अनेकांच्या कुतूहल आणि आवडीचा विषय म्हणजे योग. ‘जागतिक योग दिवसा’च्या निमित्ताने त्याचा जगभर प्रचारही होतोय. योगासनांचा फिटनेससाठी कसा उपयोग होतो याचा विविध तज्ज्ञांशी बोलून घेतलेला आढावा..

योग भारतातलाच असूनही तो परदेशांतून आपल्याकडे आल्यावर आताशा त्याविषयी लोकांना कुतूहल वाटतंय. खरं तर ‘योग’ हा योग्य शब्द आहे. तरीही परदेशी उच्चारांनुसार बहुतांशी वेळा त्याला ‘योगा’च म्हटलं जातं. आपल्याकडच्या योगअभ्यासकांनी तिकडं जाऊन योग शिकवलाय. काही योगाभ्यास केंद्रांत केवळ परदेशींसाठी आयोजल्या जाणाऱ्या योगवर्गाना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आता तर योगाचा ट्रेण्डच आलाय. आजकाल बहुतांशी तरुणाईचा फोकस स्वत:वर असतो. सुरुवातीच्या काळात फ्लेक्झिबिलिटी वाढावी, स्किन ग्लो व्हावी, फिट राहावं, कोणताही आऊटफिट चांगला दिसावा अशा अनेक कारणांमुळे मुलं योगासनांकडं वळतात. मग मी ‘अमुक आसन शिकलो’, ‘तमुक अॅक्टिव्हिटी केली’, असे ‘स्टेटस अपडेट’ होतात. तरुणाईला त्यांची पर्सनॅलिटी चांगली दिसणं गरजेचं वाटतं. योगासनांमुळे शरीराबरोबर मानसिक स्वास्थ्यही लाभतं. किंबहुना मानसिक स्वास्थ्यासाठी योग जास्त उपयोगी आहे. कारण कोणतंही असलं तरी आजचे तरुण योग शिकतात. हळूहळू त्यांना योगाचं महत्त्व कळतं नि त्यांचा रस वाढू लागतो. मग त्यांना फिजिकल फिटनेससोबत मेंटल फिटनेसचीही आवश्यकता कळते.

आसन
कॉलेजगोअर्स असोत किंवा जॉबगोअर्स असोत, अभ्यास किंवा कामाच्या अनिश्चित वेळांचा परिणाम शरीर, झोप, आहारावर होतो. आपल्या नकळत या गोष्टींचा थोडा मानसिक ताण येतो. अभ्यास किंवा काम करताना पाठीच्या कण्याला खूप ताण येतो. त्याला आराम मिळण्याची फार आवश्यकता असते. कारण त्यावरच सगळ्या शरीराचा भार अवलंबून असतो. कण्याच्या दुखावण्यामुळे एकेक व्याधी सुरू होऊ  शकतात. त्याचे परिणाम चाळिशीनंतर दिसू लागतात. यावरचा उपाय म्हणजे योगासनं करणं. योगासनं करायला दिवसभरात अर्धा तास व्यायामासाठी काढायलाच हवा. सुरुवातीला बॉडी वॉर्मिग एक्सरसाइज केल्यानंतर योगासनं करावीत. विविध आसनं करून झाल्यानंतर शवासन करावं. शवासन म्हणजे झोपायचं आसन हा समज चुकीचा आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करून शवासन केल्यास आणि योगशिक्षकानं सांगितल्याप्रमाणे रीतसर आसन केल्यास आपण अंतर्मुख होतो. आपल्या मानसिक तणावापासून १० मिनिटांसाठी का होईना, लांब जाता येतं. यादरम्यान शरीराशी संवाद साधता येतो. एकाग्रता वाढते. फ्रेश वाटतं. योगनिद्रेचा वापर स्ट्रेस रिलीजसाठी केला जातो. शवासन झोपून केल्यानं आपोआपच कण्यालाही आराम मिळतो. एरवीच्या झोपण्यात आपलं विचारचR  थांबलेलं नसतं. पण या माध्यमातून आपण जाणीवपूर्वक मनाला आराम द्यायला हवा. शवासन केव्हाही करू शकता. विशेषत: स्ट्रेसफुल असताना करावं.

