस्सीनंतरही या क्षेत्रात काम चालूच होतं. प्रबंधावर काम करताना मला या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांबद्दल अधिक जाणून घ्यायला मिळालं. त्याचाच उपयोग पुढे या क्षेत्रात काम करण्यासाठी झाला. SACO (सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अ‍ॅण्ड नॅचरल हिस्ट्री) या संस्थेमार्फत भारतातील पक्ष्यांवर सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी चालून आली आणि माझी निवड Sarus Crane (सारस) पक्षाचा अभ्यास करण्यासाठी झाली. सारस पक्षी हा जगातील उडू शकणाऱ्या पक्षांपैकी हा सर्वात उंच पक्षी आहे. या प्रकल्पामुळे संपूर्ण गुजरातमध्ये या पक्षाची गणना आणि त्याला असणाऱ्या धोक्यांच्या संदर्भात काम करायला मिळालं. कवउठ स्टेटस नुसार सारस पक्षाचं अतिसंकटग्रस्त श्रेणी आणि वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार परिशिष्ट ४ श्रेणीमध्ये वर्गीकरण केलं जातं. त्यामुळे त्याचं संरक्षण करण्याची जास्त गरज आहे’. या प्रकल्पात काम करायला मिळणं ही तिच्यासाठी चांगली संधी होती. प्रकल्पात रुजू झाल्यावर सुरुवातीचा महिनाभर त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणात संस्थेत आणि प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी काम कसं करावं, वावरावं, नोंदी कशा ठेवायच्या, तसंच ट्रान्सझॅक्ट सव्‍‌र्हे, पॉइंट काऊंट अशा पक्षिगणनेच्या पद्धतींबद्दल माहिती दिली. व्हेजिटेशन सव्‍‌र्हेमध्ये झाडांचं सर्वेक्षण, अंतर मोजणं, त्यांचं वर्गीकरण आणि गणना करणं, छायाचित्र काढणं आदी गोष्टीही शिकवल्या. अनेक तज्ज्ञांनी स्वानुभवाचे बोल सांगितल्यामुळे प्रशिक्षणार्थींना मोलाची माहिती कळली. या आधी तिने काही पक्ष्यांच्या संदर्भातले छोटे अभ्यासक्रम केले होते असल्याने पक्षिगणना आणि नोंदींची जुजबी माहिती तिला होतीच. टीम तय्यार झाल्याचं दिसल्यावर त्यांना फिल्डवर पाठवण्यात आलं.

या प्रकल्पामध्ये तिला अणि तिच्या तीन सहकाऱ्यांच्या टीमला सारस पक्षाची इकोलॉजी (जीवसृष्टी व भोवतालच्या परिस्थितीचे परस्पर संबंध) आणि त्याच्या वर्तनाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. या प्रकल्पात तिला २ वर्षं काम करता आलं. प्रकल्पाच्या एका टप्प्यात संपूर्ण गुजरात राज्यात सारस पक्षाची गणना करायची होती आणि दुसऱ्या टप्प्यात त्याच्या जीवनचक्राच्या सविस्तर नोंदी ठेवायच्या होत्या. खेडा, अहमदाबाद, आणंद या तीन जिल्ह्य़ांमध्ये सारस अधिक प्रमाणात दिसतो. उन्हाळ्यात पाणी आटतं तेव्हा आणि हिवाळ्याच्या सुरुवातीच्या काळात जवळजवळ २५० सारस पक्षी एकत्र दिसतात. मात्र विणीच्या हंगामाच्या काळात तो त्याच्या ठरावीक हद्दीतच वावरतो. त्या हद्दीत तो अन्य सारस पक्ष्याला येऊ देत नाही. त्या जागेवर माणसाचे काही कारणाने आक्रमण झाल्यास किंवा ती उद्ध्वस्त केल्यास तो ती सोडून जातो, असं ती सांगते. तिला या पक्षांविषयी अजूनही आत्मीयता वाटते. पिल्लाचं निरीक्षण करताना एक प्रकारची ओढ वाटायची. ती सांगते की, ‘एकदा भाताची रोपं खूप वाढल्याने दोन-तीन दिवस उलटून गेले तरी पिल्लू नीट दिसत नव्हतं. त्याचं काय झालं या नकोशा वाटणाऱ्या कुशंकेमुळे आम्हाला त्याची काळजी वाटू लागली. शेवटी एकदाचं ते दिसलं आणि आमचा जीव भांडय़ात पडला होता. आमच्या नोंदीत आम्ही ते दिसत नाही असं लिहिलं होतं खरं..पण उगीच वाटे की ती नोंद ‘ते पिल्लू गेलं की काय’ अशी बदलावी तर लागणार नाही ना?’. लोकांमध्ये सारसच्या संरक्षणाबद्दल जागृती निर्माण करण्याची या टीमला संधी मिळाली. सारस पक्ष्यांना विजेचे खांब, पिकांवर होणाऱ्या जंतूनाशकांच्या फवारणीपासून धोका उद्भवतो. त्याच्या जीवनचक्राच्या नोंदीदरम्यान त्याच्या अंडय़ाचे नमुने गोळा करणं किंवा मृत सारसाचे अवयव तपासून त्याची कारणमीमांसा करणं हेही काम या टीमने केलं. उन्हाळ्यात तळी सुकल्यावर मोठय़ा संख्येनं ते एकत्र येतात आणि वावरतात. सारस पक्षाचं निरीक्षण करताना टीमला पडणाऱ्या शंकांचं निरसन आम्ही आपापसात चर्चा करून सोडवत असू तर कधी त्याविषयी तज्ज्ञांना विचारत असू. सारस पक्षांचं निरीक्षण अतिशय सावधगिरीनं करायला लागतं, अशी माहितीही तिने दिली.

