तिने फेसबुकला लॉगइन केलं आणि तिला तो जुना फोटो दिसला. ..शेअर्ड अ मेमरी विथ यू असं वाचताच तिच्या आठवणी जाग्या झाल्या. सहा वर्षांपूर्वीचा तो फोटो बघून आधी तिला आश्चर्य वाटलं, मग हसायला आलं. तो हास्याचा भर ओसरल्यावर तिला आठवला तिचा कॉलेजमधला पहिला फ्रेंडशिप डे. तेव्हाचाच हा फोटो. अकरावीत असतानाच्या त्या फोटोत सगळ्याच किती वेगळ्या दिसत होत्या. तिने तो फोटो लाइक केला, पुढे एक ‘हार्ट’सुद्धा पोस्ट केलं. मग कमेंट बॉक्समध्ये ‘लव्ह यू आणि मिस यू’ असं पोस्ट केलं. हे करतानाच तिला आठवला तिच्या कॉलेजच्या पहिला दिवस..

मराठी माध्यमात शिकलेली ती हुशार आणि चुणचुणीत मुलगी होती. दहावीत मार्काची नव्वदी पार करून नावाजलेल्या कॉलेजमध्ये तिने अ‍ॅडमिशन घेतली. आत्ता चांगले मार्क्‍स मिळाले म्हणून हुरळून जाऊ नकोस. कितीही झालं तरी शाळा मराठी माध्यमाची होती, कॉलेज मोठं आहे, नावाजलेलं आहे, तुझ्यापेक्षाही हुशार विद्यार्थी असतील तिकडे.. वगैरे वगैरे सांगून दडपण आणण्याला प्रयत्न अनेकांनी केला होता. त्यांना मारे हुशारीने गप्प केलं होतं, तरी नाही म्हटलं तरी पहिल्याच दिवशी कॉलेजचं वातावरण बघून थोडीशी बावरली होती ती. तिच्या ओळखीचं, तिच्या शाळेतलं तिच्या कॉलेजमध्ये कुणीच नव्हतं. नवीन कॉलेज, नवीन विद्यार्थी, ते सुद्धा तऱ्हेतऱ्हेचे. शहराच्या कानाकोपऱ्यातून, उपनगरांतून, काही तर शहराबाहेरूनही आलेले होते. काही जणांचे मित्र-मैत्रिणी ऑलरेडी त्यांच्याबरोबर होते, त्यामुळे ते छान गप्पा मारत मजा-मस्ती करत होते. लेक्चरची वेळ झाली तसे सगळे आपापल्या वर्गात गेले. पहिला दिवस, पहिलंच लेक्चर. त्यामुळे आलेल्या प्राध्यापकांनी स्वत:ची ओळख करून देऊन विद्यार्थ्यांची ओळख करून घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक विद्यार्थी उभं राहून आपली ओळख करून देताना, नावाबरोबरच कुठून आला, शाळा कोणती हेसुद्धा सांगत होता. तिच्या शेजारी बसलेल्या मुलीशी तिची ‘हाय हॅलो’ करून जुजबी ओळख झाली होती, पण वर्गातल्या प्रत्येकाच्या नावाकडे तिचं नीट लक्ष होतं. आपल्यासारखं मराठी आडनाव ती लक्षात ठेवत होती. ओळख करून घेताना मराठी माध्यमात शिकलेले कोण कोण आहेत याची तिच्या डोक्यात नोंद होत होती. ते लेक्चर संपल्यावर मधल्या वेळात गरजेपुरती ओळख झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपापल्या सोयीनुसार एकमेकांचा सविस्तर परिचय करून घ्यायला सुरुवात केली. तिच्याच सारखे मराठी माध्यमात शिकलेले विद्यार्थी आपोआपच एकत्र आले.DOSTI पुढे काही दिवस ती त्यांच्यातली होती. इतक्यात एका इंटरकॉलेज फेस्टिव्हलसाठी काही स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी एक नोटीस लागली, ती वाचून अनेक जण सांगितलेल्या वेळेत त्या ठिकाणी गेले. शाळेत प्रत्येक स्पर्धेतून हिरिरीने भाग घेणारी तीसुद्धा तिकडे गेली, पण एकटीच! तिचे नव्याने झालेले मित्रमैत्रिणी त्यात सहभागी होणार नव्हते. त्या फेस्टिव्हलसाठी संगीत, नृत्य, नाटय़, चित्रकला, वक्तृत्व, लेखन सगळ्याच प्रकारच्या स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी तिथे जमले होते. तिथेच भेटल्या या ‘सेवन स्टार्स’. या सात जणी म्हणून त्यांनीच हे नाव ठेवलेलं. ही आणि आणखी एक जण मराठी माध्यमात शिकलेली, बाकी चौघींच्या तर मातृभाषासुद्धा वेगवेगळ्या. तरीही तेव्हापासून आजपर्यंत एकही तारा न निखळता लटके राग, रुसवे-फुगवे, समजुतींसकट अबाधित आहे. आता उच्चशिक्षणासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे आज त्या प्रत्यक्ष भेटू शकत नव्हत्याच पण अर्थात व्हच्र्युअली त्या भेटणार होत्या, पुढच्यास काहीच मिनिटांत. म्हणूनच तिने लॉग आऊट केलं आणि ती सेलेब्रेशनच्या तयारीला लागली.