सूर्यनमस्कार
फिजिकल फिटनेससाठी सूर्यनमस्कार चांगले. खरं तर सूर्यनमस्कारांची वेळ सकाळचीच असते. ते तेव्हाच केलेले चांगले. आपण जिमला जातो तेव्हा बारीक होतो, पण ते सोडल्यानंतर त्या व्यायामात सातत्य न राहिल्यानं आपण मूळ पदावर येतो. एखादी गोष्ट टिकवून ठेवायला शारीरिक-मानसिक ताकद लागते, ती योगातून मिळते. योगासनांसाठी कोणत्याही साधनांची गरज लागत नाही. अप्पर बॉडी वर्क आऊट- लोअर बॉडी वर्कआऊट असे वेगवेगळे  करावे लागत नाहीत. सूर्यनमस्कारासारखा सर्वागसुंदर व्यायाम उपयोगी पडतो.

योगासन : स्ट्रेस बस्टर्स
कामाच्या ठिकाणी किंवा लायब्ररीत अभ्यास करताना स्ट्रेस आला तर पद्मासन उपयोगी पडतं. ते बसून करता येतं. शांत बसून विचार बाजूला टाकायचा प्रयत्न करायचा. श्वासावर लक्ष केंद्रित करायच्या प्रयत्नांमुळे स्ट्रेसची लेव्हल थोडी कमी होऊ  शकते. शांत बसताना विचार थांबवणं कठीण असतं. पण तोच प्रयत्न केला तर मग विचार थांबवायचाय, हाच विचार सुरू होतो आणि नकळतपणे ताणाच्या विषयापासून आपण लांब जातो. वेगळा विचार करायला लागतो. प्रत्येक आसनात श्वासनियंत्रण महत्त्वाचं असतं.

ट्रेण्डी योगोपचार
* सध्या योगाविषयीची जागरूकता वाढतेय. योग स्पर्धामधल्या स्पर्धकांची संख्या वाढताना दिसतेय. त्याखेरीज फिटनेस आणि स्लिम-ट्रिम होण्याच्या उद्देशानं योगासनांकडे तरुणाई वळतेय.
* लेटेस्ट ट्रेण्ड आहे तो योग विन्यासाचा. यात सातत्यानं आसनं केली जातात. एका आसनातून दुसऱ्यात जायची ही अॅक्टिव्हिटी आहे. हा ट्रेण्ड सध्या जगभर फॉलो केला जातोय. यात रिझल्ट्स खूप लवकर मिळतात नि एक्सरसाइजचं समाधानही मिळतं. हा व्यायाम आपापल्या क्षमतेनुसार, सोयीनुसार थोडासा मोल्ड करतात.
* सध्या युरोपमध्ये डिटॉक्स योगा हा प्रकारही लोकप्रिय आहे. शरीरातले टॉक्सिन अर्थात विषद्रव्य बाहेर काढायचे हे तंत्र आहे. व्यायामाच्या माध्यमातून डिटॉक्स करतात. डिटॉक्स योगाची सुरुवात हळू, मग वेग- ताकद वाढणं आणि मग पुन्हा कमी करून पुन्हा वाढवणं अशी अॅक्टिव्हिटी केली जाते.
* पॉवरयोगामध्ये काही विशिष्ट इक्विपमेंट चांगले रिझल्ट मिळण्यासाठी वापरली जातात. यंगस्टर्स त्याचा वापर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी करतात. तर तिशी-चाळिशीतले लोक याकडे स्टॅमिना वाढवण्यासाठी अधिकांशी वळतात.
* अॅक्वायोगा खूप फायद्याचा ठरतो. पाण्यात उभं राहून करायची ही आसनं असल्याने तरुण जास्त एन्जॉय करतात. पाण्यात हालचाली मंदावतात. पाण्याच्या दाबाचा येथे सकारात्मकरीत्या वापर केला जातो.
* अलीकडे अनेक तरुण मुलींच्या मासिक पाळीशी संबंधित तक्रारी असतात. या तक्रारींमधून बाहेर पडून नियमित पाळी येण्यासाठी योगासनं उपयोगी पडतात. वैयक्तिक समस्येनुसार पूरक आसनं असून ती तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करणं चांगलं. त्यातल्या सातत्यामुळेच फायदा होऊ  शकतो. झटपट रिझल्ट मिळवायच्या उद्देशानं याकडे पाहू नये.
* युरोप अमेरिकेनंतर योगोपचारांचा प्रसार पूर्वेकडेही होतोय. येत्या काही वर्षांत चीन हा योगाचा मोठ्ठा हब बनणार आहे. तिथं रिसर्च आणि योगा डेव्हलपमेंट स्टडीज सुरू आहेत.

