नीलेश अडसूळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यलढय़ापासून ते अगदी आताच्या घडीपर्यंत झालेल्या प्रत्येक आंदोलनात तरुणांचा सहभाग हा सक्रिय राहिला आहे. विद्यार्थी चळवळींची परंपरा असलेल्या आपल्या देशात न्याय मिळवण्यासाठी शांतपणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारत तरुणाईने एक वेगळा वस्तुपाठ घालून दिला होता, मात्र त्यांच्यावर झालेल्या हल्लय़ाने हे सगळेच वातावरण गढुळले. त्याविरोधात सध्या सगळा देश पेटून उठला असला तरी विद्यार्थ्यांच्या मनावर भयाचे कोरडे उठले आहेत..

स्वातंत्र्यलढय़ापासून ते अगदी आताच्या घडीपर्यंत झालेल्या प्रत्येक आंदोलनात तरुणांचा सहभाग हा सक्रिय राहिला आहे. त्यात भारताला असलेल्या सत्याग्रहाच्या आणि चळवळींच्या परंपरेमुळे इथे न्यायप्राप्तीसाठी आजही बंडाची दारे सर्वाना खुली असतात. जामिया मिलिया आणि जवाहलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) तरुणांचे आंदोलन हे ती परंपरा जिवंत असण्याचेच उदाहरण म्हणता येईल. विचारांना रोखण्यासाठी शस्त्राचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्याच दहशतवादाने याही आंदोलनाला गालबोट लावले. काही अज्ञात तरुणांनी जेएनयूमध्ये घुसून तिथल्या विद्यार्थ्यांवर आणि प्राध्यापकांवर केलेला भ्याड हल्ला इथल्या हरवलेल्या विवेकाचे उत्तम दर्शन घडवतो. जरी या हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जात असला तरी या घटनेचे पडसाद मात्र विद्यार्थ्यांच्या मनातून सहज पुसले जातील असे वाटत नाही.

सध्या इथला गाळ निवळतोय असं म्हणायला हरकत नाही, परंतु जेएनयूसाठी या घटना इतिहासात नोंद होणाऱ्या असतील, असे इथले काही माजी विद्यार्थी सांगतात. त्यापैकीच एक कविता. कविताच्या मते, माध्यमांमध्ये दाखवले जाणारे डावे-उजवे गट प्रत्यक्षात अस्तित्वात असले तरी त्याची तीव्रता माध्यमांवर दाखवली जाते तितकी नाही. इथला प्रत्येक विद्यार्थी एका विशिष्ट विचारधारेने भारलेला आहे. आदिवासी समाजापासून ते उच्चभ्रू कुटुंबापर्यंत सर्व स्तरांतील विद्यार्थी इथे शिकतात आणि एकत्र राहतात. त्यामुळे देशात घडणाऱ्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटनांवर इथे सारासार विचार केला जातो. त्यात मतमतांतरे नक्कीच असतात, पण हिंसेपर्यंत जाण्याइतके वैमनस्य आजवर कधीच नव्हते जे या प्रकारातून पुढे आले. आपल्यावर एखाद्या विचारसरणीचा प्रभाव जाणवतो तशाच विचारधारेने इथले अनेक विद्यार्थी भारावून जातात. मग त्यांनी एखाद्या घटनेचे समर्थन केले तर तो उजवा आणि विरोध केला तर डावा, असे लेबल सर्रास लावले जाते. अनेकदा हे ‘लेबलीकरण’ही वादाला खतपाणी घालण्यास पूरक ठरते, असे ती म्हणते.

