वैष्णवी वैद्य मराठे

पावसाळय़ाची चाहूल लागताच सगळय़ांचे ठेवणीतले रेनकोट आणि छत्र्या बाहेर येतात. छत्री घेणे हा प्रत्येकाचाच अगदी लहानपणापासून आवडीचा आणि आकर्षणाचा विषय असेल. दरवर्षी पावसाळय़ात नवीन छत्री घेणे हा जणू एक रिवाजच आहे. छत्री कितीही नवीन असली, कमी वापरली असली तरी दर पावसाळय़ाला नवीन छत्री घरात आली पाहिजे.

Pohe Kurdai Recipe in Marathi News Valvan Recipes In Marathi
ना गॅस पेटवायचा ना पीठ शिजवायचे; सोप्या पद्धतीने कमी वेळात बनवा “पोहा कुरडई”, ही घ्या सोपी रेसिपी
fruits for diabetes patients in summer
रक्तातील साखर नियंत्रित ठेवेल ‘हे’ फळ! मधुमेहींनी उन्हाळ्यात आवर्जून खावे ‘जाम’; लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला….
heart health in danger in summer
Heart Attack In Summer : हृदयाचे आरोग्य जपा! उन्हाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!

फॅशन ट्रेण्ड कुठेच मागे राहिलेला नाही. आता छत्र्यांमध्येही अनेक वेगवेगळय़ा फॅशन येऊ लागल्या आहेत. छत्री गरजेपुरती सोय असली तरी तरुणाईला प्रत्येक गोष्टींमध्ये नावीन्य हवेच असते. फार आकर्षक अशा विविध प्रकारच्या रंगीबेरंगी छत्र्या मार्केटमध्ये दिसू लागल्या आहेत. फॅशन हा एक मुद्दा झाला, पण छत्री ही बळकट आणि वादळी पावसात टिकणारीच हवी. या दोन्हीचा समतोल साधूनही आधुनिक डिझाईनच्या छत्र्या मार्केटमध्ये कशा ट्रेण्ड होत आहेत हे बघूया.

फ्रिल बॉर्डर अम्ब्रेला

फ्रिल बॉर्डर छत्री तरुण मुलींमध्ये आवडीचा प्रकार बनला आहे. या छत्रीच्या काठावर सजावटीचे फ्रिल किंवा रफल असते. फ्रिल बॉर्डर ही छत्रीला अतिशय स्टायलिश बनवते. छत्रीच्या रंगापेक्षा साधारण कॉन्ट्रास्ट रंगाचे फ्रिल काठाला असते त्यामुळे ही छत्री अधिक खुलून दिसते. अशा प्रकारची छत्री शक्यतो फोरफोल्ड किंवा छोटय़ा आकारातच येते. फ्रिल बॉर्डरच्याछत्र्या रंगीबेरंगी पिंट्र्समध्ये येतात. फ्रिलमध्येही अनेक डिझाइन आणि प्रकार असतात. काही छत्र्यांना सिंगल छोटी फ्रिल असते आणि काहींना जाड, मोठी फ्रिलसुद्धा असू शकते. ब्रॅण्ड प्रमाणे फ्रिल छत्र्यांची किंमत बदलू शकते, पण साधारण ३००-७०० रुपये दरात या छत्र्या मिळतात.

सी शेप हॅण्डल अम्ब्रेला

या प्रकारच्या छत्र्या सगळय़ात आधुनिक प्रकार आहे. या छत्र्यांना रिव्हर्सिबल छत्र्यासुद्धा म्हणतात. म्हणजेच छत्रीची वरची आणि खालची बाजू दोन्ही आपल्याला उपयोगाच्या असतात. अशा छत्र्यांची एक बाजू पिंट्रेड किंवा डिझाइनची असते आणि दुसरी प्लेन असते. तुमच्या आवडीनुसार कुठलीही बाजू तुम्ही वापरू शकता. याचे हॅण्डल असे सी शेपचे असते त्याने तुम्हाला छत्री धरायला चांगली ग्रीप मिळते. ही छत्रीसुद्धा डबल लेअर फोल्डिंगमध्ये मिळते. जांभळा, निळा व अनेक सुंदर पिंट्र्समध्ये या छत्र्या उपलब्ध आहेत. ही छत्री साधारण ५००-६०० रुपये दरात उपलब्ध आहे.

बॉटल अम्ब्रेला

हा प्रकार फार अनोखा आणि तरुणांच्या आवडीचा प्रकार आहे. या छत्र्यासुद्धा साधारण फोरफोल्ड प्रकारात येतात. याचे कव्हर म्हणजे चक्क एक बाटली असते. आपल्या नेहमीच्या पाण्याच्या बाटलीसारखी ही छत्रीची बाटली असते. या प्रकारातही अनेक रंग उपलब्ध आहेत. निळा, पिवळा, केशरी, काळा हे रंग यात ट्रेण्डी आहेत. इथेही तुम्हाला आतल्या छत्र्या प्लेन, सिंगल रंगाच्या मिळतील, कव्हरमध्ये मात्र नावीन्य आहे. बाहेरच्या बाटलीचा जो रंग असेल तोच आतल्या छत्रीचा रंग असतो. या छत्र्या डबल लेअर फोल्डिंगच्या असतात. कॅरी करायला अतिशय आकर्षक आणि हलक्या तसेच कुठल्याही कपडय़ावर सूट होणाऱ्या असतात. बॉटल अम्ब्रेलासुद्धा ४००-५०० रुपये दरात मिळते.

