टेकजागर : तंत्रसाक्षरतेचा संकल्प

तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर एक वर्ष म्हणजे फार मोठा काळ असतो. अगदी क्षणाक्षणाला म्हटलं तरी या क्षेत्रात नवं काहीतरी घडत असतं.

(संग्रहित छायाचित्र)

आसिफ बागवान

२१ व्या शतकातलं एकोणविसावं वर्ष संपायला आता तीन दिवस उरलेत. त्याचबरोबर या सहस्रकाचं दुसरं दशकही शेवटच्या टप्प्यात प्रवेश करतं आहे. एक वर्ष संपणं किंवा दुसरं सुरू होणं हे खरंतर कालचक्र. हे चक्र अविरत, अथक फिरत असतं. एक वर्ष संपतं तेव्हा भिंतीवर नवं कॅलेंडर विराजमान होतं, एवढंच. दिवस, आठवडे, महिने सरकत जातात आणि पुन्हा आपण वर्षांच्या शेवटाकडे  पोहोचतो. हे सगळं अगदी नित्यनेमाने, आपल्याच वेगाने सुरू असतं. तरीही एखादं वर्ष किती पटकन गेलं, असं आपल्याला उगाचंच वाटत राहतं. प्रत्यक्षात त्या बारा महिन्यांच्या काळात आपल्या अवतीभवतीच्या जगात ज्या वेगानं घडामोडी घडत असतात, त्या  वेगामुळे हा काळ किती पटकन सरला, हे आपल्याला कळतही नाही.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर एक वर्ष म्हणजे फार मोठा काळ असतो. अगदी क्षणाक्षणाला म्हटलं तरी या क्षेत्रात नवं काहीतरी घडत असतं. अगदी दोन महिन्यांपूर्वी आलेलं तंत्रज्ञान कालपरवा जुनं वाटू लागतं. वर्षांच्या सुरुवातीला बाजारात आलेला फ्लॅगशिप फोन त्याच वर्षांत ‘आऊटडेटेड’ होतो, इतक्या वेगाने तंत्रविश्व धावत असतं. सध्याच्या युगात आपण या तंत्रविश्वाशी इतकं समरस झालो आहोत की, त्यासोबत आपलीही धाव सुरूच असते. बाजारात नव्याने आलेला स्मार्टफोन असो की अलेक्सासारखे व्हॉइस असिस्टंट  असो, ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ने सुसज्ज उपकरणे असोत की ‘व्हर्च्यूअल रिअ‍ॅलिटी’ने समृद्ध एखादा गेम असो, प्रत्येक नव तंत्रासोबत आपणही ‘अपडेट’ होत असतो. पण असं अपडेट होत असताना तंत्रज्ञानासोबतच्या शर्यतीत अनेकदा आपला तोल  जाण्याचा, मागं पडण्याचा किंवा पुढे पळण्याच्या नादात तोंडावर आपटण्याचा धोका असतो. हा धोका टाळायचा तर सावध पावलं टाकणं आवश्यक. सर्वसामान्यांशी संबंधित तंत्रक्षेत्रात अशी सावध पावलं कशी टाकता येतील, हे सांगण्यासाठी किंवा त्या वाटेवरचे काटे वेचून दाखवण्यासाठी यावर्षी ‘टेकजागर’ हे सदर सुरू केलं. या सदरातील आजचा हा शेवटचा लेख.

भारतातील ३८ टक्क्यांच्या आसपासची लोकसंख्या आज इंटरनेटशी जोडली गेलेली आहे. मार्च २०१९ अखेर इंटरनेटवर सक्रिय असलेल्या भारतीयांची मासिक संख्या ४५ कोटी इतकी आहे. त्यापैकी जवळपास ३९ कोटी १२ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील आहेत. म्हणजे पाच ते ११ या वयोगटातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्याही जवळपास सहा कोटींच्या आसपास आहे. याचाच अर्थ  अगदी लहान वयापासूनच भारतीयांची इंटरनेटशी जवळीक झाली आहे. अशा परिस्थितीत ‘टेक्नोसॅव्ही’ किंवा तंत्रस्नेही होणं फारसं कठीण नाही. अगदी पाच वर्षांचं लहान मूलही हातात स्मार्टफोन दिला की, यूटय़ूबचं अ‍ॅप सुरू करून त्यातील हवे ते व्हिडीओ सहज पाहू लागतो. तर वयाच्या साठीनंतर हातात स्मार्टफोन आलेल्या एखाद्या ज्येष्ठ नागरिकालाही रोजच्या वापरातून स्मार्टफोनची सवय होऊन जाते. स्मार्टफोन हा सर्वसामान्यांच्या सतत वापरण्यातला असल्याने हे त्याचं उदाहरण. पण सामान्य माणसाशी थेट संबंध येत असलेल्या प्रत्येक तंत्र उपकरणाची हाताळणी आता इतकीच सहज झालीय. म्हणजेच आपण तंत्रस्नेही देश झालोय, हे स्पष्ट आहे. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो, तो उगाच नाही.

