scorecardresearch

आम्ही मराठीचे शिलेदार!

२७ तारखेला मातृभाषा दिन साजरा केला जाईल.. एखादा दिवस साजरा करणे खूप सोपं होत चालंय.. पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून काही प्रयत्न करतोय का? किंवा करायला हवेत तर कोणते? सांगतोय स्वरूप पंडित

२७ तारखेला मातृभाषा दिन साजरा केला जाईल.. एखादा दिवस साजरा करणे खूप सोपं होत चालंय.. पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून काही प्रयत्न करतोय का? किंवा करायला हवेत तर कोणते? सांगतोय स्वरूप पंडित
भारतात ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ अर्थात किमान समान कार्यक्रम ही संकल्पना सर्वपरिचित आहे. सरकार कोणतीही योजना आखत असते वेळी एक दिशादशर्क म्हणून या संकल्पनेचा उपयोग होतो. आर्थिकदृष्टय़ा मागास, शोषित-वंचित अशा घटकांना त्यांचे हक्काचे स्थान मिळावे अशी या कार्यक्रमामागील भूमिका असते. पण आपलेच संवेदनशून्य होत जाणारे मन सध्या हे जणू विसरत चालले आहे की, आपली भाषा- आपली मातृभाषा हीसुद्धा जागतिक भाषेच्या रेटय़ासमोर- प्रसारमाध्यमांच्या प्रभावाद्वारे तिच्या हक्कांपासून वंचित होते आहे. आपल्याच मातृभाषेपासून आपण दुरावत आहोत. भाषेच्या शुद्धतेला आपण पारखे होत आहोत. एकीकडे इंग्रजीसारख्या भाषेचा द्वेष तर करायचा नाहीच; किंबहुना त्याचे ज्ञानही मिळवायचे हे आव्हान आहेच.. त्याचबरोबरीने आपली भाषा समृद्ध करायची, तिचा वापर-प्रसार करायचा आणि तिचे चिरंतनत्व अबाधित राखायचे हेसुद्धा मोठे आव्हान आहे.
मला याच पाश्र्वभूमीवर महात्मा गांधीजी आठवतात. सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या क्रांतिकारकांबद्दल तत्कालीन भारतीय जनतेच्या मनात आदर होताच, पण त्या तुलनेत महात्मा गांधीजींबद्दल मनात असलेला आदर सक्रिय सहभागातून व्यक्तही होत होता. यामागील रहस्य कोणते असावे? तर उत्तर सोपे आहे. गांधीजींनी देशभक्तीची व्याख्या सोप्या सोप्या आणि सर्वाना सहज जमू शकतील अशा लहान लहान कृतींनी मांडली. त्यात चरख्यावरील सूतकताईचा समावेश होता, त्यात गोशाळा चालविणे होते, त्यात खादीचा वापर होता, प्रभात फेऱ्या काढणे होते, वंदे मातरम् म्हणणे होते.. अशा अनेक लहान लहान कृतींतून सामान्य माणसाला आपण देशासाठी काहीतरी करत असल्याची अभिमानास्पद जाणीव करून दिली जात होती. तत्कालीन बलाढय़ ब्रिटनच्या आव्हानासमोर गांधीजींच्या या कृती कार्यक्रमाने प्रतिआव्हान निर्माण केले.
मला आज हे आठवले. कारण आपणही आपल्या भाषेच्या समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांना विनम्रतापूर्वक आणि अन्य भाषांचा जराही द्वेष मनात येऊ न देता प्रतिआव्हाने निर्माण नाही का करू शकणार? आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. संपर्क-क्रांतीचे युग मानले जाते. अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशाच छोटय़ा छोटय़ा कृतींनी काहीच नाही का करू शकणार? भाषेच्या जाज्वल्य नाही तरी किमान मनस्वी अभिमानातून आपण किमान एखादी तरी कृती नाही का फुलवू शकणार? भाषेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना आपल्या परीने नाही का सहकार्य करू शकणार? मला वाटतं की हे फारसं अशक्य नाही. उलट या कृतींनी आपल्यालाच ‘अल्प योगदान’ दिल्याचे समाधान लाभू शकेल. हा ‘किमान भाषा वापर’ असा कार्यक्रम नसून उलट किमान समान कार्यक्रमाच्या धर्तीवर आणि महात्मा गांधीजींनी घालून दिलेल्या आदर्शांवर आधारित ‘भाषा संवर्धन आणि प्रसार कार्यक्रम’ आहे. काय आहेत या कृती?
आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात रोज किमान १० तरी ‘फोन कॉल’ हाताळतोच. दहाही वेळा आपण संभाषणाची सुरु वात ‘हॅलो..!’ अशी करतो. आपण आपल्या मातृभाषेतून ही सुरुवात केली तर?  म्हणजेच ‘नमस्कार!’ या शब्दाने आपण संवादास सुरु वात केली तर? त्यामुळे आपल्या भाषेबद्दलचे प्रेमही व्यक्त होईल शिवाय एखादी अनोळखी व्यक्ती, जी आपल्याशी थेट हिंदी अथवा इंग्रजीतून संवाद साधण्यास सुरुवात करते मात्र तिचीही मातृभाषा मराठीच असते अशी अधिक जवळकीने-मोकळेपणाने आणि मुख्य म्हणजे नेमक्या अभिव्यक्तीद्वारे आपल्याशी संवाद साधू शकेल.
