– विनय जोशी
तुमचं कधी असं होतं का ? फावल्या वेळात वेबसीरिज पाहायचं ठरवलं, मोबाइल हातात घेतला… पण आधीच प्रश्न पडला – नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम की हॉटस्टार? यातून एक निवडायलाच वेळ गेला. शेवटी नेटफ्लिक्स उघडलं, मग पुढचा प्रश्न, हे बघावं की ते? यात नुसतंच स्क्रोलिंग होत गेलं…! आणि २० मिनिटांनी लक्षात आलं काय बघावं याचा विचार करण्यातच वेळ गेला आहे, बघितलं तर काहीच नाही. भूक लागली आहे, झोमॅटोवरून काहीतरी मागवायचं आहे. चायनीजपासून सुरू झालेली शोधयात्रा बिर्याणी, बर्गर, सँडविच अशा वळणांवरून जात इटालियनपर्यंत आली तरी सुरूच आहे. पोटातले कावळे ओरडून थकले, पण काय मागवावं हे मात्र अजून ठरलंच नाही. साधा आईस्क्रीम खाण्याचा मुद्दा. पण कुठला ब्रँड आणि त्याचं कुठलं फ्लेवर याच्या विचारानेच डोकं तापतं आहे. एखाद्या वेळी निर्णय घेतला तरी अजून चांगला पर्याय मिळाला असता ही चुटपुट मनात कायम राहते.
आजच्या डिजिटल जीवनात साध्याशा गोष्टींसाठीही निर्णय न घेता येणं हे आता सामान्य होत चाललं आहे. ‘यापेक्षा अजून चांगला पर्याय असेल’ या विचारात कुठलाही निर्णय घेताना अडखळणं, किंवा चक्क तो निर्णय पुढे ढकलणं हे निर्णयपंगुत्व (डिसिजन पॅरालिसिस) म्हणजे FOBO -Fear of Better Options. साध्या भाषेत सांगायचं तर, फोबो म्हणजे एखादी गोष्ट निवडण्याआधी ‘आणखी चांगलं काही मिळेल का?’ या शंकेने मन गोंधळून जाणं. यात पर्यायांची भरमसाट उपलब्धता, निर्णय पुढे ढकलण्याची सवय आणि ‘परफेक्ट’ मिळवायचा हट्ट… सगळं आलंच.
तुम्ही एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्याआधी खूप वेळ रिसर्च करत राहता का? तुमच्याकडे एक चांगला पर्याय असतानाही, अजून चांगला पर्याय सापडण्याची वाट पाहता का? अगदी रेस्टॉरंट, फिल्म, ड्रेससारखे लहानसहान निर्णय घेण्यासाठीही तुम्हाला फार वेळ लागतो का? निर्णय घेतल्यानंतरही ‘काही चुकलं तर?’ अशी अस्वस्थता वाटते का? निर्णय घेताना तुमच्या गरजा आणि आवडीपेक्षा इतरांच्या अपेक्षांना जास्त महत्त्व देता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर ‘हो’ अशी असतील, तर तुमच्या मनात फोबोचा किडा वळवळू लागला आहे असं म्हणता येईल.
फोबो हा फोमोचा जुळा भाऊच. गंमत म्हणजे, या दोघांचे तीर्थरूप पण एकच! अमेरिकन उद्योजक, लेखक पॅट्रिक जेम्स मॅकगिनिस यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिकत असताना ‘काय मिस होईल’ (FOMO) आणि ‘अजून चांगलं काय मिळेल’ (FOBO) यावर चर्चा करता असताना हे दोन शब्द जन्माला घातले. आणि बघता बघता जगप्रसिद्ध झाले. अनेक अभ्यासकांनी या विषयाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की फोबो माणसाच्या मनात तसा आधीपासून रेंगाळत होता, पण डिजिटल क्रांतीने त्याला टर्बो इंजिन बसवलं! आपण लहान होतो तेव्हा निर्णय घेणं किती सोपं होतं. खाऊ म्हणून बिस्कीट किंवा गोळ्या. वाढदिवसाचा मेनू म्हणजे केक आणि समोसा. आईस्क्रीम व्हॅनिला किंवा मँगो. सुट्यात कुठे या प्रश्नाचं उत्तर – मामाकडे किंवा काकांकडे. टीव्हीवर एकच चॅनेल सगळ्यांनी बघायचं. दिवाळीच्या खरेदीला सगळ्यांनी एकसाथ जाऊन एका दिवसात सगळं घेऊन मोकळं व्हायचं. शॉपिंग पण झटपटच, कारण पर्याय कमी आणि आनंद जास्त!