अर्थात आपण तंत्रस्नेही झालो असलो तरी, तंत्रसाक्षर झालोय का?, या प्रश्नाचं उत्तर अजूनही तितक्या ठामपणे देता येत नाही. याला अनेक कारणं आहेत. बदलती जीवनशैली, वाढलेला उत्पन्नस्तर आणि स्वस्त झालेली उपकरणे यांमुळे तंत्रज्ञानाशी आपला घट्ट परिचय झाला असला तरी, त्याच्या योग्य वापराबद्दलचं आपलं ज्ञान अजूनही अज्ञानाच्या रेषेवरचंच असल्याचं अनेक घटनांतून दिसून येतं. त्यामध्ये इंटरनेटचा अनियंत्रित वापर, स्वत:च्या गोपनीयतेबद्दलची अनास्था, ऑनलाइन सुरक्षेमधील निष्काळजी,  समाजमाध्यमांवरील द्वेषमूलक पोस्टचा प्रसार, फेकन्यूज पसरवण्याचा सोस, गेमिंगचा अतिरेक, असुरक्षित आर्थिक व्यवहार अशा अनेक गोष्टींचे दाखले यात देता येतील. यातूनच मग आर्थिक फसवणुकीपासून मानसिक आरोग्याच्या तक्रारींपर्यंतच्या अनेक समस्यांना सध्या वापरकर्ते तोंड देत आहेत. ही परिस्थिती केवळ भारतीयांबाबतच आहे, असं नाही. पण चीनखालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा इंटरनेट वापरकर्ता देश, जगातील स्मार्टफोनची सर्वात मोठी बाजारपेठ असलेला देश आणि नवनवीन तंत्रज्ञानाला पटकन कवेत घेणारा देश अशी ओळख मिरवणाऱ्या आपल्या देशात तंत्रसाक्षरता हा किती महत्त्वाचा मुद्दा आहे, हे सांगायला नको!

वर्षभरात ‘टेकजागर’मध्ये वेगवेगळय़ा लेखांतून हीच तंत्रसाक्षरता रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजमाध्यमांवरील प्रचार-अपप्रचार, मोबाइलचा नियंत्रित वापर, ऑनलाइन आर्थिक व्यवहारांतील सुरक्षितता, डेटिंगसारखे अ‍ॅप वापरताना घ्यायची काळजी असे विषय त्यात हाताळण्यात आले. त्यात वाचकांना शहाणपण शिकवणं, हा अहंभाव मुळीच नव्हता. किंबहुना या विषयांतील ‘फॅक्ट्स’ किंवा दृश्य-अदृश्य सत्यस्थिती तटस्थपणे मांडण्याचा त्यामागे हेतू होता. त्यासोबतच त्या त्या वेळच्या तंत्रविश्वातील घडामोडींचा सर्वसामान्यांवर होणारा परिणामही उलगडून दाखवण्याचा प्रयास या सदराच्या माध्यमातून केला. तंत्रज्ञानाचं जग इतकं अफाट आहे की, अशा प्रकारचे विषय मांडण्यासाठी मोजके लेख किंवा लेखमाला पुरेशी ठरणार नाही. त्यातल्या त्यात अधिक महत्त्वाचं, वापरकर्त्यांशी थेट जोडलं गेलेलं आणि तरीही त्यांना अज्ञात असलेलं निवडून त्याची मांडणी करण्यात आली. ती मांडणी किती योग्य आणि उद्बोधक होती, हे सुज्ञ वाचक जाणो!

भारतात तंत्रज्ञानाची पहाट उजाडली ती नव्वदच्या दशकात. टीव्हीसारख्या उपकरणाने ते दशक गाजवलं. त्यानंतरच्या नव्या सहस्रकाची चाहूल देशात संगणकाचे राज्य घेऊन आली. पण देशातील तंत्र क्षेत्रातील उत्क्रांतीचा काळ चालू दशकाने अनुभवला. स्मार्टफोनच्या प्रसारासोबत इंटरनेट, समाजमाध्यमे, इन्स्टन्ट मेसेंजर, ऑनलाइन बँकिंग, डिजिटल वॉलेट, व्हॉइस असिस्टंट यांनी तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा देशाचा दृष्टिकोन बदलून टाकला आहे. आपण आता तंत्रस्नेही झालो आहोतच; आता गरज आहे तंत्रसाक्षर होण्याची. २०२०मध्ये भारत महासत्ता बनेल, असे भाकीत अनेकांनी वर्तवले आहे. येत्या तीन दिवसांत आपण प्रत्यक्षात त्या वर्षांत प्रवेश करत आहोत. तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक सजग होण्याचा संकल्प करण्यासाठी यापेक्षा चांगला मुहूर्त नाही!

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on concept of technology literacy abn

Next Story
व्हिवा
ताज्या बातम्या