प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टचं एक गाणं तुम्ही नक्की ऐकलं असेल.. ‘यू बिलाँग विथ मी’. त्यातली एक ओळ आहे – शी वेअर्स शॉर्ट स्कर्ट, आय वेअर टी-शर्ट्स.. शी वेअर्स हाय हिल्स, आय वेअर स्नीकर्स.. स्नीकर्स साधे आहेत. ट्रेंडी, फॅशनेबल नाहीत, हे यातून दिसतं. पण लोकहो.. ट्रेण्ड बदलला आहे. हाय प्रोफाइल सेलेब्रिटीज आनंदाने स्नीकर्स मिरवताहेत. वनपीस, जम्पसूट, स्कर्ट्स, डेनिम्स कशावरही स्नीकर्स घातले तरी हल्ली ट्रेण्डी वाटतंय. स्नीकर्स एव्हरीवेअर हे फॅशन स्टेटमेंट हिट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फॅशन जगतात सतत नवनवीन बदल होत असतात. आजचे ट्रेंड्स उद्या जुने झालेले दिसतात. दिवसा दिवसाला दिसणाऱ्या बदलांमध्ये प्रयोगशीलता आढळते, कलात्मकता आढळते. शेवटी फॅशन म्हणजे केलेले वेगवेगळे कलेचे प्रयोगच. त्यातलेच सफल झालेले काही प्रयोग आपल्याला ट्रेंड्स म्हणून ओळखू लागतो.
अशाच प्रयोगांमध्ये एक प्रयोग सध्या हिट ठरतोय. म्हटलं तर हा ओल्ड फॉम्र्युला. पण तरीही तो ट्रेण्डी ठरलाय. हा ट्रेंड आहे ‘स्नीकर्स एव्हरीवेअर’. स्नीकर्स म्हणजे सॉफ्ट शूज. जनरली स्पोर्ट्स, वॉक किंवा कॅज्युअल ड्रेसिंगवर घालायचे जोडे. अ‍ॅथलेट शूजच्या जवळ जाणारे असल्याने स्नीकर्स मुलांमध्ये जास्त लोकप्रिय होते. मुलीहीदेखील स्नीकर्स घालायच्या. पण क्वचित कधी डेनिम्सवर कॅज्युअल आऊटिंगला जाताना किंवा सकाळी फिरायला जाताना, ट्रिपला जाताना, प्रवासाला वगैरे. सध्या मात्र स्नीकर्स पूर्ण फॉर्मात आलेत. केवळ डेनिम्सच नाही तर वनपीस ड्रेस, जंपसूट , स्कर्ट्स आणि अशा बऱ्याच वेस्टर्न वेअरबरोबर स्नीकर्स घालण्याचा ट्रेण्ड नव्याने आलाय. जनरली कुठल्या आऊटफिटवर काय घालायचं हे त्या काळच्या ट्रेण्डवर अवलंबून होतं. म्हणजे १०-१२ वर्षांपूर्वी जीन्सवर फ्लॅट चप्पल घातली तर अजिबात फॅशन सेन्स नसणारी काकूबाई म्हटलं जायचं. पण तीन-चार वर्षांपूर्वी फ्लॅट्स, चप्पल्स कशावरही घालण्याचा ट्रेण्ड आला होता. आता तोच ट्रेण्ड बदललाय. नव्या फॅशनचे वेस्टर्न आऊटफिट्स बाजारात आले की, त्याबरोबर त्याला साजेसे फूट वेअरही दिसू लागतात. ते घेण्यावर भर असतो. पण आता सर्रास स्नीकर्स वापरले जात आहेत.
स्नीकर्समध्ये अनेक कलर्स, पॅटर्न्‍स, डिझाइन्स बघायला मिळताहेत. प्लेन, चेक्स, फ्लोरल इत्यादी पॅटन्समध्ये ते उपलब्ध आहेत. नियॉन कलर्सपासून ते अगदी साध्या पांढऱ्या रंगापर्यंत स्नीकर्स फॅशनमध्ये आहेत. आपल्या कपडय़ांना, व्यक्तिमत्त्वाला शोभतील असे पॅटर्न आणि रंग तुम्ही स्नीकर्समध्ये निवडू शकता. स्नीकर्सने ट्रेण्डी लुक मिळेल हे नक्की. बेसिक ब्लॅक किवा व्हाईट कलरमधील स्नीकर्सही तुम्ही नक्कीच वापरू शकता. हल्ली स्नीकर्समध्ये शाळेत वापरतात अगदी तशाच कान्व्हास शूजचाही समावेश आहे . फक्त वेगवेगळे डिझाइन, िपट्र्स इत्यादी वापरून त्याला कूल लुक दिला गेला आहे. अशा प्रकारचे कलेक्शन सगळ्या फूटवेअर ब्रॅण्डनी नव्याने बाजारात आणले आहे. त्याची किंमत ब्रॅण्डनुसार बदलते. ब्रॅण्डेड स्नीकर्स ७०० ते १००० रुपयांपासून सुरू होणारे आहेत. ब्रॅण्डेड नको असतील तर शहरातल्या मेन मार्केटमध्येही तुम्हाला स्नीकर्स बघायला मिळतील. मुंबईत बांद्रा लिंकिंग रोड, कुलाबा, गोखले रोड (ठाणे) अशा ठिकाणी तर पुण्यात फग्र्युसन कॉलेज रोड, कॅम्प या स्ट्रीट मार्केटवर स्नीकर्सचं कलेक्शन दिसतंय. याची किंमत २५० ते ५०० रुपयांपर्यंत आहे . स्नीकर्समध्येही प्लॅटफॉर्म स्नीकर्स, हाय हिल वेजेस, हाय हिल स्नीकर्स, बक्कल स्नीकर्स, हाय अँकल वेजेस स्नीकर्स इत्यादी प्रकार उपलब्ध आहेत. उन्हाळ्यात तर अशा स्नीकर्सचा चांगलाच फायदा होईल . आपल्या पावलांचा सन टॅिनगपासून बचाव करायचा असेल तर ही नवीन स्टाइल नक्कीच उपयोगी ठरेल. बरोबर स्टाइलिश लुकसुद्धा मिळेल. पण सावधान.. पावसाळ्यातल्या धो- धो पावसात कापडी स्नीकर्स सोयीचे नाहीत. हा ट्रेण्ड फार काळ टिकणारा दिसत नाही. त्यामुळे सीझन बघूनच स्नीकर्सची निवड करा आणि आपलं स्टाइल स्टेटमेंट वाढवत न्या.
प्राची परांजपे – viva.loksatta@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I wear sneakers
First published on: 05-06-2015 at 01:13 IST