आता मात्र उलट झालंय. खाण्याचे हजार पदार्थ, त्यांचे पन्नास ब्रँड, शंभर फ्लेवर्स, प्रत्येकावर पाचशे रिव्ह्यूज! व्हेकेशनचे दिवस कमी आणि डेस्टिनेशन्स फार. शॉपिंगचे तर पर्याय विचारायलाच नको. करमणुकीच्या बाबतीतही टीव्हीवरचे सतराशे साठ चॅनेल्स, तेवढेच ओटीटी आणि त्यांच्यावरील वेबसीरिजचा सुळसुळाट. तरीही ‘मुन्नाभाई’मधली विद्या बालन म्हणते तसं १०८ है चॅनेल फिरभी दिल बहेलते क्यूं नही… अशी गत. याबाबत पॅट्रिक मॅकगिनिस म्हणतात, आपण जसजसे मोठे होत जातो तसतसं निर्णय घेणं अवघड होत जातं. कारण आपल्या निर्णयाला अनेक फिल्टर्समधून जावं लागतं. ‘गेल्यावेळी या ब्रँडचे शूज घेतले आणि दोन दिवसांत फाटले’ असा एखादा अनुभव असतो. ‘अमुक हॉटेलची बिर्याणी भारी असते’ असा प्रभाव तर कधी भारी लॅपटॉप घ्यायची अपेक्षा, कधी दोस्तमंडळीत भाव खाऊन जावं अशी सुप्त इच्छा असते. या सगळ्या फिल्टर्सच्या गाळणीतून विचारांचं पाणी जाताना इतकं गाळलं जातं, की निर्णयाचं भांडं रिकामंच राहतं.
अर्थात अनेक पर्यायांमधून विचारपूर्वक उत्तम पर्याय निवडणे हा खरंतर मानवी स्वभाव आहे. पॅट्रिक यांच्या मते ही आपली आदिम प्रवृत्ती आहे. लाखो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना जगण्यासाठी आणि तगण्यासाठी उत्तम पर्याय शोधणं महत्त्वाचं होतं. शिकार करताना सर्वात पौष्टिक आणि सहजसाध्य अन्न मिळवणं, निवाऱ्यासाठी सर्वात सुरक्षित जागा शोधणं अशा अनेक निर्णयांमुळे ते टिकाव धरू शकले. आज आपलं जगणं धोक्यात नसलं, तरी मेंदूची ही सर्वात चांगलं मिळवायची सवय अजूनही काम करते आहे.
आपल्या मेंदूमध्ये निर्णय घेण्याचं मोठं काम ‘प्रीफ्रंटल कॉर्टेक्स’ हा भाग, इतर भागांच्या मदतीने करतो. ‘अमिग्डाला’ (Amygdala) हा भाग निर्णय प्रक्रियेला भावना आणि भीतीची फोडणी देतो. ‘चुकलो तर काय?’ अशी काळजी याच ठिकाणी जन्म घेते. ‘हिप्पोकॅम्पस’ (Hippocampus) हा भाग आपल्या पूर्वीच्या अनुभवांचं आणि आठवणींचं गाठोडं उलगडतो, ज्यातून निर्णयप्रक्रियेला दिशा मिळते. ‘बेसल गँगलिया’ (Basal Ganglia) आपल्याला रोजचे सवयीचे निर्णय पटकन घ्यायला मदत करतो. उदाहरणार्थ, जर रोज सकाळी फक्कड चहा प्यायची सवय असेल, तर रोज उठल्यावर ‘चहा की कॉफी?’ किंवा ‘किती चमचे साखर?’ असे फुटकळ प्रश्न मुळीच पडत नाहीत. ‘इन्सुला’ (Insula) म्हणजे आपला गट फिलिंग सेन्सर! अचानक ‘देखा जो तुझे यार, दिल में बजी गिटार’ अशी भावना मनात येऊन आपण निर्णय घेतो. लॉजिक गेलं खड्ड्यात. तर्क, सवयी, भावना आणि कधी केवळ आतून वाटणं… या सगळ्यांचा मेळ घालून, मेंदू निर्णय घेत असतो.
