नॉस्टॅल्जिक व्हायला वयाचं बंधन नसतं. आजचा जमाना हा रेट्रो काळ पुन्हा फॅशनमध्ये खेचून आणण्याचा आहे. एखादी गोष्ट डिलीट केली तरी ‘हिस्टरी’ आणि ‘बॅकअप’ असतोच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आमच्या काळी..’ पासून सुरू होणारी वाक्य सध्या तरुण मुलांच्या तोंडीही सर्रास येऊ लागली आहेत. लाइफ का पेस ही इतना है बॉस! आमच्या काळी असं होतं.. ही भाषा साधारण आजी-आजोबांच्याच तोंडी असायची पूर्वी. पूर्वी म्हणजे अगदी अलीकडच्या १५ -२० वर्षांपूर्वी ज्या गोष्टी सगळ्यांच्या सवयीच्या होत्या, हाती-तोंडी होत्या, त्या अचानक गायबच झाल्यात. उन्हाळी सुट्टीत त्या गायब झालेल्या गोष्टींचा उगाच आठव येतोय. ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ या विचारांच्या आधुनिक मुलांना अचानक जुन्या गोष्टींची आठवण येऊन नॉस्टॅलजिक व्हायला होतंय.
आजचा जमाना हा रेट्रो काळ पुन्हा फॅशनमध्ये खेचून आणण्याचा आहे. एखादी गोष्ट डिलीट केली तरी ‘हिस्टरी’ आणि ‘बॅकअप’ हा असतोच. गरज भासेल तेव्हा हिस्टरी शोधून काढण्यात मुलं पटाईत! भर ट्रॅफिकमध्ये फुगेवाला दिसला की त्याच्याकडून तितक्याच निरागसतेने रंगीबेरंगी फुगे घेऊन ते मिरवले की, आजचा आपला ‘सो कॉल्ड’ तरुण लगेच लहान होतो. फक्त फुगे विकत घेणारं पाकीट स्वत:चं असतं एवढीच काय ती खंत! एकदा का नॉस्टॅल्जियाचा दंश झाला की, पूर्वीचं सगळंच गोड लागतं. मग लहानपणीचा आवडता लॉलिपॉपही शोधावासा वाटतो. खूप शोधून तो मिळाला की, हजारो रुपयांची परदेशी चॉकलेट्सही बेचव वाटतात. जे मिळत नाही त्याचा खूप शोध घेतला जातो. अगदी नव्वदच्या दशकापर्यंतच्या मुलांना तो शाळेबाहेर एका छोटय़ा दुकानात मिळणारा रंगीबेरंगी पेप्सीकोला माहीत असेल. प्लॅस्टिकच्या पिशवीतला तो ऑरेंज कोला एक रुपयापासून मिळायचा आणि दुधाचा मोठा कोला दोन रुपये. बाजारातून एकाएकी गायबच झाला तो! पेप्सीकोला लपवून, चोरून खाल्लय़ाने पालकांचा ओरडाही खावा लागलेला अजूनही स्वच्छ आठवतो. आता तो कोलाही मिळत नाही आणि तसा ओरडाही!

उन्हाळी सुट्टी लागली की कॉलनीमधले सगळे मिळून खेळणारे खेळही आता विस्मरणातच गेलेत. ‘डोंगर का पाणी’, ‘विषामृत’, ‘डोंगराला आग लागली’ किंवा ‘मामाचं पत्र हरवलं’ हे सगळे खेळ हमखास खेळले जायचे. हल्ली पाणी काय किंवा डोंगराला आग काय, व्हिज्युअल इफेक्ट्सने इतके उत्तम कॉम्प्युटरवर दाखवतात की प्रत्यक्षात कोण आणि का खेळायला जाईल? आपण आपले उगीच सपाट जमिनीला पाणी आणि ओबडधोबड जमिनीला डोंगर म्हणवून कल्पनाशक्ती खर्ची घालायचो. क्रिकेट हाच काय तो खेळाचा अविभाज्य भाग राहिलाय. त्यातही पूर्वी टॉससाठी मार्बल कपचीचा तुकडा शोधावा लागायचा. खिशात टॉस करायला नाणी नसली की मातीतच शोधावं लागतं. चुकूनमाकून खिशात नाणी असलीच तर कोण खेळत बसेल? एवढय़ा उन्हाळ्यात गारेगार बर्फाचा गोळा म्हणजे सुखच! हल्ली तो गोळाही हातगाडीवरून थेट मॉलमध्ये जाऊन स्थिरावलाय. गाडीतून मॉलपर्यंतचा त्याचा हा प्रवास आपल्याला मात्र फारच महागडा ठरतो. पण नॉस्टॅल्जिया दूर करण्यासाठी आपण तो जाऊन खातोही. तीच गोष्ट त्या गुलाबी कापसाची! लोक त्याला म्हातारीचे केस, कापूस, कॅण्डी फ्लॉस काय काय म्हणतात!
नॉस्टॅल्जियाचा झटका दूर करण्यासाठी आपण वाटलंच तर लहानपणीचे खेळ परत खेळू शकतो. चिप्समध्ये अजूनही एखादं गिफ्ट सापडलं की लहानपणी साठवलेली गिफ्ट्स आठवतात. केवळ सचिन एमआरएफची बॅट वापरतो म्हणून हट्टानं आई-बाबांकडून मागून घेतलेली तीच बॅट एखाद्या कोपऱ्यात पडलेली असते. त्याच आठवणी पुन्हा ताज्यातवान्या करतात.
या आठवणींच्या गोष्टींचं पुस्तक काही संपलं नाहीये, फक्त त्यांची जागा काही मॉडिफाइड गोष्टींनी घेतलीये..किंवा काही गोष्टीच बदलल्या आहेत. रस्त्यावरचा ‘बरफ का गोला’ मॉलमध्ये जाऊन ‘आइस बॉल’ झालाय इतकंच! भोवऱ्याचं बेब्लेड झालं म्हणून ते फिरायचं थांबलं नाही. आपण पोळीशी भाजी खात नाही म्हणून आईने पोळीला सॉस किंवा जॅम लावून ती रोल करून त्यात भाजी घालून आपल्याला खायला घातली आणि आता त्याची फँकी झाली..फरक काहीच नाही.
काहीही बदललेलं नाहीये, फक्त ते चकचकीत झालंय. आणि सुदैवाने वा दुर्दैवाने, ‘ते दिवस आता कुठे..’ असं म्हणायची वेळ आपल्यावर फारच लवकर आली इतकंच!

More Stories onविवाViva
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Childhood memories and games
First published on: 13-05-2016 at 01:25 IST