generation gap uncertainty in life career options for today s youth zws 70 | Loksatta

मन:स्पंदने : जनरेशन गॅपचा ताप

ऐश्वर्याचे पालक ते कॉलेजमध्ये असल्यापासूनच घरखर्चाला हातभार लावण्यासाठी नोकरी करत होते.

मन:स्पंदने : जनरेशन गॅपचा ताप
(संग्रहित छायाचित्र)

मृण्मयी पाथरे

अमोल नोकरी करायला लागल्यापासून जवळपास सात वर्ष झाली होती. या सात वर्षांत त्याने चार जॉब्स बदलले. प्रत्येक कंपनीने त्याला बऱ्यापैकी पगारवाढ दिल्यामुळे त्याने पटापट नोकऱ्या बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याच्या घरच्यांना हा इतक्या भरभर जॉब्स बदलायला लागल्याने काळजी वाटू लागली – ‘अमोल किती चंचल आहे, त्याला सतत नवनवीन गोष्टी आणि माणसं आजूबाजूला लागतात. याचे काही फायदे असले, तरी त्याच्या कंपनीला याच्याकडे ‘कमिटमेंट’ किंवा कंपनीबद्दल काडीमात्रही ‘लॉयल्टी’ नाही असं वाटलं तर? आमच्या काळी संपूर्ण करिअरच्या तीसेक वर्षांत आम्ही फार फार तर एक-दोनदाच जॉब बदलण्याचा विचार केला. याहून जास्त वेळा जॉब बदलला असता, तर आमचं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे हलून गेलं असतं. मंदी आली की या अशा एकीकडून दुसरीकडे पटापट उडय़ा मारणाऱ्या सशांनाच आधी कामावरून काढलं जातं. पण लाखांच्या पॅकेजेससमोर ही दूरदृष्टी आजच्या पिढीला कुठे अवगत होणार?’   

ऐश्वर्याचे पालक ते कॉलेजमध्ये असल्यापासूनच घरखर्चाला हातभार लावण्यासाठी नोकरी करत होते. पै अन् पै जमा करून त्यांनी स्वत:चं शिक्षण पूर्ण केलं आणि थोडं कर्ज काढून एक छोटंसं घरही विकत घेतलं. पुढे ऐश्वर्याचा जन्म झाल्यावर त्यांनी तिच्या शिक्षणात आणि इतर खर्चात कसलीही कमी पडू दिली नाही. मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या ऐश्वर्याने पुढे आर्थिकदृष्टय़ा स्थिर आणि स्वावलंबी होण्यासाठी एखादा ‘स्टेबल जॉब’ शोधून ‘सेटल’ व्हावं अशी तिच्या पालकांची फार इच्छा होती. मात्र ऐश्वर्याला तिचा स्वत:चा बिझनेस उभारायचा होता. ‘बिझनेस वगैरे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांसाठी नाही, त्यात खूप अस्थिरता असते. नोकरी करून काम केल्यावर दर महिन्याला निश्चित पगार तरी मिळतो! कंपनीने मंजूर करून दिलेल्या सुट्टय़ा घेतल्या तर आपल्या उत्पन्नातही फारसा फरक पडत नाही, पण बिझनेस करताना महिन्याला बऱ्यापैकी उत्पन्न होईल की नाही याची शाश्वतीच नसते. वरून सुट्टय़ा घेतल्याच, तर उत्पन्नाला टाटा, बाय बाय! रिटायरमेंटच्या वेळेस पी. एफ. नाही, ग्रॅच्युईटी नाही. उलट आपल्यालाच इतर सप्लायर्स आणि कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागतो. कशाला नको त्या फंदात पडायचं आणि स्ट्रेसला आमंत्रण द्यायचं?’ असं ऐश्वर्याच्या पालकांना खूप वाटायचं.

प्रत्येक पिढी शिक्षण, नोकरी, नाती, कुटुंबपद्धती अशा असंख्य गोष्टींबद्दल आपले विचार नेहमीच मांडत असते. पण आपण वर्षांनुवर्ष बारकाईने निरीक्षण केलं, तर दोन पिढय़ांचे विचार फार क्वचितच एकमेकांशी तंतोतंत जुळतात आणि हे होणं तसं स्वाभाविकच आहे. आपलं जसजसं वय वाढतं, तसतसं जैविक घडय़ाळाप्रमाणे (biological clock) शरीरात बदल होत जातात आणि त्याचा प्रभाव आपल्या मानसिक आरोग्यावरही पडतो. आपल्या सगळय़ांचं मानसिक स्वास्थ्यसुद्धा अशाच एका विशिष्ट घडय़ाळाशी संबंधित आहे. त्याला सोशल क्लॉक (social clock‘) असं म्हणतात. आपण या घडय़ाळानुसार आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे ((milestones) गाठण्याचा प्रयत्न करत असतो. हे घडय़ाळ आपलं वय, जेंडर आयडेंटिटी, लैंगिकता, राहण्याचं ठिकाण आणि तिथली संस्कृती अशा अनेक घटकांवर अवलंबून असतं.