योगासने की जिमिंग?
वेट ट्रेनिंग किंवा जिमिंग विरुद्ध योगासने ही काही स्पर्धा नाही. तुम्ही दोन्ही शिकू शकता. तसंच वेट ट्रेनिंग आणि योगासनं दोन्ही करता येतं. वेट ट्रेनिंगमध्ये शरीरावर लक्ष दिलं जातं. सुयोग्य मार्गदर्शनाखाली वेट ट्रेनिंग केलं तर सूक्ष्म शारीरिक अवयांपर्यंत पोहचू शकतो. त्यातून स्नायूंची ताकद वाढते. योगासनांचा मानसिक स्वास्थ्यासाठीदेखील उपयोग होतो. योगासनांमधून तुमचा श्वास, तुमच्या भावना, तुमचं मन या सगळ्यापर्यंत पोहोचू शकतो. पण त्यासाठी योग्य अशा प्रशिक्षित योग शिक्षकाकडून योगासनांचे धडे घेतले पाहिजेत. उदाहरणार्थ पुण्यात अय्यंगर स्कूल ऑफ योगा आहे. त्यांच्या शिष्यांकडून शास्त्रीय पद्धतीनं पतंजलीने सांगितल्याप्रमाणे योगोपचार शिकवतात. ठाण्यात घंटाळीपाशी असणारे निंबाळकर गुरुजी, निमकर गुरुजी असे काही चांगले गुरू आपल्याकडे आहेत. त्यांना ग्लॅमर नाही, पण त्यांचं काम मोठं आहे.

चालणं हा व्यायाम नाही. ती अॅक्टिव्हिटी आहे. ती प्रत्येकानं केलीच पाहिजे. किमान घरापासून कॉलेजपर्यंत, स्टेशनपासून ऑफिसपर्यंत चाललंच पाहिजे. व्यायाम याच्या पुढे जाणारा असतो. व्यायाम म्हणजे तुमच्या शरीराला आव्हान देणारी अॅक्टिव्हिटी. व्यायामातून तुम्ही शरीराची क्षमता वाढवणं अपेक्षित आहे. सूर्यनमस्कार हा सर्वागसुंदर व्यायाम आहे हे खरं. पण त्याचा वेटलॉस, स्पॉटरिडक्शन यासाठी वापर करणं योग्य नाही. प्रत्येकानं सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. योग्य पद्धतीने, श्वास नियंत्रण करून ते केले पाहिजेत. दररोज ८- १० सूर्यनमस्कार घातले तर फायदा होईल. याकडे वेट लॉस टूल म्हणून बघू नका. कारण अमुकने १०८ सूर्यनमस्कार घातले आणि ती बारीक झाली, असं समजून ते करायला जाल आणि पाठदुखी, गुडघेदुखीची साथ मिळवाल.

संकलन – राधिका कुंटे
(हा लेख ठाणे जिल्हा योग असोसिएशनचे सरचिटणीस विशाल पाटील  आणि प्रशिक्षक प्राची शेंबेकर यांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे.)