आज पिवळा टीशर्ट घालावा की लाल? असा सोपा प्रश्न असो की अमुक कॉलेज निवडावं की तमुक? ते शिक्षण, लग्न, नोकरी, घरखरेदी अशा आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांवर आपण सर्व पर्यायांचा विचार करून फायद्याचा, सर्वोत्तम पर्याय निवडतो. हे अगदीच स्वाभाविक असलं तरी लहानसहान गोष्टींमध्ये आपण अजून चांगला पर्याय असेल या अपेक्षेत अडकतो किंवा बऱ्याच वेळा निर्णय घेणंच टाळतो, तेव्हा मात्र ही धोक्याची घंटा ठरते. आणि यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आजचं डिजिटल जग.
आजच्या डिजिटल युगात पर्यायांचा महासागर उपलब्ध आहे. नेटफ्लिक्सवर हजारो सिनेमे, ॲमेझॉनवर लाखो प्रॉडक्ट्स, झोमॅटोवर शेकडो डिशेस, इतक्यातून एकाची निवड करायला प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला वेळ लागतो. हेडफोन घेण्यासाठी तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा अनेक पोर्टलवर एकाच वेळी ५० प्रॉडक्ट बघता. मेंदूवर एकाचवेळी त्यांचे फीचर्स, रिव्ह्यू यांची माहिती येऊन आदळते आहे. दर सेकंदांनी आदळणाऱ्या इतक्या माहितीवर प्रक्रिया करून, त्यानुसार निर्णय घ्यायला प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला वेळच मिळत नाही. त्यात सोशल मीडियामुळे आलेलं प्रेशरचं भूत सतत मानगुटीवर बसलेलं. आपण घेतलेला हेडफोन सेल्फी घेऊन नंतर स्टेट्स टाकायचं असतं. त्यामुळे आपला निर्णय जगाला कळणार असतो. परिणामी तो सर्वोत्तमच हवा. अमिग्डाला लगेच चुकीचा निर्णय घेतला तर? ही भीती वाढवतो. तुमच्या मागच्या खरेदीच्या अनुभवातून हिप्पोकॅम्पने पिट्रोनचे हेडफोन भारी असतात, असं सांगितलं खरं. पण सगळ्या ब्रँडचे हेडफोन कुठे आपण वापरून पाहिले आहेत. पिट्रोनच्या आपण घेतलेल्या मॉडेलपेक्षा ५० नवे मॉडेल्स समोर आहेत. बापरे निर्णय घेणं अजूनच अवघड. त्यात या प्लॅटफॉर्मचे अल्गोरिदम यापेक्षा ते भारी आहे असं सुचवतात. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सततचा अपडेट-कल्चर त्यामुळे डोकं वर काढतो: ‘आत्ता घेतलं, तर उद्या नवं भारी मॉडेल येईल’ – ही भावना सतत बोचत राहते. परिणामी, हेडफोन घेण्यासाठी तुम्ही २ तास सगळे पोर्टल्स धुंडाळूनही ‘Buy’चं बटन काही केल्या दाबत नाही!
फोबोमुळे येणारं हे निर्णयपंगुत्व शॉपिंग किंवा ओटीटीपुरतं मर्यादित राहात नाही. याचे काही परिणाम हळूहळू रोजच्या आयुष्यात दिसू लागतात. गरज असतानाही निर्णय न घेतल्याने नुकसान होण्याची शक्यता असते. सुट्ट्यांचा दिवस येऊन ठेपला तरी चांगली डील मिळेल या नादात आधी न केलेले बुकिंग, यंदा कर्तव्य असतानाही अजून चांगला पर्याय असू शकेल या आशेवर पुढे सरकणारं लग्नाचं वय, ‘बेटर जॉब’च्या शोधात हातातल्या उत्तम संधी गमावल्या जातात. सर्वोत्तम पर्यायाच्या शोधात वाया जाणारा वेळ आणि ऊर्जा हाही एक मुद्दा आहे. योग्य पर्याय निवडण्यात चूक झाली की काय? या भीतीमुळे मन अस्वस्थ राहतं. नातेसंबंधांच्या बाबतीतही असे परिणाम दिसू शकतात. नात्यात कमिटमेंट टाळल्या जाऊ लागतात. अजून काही ‘बेटर’ मिळतंय का बघूया या नादात खरी भावनिक गुंतवणूक होत नाही. अशी सतत पर्याय पाहणारी व्यक्ती इतरांना विश्वसनीय वाटत नाही.
