scorecardresearch

नवं दशक नव्या दिशा : अथांगाचा थांग – २

मेंदूचा कुठला भाग काय काम करतो, याबद्दल संशोधन सर्वप्रथम केलं गेलं ते फिनियस गेजच्या अपघातानंतर.

नवं दशक नव्या दिशा : अथांगाचा थांग – २

सौरभ करंदीकर viva@expressindia.com

मानवी मेंदू, त्याच्या कार्यपद्धतीबद्दल, त्याची क्षमता वाढवण्याबद्दल मानवजातीला नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे. इसवीसनपूर्व १७०० वर्षांपासून आजपर्यंत आपलं मेंदूबद्दलचं ज्ञान कूर्मगतीने वाढतं आहे. असं म्हणतात की आपण आपल्या मेंदूचा केवळ २ टक्के वापर करतो. काही जण म्हणतात १० टक्के. दोन्ही गटातील आकडेवारी खोटी आहे. १८९० साली हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स जन्मजात अतिहुशार मुलांच्या मनोव्यापारावर संशोधन करत होते. आपल्या एका व्याख्यानात ते असं म्हणाले की, ‘आपल्या मानसिक क्षमतेचा पूर्ण वापर करणं सर्वानाच शक्य नसतं, आयुष्यातला अर्धा वेळ तर आपण झोपतो. त्यातून सामाजिक परिस्थिती, मिळणाऱ्या संधी इत्यादी अनेक गोष्टींमुळे शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा पुरेसा वापर केला जात नाही’. मेंदूच्या क्षमतेच्या टक्केवारीवर त्यांनी कधीच भाष्य केलं नाही. पण प्रसिद्ध व्यक्तींच्या वक्तव्याचा विपर्यास झाला नाही, तरच नवल. १९२० च्या सेल्फ – हेल्प चळवळीदरम्यान  विल्यम जेम्सच्या वक्तव्याला आकडेवारी बहाल केली गेली. अनेक पुस्तकातून, व्यक्ती – विकास शिबिरातून, व्याख्यानातून ‘१० टक्के’ हे शब्द अधोरेखित केले गेले. शास्त्रीय आधार नसलेलं हे विधान आपल्याकडे ‘२ टक्के’ या भावात वापरलं जाऊ लागलं. (आपला स्वभाव तसा काटकसर करण्याचा असल्यामुळे असेल कदाचित!). खरं सांगायचं तर प्रत्येक क्षणी आपण आपल्या मेंदूचा १०० टक्के उपयोग करत असतो. मेंदूचा एखादा भाग वापरात नसलेल्या खोलीसारखा कोळिष्टकं जमवत बसला आहे, असा गैरसमज कृपया करून घेऊ नये. अनेक विज्ञानकथांमध्ये आणि मागील लेखात उल्लेख केलेल्या ‘लिमिटलेस’ सारख्या चित्रपटात मेंदूची क्षमता वाढवण्याचे प्रयोग मनोरंजनाखातर दर्शवले जातात. पण आजच्या घडीला तरी असं काही शक्य नाही.

मेंदूचा कुठला भाग काय काम करतो, याबद्दल संशोधन सर्वप्रथम केलं गेलं ते फिनियस गेजच्या अपघातानंतर. १८४८ साली  एक रेल्वेमार्ग तयार करताना स्फोटकांनी पेट घेतला आणि रेल्वे कर्मचारी असलेल्या फिनियसच्या गालात एक लोखंडी सळई घुसली आणि त्याच्या मेंदूचा एक भाग नष्ट करून आरपार गेली. चमत्कार म्हणजे फिनियस जिवंत राहिला. इतकंच नाही तर उपचार करणाऱ्या डॉक्टर एडवर्ड विल्यम्स यांना ‘मलमपट्टी करून मला घरी जाऊ द्या’, असं म्हणू लागला! फिनियसला पूर्वीपासून ओळखणाऱ्या डॉक्टर जॉन हार्लो यांनी त्याच्यावर उपचार सुरू ठेवले आणि त्याबद्दलच्या नोंदी करायला सुरुवात केली. अपघातापूर्वी काहीसा बुजरा आणि शांत असलेला फिनियस गेज बरा झाल्यानंतर मात्र एकलकोंडा, तुसडा झाला असं त्याच्या सहकाऱ्यांना जाणवू लागलं. वर्षभरानंतर डॉक्टर हार्लो यांच्या नोंदीनुसार फिनियस ठीकठाक असला तरी त्याच्या स्वभावात कायमस्वरूपी बदल झाले. त्याला भावनांचं आकलन होत नाहीये, काही वस्तूंचे आकार ओळखता येत नाहीयेत, त्याची निर्णयक्षमता नाहीशी झाली आहे, असं त्यांनी नोंदवलं. फिनियसच्या मेंदूचा जो भाग नष्ट झाला होता तो या विचारांशी संबंधित असावा असा पहिला अंदाज तेव्हा मांडला गेला. आज वैद्यकशास्त्राने मेंदूचा कुठला भाग कोणत्या भावनांनी उद्दीपित होतो. कोणता विचार करताना मेंदूच्या कुठल्या भागात घडामोडी होतात त्याचे काही प्रमाणात अचूक आडाखे बांधले आहेत.