बबल अम्ब्रेला

बबल अम्ब्रेला हासुद्धा बऱ्यापैकी आधुनिक प्रकार आहे. याला बबल अम्ब्रेला म्हणतात, कारण याचा आकार इतर छत्र्यांपेक्षा जरा वेगळा असतो. याचा आकार गोलाकार किंवा एखाद्या डोम शेपसारखा असतो आणि ही पूर्ण पारदर्शक छत्री असते ज्यामुळे ती एखाद्या बबलसारखी दिसते. ही वादळी पावसात जास्त उपयोगी असते, प्लास्टिक किंवा ढश्उ पासून ही छत्री बनवलेली असते. अशा छत्र्या जरी पारदर्शक असल्या तरी या मध्येही आता सुबक अशा पिंट्र्स उपलब्ध आहेत. पिंक फ्लॅमिंगो, पोलका डॉट पिंट्र, लव्हेंडर पिंट्र या स्टाईल सध्या बबल अम्ब्रेलामध्ये ट्रेण्डी आहेत. या छत्रीची किंमत ब्रॅण्डप्रमाणे बदलते. जास्त ट्रेण्डी आणि वेगळय़ा प्रकारची असल्याने इतर छत्र्यांपेक्षा बबल अम्ब्रेला थोडी महाग असते.

कॅप्सूल छत्री

फोरफोल्डची छोटीशी घडी होणारी छत्री हा फार नवीन प्रकार नाही. अगदी पूर्वापार मोठय़ा छत्र्या व अशा फोल्ड करून बॅगेत भरता येणाऱ्या या छोटय़ा छत्र्या हे प्रकार आपल्याला माहिती आहेत, पण यामध्येही आता आकर्षक प्रकार बाजारात दिसत आहेत. पूर्वी अशा छत्र्यांना साधे प्लास्टिकच्या पिशवीसारखे कव्हर असायचे. आता सुंदर असे दोन रंगी कव्हर असते जेणेकरून ही छत्री कव्हरमध्ये ठेवल्यावर कॅप्सूलच्या गोळीसारखी दिसेल. काहीजण फक्त पावसात नाही तर उन्हातही छत्रीचा वापर करतात. अशा वेळी ऊन पावसापासून छत्री कव्हर करण्यासाठी अशी कॅप्सूल छत्री उपयोगात आणली जाते. हातात किंवा पर्समध्ये ठेवायला, कॅरी करायला ही छत्री अगदी ट्रेण्डी दिसते. कॅप्सूल छत्रीच्या कव्हरमध्ये एक रंग कायम पांढरा असतो व दुसऱ्या रंगामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा रंग निवडू शकता. सध्या या पॅटर्नमध्ये लाल, स्काय ब्लु, गुलाबी, फेंट हिरवा असे रंग ट्रेण्डी आहेत. या छत्र्या हातात धरायलाही फार हलक्या असतात. या प्रकारात मुळात कव्हर आणि पॅटर्नचे आकर्षण आहे. कव्हरच्या आतली छत्री ही प्लेन, एकाच रंगाची असते. अॅमेझॉनसारख्या साईट्सवर किंवा कुठल्याही दुकानात तुम्हाला ही छत्री ४०० – ५०० रुपये दरात मिळते.

छत्र्यांबद्दल पडणारे नेहमीचे प्रश्न

चांगली छत्री कशी निवडावी?

छत्री घेताना साईझ आणि मटेरियल या दोन गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. आपण जी छत्री घेतोय ती निदान मोठय़ा पावसात टिकणारी, उन्हात वापरता येणारी आणि दीर्घकाळ टिकणारी हवी. स्टाईलसोबत गरज आणि वापर याचा विचार करून छत्री घ्यावी. तसेच पावसात प्रवास करणे अवघड असते, ऑफिसला जात येताना आपल्याकडे इतर बरेच सामान असते त्यामुळे पोर्टेबल आणि आकाराने योग्य अशी छत्री घेतली तर कमीतकमी त्रास होतो.

छत्री ऑनलाइन घ्यावी की दुकानात?

हा खरंतर ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे, परंतु छत्री घेताना कोणत्या गोष्टी बघाव्यात यानुसार ती कुठे घ्यायची हे तुम्ही ठरवू शकता. सगळय़ात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंमत. साधारण ३००-५००/६०० दरात छत्री घेणं योग्य आहे. सध्या नवनवीन ट्रेण्डमुळे कमीतकमी एवढी किंमत असतेच. मटेरियल शक्यतो पॉलिस्टर किंवा मुसळधार पावसात टिकणारे कुठलेही मटेरियल असावे. अशा महत्त्वाच्या गोष्टी बघून तुम्हाला योग्य ती छत्री जिथे मिळेल तिथे तुम्ही घेऊ शकता.

पावसाळी आणि उन्हाळी छत्र्या वेगवेगळय़ा असतात का?

नाही. छत्री ही तेवढय़ा काळापुरती गरज आहे त्यामुळे ट्रेण्ड किंवा रंगाचा चॉईस सोडून फार पैसे आणि वेळ यात खर्ची करू नये. आजकाल UV- rays युक्त छत्र्या वगैरे प्रकार उपलब्ध आहेत, पण आपल्या साध्या रोजच्या वापरातल्या छत्र्या सगळय़ा मौसमात तुम्ही वापरू शकता. छत्र्यांमध्ये वयोगटाप्रमाणे बदलणारे डिझाइन तर आहेतच, पण त्यासोबत या नवीन डिझाइन आणि ट्रेण्डनेसुद्धा तरुणाईचे लक्ष वेधले आहे. छत्री ही बळकट आणि वादळी पावसात टिकणाऱ्या मटेरियलची असते तरीही त्यात इतकी व्हरायटी आहे. जर कपडे आणि ज्वेलरीसारखी तीही फक्त फॅशन असती तर तरुणाईने इक्कत, इंडिगो, एम्ब्रॉयडरी पद्धतीच्या छत्र्या आणल्या असत्या यात वाद नाही.

viva@expressindia.com