वैष्णवी वैद्य मराठे

रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा हा आपल्या भारतीय संस्कृतीतील प्रमुख सणांपैकी एक आहे. वेगवेगळय़ा भागात हा सण विविध नावांनी प्रसिद्ध आहे. काही ठिकाणी हा सण कजरी-पौर्णिमा, नारळी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. दरवर्षी बहिणीला काय भेट द्यायची? हा सगळय़ा भावांना पडलेला प्रश्न असतो. हल्ली बहिणीसुद्धा अगदी उत्साहाने आपल्या भावांसाठी काहीतरी हटके भेट वस्तू घेत असतात. भेटवस्तू म्हणून कस्टमाईज्ड काहीतरी द्यावं किंवा आयुष्यभर आपली आठवण भावाला-बहिणीला राहील, अशा पद्धतीची काही वस्तू असावी असा आग्रह अनेकांचा दिसून येतो. त्यातूनच गिफ्टिंगच्या वेगवेगळय़ा संकल्पना आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून सुबक-कलाकुसरीच्या वस्तूंपर्यंत अनेक पर्याय बाजारात सध्या उपलब्ध झाले आहेत. अशा कुठल्या वेगळय़ा गोष्टी, गिफ्टिंगचे पर्याय सध्या ट्रेण्डिंगमध्ये आहेत त्यासंदर्भात बाजारात फेरफटका मारून घेतलेला हा आढावा..

nagpur wedding ceremony marathi news
आगळा वेगळा विवाह सोहळा! वर- वधूकडून एक हजारांवर औषधी वनस्पतींचे पाहुण्यांना वाटप
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Gudhi padwa 2024 sade tin muhurta
Gudhi Padwa 2024: साडेतीन मुहूर्त कोणते? गुढीपाडव्याशिवाय ‘या’ अन्य अडीच दिवसांचं महत्त्व काय?
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी

हॅन्ड-पेन्टेड शोपीस

हल्ली अनेक तरुण इको-फ्रेंडली आणि हॅन्ड-पेन्टेड वस्तूंकडे आकर्षित होत आहेत. इंस्टाग्राम हे अशा छोटेखानी बिझनेसचे उत्तम माध्यम बनले आहे. इंस्टाग्रामवरील एक तरुण बिझनेस वुमन प्राप्ती गुप्ता ही तिच्या ‘अनोखी क्राफ्ट्स’बद्दल सांगते, ‘‘लोकांना माझे प्रॉडक्टस आवडतात, कारण ते त्यांना युनिक वाटतात. तसेच मी ज्या थीमने या वस्तू बनवते ते लोकांना खूप आवडतं. ट्रेण्डिंग म्हणी, शब्द, टी-व्ही शो जे तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत त्यांचा विचार करून मी पेंटिंग आणि वस्तू तयार करते. राखीसाठी आम्ही काही मोजके हॅम्पर बनवले होते ज्याच्यात फ्रिज मॅग्नेट, राखी आणि चॉकलेट होते ’’ फ्रिज मॅग्नेटस, कॅरिकेचर मॅग्नेटस हे सध्या राखी गिफ्ट्ससाठी तरुणांच्या भरपूर पसंतीस पडत आहेत असे ती सांगते. वॉल-हँगिंग्स, नेम प्लेट्स, टेबल टॉप्स असेही अनेक नावीन्यपूर्ण आणि वेगवेगळय़ा प्रकारचे गिफ्टिंग ट्रेण्डिंग आहेत. यामध्ये तुम्हाला हवे ते रंग, तुम्हाला हवा तसा मेसेज तुम्ही बनवून घेऊ शकता. हे गिफ्ट दिसायलाही अगदी सुरेख दिसते आणि या समारंभाची आठवण म्हणून कायम तुमच्या जवळ राहू शकते. या सगळय़ा वस्तू बाराही महिने तुम्ही वेगवगेळय़ा निमित्ताने भेट म्हणून देऊ शकता.

रेझीन शोपीस

हा प्रकारसुद्धा सध्या बऱ्यापैकी तरुणाईच्या पसंतीस उतरला आहे, किंबहुना बरेच तरुण हे स्वहस्ते बनवून उपलब्ध करून देतात. रेझीन म्हणजे झाडांपासून मिळालेला एक प्रकारचा पातळ पदार्थ ज्याचे रूपांतर टिकवून प्लॅस्टिकमध्ये होऊ शकते. हे शोपीस दिसायला अतिशय आकर्षक असतात, तसेच होम डेकोर म्हणून उत्तम पर्याय आहेत. शोपीस, वॉल-क्लॉक असे पर्याय भेट म्हणून तुम्ही देऊ शकता. शिवाय, निसर्गापासून मिळालेला हा कच्चा माल असल्याने हे इको-फ्रेंडली गिफ्टचा उत्तम पर्याय ठरते आहे. रेझीन हा मूळत: लिक्विड पदार्थ असतो त्यामुळे त्याला कुठल्याही आकारात, रूपात, रंगात वापरता येते, अशाच पद्धतीने यापासून अनेक भेटवस्तू तुम्ही बनवू शकता. सध्या प्लॅस्टिक किंवा काचेच्या शोपीसपेक्षा हा पर्याय नक्कीच जास्त भावतो आणि टिकतो.

