scorecardresearch

ओडिसा, छेनापोडा आणि बरंच काही..

भारताच्या इतर ठिकाणांपेक्षा ओडिसामध्ये मोठय़ा प्रमाणात सण-उत्सव साजरे होतात.

|| स्वागतिका

भारताच्या इतर ठिकाणांपेक्षा ओडिसामध्ये मोठय़ा प्रमाणात सण-उत्सव साजरे होतात. त्यामुळे उत्सव काळात वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ इथे केले जातात. इथली जगन्नाथपुरीची यात्रा प्रसिद्ध आहे. यात्रेदरम्यान पीठा म्हणजेच गोडाचे पदार्थ आणि पारंपरिक पदार्थ केले जातात. जगन्नाथ मंदिरात दर दिवशी ५६ प्रकारचे मिठाईचे प्रकार केले जातात. त्याला अभडा (प्रसाद) म्हणतात.

भुवनेश्वर हे ओरिसाच्या राजधानीचं शहर आहे. पण या शहराची ओळख मंदिरांचं शहर अशी आहे. भुवनेश्वर शहराला समृद्ध इतिहास, संस्कृती आणि अनोखी अशी खाद्यसंस्कृती आहे. तांदूळ इथलं प्रमुख पीक असल्यामुळे बहुतेक पाककृती या तांदळापासून तयार होणाऱ्या असतात. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या पाककृती इथे खवय्ये आवडीने चाखतात. परंतु मांसाहारी पाककृती इथे अधिक प्रसिद्ध आहेत. मांसाहारी पाककृतींमध्ये मासे, खेकडे आणि चिकनच्या पाककृती लोकप्रिय आहेत. स्वयंपाक करण्याची एक विशिष्ट पद्धत इथे आहे. इथल्या पाककृती तेलाचा आणि मसाल्याचा कमीत कमी वापर करून बनवल्या जातात. तरीही त्यांना वेगळी चव असते. बहुतेक पाककृतींसाठी मोहरीचं तेल वापरलं जातं, तर काही पाककृतींसाठी तुपाचा वापर केला जातो. इथे काही ठिकाणी पत्रावळीवर पारंपरिक पद्धतीने जेवण वाढलं जातं. गोड पदार्थ बनवताना छेनाचा (चीजसारखा पदार्थ) वापर जास्त केला जातो. ओडिसाच्या खाद्यसंस्कृतीविषयी तुम्हाला माहिती द्यायला मला जास्त आवडेल..

भारताच्या इतर ठिकाणांपेक्षा ओडिसामध्ये मोठय़ा प्रमाणात सण-उत्सव साजरे होतात. त्यामुळे उत्सव काळात वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ इथे केले जातात. इथली जगन्नाथपुरीची यात्रा प्रसिद्ध आहे. यात्रेदरम्यान पीठा म्हणजेच गोडाचे पदार्थ आणि पारंपरिक पदार्थ केले जातात. जगन्नाथ मंदिरात दर दिवशी ५६ प्रकारचे मिठाईचे प्रकार केले जातात. त्याला अभडा (प्रसाद) म्हणतात. रथयात्रेत भगवान जगन्नाथजी सात दिवसांसाठी बाहेर असतात. त्यानंतर पूजा होते आणि मग त्यांना मंदिरात नेलं जातं. त्यानंतर वर्षांतून एकदा रजे नावाचा एक सण ओडिसामध्ये साजरा केला जातो. हा सण तीन दिवसांचा असतो.

या सणाच्या तीन दिवसांत मुली कुठलेही काम करत नाहीत. त्या आराम करतात. त्यांच्या घरातील इतर मंडळी काम करत असतात. मुली फक्त छान छान कपडे घालून नटून-थटून धमाल-मस्ती करायच्या मूडमध्ये असतात. घरच्यांनी केलेल्या विविध पक्वान्नाचा आस्वाद त्या घेतात. हे तीन दिवस खास मुलींचे असतात, अशी ही परंपरा आहे.

‘छेनापोडा’ नावाचा एक गोड पदार्थ इथे प्रसिद्ध आहे. त्यामागे एक सुंदर गोष्ट आहे. एक सुदर्शन नावाची व्यक्ती होती. त्याने छेना (चीज सारखा प्रकार) आणि साखर घालून ओवनसारख्या एका जुन्या पद्धतीच्या एका भांडय़ात रात्रभर ठेवलं. सकाळी उठून त्यांनी पाहिलं तर त्या भांडय़ात एक सुंदर पाककृती बनली होती. त्याला ‘छेनापोडा’ असं नाव देण्यात आलं. तेव्हापासून ती पाककृती घराघरात बनू लागली. आता हा पदार्थ करण्यासाठी ओवनचा वापर केला जातो. ही पाककृती फक्त ओडिसामध्येच चाखायला मिळते, इतर कुठेच नाही. दूध उकळून त्यात लिंबाचा रस घालून त्यापासून छेना करतात. त्यात साखर आणि सुकामेवा घालून हा पदार्थ ओवनमध्ये तयार केला जातो. ‘पखाडो’ नावाची एक पाककृती इथे घरांघरांत बनते. तांदळाचा वापर त्यात असतो. ओडिसामध्ये चिकन करताना बटाटा त्यात घातला जातो. कांदा, लसूण आणि आलं यांची पेस्ट त्यात वापरली जाते. पण ओडिसामधील गावाकडे चिकन करताना आलं – लसूण आणि कांदा यांचं वाटण तयार केलं जातं. त्याने या पदार्थाला एक वेगळी चव येते.

