प्रियांका वाघुले
अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असताना फिटनेस महत्त्वाचा असतो, मात्र त्यासाठी नियमित व्यायाम करत असलो तरी अनेकदा वेळेअभावी हवा तसा आणि आवश्यक तितका व्यायाम करता येतोच असे नाही, असा आपला अनुभव असल्याचे अभिनेता सुयोग गोरे याने सांगितले. गेल्या काही वर्षांत ‘आम्ही बेफिकर’, ‘कृतांत’, ‘बसस्टॉप’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटामुळे सुयोगचा चेहरा घराघरांत परिचित झाला आहे.
अनेकदा कामाच्या व्यापामुळे व्यायाम आटोपता घ्यावा लागतो, पण असे असले तरी व्यायाम करण्याचे टाळत नसल्याचे त्याने सांगितले. जेव्हा आणि जसा वेळ मिळेल तसा तो व्यायामासाठी देत असल्याचे तो सांगतो. व्यायामासाठी पुरेसा वेळ देता येत नसला तरीही जिममध्ये व्यायाम करताना स्क्वॉट्स आणि डेडलिफ्ट या दोन गोष्टींना त्याच्या लेखी अतिशय महत्त्व असल्याचे तो सांगतो. वेळ कमी असताना स्क्वॉट्स आणि डेडलिफ्टसाठी जास्तीतजास्त वेळ देऊन मग इतर प्रकारांवर भर देत असल्याचे त्याने सांगितले.
त्याच्या मते स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये स्क्वॉट्स आणि डेडलिफ्ट हे शरीरातील मोठय़ा भागांवर प्रभावीपणे काम करणारे ठरतात. शरीरातील महत्त्वाच्या मोठय़ा भागांना जसे पाय मजबूत होण्यासाठी तसेच पाठीचे स्नायूही बळकट होण्यासाठी स्क्वॉट्स जास्त महत्त्वाचे ठरतात, फक्त ते योग्यप्रकारे केले पाहिजेत, असे त्याने सांगितले. स्क्वॉट्सबरोबरच डेडलिफ्टिंगमुळेही शरीरातील महत्त्वाचे अवयव कार्यरत होतात आणि त्यामुळे शारीरिक क्षमता वाढते. डेडलिफ्टिंगमुळे शरीर बळकट होते, शिवाय कमरेखालचे आजार दूर होण्यास मदत होते. त्यामुळे जिम प्रकारांमध्ये स्क्वॉट्स आणि डेडलिफ्ट हे माझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आहेत, असं सुयोग म्हणतो.
फिटनेससाठी केवळ व्यायामच नाही तर आनंदी राहून आयुष्य जगणेही तितकेच महत्त्वाचे आहे, याकडेही तो लक्ष वेधतो.
viva@expressindia.com