विनय नारकर

भारतीय वस्त्रकलेचा इतिहास आणि परंपरा यांचा अभ्यास इतर अनेक कलांमधून करता येतो. नृत्यकला, शिल्पकला अशा विविध कलांमधून दैदीप्यमान अशा वस्त्रकलेचा इतिहास कसा जपला गेला आहे इथपासून ते वस्त्रकलेचा इतर कलांवर झालेला परिणाम याविषयी प्रसिद्ध फॅशन डिझाइनर विनय नारकर ‘वस्त्रांकित’ या सदरातून अभ्यासपूर्ण मांडणी करणार आहेत.

भारतास वस्त्र कलेचा दैदीप्यमान वारसा लाभला आहे हे आपण जाणतो. ही वस्त्र परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. सर्व प्रकारच्या पोषक वातावरणात ती वृद्धींगत झाली, खऱ्या अर्थाने बहरली. विविध प्रदेशातील सौंदर्यशास्त्रानुसार या वस्त्र कलेला आकार येत गेला.

विविध कला आणि परंपरा यांच्या दस्तऐवजीकरणाच्या परंपरेचा मात्र भारतीय समाजात अभाव आहे. याबाबत एक प्रकारची अनास्थाच दिसून येते. वस्त्र परंपरे बाबतही अपवादानेच लिखाण झाले आहे. वस्त्रांचे स्वरूपही नश्वर असल्यामुळे निरनिराळ्या काळातील वस्त्रे आपल्याला सहजी पहायला मिळत नाहीत.

महत्वाच्या अशा या वस्त्र कलेचं, परंपरेचं प्रतिबिंब मात्र विविध कलांमध्ये पडलेलं पहायला मिळतं. जाणते-अजाणतेपणाने  विविध कलांमध्ये त्या त्या काळातील वस्त्र परंपरा अविष्कृत होत गेली. इथे मी वस्त्र कला असा शब्दप्रयोग करतो आहे. मुळात, वस्त्र निर्मिती ही कारागिरी आहे की कला.. एखादी कारागिरी कलेच्या पातळी पर्यंत कधी पोहोचते? डिझाइनिंग (रचना) मध्ये उपयुक्तता ही महत्वाची असते आणि कलेमध्ये अभिव्यक्ती महत्वाची असते. ज्याक्षणी डिझाइन किंवा कारागिरी उपयुक्ततेची मर्यादा ओलांडते, तेव्हा ती कलेच्या पातळीवर जाते का? डिझाइन आणि कला यामधील सीमा धूसर होते का?

वस्त्रांची एक निश्चित उपयुक्तता असते, पण कधी कधी वस्त्रेही अभिव्यक्तीचे माध्यम बनतात. काही खास क्षणांसाठी, प्रसंगांसाठी, काही खास प्रकारची वस्त्रं वापरली जातात. वस्त्रांबद्दल काही प्रतिकात्मकता ही तयार होत आल्या आहेत.

अनेक भाषांमधल्या पारंपरिक काव्य रचनांमध्ये, लोकगीतांमध्ये वस्त्र परंपरांचे  मानवी जीवनातील स्थान, त्याबद्दलचा खास जिव्हाळा या गोष्टी अतिशय तरलतेने अभिव्यक्त झाल्या आहेत. पारंपरिक संगीत रचना, जसे ठुमरी, कजरी, सावनी मधून वेगवेगळ्या ऋतुंमधे कोणती वस्त्रे वापरली जावीत, कोणत्या प्रसंगांमध्ये कोणत्या वस्त्र परंपरांचा मान आहे, कोणत्या सणांमध्ये काय वापरावे, कोणत्या प्रसंगी कोणते रंग वापरावे याबद्दलची सुरेख वर्णनं आलेली आहेत.

प्राचीन साहित्यात, अगदी वेद, उपनिषद, पुराण आणि इतर साहित्यांतही वस्त्र प्रकारांबद्दल लिहिण्यात आले आहे. विविध प्रकारच्या साहित्यातील वस्त्रांच्या नोंदी आणि त्याबद्दलचे रंजक संदर्भ, शिवाय त्यावेळचे वस्त्रांबद्दलचे समज, त्या वेळच्या नैतिकते बद्दलच्या समजुती अशा अनेक अंगांनी या बाबी समोर येतात. वस्त्र प्रकार आणि ते नेसण्याबद्दलच्या धार्मिक समजुती आणि निर्देश हे सुद्धा आज रंजक आणि उद्बोधक ठरू शकतील.