ओडिसाचं स्ट्रीट फूड तुम्हाला चाखायचं असेल तर कटकचा दहीवडा प्रसिद्ध आहे, त्याची चव चाखलीच पाहिजे. तसंच इथे रसगुल्लाही मिळतो. या रसगुल्ल्यामध्ये गुळाचा वापर होतो. बंगाली पद्धतीचाही रसगुल्ला मिळतो. इथला रसगुल्ला हा बंगाली रसगुल्ल्यापेक्षा नरम असतो. इथे दहीवडा देताना त्याच्याबबरोबर आलू दमसुद्धा देतात. तसंच इकडे मुरमुरे मटणामध्ये घालून खाल्ले जातात. खाद्यपदार्थाच्या बाबतीत अशा अनेक गमतीजमती इथे अनुभवायला मिळतात. इथे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा ऋतुमानानुसारही पाककृतीचं वेगळं महत्त्व आहे. ‘पखाडो’ ही पाककृती उन्हाळ्यात जास्त बनवली जाते. पावसाळयात इथे ‘आलू चाप’ नावाचा पदार्थ केला जातो. कांदा आणि बटाटय़ाची भजी बनतात, तसाच हा प्रकार आहे. तसंच इथे मिळणारा समोसाही वेगळा असतो. बटाटय़ाचे बारीक तुकडे करून त्याची मसाला घालून भाजी केली जाते. त्याचं स्टफिंग करून हे समोसे तयार केले जातात. सूजी (रवा) का पीठा नावाचा एक पदार्थ सूजीला फ्राय करून बनवला जातो. ओडिसामधल्या रेस्टोरंटमध्ये मोठय़ा प्रमाणात भारतीय पद्धतीचं जेवण मिळतं. चायनीज वगैरे असे प्रकार कमी मिळतात. इथल्या मालपुआची चवही वेगळी असते. तसंच माशांची कालवणंसुद्धा वेगळ्या प्रकारची इथे मिळतात. तसंच कैरीच्या फोडी सुकवून त्याचाही वापर ग्रेव्हीमध्ये आंबटपणासाठी केला जातो. ड्राईड मँगो करी म्हणून इथली एक पाककृतीही प्रसिद्ध आहे.

ओडिसामध्ये तांदूळ आणि उडिदाचं पीक जास्त घेतलं जातं. त्यामुळे तशा पाककृतीही जास्त आहेत. इथे शहरांची संख्या कमी आहे. गावासारखा परीसर जास्त आहे. त्यामुळे पावसाळ्यात भाताची शेती के ली जाते. त्यानंतर कोबी वगैरे भाज्यांची पिकं घेतली जातात. पहाला नावाची एक जागा इथे आहे. भुवनेश्वर येथून ही जागा जवळ आहे. इथे विविध प्रकारची मिठाई मिळते. इथे मोठय़ा प्रमाणात गोडाचे पदार्थही मिळतात. त्यामुळे भुवनेश्वरला फिरायला आलेले पर्यटक घरी निघताना या जागी मिठाई आणि गोडाचे पदार्थ घरी घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी करतात. भुवनेश्वर आणि पुरीची यात्रा त्याचबरोबर सिलिका लेक आणि तिथेच जवळ असलेलं कालिमातेचं मंदिर आहे. त्यामुळे हा परिसर सतत पर्यटकांनी गजबजलेला असतो. पर्यटन आणि खाद्यसंस्कृतीची ही सफर वेगळी ठरते. एका बाजूने दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आणि दुसऱ्या बाजूला उत्तर भारतीय आणि बंगाली खाद्यसंस्कृतीचा प्रभाव यामुळे इथल्या पाककृतींमध्ये विविधता आढळते. प्रभाव असला तरी त्या जास्त उठून दिसतात.

मी गेली दोन वर्षं शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने चेन्नई ते ओडिसा अशी ये-जा करत असते. ब्लॉगलेखनाला सुरुवात करूनही एक वर्षं झालं आहे. ‘द फुडी विथ द बुक’ नावाच्या ब्लॉगवर मी लिहीत असते. यापुढे विविध प्रांतातल्या थाळी एक्स्प्लोअर करायच्या आहेत. महाराष्ट्रीय थाळी, गुजराती थाळी, राजस्थानी थाळी अशा सगळ्या प्रकारच्या थाळींबद्दल मी ऐकून आहे. त्यांचं वेगळंपण मला जाणून घ्यायचं आहे, मग त्याविषयी भरभरून लिहायचं आहे. मुंबईत आल्यावर वडा पाव आणि पाव भाजी या आवडत्या पदार्थावर मी ताव मारते. मी वेगवेगळ्या प्रकारचं चिकन खाल्लं आहे. पण ओडिसामधील चिकन मला खूप आवडतं. तसंच दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीतील ब्रेकफास्टचे सगळेच पदार्थ आवडतात. दक्षिण भारत आणि ओडिसा खाद्यसंस्कृतीच्या दृष्टिकोनातून एक्स्प्लोअर केला आहे. यानंतर गुजरात आणि महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीच्या सफरीवर मी निघणार आहे.

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Food odisha

ताज्या बातम्या