मितेश रतिश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही वर्षांपूर्वी फक्त वाढदिवसाच्या सेलिब्रेशनपुरताच मर्यादित असलेला केक आता प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होऊ लागला आहे. ‘प्रभाव’ पडावा अशा केकच्या या रंगीबेरंगी दुनियेत सतत बदल घडताना दिसत आहेत. इतके की केकसाठी ग्राहकांच्या मागण्यासुद्धा बदलत चालल्या आहेत. नेमके काय आहेत हे बदल?..

मंद प्रकाश.. गुलाबी थंडी.. केकचा घमघमाट हे वर्णनात्मक चित्र नाताळचं असतं. सणांचं पदार्थाशी जोडलेलं नातं त्या सणाला खूप निराळं रूप देतं. ज्याप्रमाणे गणेशोत्सव आणि मोदक यांचं अतूट नातं आहे. त्याचप्रमाणे नाताळ आणि केकचं, वाढदिवस आणि केकचंही नातं आहे, पण आजकाल हे चित्र बदलेलं दिसतं आहे. वाढदिवस आणि समारंभापुरताच कुतूहलासह मर्यादित असलेला हा केक आजकाल छोटय़ात छोटय़ा सेलिब्रेशनचा अविभाज्य घटक झाला आहे. म्हणजे हा केक डोहाळे जेवण्यातल्या धनुष्यबाणाबरोबर जोडला गेला आहे. साखरपुडय़ातल्या अंगठय़ांबरोबर जोडला गेला आहे. अगदी लग्नातही केकची मागणी वाढत चालली आहे.

एकंदरीतच कोणत्याही कार्यक्रमात ‘जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना’ असं केकच्या बाबतीत घडलं आहे. केकमध्येसुद्धा नवनवीन ट्रेंड पाहायला मिळत आहेत. याविषयी माहिती सांगताना पुण्यातील ‘द पेस्ट्री किचन’चा पेस्ट्री शेफ रत्नाकर जपे म्हणतो, आज सगळय़ा जगभरात केकचे म्हणाल तितके प्रकार उपलब्ध आहेत. भारतीयांच्या आयुष्यातही केकने स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आहे. केकमध्ये अनेक नवीन प्रकार बघायला मिळत आहेत. ज्याची भुरळ खवय्यांना पडते आहे. त्यातलाच एक लोकप्रिय प्रकार म्हणजे ‘फोटोरोल केक’. आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांचे फोटो एकत्र करून एक रोल तयार केला जातो. जो केकच्या पोटात मधोमध ठेवतात. केक कापण्याच्या आधी तो रोल बाहेर काढला जातो. आठवणींना उजाळा देण्यासाठी या केकचा पर्याय निवडला जातो.

फोटोरोलप्रमाणेच ‘बॉम्ब केक’ हाही लोकप्रिय प्रकार असल्याचं रत्नाकरने सांगितलं. या केकमध्ये बॉम्बसदृश एक मोठा साचा असतो. ज्याला चार पाकळय़ा असतात. या साच्यामध्ये मधोमध केक ठेवला जातो. केक कापण्याआधी हा बॉम्ब फोडला जातो, तेव्हा त्याच्या चार पाकळय़ांमध्ये असणारा आकर्षक केक सगळय़ांसमोर येतो. साखरपुडा, डोहाळे जेवण, लग्न समारंभात बनवले जाणारे विशेष थीम केकही ट्रेंडिंगमध्ये आहेत. या केकमध्ये खूप कष्ट आहेत. थीम केक्स बनविणं कुठल्याही संशोधनापेक्षा कमी नाही. नावाप्रमाणेच कोणती तरी एक थीम घेऊन हा केक तयार केला जातो. त्यासाठी कमीत कमी तीन दिवस लागतात. थीम केकच्या सजावटीसाठी फॉण्डण्ट वापरलं जातं. सारखेपासून विशिष्ट पद्धतीने बनविलेल्या आयसिंगचाच एक भाग असणाऱ्या फॉण्डण्ट आयसिंगला पूर्णपणे सुकण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. अशा प्रकारचे केक हे आकर्षक, नेत्रसुखद असले तरी चवीच्या बाबतीत ते फार लोकांना आवडत नसल्याने हळूहळू हा ट्रेण्ड कमी होऊ लागला असल्याचे त्याने सांगितले.

केक बनवणाऱ्या आर्टिस्टला कलेची आणि चवीची दोन्हीची जाण असावी लागते, ही जाणीव असणारे नवनवीन उत्तम पेस्ट्री शेफ तथा होमशेफ बाजारात मोठय़ा संख्येने असल्याने सध्या वैविध्यपूर्ण केक पाहायला मिळत आहेत. केक ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांच्या मागण्या कधी नवलाईच्या तर कधी तापदायक असतात, असं मत मुंबईतील ‘लादीदा डेझर्ट्स’चा पेस्ट्री शेफ अमोल शिरोडकरने व्यक्त केलं. ‘पूर्वीच्या काळी बेकरीत दिसणाऱ्या केकने हळूहळू स्वतंत्र केक शॉपची जागा घेतली. आता तर तो घरोघरी बनवला जातो. बाजारात रेडिमेड मिळणाऱ्या केकपासून हौशी गृहिणींच्या तव्यावर बेक केलेल्या केकपर्यंत प्रत्येकाला केक करून बघावासा वाटतो. काही वर्षांपूर्वी बेकरीत किंवा केक शॉपमधल्या भिंतींवर मोजकेच केकचे फोटो लावले जायचे. त्यातलाच एखादा आवडत्या कार्टून, सुपरहिरो किंवा डिझाईनचा केक मागवला जायचा. पण आजकाल ग्राहकांच्या काहीच्या काही मागण्या वाढल्या आहेत.