आपल्या मेंदूंमधील पेशी – न्यूरॉन्स – इतर न्यूरॉन्सबरोबर जोडले गेलेले असतात. मानवी मेंदूमध्ये सरासरी ८,६०० कोटी न्यूरॉन्स असतात. आपल्या आयुष्यभर न्यूरॉन्सच्या जोडणीतून विद्युत – संदेश सतत पाठवले जातात. विद्युत संदेशाच्या या महाप्रचंड गदारोळात आकलन, विचार, भावभावना, कृती, चयापचय, प्रतिक्षिप्त क्रिया या साऱ्या गोष्टी घडत असतात. नेमक्या कुठल्या विचारांनी कुठल्या न्यूरॉन्सची साखळी उद्दीपित होते, यावर संशोधन चालू आहे. कुठल्या क्रिया करताना मेंदूच्या कुठल्या भागात विद्युत – घडामोडी घडतात त्याचं निरीक्षण विविध उपकरणांनी केलं जात आहे.

आपली बौद्धिक कुवत, हुशारी ही आपल्या मेंदूत असलेल्या न्यूरॉन्सच्या संख्येवर आणि त्यांच्या जुळणीवर अवलंबून असते असा समज आहे. आपल्या जन्मापासून आपल्यावर घडणारे संस्कार, आपले अनुभव, आपली निरीक्षणं न्यूरॉन्सना एकमेकांशी विशिष्ट पद्धतीने जोडायला भाग पाडतात. न्यूरॉन्सची ही जुळणी – न्यूरल पाथवेज – आपण कशा प्रकारे विचार करतो ते ठरवत जातात. आपली मानसिक कुवत घडवतात. जन्मत: जेवढे काही न्यूरॉन्स आपल्याला प्राप्त होतात, त्यात अजिबात भर पडत नाही, असाही समज होता. पण आज तो मागे पडतो आहे. अनेक संशोधनांमध्ये न्यूरॉन्सच्या संख्येत थोडय़ा फार प्रमाणात वाढ झालेली दिसून आलेली आहे. इतकंच नाही तर मेंदूच्या एका भागात असलेले न्यूरॉन्स दुसऱ्या भागात पोहोचलेले, आपली जोडणी बदलतानादेखील आढळलेले आहेत. थोडक्यात मेंदूबद्दलचं आपलं ज्ञान सतत अपुरं असल्याचंच जाणवतं आहे.

संगणक क्रांती घडवणाऱ्यांपैकी एक, अ‍ॅलन टय़ुरिंग १९५० मध्ये असं म्हणाले की २००० सालापर्यंत माणसासारखा विचार करणारे संगणक अस्तित्वात येतील. विचारक्षमता असलेला संगणक आणि मानवी मेंदू यांची रचना एकाच प्रकारची असेल ही कल्पना तग धरू लागली. संगणकाच्या सीपीयू – सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये घडणाऱ्या प्रक्रिया आणि आपल्या मेंदूतल्या घडामोडी या सारख्याच असल्या पाहिजेत असा विचार समोर आला. आज मात्र शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांच्यामध्ये याबाबत एकवाक्यता राहिलेली नाही. संगणकामधील सर्वात सूक्ष्म भागाच्या ‘चालू किंवा बंद’ या दोनच स्थिती असतात (‘एक आणि शून्य’ या आकडय़ांनी संगणकाची भाषा घडते ती यामुळेच). मेंदूतला प्रत्येक अतिसूक्ष्म भाग मात्र सतत ‘चालू’ असतो. इतकंच नाही तर गरजेप्रमाणे स्वत:ची कार्यक्षमता कमी-जास्त करू शकतो. संकटकाळी आपल्या ज्या हालचाली, विचार आणि निर्णय होतात त्या क्षणी मेंदूतील विद्युत – संदेशांची क्षणार्धात प्रचंड प्रमाणात देवाणघेवाण होते. संगणकाची रचना मात्र तशी नाही. सुमारे १३ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर २००३ साली मानवाच्या जडणघडणीला जबाबदार असलेल्या मानवी जनुकाची नोंद पूर्णत्वास आली (हयुमन जिनॉम प्रोजेक्ट). त्याच धर्तीवर मेंदूची रचनादेखील तंतोतंत मांडण्याचे काम २००९ च्या सुमारास हाती घेण्यात आलं. या प्रयत्नांबद्दल पुढील लेखात जाणून घेऊ.

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Brain cells brain function percentage of brain use human genome project zws