हा एक प्रातिनिधिक अनुभव आहे, पण आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला. कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसात काहीसं असंच चित्र कमी-अधिक फरकाने सगळीकडे दिसतं. समान माध्यमात किंवा शाळेत शिकलेली किंवा समान भाषिक मंडळी सहजपणे आपापले ग्रुप्स जमवतात. व्हर्नाक्युलर माध्यमांमधून शिकलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीबद्दल गंड असतो, आणि इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांना इंग्रजीतून बोलण्याबद्दल फाजील अभिमान असतो. राष्ट्रभाषेचा वापर म्हणजे तर अगदीच डाऊन मार्केट असतं.
पण काही दिवसांतच हे चित्र पालटतं. आवडीनिवडी, वेवलेंग्थ जुळल्यामुळे विविध माध्यमात शिकलेली, विविध भाषिक, विविध स्तरांतली मंडळी एकत्र येतात आणि त्यांचे बंध जुळतात. फ्रेंड्स?… फ्रेंड्स! असं फॉर्मली (किंवा फिल्मी) न म्हणतासुद्धा खूप सहज मैत्री होते आणि नंतर अनेक र्वष ती टिकतेसुद्धा.
मैत्रीला कोणतीही बंधनं नसतात हेच यातून अनुभवताना येतं. अर्थात, प्रत्येकाचे अनुभव वेगळे, प्रत्येकाचे विश्व वेगळे, पण वेगळ्या विश्वात राहूनसुद्धा मैत्रीचा धागा अतूट राहतो. हीच मैत्रीची ताकद असते, म्हणूनच सहवास संपला तरी मैत्री संपत नाही.
हेच सांगते इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर असलेली मधुरा आपटे. ती म्हणते, ‘डिप्लोमासाठी मी चेंबूरच्या विवेकानंद कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतली, तेव्हा मुळातच तिथे मराठी क्राऊड कमी, त्यात मी मराठी माध्यमातून शिकलेले, त्यामुळे सुरुवातीला साहजिकच मराठी माध्यमात शिकलेले नसले, तरी मराठी भाषिक मित्र-मैत्रिणी शोधले. नंतर काही दिवसांनी कॉलेजकडून एका प्रदर्शनासाठी सगळे सी.एस.टी.ला गेलेले असताना वर्गमित्र रौनक कपूर आणि भाविन मकवानाशी गप्पा मारताना जाणवलं, की आपले विचार जुळतात, तोच धागा पकडून आमची मैत्री झाली. आता १० र्वष झाली या गोष्टीला, पण आजही आमची मैत्री टिकून आहे.’

मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयात बी.ए.च्या पहिल्या वर्षांत शिकणाऱ्या स्वप्ना गोगवेकरचा अनुभव असा की, तिच्या कॉलेजमध्ये सुरुवातीला तिच्याबरोबरच डोंबिवलीहून जाणाऱ्या, तिच्याच वर्गातल्या मुली तिच्या मैत्रिणी होत्या, पण नाटकाची आवड असलेल्या त्या दोघी कालांतराने त्यांच्या आवडीत रमल्या, मग स्वप्नाने नवे मित्रमैत्रिणी शोधायला सुरुवात केली, तेव्हा साधी, संवेदनशील असणाऱ्या जान्हवी काटिरा हिच्याशी तिचं छान जमायला लागलं, बरोबरच मोहित जोशी, पॉल, इशा यांचा मस्त ग्रुप जमला, आता ते कायम एकत्रच असतात.
‘कॉलेजच्या आय.व्ही. (इंडस्ट्रिअल व्हिजिट) ला गेलेलो असताना, फोटो काढण्याची, म्हणजे, वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढून घेण्याची आवड आमच्या मैत्रीचं कारण ठरली.’ भिवपुरीच्या तासगांवकर महाविद्यालयातून इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेली चैताली मुंढे सांगते. तर पुण्यातल्या लोहगांव इथल्या एम.एम.आय.टी. महाविद्यालयातून इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेली तेजस्विनी थोरात म्हणते, ‘आमची मैत्री व्हायला विशेष काही कारण नाही लागलं, अगदी सहज एकमेकांशी बोलता बोलता फक्त क्लासमेट्स न राहता घनिष्ट मित्र-मैत्रिणी झालो.’
काय गंमत आहे ना! मैत्री व्हायला निमित्त लागत नाही, पण ती मैत्री साजरा करायला अनेक निमित्त आपण शोधत असतो. त्यातलंच एक निमित्त फ्रेंडशिप डे. नव्याने जमलेल्या, वर्षांनुर्वष मुरलेल्या, काळ, वेळ, भाषा, प्रांत, वय, व्यवसाय, कोणत्याही गोष्टींची मर्यादा नसलेलं हे अनोखं नातं शोधणाऱ्या, निभावणाऱ्या, टिकवणाऱ्या सगळ्यांना हॅप्पी फ्रेंडशिप्स डे!

-दुहिता सोमण