डिझायनर मंत्रा : इतिहासाचे धागे पकडून ठेवणारा डिझायनर – विनय नारकर

व्यवसायाने कॉर्पोरेट वकील असलेल्या विनयला भारतीय टेक्स्टाइलविषयी असलेली आवडच या क्षेत्राकडे खेचून घेऊन आली

(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गायकवाड

भारतीय वस्त्रपरंपरेविषयी अफाट प्रेम, त्याचा अभ्यास आणि त्यावर प्रचंड मेहनत घेऊन सुंदर कलाकृती घडवणाऱ्या कारागिरांना पुढे घेऊन जाण्याचा ध्यास बाळगणारा, त्यासाठी सातत्याने झगडणारा टेक्स्टाइल आणि फॅ शन डिझायनर म्हणजे विनय नारकर. अतिशय अभ्यासू पद्धतीने काम करत फॅ शनसारख्या ग्लॅमरस विश्वात त्याने ‘विनय नारकर डिझाइन’ हा त्याचा ब्रॅण्ड प्रस्थापित केला आहे, या बॅ्रण्डअंतर्गत गेली १० वर्ष तो सातत्याने काम करतो आहे. ‘लोकसत्ता व्हिवा’मध्ये गेल्या वर्षी त्याने टेक्स्टाइल इंडस्ट्रीतून हरवत चालेल्या वेगवेगळ्या कापड प्रकारांविषयी अगदी इतिहासाच्या पोटात शिरून ‘विरत चालेले धागे’ या  सदरातून वर्षभर माहिती दिली होती.

व्यवसायाने कॉर्पोरेट वकील असलेल्या विनयला भारतीय टेक्स्टाइलविषयी असलेली आवडच या क्षेत्राकडे खेचून घेऊन आली. त्याबद्दल तो सांगतो, ‘मी पात्रतेनुसार कॉर्पोरेट वकील आहे. नॅशनल लॉ स्कूल, बंगळूरूमधून माझं शिक्षण पूर्ण झालं. मी मुंबईत एका लॉ फर्मबरोबर काम करत होतो. भारतीय टेक्स्टाइल ही माझी आवड असल्याने मी वेगवेगळ्या गोष्टी गोळा करायचो. वेळ मिळेल तसा त्याचा अभ्यासही करायचो. मी माझ्या पत्नीसाठी दोन साडय़ाही विणल्या होत्या. त्या साडीचं मित्र आणि नातेवाईकांनी खूपच कौतुक केलं. त्यांनी अगदी स्वत:साठीसुद्धा साडय़ा मागवल्या. इथून सुरू झालेलं हे ऑर्डरचं सत्र पुढे वाढतच गेलं’. विनयला त्यानंतर साडय़ांसाठी अनेक ऑर्डर येऊ  लागल्या. या ऑडर्स पूर्ण करत असतानाच पुढे मला चित्रपट महोत्सवासाठी शाल डिझाइन करण्याची संधी मिळाली. आणि ती शाल भानु अथैया (प्रख्यात वेशभूषा डिझायनर आणि ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळविणारी पहिल्या भारतीय डिझायनर) यांना मान्यवरांपैकी एक म्हणून देण्यात आली. त्यांना ती शाल आवडली आणि माझ्या क्रिएशनचं त्यांनी कौतुकही केलं. त्यांनी मला माझ्या इतर क्रिएशन्सही दाखवायला सांगितल्या. आणि ते बघून त्यांनी फक्त त्याचं केवळ कौतुकच केलं नाही तर स्वत:साठी एक मोठी ऑर्डरही दिली. त्यांनी पहिल्यांदा पूर्णवेळ करिअर म्हणून फॅशनडिझाइनिंग क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिलं, असं विनय सांगतो.

एकदा या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय झाल्यानंतर हळूहळू मी माझं स्वत:चं कलेक्शन लॉन्च केलं, असं तो सांगतो. हे त्याचं पहिलंवहिलं कलेक्शन त्याने लोकांसमोर आणण्यासाठी प्रदर्शनांचा मार्ग निवडला. ‘मी माझ्या पहिल्या कलेक्शनसह मुंबईतल्या प्रदर्शनापासून सुरुवात केली, ज्यात मला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनानंतर मी माझी नोकरी सोडली. आणि विणकरांच्या जवळ असलेल्या माझ्या मूळ गावी सोलापूर येथे राहायला गेलो. तिथे आता मी पूर्णवेळ टेक्स्टाइल डिझाइनर म्हणूनच काम करतो आहे’, असंही त्याने सांगितलं.

विणकरांबरोबरचे विनयचे कामही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली हे तो सांगतो, ‘मी सुरुवातीला सोलापूरच्या विणकरांसोबत काम करायला सुरुवात केली. परंतु ते एवढे सुसज्ज नाहीत. तांत्रिक मदतीसाठी त्यांना गडवळांवर अवलंबून राहण्याची गरज भासते. आणि मला अधिक विणकरांची गरज होती, मी गडवळ (तेलंगणा) विणकरांसोबत काम करायला लागलो. मग हळूहळू पोचमपल्ली, चंदेरी, इरकल यांसारख्या इतर समूहांमध्येही काम करायला सुरुवात केली’. त्याच्या या एकित्रत कामातूनच त्याला अधिकाधिक विणकर आणि वेगवेगळ्या टेक्स्टाइलवर काम करायची संधी मिळाली. भारतीय वस्त्रपरंपरा जतन करण्याची जणून शपथच घेतलेला विनय सध्या अनेक विणकरांबरोबर वेगवेगळ्या लोप पावत चालेल्या टेक्स्टाइलवर काम करतो आहे. ‘मी एकाच वेळी लोप पावत चाललेल्या टेक्स्टाइलचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी काम करतो आहे आणि त्याच वेळी एक फॅ शन डिझायनर म्हणूनही सातत्याने वेगवेगळे कलेक्शन लोकांसमोर आणतो आहे. माझा अनुभव सांगतो की कापड परंपरा पुनरुज्जीवित करणे म्हणजे एकप्रकारे नवीन डिझाइन्स बनवण्यासारखेच आहे’, असं तो म्हणतो.

