वैष्णवी वैद्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थंडीचे गुलाबी वारे वाहू लागल्यावर अगदी वरच्या कपाटात बांधून ठेवलेले विणलेले स्वेटर, हातमोजे, कानटोप्या बाहेर येतात. माघाची थंडी.. माघाची.. म्हणत या दिवसांत वेध लागतात ते थंडी स्पेशल खवय्येगिरीचे!

कुठल्याही पंचतारांकित हॉटेलवर किंवा खाऊ गाडीवर मिळणार नाहीत असे पारंपरिक चवीचे पदार्थ ही या खवय्येगिरीची खासियत असते. त्यामुळे अर्थातच ही पार्टी काही ३१ डिसेंबरसारखी ग्लॅमरस फूडची नसते. अस्सल गावरान पद्धतीची शेतात, रानात किंवा घरात होणारी खादाडगिरी असते. या पाटर्य़ाचा मेन्यू तसं बघायला गेलं तर रोजच्या सामग्रीतूनच बनतो, पण त्याला हटके फ्लेवर देत रात्री शेकोटीच्या साक्षीनं थंडीला पळवत घडणारी ही खवय्येगिरी अनेकांना भुरळ घालते.

थंडीत बनणारा ‘पोपटी’ किंवा ‘मोगा’ हा प्रकार कोकण, अलिबाग या भागांत खूप प्रसिद्ध आहे. हे बनवायची एक विशिष्ट पद्धत आहे. हा मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही पद्धतीने बनवला जातो; पण यात सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ असतो तो म्हणजे भांबुर्डीचा पाला. हा पाला साधारण पावसाळ्यात आसपासच्या रानात दिसू शकतो. या पाल्याचा पहिला थर लावला जातो. शाकाहारींसाठी अर्थातच भाज्यांचा वापर केला जातो. बटाटे, रताळे, वालाच्या/ पावटय़ाच्या शेंगा, वांगी, कांदे, कधीकधी कैरी या सगळ्या भाज्यांचा वापर यात केला जातो. या भाज्या अख्ख्याच धुतल्या जातात आणि त्यांना मध्ये टाचे देऊन के ळीच्या किंवा बदामाच्या पानात गुंडाळून एका मडक्यात ठेवले जाते. त्यावर आलं, मिरची, लसणाची पेस्ट, गरम मसाला, दही या सगळ्या मसाल्यांचा दुसरा थर लावला जातो. ते सगळं पुन्हा भांबुर्डी पाल्याच्या थराने झाकलं जातं. मांसाहारीसाठी याच प्रक्रियेत चिकन किंवा मटणाच्या मसालेदार थराची भर असते. थरांमध्ये मीठ, ओवा यांचीही भर असते. सगळे थर लावून झाले की हे मडकं उलटं करून कोळशाच्या किंवा लाकडाच्या जाळावर ठेवले जाते. हे सगळं एखाद्या शेतात, रानात किंवा मोकळ्या जागी केले जाते. त्यामुळे साहजिकच हा जाळ जमीन थोडीशी खणून करतात. पोपटी शाकाहारी असेल तर साधारण ३० मिनिटं आणि मांसाहारी असेल तर ४५ मिनिटं अशा अंदाजाने ते भाजलं जातं.

चंद्रकांत वर्तक यांचं ‘मानस हॉलिडे होम’ हे अलिबागमध्ये प्रसिद्ध आहे. ते सांगतात, ‘‘खास पोपटीसाठी थंडीच्या दिवसांत खूप गर्दी असते. हे नक्की कसं बनतं याचं लोकांना खूप आकर्षण आहे. मुख्यत: फॅमिली आणि तरुणवर्ग हे बनवण्यातसुद्धा सहभागी होतात. अगदी भाज्या किंवा चिकन साफ करण्यापासून ते जाळ लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेत ते सहभागी होतात. ही प्रक्रिया एका विशिष्ट पद्धतीनेच झाली पाहिजे. थरांची क्रमवारी जरी चुकली तरी चवीत फरक पडतो.’’

‘अनुभूती’ ही नव्याने सुरू झालेली संस्था आहे. ते माथेरान जवळपासच्या गावांत लेकसाइड कॅम्प्स आयोजित करतात. अनुभूतीचे सुदीप आठवले सांगतात, ‘‘पोपटी हा इतर पाटर्य़ासारखा रात्रभर चालणारा कार्यक्रम नसतो. ते तयार करण्याची पद्धत हेच त्याचं कौशल्य आणि वेगळेपणा आहे. लोकांना त्याची उत्सुकता असते. ते बनवून, थंड करून, त्याच्यावर ताव मारेपर्यंत तीन-चार तास सहज निघून जातात.’’

त्या त्या विशिष्ट दिवसांचं महत्त्व किंवा ट्रेंण्डी असणाऱ्या गोष्टी, जेवण आम्ही हे सगळं माथेरानजवळच्या छोटय़ा खेडेगावात करतो. तिथल्या लोकांनाही आर्थिक मदत व्हावी हासुद्धा आमचा हेतू आहे, असं सुदीप सांगतात. या वर्षी त्यांनी खास २५-२६ जानेवारीदरम्यान हा पोपटीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला त्यांनी ‘पोपटी नाइट’ असंच नाव दिलं आहे.