आधी पोगो, कार्टून नेटवर्कसारखी मर्यादित कार्टून चॅनेल्स असल्याने कार्टून केक्स बनवणं सुकर व्हायचं, पण आजकाल ओटीटीवर दिसणाऱ्या जगभरातील कार्टून वेबसीरिजमुळे अगणित कार्टून्स वाढले आहेत. आणि अशा हटके कार्टून केक्सची मागणी झपाटय़ाने वाढते आहे. बऱ्याचदा हे कार्टून आम्हालाही माहिती नसतात. आम्हाला आधी ती सीरिज पाहावी लागते. केकवरच्या कार्टूनच्या ड्रेसचा रंग आणि वाढदिवस असणाऱ्या मुलाच्या ड्रेसचा रंग मॅचिंग असावा अशीही ग्राहकांची अजब इच्छा असते, काही जण कलर थीम करतात. उदाहरणार्थ, निळा-पांढरा किंवा पांढरा-गुलाबी असेल तर कपडे, फुगे, गिफ्ट्सपासून केकही त्याच रंगाचा ऑर्डर केला जातो. काहींना एकाच केकमध्ये वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीच्या आवडीचं सगळं काही दाखवायचं असतं, त्यामुळे त्या केकची आकर्षकता निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकाला योग्य ते मार्गदर्शन करावं लागतं, असं अमोलने नमूद केलं. केकवरचा कार्टुन कोणत्या रंगसंगतीत हवा, फ्रुट केकमध्ये फळं कोणती असतील आणि कोणत्या बाजूला कोणते फळ असेल इतकी ग्राहकांची चिकित्सक वृत्ती वाढली आहे. अशा वेळी केक बनवण्याआधी मी स्वत: स्केच करतो व ते ग्राहकांना दाखवतो. त्यात योग्य ते बदल ग्राहक करतात. त्यामुळे काम सोपं होतं, असं अमोलने सांगितलं.

मऊपणा, गोडवा, क्रीमचा स्निग्धभाव या सगळय़ा रसायनातून केकचा तुकडा मुखात शिरल्यावर एक आनंदाचं गोड कारंजं जिभेवर थुईथुई करायला लागतं. या गोडव्यापासून प्राणीही दूर राहिलेले नाहीत. प्राण्यांचे वाढदिवस साजरे करतानाही खास त्यांच्यासाठी वेगळे केक तयार केले जातात. प्राण्यांसाठी वाढदिवसाचे केक तयार करणारी मुंबईतील ‘वूफी वूफ’ची मनस्वी सावंत म्हणते, कुत्रा किंवा मांजरीच्या वाढदिवसासाठी लागणारे केक हे इतर नेहमीच्या केकपेक्षा वेगळे असतात. या केकमध्ये बदामाचं पीठ, ओट्स हे घटक वापरले जातात. आकर्षक दिसणारे, वेगवेगळय़ा आकारातील हे केक खास कुत्रे किंवा मांजरांसाठी तयार केलेले असतात. व्हेज, नॉनव्हेज व व्हिगन या तिन्ही प्रकारांमध्ये हे केक तयार केले जातात. मोठ्मोठय़ा केकपेक्षा छोटे केक, डोनट, कप केक मागवण्याकडे ग्राहकांचा कल अधिक असतो. कप केकला आम्ही इथे पप केक म्हणतो. या केकमध्येही अनेक ट्रेण्ड येत-जात असतात. गणेशोत्सव काळात मोदकाचे केक, दिवाळीच्या काळात लाडूच्या आकारासारखे केक, नाताळात पांढरा- हिरवा- लाल-  या रंगातले केक ग्राहकांकडून अधिक मागवले जातात, असं ती सांगते.       

केक हा अष्टपैलू झाला आहे. हव्या त्या डिझाईनमध्ये, हव्या त्या चवीमध्ये, हवा तेवढा केक बनवून मिळतो आहे. त्यामुळे केकची सतत मागणी करणारे खवय्येही वाढत आहेत आणि त्यांना हवे तसे प्रभावशाली केक पेश करणारे शेफही उपलब्ध आहेत. त्यामुळे सेलिब्रेशनचं निमित्त कुठलंही असो.. केक तो बनता है!

More Stories onविवाViva
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cake birthday just for the celebration limited cake customers demands increases ysh
First published on: 16-12-2022 at 01:36 IST