सध्या अपूर्वा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पर्यावरण शिक्षणासंबंधी काम करते आहे. त्यात शाळेच्या मुलांना निसर्गाची आवड निर्माण होण्यासाठी त्यांना निसर्गभ्रमंतीसाठी घेऊन जाणं, पक्षीनिरीक्षण शिकवणं, अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीज आखणं या गोष्टींचा समावेश होतो. या फिरस्तीत भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. शिवाय संशोधनाच्या ध्यासात सातत्य ठेवत अपूर्वा ‘धरित्री इन्व्हिरो रिसर्च सेंटर’ या संस्थेअंतर्गत मुंबई आणि ठाण्यामधल्या बागेतील फुलपाखरं आणि इतर कीटकवर्गाच्या विविधतेबाबत काम करते आहे. हा प्रकल्प डॉ. प्रमोद साळसकर आणि चैतन्य कीर यांच्यासोबत सुरू आहे. ती सांगते, ‘लोकांमध्ये फुलपाखरं आणि इतर कीटकवर्गाबद्दल अधिकाधिक जागरूकता निर्माण व्हावी आणि निसर्गाशी जोडलेला प्रत्येक घटक हा आपल्याला काही ना काही सांगत असतो, वातावरणातील होणारे बदल दर्शवत असतो आणि आपल्याला आनंद देत असतो. म्हणून तो आपण जपला पाहिजे, हे लोकांना समजावणं आणि निसर्गाचं मोल जाणवून देणं, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे’. सकाळी फेरफटका मारताना फुलपाखरांचं जीवनचक्र न्याहाळायला मिळालं तर कुणाला आवडणार नाही, हेच ध्यानात ठेवून सार्वजनिक बागांमध्ये अशा प्रकारची झाडं-झुडपं लावण्यात आली आहेत. कोणत्या झाडांवर किंवा ठिकाणी कोणतं फुलपाखरू केव्हा दिसलं अशी नोंदही ती ठेवते आहे. या नोंदी कालंतराने पुस्तक स्वरुपात प्रकाशित होणार आहेत. या नोंदी करताना लहान-मोठय़ा अनेकांनी फुलपाखरांविषयी तिला अनेक प्रश्न विचारले आणि त्यांची माहिती घेतली. तिच्या मते, या स्वरुपाचं काम करण्यासाठी अर्थातच निसर्गाची आवड, निरीक्षणशक्ती, अभ्यासू वृत्ती अत्यंत उपयुक्त ठरते. पाठोपाठ महत्त्वाची आहेत ती पुस्तकं. वाचनातून एक वेगळा दृष्टिकोन मिळाला, असे ती म्हणते. कारण नोंदवलेल्या निरीक्षणाला पुस्तकातल्या नोंदीची जोड असणं चांगलं ठरतं. शिवाय छायाचित्रं काढली गेली तर आपसूकच एक डिजिटल विदा तयार होते आणि त्याचीही नेमकी नोंद ठेवल्यास पुढच्या अभ्यासात ती उपयुक्त ठरते. पुढे वन्यजीव क्षेत्रात पीएचडी करून त्याचा उपयोग जास्तीत जास्त वन्यजीव वाचवणं आणि त्यांचा  नैसर्गिक अधिवास कसा संरक्षित करता येईल याचा विचार करायचा आहे. अपूर्वाचा हा अभ्यास आणि काम बहुत स(सा)रस हैं भाई.. तिच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा.

viva@expressindia.com