पोपटीप्रमाणेच दुसरा प्रकार जो पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तो म्हणजे ‘हुरडा’. हुरडा हा प्रकार तुरी किंवा ज्वारीचे कोंब असतात. साधारणपणे कापणीच्या आधी आलेलं कोवळं पीक. हे दाणे दिसायला बाजरी किंवा तांदळाच्या कणी इतक्या लहान आकाराचे असतात. त्याची चव थोडी गोडसर असते, त्यामुळे त्यात बारीक चिरलेला कांदा, लिंबू, मसाले टाकून त्याला चटपटीत बनवले जाते. कधी कधी हे नुसते भाजून मीठ लावूनसुद्धा खाल्ले जातात. हे सगळं करतानासुद्धा हुरडा भाजणं कौशल्याचं काम असतं. तव्यावर टाकून गोवऱ्यांच्या जाळावर हुरडा भाजला जातो. गरमागरम हुरडा मोठय़ा थाळीत देऊन त्याच्या जोडीला तिळाची चटणी, घट्ट दही, भाकरीसुद्धा दिली जाते. विदर्भ आणि खानदेशात प्रसिद्ध असणारा हा प्रकार महाराष्ट्राचा ‘रांगडा खुराक’ आहे.

सोलापूरजवळ असलेल्या पाकणी गावात राजू भंडारकवठेकर यांचे ‘अभिषेक मळा’ नावाने कृषी पर्यटन केंद्र आहे. ते सांगतात, ‘‘आम्ही वर्षांनुवर्षे शेतीच करतो, परंतु पावसाच्या बदलत्या वेळापत्रकामुळे बरेच वेळा नुकसान व्हायचे. त्यामुळे शेतीसोबत एक जोड व्यवसाय करायचे ठरवले. लग्न, वाढदिवस, साखरपुडा अशा सार्वजनिक कार्यक्रमांसाठीच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. मग बारमाही जेवणासोबत हुरडा पार्टीचे आयोजन करायला सुरुवात केली ज्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. इकडे हुरडा चुलीवर भाजला जातो. लोकांना चूल आणि त्यावर बनणाऱ्या हुरडय़ाचं विशेष आकर्षण आहे.’’

तसं बघायला गेलं तर या पाटर्य़ा अगदी काही तासांच्या असतात. तो पदार्थ बनवून होईपर्यंतचा काळ गमतीजमतींचा असतो. एकदिवसीय मनमुराद करमणुकीचे हे उत्तम पर्याय आहेत. हे पदार्थ बनवण्याची प्रक्रिया थोडी किचकट आणि वेळखाऊ  असली तरी त्यासाठी लागणारी सामग्री मात्र अगदी रोजच्या वापरातली आहे. ताज्या भाज्या, चिकन, मटण, भरपूर मसाले, चूल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लोकांचा सळसळता उत्साह. हल्ली घाईगर्दीच्या, धकाधकीच्या दैनंदिन जीवनातून अशा पद्धतीचा विरंगुळा लोकांना जास्त आवडू लागला आहे. घरापासून दूर, मोकळ्या वातावरणात, निसर्गाच्या सान्निध्यात पारंपरिक मेजवानीसोबत मैफली रंगतात. याला पार्टी किंवा अशा पद्धतीचे व्यावसायिक रूप आता येऊ  लागलं आहे. पूर्वी सुट्टीत भावंडं आणि नातेवाईक जमले की अंगणात शेकोटी पेटवून, गाण्याच्या भेंडय़ा खेळत कौटुंबिक सोहळे व्हायचे जे आता प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.

हा सगळा व्यावसायिक किंवा वाढत्या ट्रेण्डचा भाग झाला; पण या सगळ्या खास मेजवान्या थंडीतच होण्याचं कारण काय किंवा या कौटुंबिक मेळाव्याचे पर्याय व्यवसायात कसे झाले.. या सगळ्याबद्दल शेफ पराग जोगळेकर सांगतात, ‘‘पोपटीसाठी अत्यावश्यक असणारा भांबुर्डीचा पाला हा या ऋतूतच उपलब्ध होतो. या पाल्याला विशिष्ट असा ओवासदृश सुगंध असतो जो अर्थातच शरीराला पोषक आणि औषधी असतो. त्याचा हटके फ्लेवर या पदार्थाना लागतो. यात वापरला जाणारा भाज्यांचा आहारसुद्धा पौष्टिक असतो. साधारण सगळ्याच भाज्या हिवाळ्यात पिकणाऱ्या असतात. म्हणजे अर्थातच शरीराला उष्ण असतात. हुरडय़ाचे पीकसुद्धा याच वेळी येते. कापणीच्या आधीच कोवळे पीक काढून त्याची ही चटकदार रेसिपी बनवावी लागते. आता तरुणाई नोकरीच्या, शिक्षणाच्या निमित्ताने शहरात स्थिरावली आहे. गावात जाणे नेहमी शक्य होत नाही, पण या पारंपरिक पद्धतींचा मोहसुद्धा आवरत नाही, त्यामुळे याचे व्यावसायिकीकरण सुरू झाले; पण आता बदलत्या काळामुळे परंपरा आणि आधुनिकीकरणाचा संगम झाला आणि या गोष्टी अधिक लोकप्रिय झाल्या असं वाटतं.’’

थंडीतली ही खाऊ मैफल आता अशा पद्धतीने ‘खवय्येगिरी’ म्हणून नव्या ढंगाने नावारूपाला आली. तरुणाईला आता पर्यटनासोबत खाऊखुशालीतसुद्धा रुची निर्माण झाली आहे. आता अशी खास रानातली पंगत सजावी म्हणून थंडीतल्या सुट्टीत हे हमखास होणारे प्रयोग आहेत.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on foods in cold seasonal abn
First published on: 31-01-2020 at 04:19 IST