२८ ऑक्टोबरला सुरू झालेले आंदोलन शैक्षणिक प्रश्नातून नागरिकत्व, जामिया मिलियासारखे विविध वेटोळे घेत चिघळले आणि अखेर ५ जानेवारीला हाणामारीचा भडका उडाला. या प्रकरणाने देशभरातील एकूणच वातावरण ढवळून निघाले. याच धुमसणाऱ्या वातावरणातून सध्या जेएनयूतील प्रत्येक विद्यार्थी स्वत:ला सावरतो आहे. तिथे शिकणारा साजिद सांगतो, घडल्या प्रकाराला दहा दिवस उलटून गेले असले तरी परिस्थिती पूर्ववत व्हायला वेळ लागेल. वातावरणातला मोकळेपणा हरवून गेला आहे. जिथेतिथे पहारे आणि बंदोबस्ताचा वेढा आहे. प्रकरण आज-उद्या निवळेलही. विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली याचे अधिक दु:ख आहे. त्याच्या मते, मुलांच्या तुलनेने जेएनयूमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. ज्या निर्धास्तपणे पालक आपल्या मुलींना जेएनयूमध्ये दाखल करत होते ते चित्र आता पूर्णत: पालटून जाईल आणि नव्या प्रवेशावर गंभीर पडसाद उमटतील. इथे अनेक विद्यार्थी संघटना काम करत आहेत, अगदी जातीय गटांपासून ते विचारधारेपर्यंत नाना गट आहेत. वाद, प्रतिवाद, झगडे इथे काही नवीन नाही; पण हिंसेचा सूर कधीच कुणात नव्हता. जेएनयूच्या इतिहासात पहिल्यांदाच कदाचित असे विचारधारेवर गुंडगिरीने आक्रमण केले असेल. त्यामुळे या प्रकरणाचे खरे सूत्रधार कुणी निराळेच असतील, अशीही शंका तो व्यक्त करतो.

तर इथल्या सुरक्षेकडे बोट करत मिलिंद वास्तव अधिक प्रखरतेने मांडतो. त्याच्या मते, आता प्रकरण बऱ्यापैकी निवळताना दिसते आहे. झाल्या प्रकारात जरी पोलीस निष्क्रिय राहिले तरी आता मात्र कडक गस्त घालत आहेत. त्यामुळे विद्यापीठातले वातावरण सुरक्षित आहे असे म्हणायला हरकत नाही, कारण जेएनयूसंदर्भात समाजात झालेला पूर्वग्रह पाहता बाहेरचं वातावरण अधिक गढूळ आहे. त्यात दिल्ली सुरक्षेच्या बाबतीत आधीच बदनाम असल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठ आवारात राहणेच सुरक्षित आहे, असे तो सांगतो. तर आंदोलनावरील दडपशाहीच्या विरोधात बोलताना तो सांगतो, इथल्या आंदोलनाला चिरडण्याचे काम प्रथम विद्यापीठ प्रशासनाकडून केले जाते. मग नंतर राजकीय पक्ष यात सामील होतात. कदाचित विद्यार्थ्यांचा लढा हीच आमची ताकद असल्याने या ताकदीची कायमच प्रशासनाला भीती वाटत आली आहे. तर देशभरातून मिळालेल्या समर्थनानंतर जेएनयू एकटं पडल्याची भावना नाहीशी झाली, असेही तो सांगतो. आंदोलनाला मिळालेले उद्विग्न स्वरूप पाहून प्रत्येकालाच धक्का बसला होता. आपण एकटे आहोत, अशी भावना वाढीस लागतानाच देशभरातून लोक सहभागी होऊ  लागले. हा पाठिंबा पाहून प्रत्येक विद्यार्थ्यांला समाज आपल्यासोबत असल्याची जाणीव झाली; परंतु एवढे होऊनही अनेकांच्या मनात आजही आमच्याविषयी अढी आहे. ती दूर झाली तर नक्कीच समाधान वाटेल, असेही तो सांगतो.