या सोशल क्लॉकनुसार तरुण मंडळींना स्वत:चं स्वतंत्र जग आणि अस्तित्व निर्माण करणं, करिअरवर लक्ष केंद्रित करणं, जोडीदार शोधणं, त्यांच्यासोबत नातं बहरवणं, मुलाबाळांचा विचार करणं, भविष्यासाठी तरतूद करणं, पालकांना मानसिक आणि आर्थिक आधार देणं महत्त्वाचं वाटू शकतं. ही स्वप्नं पुरी करताना आपण योग्य ‘ट्रॅक’वर आहोत की नाही याची कित्येक जण त्यांच्या समवयस्क मंडळींशी तुलना करून पडताळणी करतात. या तुलनेतून आपण पुढे किती शिकावं, नोकरी करावी का स्वत:चा उद्योग उभारावा, आणखी मोठं घर घ्यावं की जग फिरण्यावर पैसे खर्च करावेत, लग्न करावं की करू नये, स्वत:चं मूल असावं की नसावं, कुटुंबीयांसोबत राहावं की इतर शहरात किंवा देशात स्थायिक व्हावं असे अनेक निर्णय घेतले जातात.

हे सोशल क्लॉक जसं तरुणांना लागू पडतं, तसंच ते त्यांच्या मध्यमवयीन पालकांनाही लागू पडतं. आयुष्याच्या या मधल्या टप्प्यावर पोहोचल्यावर गतवर्षांचा मागोवा घेताना घर-जॉब सांभाळताना, मुलांना मोठं करताना, पालकांची काळजी घेताना, रिटायरमेंटसाठी तजवीज करताना अर्ध्याहून अधिक आयुष्य कसं भर्रकन निघून जातं हे कधी कधी त्यांनाही कळत नाही. आणि जेव्हा याची जाणीव होते, तेव्हा जी स्वप्नं आपल्याला तरुणपणी पूर्ण करायची होती, ती राहून गेली ही रुखरुख लागून राहू शकते. आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन निसटलेल्या वेळेकडे आणि संधींकडे मागे वळून पाहणं मनाला बोचतं. त्यामुळे आपण घेतलेले निर्णय कसे ‘सेफ’ होते आणि आताची पिढी खूप ‘रिस्की’ निर्णय घेऊन उगाचच आयुष्यात अनिश्चिततेला पाचारण करते, असं मध्यमवयीन लोकांना वाटू शकतं.

गंमत आहे नाही का? आपण तरुणपणी भविष्यात काही गोष्टी करता याव्यात म्हणून चिंता करतो आणि आपली पन्नाशी-साठी जवळ आली की तरुणपणी घेतलेल्या किंवा न घेतलेल्या निर्णयाबद्दल विचार करत बसतो. वयानुसार हे असे विचार मनात येणं साहजिकच आहे. त्यामुळे आपण भले एका घरात कितीही काळ राहत असलो, तरी आपल्या आणि कुटुंबीयांच्या विचारांमध्ये तफावत कधी ना कधी आढळून येतेच. पण ही तफावत जाणवल्यावर कित्येक जण कोणाचे विचार बरोबर आणि कोणाचे चूक हे ठरवण्याचा अट्टहास करतात. आपलं म्हणणं बरोबर आहे हे पटवून देण्यासाठी झालेल्या ओढाताणीतूनच रुसवे-फुगवे, हेवेदावे आणि भांडणांना सुरुवात होऊ शकते. पण या दोन्ही पिढय़ा आपापल्या जागी योग्य आहेत, हे समजून घेतलं तर? तरुणांनी मोठय़ांच्या अनेक वर्षांच्या अनुभवांतून काय शिकता येईल याचा विचार केला तर? मोठय़ांनी त्यांना ज्या गोष्टी त्यांच्या वेळेस वडीलधाऱ्यांच्या दडपणाखाली येऊन किंवा आर्थिक परिस्थितीमुळे करता आल्या नाहीत त्या गोष्टी करण्याची स्पेस तरुणांना दिली तर? आपले विचार आपल्यासाठी अनुरूप आहेत, पण आजचं बदलतं जग पाहता ते आजच्या तरुण पिढीसाठी योग्य असतीलच असं नाही, हे लक्षात ठेवलं तर? यामुळे ही जनरेशन गॅप अगदी शंभर टक्के मिटली जाणार नाही, पण संवादातील आणि मनातील दरी थोडी तरी कमी होईल.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-11-2022 at 05:57 IST
Next Story
क्लिक पॉईंट : स्वप्नांचा पाठलाग करणारा दिग्पाल