आपण आपल्या ‘मोबाइल’वरून किमान १०-१५ तरी लघुसंदेश (एसएमएस) दररोज पाठवतो. ते सगळेच अर्थातच इंग्रजीतून असतात किंवा इंग्रजी लिपी आणि मराठी शब्द अशा पद्धतीने असतात. आपण दिवसभरात किमान दोन लघुसंदेश मराठीतून पाठवले तर? पुन्हा एकदा भाषेवरील प्रेमाबरोबरच माहिती तंत्रज्ञानात मातृभाषेचा केला जाणारा वापर आपल्याबरोबरच समोरच्यालाही समाधान देऊ शकेल. शिवाय आज कित्येकदा घरकाम करणाऱ्या व्यक्ती इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे मोबाइलचा परिपूर्ण वापर करीत नाहीत. अशांना मराठीतील लघुसंदेश पाठविले गेल्यास त्यांना आपण मूळ प्रवाहात आल्यासारखे वाटेल.
ल्ल जी बाब एसएमएसची तीच ई-मेलचीसुद्धा! आपल्याला सध्या सर्वच संकेतस्थळांद्वारे ‘फोनेटिक’ (उच्चारावरून शब्द) पद्धतीने अनेक भाषांत ई-मेल पाठविण्याची सुविधा आहे. ठरवून आपण दिवसभरात किमान एक ई-मेल मराठीतून नक्कीच करू शकतो.
आज आपल्याला सणांच्या सुट्टय़ा हव्याहव्याशा वाटतात. पण भारतीय महिने आणि दिनदर्शिका आपण विसरतो. इतकी की कित्येकदा ‘गुरुपौर्णिमे’च्या तिथीऐवजी आपल्याला ‘वट पौर्णिमे’ची तिथी आठवते. पण चैत्र, वैषाख, ज्येष्ठ.. असे महिने आणि त्या त्या महिन्यांत येणारे सण आपल्याला सांगता येतील का? नवरात्र म्हणजे आश्विन महिना हे किती जणांना माहिती असते? तेव्हा किमान ज्या सणांच्या आपल्याला राष्ट्रीय सुट्टय़ा असतात अशा सणांच्या तरी भारतीय दिनदर्शिकेची आपल्याला माहिती हवी आणि ते त्याच तिथीनुसार बोलता यायला हवेत.
आपण हल्ली सामान्यपणे महिन्याला किमान एकतरी चित्रपट पाहतोच.. मग तो कितीही ‘टुक्कार’ का असेना! अशा वेळी आपण आपल्या भाषेसाठीसुद्धा चित्रपट प्रेमातून काही करू शकत असू तर? वर्षांतून किमान दोन मराठी चित्रपट आणि दोन मराठी नाटके आपण नाही का पाहू शकणार? किंवा अगदी मित्र-मैत्रिणींसह जाऊन आपण नाही का मातृभाषेतील कलाकृतींचा आस्वाद घेऊ शकणार?
 आपण हल्ली सर्रास पुस्तके वाचतोच. अशा वेळी ठरवून वर्षांकाठी किमान दोन मराठी पुस्तके विकत घेऊन वाचणे ही कृतीसुद्धा अशीच सहज जमणारी आणि भाषेसाठी काही केल्याचा आनंद देणारी ठरू शकेल. त्यापुढे जाऊन वाचकांचा एखादा गट तयार केल्यास मराठी पुस्तक खरेदीवर काही विशेष सवलत मिळू शकेल का ते पाहता येऊ शकेल.
वाढदिवसाला, शुभकार्याला, अभिनंदन करताना भेटवस्तू देण्याची प्रथा आता चांगलीच रुजली आहे. अशा वेळी ही भेटवस्तू म्हणून सर्वोत्तम मराठी पुस्तके/ काव्यसंग्रह/ नाटय़कृती यांचा आपण विचार करायला हवा. एक म्हणजे त्यासाठी आपण स्वत: ती कलाकृती वाचलेली असेल म्हणजे आपोआप वाचक म्हणून आपले भाषेसाठी योगदान होईल आणि शिवाय इतरांना ती वाचायला दिल्याने भाषाप्रसारास- भाषेतील पुस्तक विक्रीस चालना देता येईल.
आता मात्र थोडी अवघड कृती सुचवितो आहे. आपण राष्ट्रीयकृत बँकांमध्ये हे पाहिले असेल की तिथे दररोज एक नवीन बँकेच्या पारिभाषिक सूचीतील हिंदी शब्द लिहिलेला असतो. अपेक्षा ही असते की त्यातून प्रादेशिक शब्दांच्या वापरास चालना मिळावी. तद्वतच आपणही मराठीतील दररोज किमान एक तरी नवीन शब्द त्याच्या सर्व छटांसहित नव्याने समजून घेतला पाहिजे. यामुळे कालबाह्य़ होणाऱ्या कित्येक शब्दांना (म्हणजे प्रत्येकी किमान ३६५ प्रतिवर्षी) प्रवाहात आणता येईल.
आणि आता शेवटचे तीन :
बँका, विमा कंपन्या, चल ध्वनी कंपन्या यांच्याकडे मराठीतून माहिती- सूचना पुस्तिका- प्रपत्रे (फॉम्र्स) इत्यादी देण्याचा आग्रह करणे.
आपली स्वाक्षरी शक्य असल्यास मराठीतून करणे.
आणि हा भाषा प्रसार कार्यक्रम प्रतिमहिना किमान ५ जणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे.
आजची तरुण पिढी, त्यांची ‘सेलिब्रेट’ करण्याची वृत्ती, त्यांचे माहिती-तंत्रज्ञानावरील प्रेम, करमणूकप्रधान समाजरचना, दिन-विशेष असे बिंदू लक्षात घेऊन हा कार्यक्रम मी तयार केला आहे. त्यात जेवढी भर घालता येईल अर्थात जेवढी कृतिशील भर घालता येईल तेवढे उत्तमच!
आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत..!

मराठीतील सर्व लेख ( Lekhaa ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Celebration of marathi bhasha din on 27 february and use of marathi language

ताज्या बातम्या