हे असं प्रत्येकाचं होतं असं नक्कीच नाही, पण डिजिटल जगात वावरणाऱ्या बहुतांश लोकांच्या मनाच्या एका कोपऱ्यात सर्वोत्तम मिळवण्याची ओढ असते. काहींसाठी ती भावना हळूहळू जीवनाच्या मोठ्या निर्णायक क्षणांवर परिणाम करू लागते. कुठलाही निर्णय मग तो डीनरसाठी हॉटेल ठरवण्याचा असो, की नवीन कार घेण्याचा… त्यासाठी एक वेळमर्यादा ठरवणं गरजेचं असतं. ‘मला ५ मिनिटांत झोमॅटोवरून ऑर्डर करायचंच आहे’ अशी एखादी स्वयंसूचना स्वतःला देता येते. निर्णय घेताना पर्याय कमी ठेवणं ही दुसरी महत्त्वाची गोष्ट. त्यासाठी आपली गरज, आवड, बजेट यांचे आधीच निकष लावता येतील. उदा. मोबाइल घ्यायचा असेल, तर ‘२०,००० च्या बजेटमध्ये चांगला कॅमेरा हवा’ अशा काही प्राथमिक निकषांनुसार पर्याय फिल्टर करता येतात. त्यामुळे उगाच इतर अनेक पर्यायांकडे लक्ष जात नाही. सर्व शक्यता तपासण्याऐवजी फक्त ३-५ पर्यायांची तुलना सोपी ठरते. नेटफ्लिक्सवर काही बघायच्या आधीच फक्त ३ चित्रपट शॉर्टलिस्ट केले, तर त्यातून एक निवडणं खूपच सोपं जातं. एखादा निर्णय घेण्याआधी पुरेसा रिसर्च झाला असेल, तर उपलब्ध पर्यायांपैकी एका निवडीवर आपल्या अंतरीच्या आवाजावर विश्वास ठेवून ठामपणे निर्णय घ्यायला हवा. उदा. ट्रिपसाठी दोन हॉटेल्स शॉर्टलिस्ट झाली असतील, तर पुन्हा विचार न करता त्यातलं एक ठरवून मोकळं व्हावं. एकदा निर्णय घेतल्यावर मात्र इतर नवीन पर्याय, रिव्ह्यूज, सल्ले यांच्याकडे पाहणं थांबवणं खूपच महत्त्वाचं.
मी निवडलेला पर्याय चुकला तर काय असं आभाळ कोसळणार आहे हे स्वत:ला विचारावं. अमुक हॉटेलचा तमुक पदार्थ मागवला पण खास नव्हता. पुढच्यावेळी दुसरं मागवू. पण त्यासाठी भुकेल्या पोटी झोमॅटो का स्क्रोल करत बसावं? नेटफ्लिक्सवरची वेबसिरीज पूर्ण पाहून कळलं, शेवट सुमार आहे. ओके काय पाहावं यात वेळ घालवण्यापेक्षा निदान हे बरं. फोबोच्या मुळाशी आहे-पर्यायांचा विरोधाभास (Paradox of Choice). या संकल्पनेविषयी अमेरिकन मानसशास्त्रज्ञ बॅरी श्वार्ट्झ म्हणतात, जास्त पर्याय असणं हे आपल्या स्वातंत्र्याचं आणि समाधानी होण्याचं लक्षण वाटतं, पण प्रत्यक्षात ते आपली निर्णयक्षमता कमी करतं, गोंधळ वाढवतं आणि शेवटी असमाधानच निर्माण करतं. त्यांच्या मते पर्यायांच्या महासागरात मॅक्सिमायझर्स (सर्वोत्तम पर्याय शोधणारे) डुबत राहतात आणि सॅटिसफायझर्स (पुरेसे चांगले पर्याय स्वीकारणारे) मात्र निर्णयाचा मोती घेऊन सुखी होतात. आपण कोण व्हायचं? हे आपल्याला ठरवायला हवं.