भारतात विविध प्रदेशात विविध नृत्य परंपरांचा संपन्न वारसा आहे. त्या त्या प्रदेशानुसार, तिथल्या संस्कृतीनुसार, जीवनमानानुसार त्या परंपरा घडत गेल्या आहेत. त्यांच्या विकासामध्ये तिथल्या वस्त्र परंपरांचाही मोठा वाटा आहे. कथ्थक नृत्याची नजाकत बनारसी आणि चंदेरी वस्त्रांशिवाय इतकी अधोरेखित झाली असती का? आसामच्या सत्त्रीय नृत्यात परिधान केल्या जाणाऱ्या शुभ्र सुती आणि कोरा मुगा रेशमाच्या वस्त्रांशी त्या शैलीच्या अंतरंगाशी एकत्व साधले गेले आहे. गुजरातच्या वस्त्रांमधल्या रंगांच्या उधळणीमुळे गरबा आणखी उल्हसित आणि जोषपूर्ण होऊ  शकला.  प्रत्येक प्रदेशाच्या नृत्यशैलीचे व्यक्तिमत्व घडण्यात सुध्दा तिथल्या वस्त्र परंपरांचा महत्वाचा सहभाग आहे.

भारतातल्या शिल्पकलेनं अतिशय महत्वाची वस्त्र परंपरेची नोंद करून ठेवली आहे. सिंधू संस्कृती पासून आधुनिक शिल्पकलेच्या प्रवासातलं वस्त्र परंपरेचं रेखाटन खूप रंजक आणि महत्वाचं आहे. निरनिराळ्या काळात घडत गेलेल्या शिल्पांमधून दिसणारी वस्त्रं आणि पोषाख यांच्या ऐतिहासिक नोंदी तर महत्त्वाच्या आहेतच, पण त्या पलिकडे जाऊन त्या वस्त्रांमधील सौंदर्यशास्त्र समजून घेणे आणि तो प्रवास उलगडून पाहणे असा प्रयत्न या सदरातील लेखांमधून होणार आहे.

चित्रांच्या अनुषंगाने विचार करता या वस्त्र कलेच्या या अभ्यासाला वेगळेच परिमाण मिळते. चित्रांमधे असणाऱ्या रंगांमुळे वस्त्रांचे पूर्ण रूप साकारायला लागते. वस्त्रांच्या शोधातला महत्वाचा टप्पा गाठता येतो. अजिंठय़ाच्या चित्रांमधील वस्त्रं, पोषाख, दागिने यांच्या चितारण्याने ही चित्रे अधिक सुखावह झाली आहेत.

लघुचित्रांमध्ये वस्त्र आणि पोषाखांचे कधी शैलीदार तर कधी वास्तवदर्शी चित्रण झाले आहे. मुघलशैली मध्ये वस्त्रे व पोषाखांचे चित्रण विशेष काळजीने केलेले दिसून येते. लघुचित्रांमध्ये चितारण्यात आलेल्या प्रसंगानुसार, ऋतुंनुसार केलेला वस्त्रांच्या रंगांचा वापरही विलोभनीय आहे. सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने हा अभ्यास रंजक ठरू शकेल.

सगळ्याच दृश्यकलांना वस्त्रांमुळे एक गतिमानता येते. या लेखमालेद्वारे विविध कला आणि वस्त्र कला यामध्ये ऐतिहासिक नोंदी व यापुढे जाऊन सौंदर्यशास्त्रीय दुवे काय आहेत याचा शोध घेण्याचा, छोटासा प्रयत्न करण्याचा मानस आहे.

या कलांशिवाय आणखीही अशा कला आहेत, ज्यांना आपण रूढार्थाने कला म्हणत नाही, पण या विषयाच्या अनुषंगाने त्यांचे महत्व आहे. माझी वाचकांना नम्र विनंती आहे की तुमच्या दृष्टीने अशा काही कला असतील ज्यामध्ये वस्त्र कलेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं, तर त्यांनी मला आवर्जून त्याबाबत सूचना करावी.

viva@expressindia.com