कोणत्याही टेक्स्टाइलचे पुनरुज्जीवन करणे म्हणजे त्याची प्रतिकृती बनवणे असा अर्थ होत नाही. त्यासाठी आम्हाला संपूर्ण सर्जनशील प्रक्रियेतून जाणं आवश्यक ठरतं, असं विनयने स्पष्ट केलं. जेव्हा मी स्वत:ची डिझाइन्स बनवतो, तेव्हा मी क्लस्टरचे विणण्याचे तंत्र मध्य टप्प्यावर ठेवतो. आणि समकालीन शब्दसंग्रहामध्ये ते एक्स्प्लोर करतो. मी जेव्हा कापड परंपरा पुनरुज्जीवित करतो तेव्हा मी परंपरेचं सौंदर्यशास्त्र लक्षात ठेवून काम करतो. मी सध्या महाराष्ट्रातील हरवलेल्या टेक्सटाइल परंपरा पुनरुज्जीवित करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे, असं त्याने सांगितलं. आपल्याला केवळ पैठणी माहिती आहेत, पण त्यापलीकडेही अशा इतर अनेक परंपरा आहेत, असं तो सांगतो. ‘आतापर्यंत मी इरकल साडय़ा, सोलापूर कॉटन साडय़ा, चंद्रकला साडय़ा, पैठणी शालू, इंदुरी साडय़ा पुनरुज्जीवित केल्या आहेत, अशी माहिती विनयने दिली. टेक्स्टाइल लोप पावत चालले आहे, असे आपण वारंवार ऐकतो, वाचतो. मात्र म्हणजे नेमके काय हे विनय समजावून सांगतो. नानाविध टेक्स्टाइल्स विणण्याचे तंत्र मुख्यत: हरवत चालले आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. या टेक्स्टाइलचे सौंदर्य काय आहे, ते समजून घेणं-त्याचा अभ्यास करणं फार कठीण होत चाललं आहे, असं तो म्हणतो. त्याचे कारण स्पष्ट करताना आपल्याकडे त्या त्या टेक्स्टाइलचे मूळ तुकडे नसतात, अशा वेळी मग त्या टेक्स्टाइलचा अभ्यास करण्यासाठी कापडांची परंपरा, साहित्य, कविता, फोटो, संग्रहालये याबद्दलच्या लेखनावर बऱ्याच वेळा अवलंबून राहावं लागतं, असं तो सांगतो.

भारतीय कापड आणि विणकाम याबद्दल सविस्तर सांगताना विनय म्हणतो की, ‘आपल्याकडे पारंपरिक टेक्स्टाइलचे ज्ञान आहे, तो आपला वारसा आहे आणि परंपरेनुसार एखादी गोष्ट सिद्ध झाली की ती टिकून राहते. एकदा हे समजून घेतलं की मग टेक्स्टाइल म्हणजे अमुकएक प्रकारचे कापड इथपर्यंत मर्यादित राहत नाही. तर त्यातून विशिष्ट प्रदेशातील जीवनशैली आणि सौंदर्यशास्त्र दिसून येते. त्यातलं तंत्र जे आहे ते त्या संपूर्ण समाजाची बौद्धिक संपत्ती आहे, ते ज्ञान आहे. त्यामुळे त्या संपत्तीची जपणूक झालीच पाहिजे. त्या ज्ञानाच्या आधारे जो समाज पुढे चालला आहे, त्यांचे संरक्षण हीसुद्धा आपली जबाबदारी आहे, असं विनय सांगतो. इतकंच नाहीतर केवळ वारसा जतन करणं हे आपलं कर्तव्य नाही, जे आपल्याकडे आहे त्यात चांगली भर घालून पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवलं गेलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे, याकडेही त्याने लक्ष वेधले.

विनय उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘गोवा कुतूर फॅशनवीक २०१९’ मध्ये ‘पेशवाई’ नावाचे कलेक्शन सादर करणार आहे. पेशवाईच्या काळातील साडय़ांबद्दल अभ्यास करून त्याने हे कलेक्शन बनवलं आहे. विनय या इंडस्ट्रीमध्ये येऊ  पाहणाऱ्या नवीन डिझायनर्सना आवर्जून सांगतो की, बाजारामध्ये काय चर्चेत आहे, काय विक्री योग्य आहे याबद्दल विचार करत बसू नका. तर मनापासून जे तुम्हाला वाटतं त्याचं अनुसरण करा आणि त्यातून नवनिर्मिती करत रहा. तुमच्या निर्मितीतील विशिष्टताच तुम्हाला बाजारात तुमचं स्थान मिळवून देईल, असा यशमंत्रही तो देतो.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Handloom heritage vinay narkar fashion designer abn

Next Story
१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट
ताज्या बातम्या