मुंबईत नुकताच ब्रायडल फॅशन वीक साजरा झाला. चित्रांगदा सिंग, सानिया मिर्झासारख्या अनेक सेलिब्रिटींनी तरुण तेहेलियानी, गौरव गुप्ता, शंतनू आणि निखिल, जे जे वालिया, निता लुल्ला, रोहित बाल, फ्लागुनी आणि शेन पिकॉक या नामवंत डिझायनर्सचं कलेक्शन यामध्ये सादर केलं. आजची स्त्री स्वतंत्र आहे, खंबीर आहे. तिला तिचं मत आहे, विचार आहेत. पण तरीही तिच्यातील पारंपरिक हळवेपण, स्वप्नाळूपण अजून तसंच आहे. लग्नात एखाद्या राजकन्येप्रमाणे नटावं ही तिची सुप्त इच्छा असते. परंतु आपल्या देहबोलीला काय शोभून दिसेल याचा विचार करून ती ही इच्छा पूर्ण करते. याच गोष्टीचं भान ठेवत या वेळी  पारंपरिक पेहरावाला नावीन्याची जोड देणारी डिझाईन्स सादर झाली.
दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईच्या हंगामाची दखल घेत दरवर्षी होणारा इंडियन ब्राइडल फॅशन वीक नुकताच मुंबईत पार पडला. २९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान सांताक्रूझच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा दिमाखदार फॅशन शो झाला. या फॅशन वीकमध्ये भारतातील नामवंत ब्रायडल डिझायनर्सनी हजेरी लावली होती. यामध्ये तरुण तेहेलियानी, गौरव गुप्ता, शंतनू आणि निखिल, जे जे वालिया, निता लुल्ला, रोहित बाल, फ्लागुनी आणि शेन पिकॉक यांसारख्या अनेक दिग्गज डिझायनर्सचा समावेश होता. दिया मिर्झा, सानिया मिर्झा, जेनेलिया डिसूझा, प्राची देसाई, काजल अग्रवाल, कल्की कोल्चीन, जॅकलीन फर्नाडिस, आदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंग यांसारख्या अनेक बॉलीवूड तारकांनी आपल्या हजेरीने शोला चारचांद लावले होते.
प्रत्येक स्त्री ही दुसरीपेक्षा भिन्न असते. तिला तिचं स्वतंत्र अस्तित्व, गरज आणि व्यक्तिमत्त्व असतं. या गोष्टीची पुरेपूर जाणीव ठेवत प्रत्येक डिझायनरने या वेळी आपल्या कलेक्शनमध्ये वैविध्य आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. त्यामुळे कलेक्शनमधील तोच तोचपणा टाळला गेला. भारतातील आजची स्त्री ही स्वतंत्र आहे, खंबीर आहे. तिला तिचं असं मत आहे, विचार आहेत. आज ती कमावती झाली आहे, त्यामुळे आपला पसा कुठे आणि कसा खर्च करावा याबद्दल ती जाणीवपूर्वक विचार करते. त्यामुळेच तिला सतत नावीन्याची आस असते. याच गोष्टीचं भान ठेवत या वेळी डिझायनर्सनी पारंपरिक पेहरावाला नावीन्याची जोड देण्याचा प्रयत्न केला होता.
या वेळी कलेक्शन सादर केलेल्यांपकी तरुण तेहेलियानीने साडी गाऊनला नव्या अंदाजात पेश करून पारंपरिकता आणि सहजता यांचा सुरेख संगम घातला होता. तर फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांच्या ‘गार्डन ऑफ एडन’ या कलेक्शनमधून जगभरातील विविध देशांतील प्रादेशिक संस्कृतीचा मेळ घातलेला होता. राघवेंदर राठोड याने त्याच्या कलेक्शनमधून राजेशाही थाट आणि १९२० च्या दशकातील पोशाखातील रुबाब यांचा संगम त्याच्या कलेक्शनमध्ये केला होता. पल्लवी जयकिशन यांनी तर त्यांच्या कलेक्शनमधून दागिने आणि पेहराव यांचा सुरेख मेळ घातला होता. त्यांच्या हाराच्या डिझाईन्सच्या एम्ब्रॉयडरीने उपस्थितांची मनं जिंकली. गौरव गुप्ताची नववधू हीदेखील फ्युचरीस्टिक, काळाचं प्रतिनिधित्व करीत होती. याच फॅशन विकचं औचित्य साधत अझ्वा ज्वेलरी ब्रँन्डने सप्तपदीला समíपत असलेलं २२ कॅरेट सोन्याचं कलेक्शन सादर केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onफॅशनFashion
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bridal fashion week
First published on: 06-12-2013 at 01:12 IST