मिलिंद सांगतो, इथे आल्यानंतर आपण कोण आहोत, आपले विचार काय आणि आपण कोणत्या गटाशी जुळवून घेऊ  शकतो याची जाणीव प्रत्येकाला काही दिवसांतच होते. ज्यांना विचारधारा नसते अशांचं ब्रेनवॉशिंगही इथे केलं जातं. कितीही मतभेद असले तरी ते केवळ शाब्दिक चकमकीपुरतेच मर्यादित राहतात. हिंसा हा पर्याय आमच्याकडे कधीच नव्हता. त्यामुळे आता मिळालेले हिंसक वळण प्रत्येकालाच अनाकलनीय आहे. विशेष म्हणजे जे विद्यार्थी डावे आणि उजवे दोन्ही प्रवाहांत येत नाहीत त्यांनाही मार पडला, त्यामुळे ते अधिक घाबरले आहेत. त्यामुळे एकंदरच क्लेशकारक वातारण जेएनयूत पसरले आहे, असे त्याने सांगितले.

जेएनयूत झालेल्या हल्ल्यानंतर विद्यार्थीच नाही तर कर्मचाऱ्यांपासून प्राध्यापकांपर्यंत सगळेच घाबरले आहेत. कुणालाच कल्पना नव्हती, की असं काही घडेल. आता सगळे शांततेच्या दिशेने चालले असले तरी अनेकांच्या मनात राग खदखदतो आहे हेही नाकारून चालणार नाही, असे जेएनयूतील विद्यार्थी पार्थ सांगतो. त्याच्या मते, इथे अनेक प्रकारचे राजकारण सुरू असते. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या गटावर अन्याय हा होतच असतो. जातीय वर्गाचाही मोठा पगडा इथल्या प्रशासनावर असल्याने जातीवरून आणि आर्थिक उत्पन्नावरून अनेक खटके उडत असतात; परंतु जो विद्यार्थी कोणत्याच संघटनेचा भाग नाही त्याची अधिक गळचेपी होते. शिवाय इथल्या सुरक्षेबाबतही वातावरण संभ्रमाचे असल्याचे तो सांगतो. त्याच्या मते, कुलगुरूंचे दुर्लक्ष, पोलीस प्रशासन असताना झालेला हल्ला या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या मनात विश्वासाची भावनाच उरलेली नाही. आज समाजमाध्यमांमार्फत इथला अनागोंदी कारभार लोकांपर्यंत पोहोचला, देशभरातून पाठिंबा मिळाला याचा आनंद आहेच, परंतु कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती देशातील अनेक विद्यापीठांमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आंदोलन होणे हे गरजेचेच आहे आणि अशा आंदोलनाला देशातून सहकार्य मिळाले तर नक्कीच परिस्थिती बदलायला मदत होईल, असा आशावाद पार्थ व्यक्त करतो.

सुधारकांची पाश्र्वभूमी असलेल्या भारतात अशा घटना घडणे प्रत्येकासाठीच हेलावणारे होते. विशेष म्हणजे हा हल्ला विद्यार्थ्यांवर झाला याचे अधिक दु:ख वाटते. वैचारिक मतभेदाला विचारांनी शह देण्याचे दिवस गेले की काय अशीच परिस्थिती देशभरात आहे. हे कुणी केलं, का केलं, हा शोध प्रशासन घेईलच; परंतु काही असंवेदनशील हल्लेखोरांची शिकार ठरलेल्या जेएनयू विद्यार्थ्यांच्या लढय़ात अवघा देश रस्त्यावर उतरला हेही दखलघेण्याजोगे आहे. निदान यावरून तरी देशात काही अंशी संवेदनशीलता शिल्लक आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

इथे अनेक विद्यार्थी संघटना काम करत आहेत, अगदी जातीय गटांपासून ते विचारधारे पर्यंत नाना गट आहेत. वाद, प्रतिवाद, झगडे इथे काही नवीन नाही पण हिंसेचा सूर कधीच कुणात नव्हता. जेएनयूच्या इतिहासात पहिल्यांदाच कदाचित असे  विचारधारेवर गुंडगिरीने आक्रमण केले असेल.

– साजिद

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fear has withered on students minds after jnu attack abn
First published on: 17-01-2020 at 04:18 IST