खणाच्या भेटवस्तू

खणाच्या वस्तू सध्या प्रचंड लोकप्रिय आणि तरुणांच्या शॉपिंग लिस्टमध्ये अग्रस्थानी आहेत. खणाच्या कपडय़ांसोबत खणाच्या पर्सपासून खणाच्या राख्यांपर्यंत कुठलीही वस्तू आजकाल खणाच्या कापडात मिळते. सोशल मीडियावर सखी क्रिएटिव्हसकडून खणाच्या सुंदर वस्तू तुम्ही गिफ्टिंगसाठी घेऊ शकता. यांच्याकडे खणाची पर्स, राखी, खणाचे छोटे ट्रे, खणाच्या डायरीज् अशा नावीन्यपूर्ण वस्तू मिळतील. याशिवाय खणाचे नथ डिझाइन क्लच हे त्यांचे हॉट-सेलिंग आणि लोकप्रिय प्रॉडक्ट आहे. हल्लीच त्यांनी नवीन लॉन्च केलेले प्रॉडक्ट म्हणजे खणाचे वॉल-क्लॉक आणि खणाच्या नेम प्लेट. हे दिसायला आणि भेट म्हणून द्यायला उत्कृष्ट पर्याय आहेत. हेसुद्धा तुम्ही इतर काही निमित्ताने भेट म्हणून देऊ शकता. आधुनिक डिझाइन, नावीन्यपूर्ण संकल्पना यामुळे या सगळय़ाच वस्तू सध्या खूप ट्रेण्डमध्ये आहेत. 

परफ्युम्स

हा प्रकारसुद्धा गिफ्टिंगसाठी सध्या मोठय़ा प्रमाणात प्रचलित होतो आहे. पूर्वीच्या काळी फक्त बडय़ा लोकांचे शौक म्हणून परफ्युम्स वापरले जायचे. पण आता भेट वस्तू म्हणून किंवा आवड म्हणून सगळय़ांकडेच एखादे तरी परफ्युम पाहायला मिळते. मुंबई-पुण्यात बऱ्याच प्रमाणात परफ्युम पार्लर आहेत. जिथे फक्त विविध प्रकारचे अस्सल परफ्युम्स तुम्हाला मिळतील. डोंबिवलीत ‘के.के. एंटरप्राईजेस’ या नावाने केतन काळे हा तरुण स्वत: बनवलेले परफ्युम्स उपलब्ध करून देतो. ‘‘माझ्याकडे शक्यतो युनिसेक्स परफ्युम्स असतात, कारण ते जास्त विकले जातात आणि तरुणांना आवडतात. परफ्युमसुद्धा आजकाल वेगवगेळय़ा साइझ आणि प्रकारात आपल्याला मिळू शकतात. पेन परफ्युम, पॉकेट परफ्युम हे सध्या तरुणांचे आवडते प्रकार आहेत, कारण नावाप्रमाणे छोटय़ा साइझमध्ये अतिशय कॉम्पॅक्ट आणि सहज कॅरी करता येणारे हे प्रकार आहेत. साधारणपणे आपल्या बहिणीचे/भावाचे व्यक्तिमत्त्व आपल्याला माहिती असते त्याप्रमाणे तुम्ही डार्क, लाइट परफ्युम घेऊ शकता’’ असे केतनने सांगितले. आपल्याकडे कार्यक्रमांमध्ये कोणाचेही स्वागत करताना अत्तरकुपी दिली जाते जेणेकरून त्यातले अत्तर संपले तरी सुगंध दरवळत राहील आणि ती आठवण कायम जपली जाईल. याच उद्देशाने तुम्ही छान असा परफ्युम भेट देऊ शकता. शिवाय, परफ्युम हे छानशा डेकोरेटिव्ह बाटलीतच मिळते त्यामुळे फार आकर्षक गिफ्ट-रॅपिंगचीही चिंता नसते.

काळ बदलला तशा सण साजऱ्या करण्याच्या पद्धतीही बदलल्या. पूर्वीच्या काळी बहिणीचे लग्न झाल्यावर ती दुसऱ्या गावी लांब राहायला गेली की आता सारख्या खूप भेटी-गाठी व्हायच्या नाहीत. तेव्हा राखी पौर्णिमा आली की भाऊ-बहीण दोघांचेही ऊर आनंदाने भरून यायचे, कारण त्या निमित्ताने भेट व्हायची. गेल्या वर्षी सगळय़ांचीच राखी पौर्णिमा अगदी आनंदात आणि दिमाखात साजरी झाली. कोव्हिडच्या सावटानंतर जवळपास अडीच-तीन वर्षांनी सगळे भेटले होते. कोविडमुळे आलेला दुरावा एकाअर्थी नात्यांना पुन्हा एकत्र आणणारा ठरला आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा प्रत्येक सणाला तरुणाई जोरदार तयारी आणि सेलिब्रेशन करताना दिसते आहे. सोलो ट्रिप्स आणि डेस्टिनेशन वेडिंग्ससारखंच आता डेस्टिनेशन रक्षाबंधन साजरं होतानाही दिसतं. भरपूर भावंडं वेगवेगळय़ा ठिकाणाहून भेटणार असतील तर सगळय़ांनाच सोयीची म्हणून एखादी जागा ठरवली जाते आणि छान असे रक्षाबंधनचे आयोजन केले जाते. मग त्याच्यात कस्टमाइज्ड थीम डेकोरेशन, कपडे, गिफ्ट्स असं सगळंच असतं. कपडे, सोने, दागिने या सगळय़ा वस्तू आता सगळय़ांकडेच असतात आणि त्या शक्यतो स्वत:च्या स्वत: घ्यायला आवडतात म्हणून या वर्षी अशा पद्धतीच्या कस्टमाइज्ड भेटवस्तूंचा नक्की विचार करा. येणाऱ्या राखीपौर्णिमेच्या सगळय़ांना शुभेच्छा!